किरणने अतिशय मोजक्या शब्दांत स्वतःची समस्या डॉक्टरांसमोर मांडली. आपली समस्या सांगताना ती डॉक्टरांच्या चेहऱ्यावरील भाव, डोळ्यांमधील जाण, त्यांची देहबोली… सगळं बारकाईने जोखत होती. परंतु त्यांच्या बद्दलचे तिच्या मनातील पूर्वग्रह चुकीचे निघाले. ते किरण खुर्चीत बसल्यापासून जसे होते तसेच एकाग्रतेने ऐकत राहिले. मधूनमधून
“हं… बरं… ओके…”
असं म्हणत त्यांनी तिचं मनोभावे ऐकून घेतलं.
किरणचं सांगून झाल्यावर त्यांनी तिच्या समोर पाण्याचा ग्लास ठेवला. किरणलाही खरोखरच पाण्याची गरज होती. आयुष्यात असाही प्रसंग येईल, याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती. तिने पाण्याचा ग्लास हातात घेतला, दोन घोट पाणी प्यायले आणि डॉक्टरांकडे अपेक्षेने पाहू लागली… आता त्यांची काय प्रतिक्रिया असेल?
डॉक्टरांनी आपल्या ड्रॉवरमधून कॅडबरी इक्लेअर्स काढले आणि किरणला देत संवादास सुरुवात केली.
“तुम्ही आपली समस्या मोजक्या शब्दांत अतिशय विश्वासाने मांडलीत. तुम्हाला जाणीव आहे की या प्रेमातून काहीच निष्पन्न होणार नाही, आणि तुम्हाला स्वतःला वाटतंय की या भावनांच्या जाळ्यातून बाहेर यायचं आहे… मला हे ऐकून आनंद वाटला."
"तुम्ही अगदी योग्य मार्ग निवडलाय, आणि तुम्हाला या समस्येतून बाहेर निघण्यासाठी आपण नक्कीच मदत करणार आहोत, आणि तुम्ही त्यातून बाहेरही येणारच!"
"परंतु तुमच्या चेहऱ्यावरून मला असं दिसतंय की तुम्ही या ताणामुळे खूप थकल्या आहात. तुमचा मेंदू आणि मन थकून कोलमडलेय. म्हणून आपण सर्वात आधी आपल्या मनाला आणि मेंदूला आराम देऊया. त्यांचा थकवा दूर झाला की आपण त्यांच्या बरोबर मिळून या समस्येतून बाहेर पडण्यासाठी पुढची पावलं उचलूया. मी काही औषधं देतो. ती खाली मेडिकलमध्ये मिळतील. आजपासून ती सुरू करा. आपण सात दिवसांनी पुन्हा भेटू. आपणांस आणखी काही विचारायचं आहे का? काही सांगायचं राहून गेलंय असं वाटतं का?”
डॉक्टरांच्या बोलण्याची जादू किरणवर झाली होती. मनात आत्मविश्वास निर्माण झाला होता. तिने मानेनेच नकार देत म्हटलं…
“नाही, नाही डॉक्टर! मला काही विचारायचं नाही आणि काही सांगायचंही राहिलेलं नाही.”
किरणचं उत्तर ऐकून डॉक्टरांनी त्यांच्या लेटरपॅडवर प्रिस्क्रिप्शन लिहिलं आणि ते तिच्या हाती दिलं. किरणने ते प्रिस्क्रिप्शन हातात घेतलं आणि तरंगतच रिसेप्शनला आली. मॅडमने तिला फीची रक्कम सांगितली आणि पुढील आठवड्याची तारीख तिच्या फाइलवर नमूद केली. किरणने फीचे पैसे दिले आणि उत्साहाने जिना उतरून हॉस्पिटलच्या खाली आली.
बाहेर मेडिकलमधून तिने डॉक्टरांनी लिहून दिलेल्या गोळ्या घेतल्या आणि काळजीपूर्वक आपलं नाव पडताळून पाहिलं. त्या व्यवस्थित खिशात ठेवल्या.
आता नेक्स्ट काय?
पुन्हा तिच्यासमोर तोच यक्षप्रश्न उभा राहिला.
घडलेल्या घटनांनी आणि डॉक्टरांच्या भेटीमुळे लकी काही अंशी विस्मृतीत गेला होता. मनातील बोच काहीशी बोथट झाली होती.
तिने ठरवलं… थोडं मार्केटमध्ये फिरून एखाद्या हॉटेलमध्ये जेवून नंतरच घरी जाऊया.
त्याप्रमाणे ती मार्केटमध्ये शिरली. मन-मस्तिष्कातून लकीचं भूत काहीसं बाजूला झाल्यामुळे तिला बाजारातील रांगेत थाटलेली दुकाने काय विकत आहेत हे दिसत होतं. नाहीतर दिवस-रात्र लकीचाच चेहरा डोळ्यां समोर असायचा. किरणला हा बदल खूप आवडला. त्या आनंदात तिने स्नॅक्सच्या दुकानातून सकाळच्या नाश्त्यासाठी काही पाकिटं घेतली.
फिरत फिरत जेवणाची वेळ झालीच होती. तिला हॉटेल सागरमधील थाळी खायची होती. आज हॉटेलमध्ये गर्दी तशी कमीच दिसत होती. तिला जागाही व्यवस्थित मिळाली. वेटरने तत्परतेने स्पेशल थाळी आणून तिच्या पुढे ठेवली. थाळीतील पदार्थांच्या सुवासानेच भूक चाळवली गेली होती.
सगळी थाळी संपवून किरणने कसाटा आईस्क्रीम मागवली. एक प्लेट खाऊनही मन भरत नव्हतं, पण तिने मनाला आवरलं आणि वेटरला टीप ठेवून बिल पेड करत बाहेर पडली. बरेच रिलॅक्स वाटत होतं. किरण शतपावली करत घरी पोहोचली. तिला डॉक्टरांच्या गोळ्या खाऊन काय फरक पडतोय, याची तीव्र उत्सुकता लागली होती.
घरी येऊन तिने पसारा आवरला… केर काढला, धुवायचे कपडे एका बाजूला ठेवले, अस्ताव्यस्त किचन आवरलं, स्वतःचं कपाट लावलं. ऑफिसचे कपडे, बॅग, शूज सगळं व्यवस्थित ठेवलं.
मनात विचार सुरू होते…
“आता खूप झालं कुणाच्या मागे फरफटत जाणं… येथून पुढे आपलं आयुष्य सावरून, आत्मसन्मानाने आणि आनंदी जगायचं. फक्त डॉक्टरांच्या गोळ्यांनी यातून बाहेर पडण्यासाठी मदत करावी.”
किरणने झोपायची तयारी केली आणि रात्री दहाचा टाइम औषधांचा फिक्स केला. ती एक चिमुकली टिकली एवढी गोळी काढून आपल्या तळहातावर ठेवली.
मनात विचार आला…
“इतकीशी ही गोळी आपल्या मेंदूमधून लकीला हद्दपार करणार? आधुनिक विज्ञानामुळे किती गोष्टी शक्य झाल्यात.”
किरणने त्या गोळीला आपल्या माथ्याला लावत, डोळे मिटून देवाचं नामस्मरण करत म्हटलं…
“हे परमेश्वरा, मला या जंजाळातून बाहेर यायला मदत कर.”
असं मनात म्हणत तिने ती गोळी गिळली आणि पाणी प्यायलं. लाईट विझवून समाधानाने उशीवर डोकं टेकवलं.
“चला…”
म्हणून मोबाईल हातात घेतला.
नोटिफिकेशन्समध्ये एक अनरीड मेसेज दिसत होता. लकीचं नाव वाचून तिचा श्वास जड झाला. डोळ्यांत पुन्हा एक वेड कब्जा करू लागलं. किरण त्रासली होती…
“का? का हा सारखा माझं आयुष्य व्यापून टाकतोय? एकतर मला साथही देत नाही… आणि साथ सोडताही नाही…”
तिने धाडसाने मेसेज उघडला…
“Life is nothing when we get everything,
But life is everything when we miss something in life.
Value of people will be realized in their absence only!
Good night!!!”
मेसेज वाचला आणि किरण पुन्हा लकीच्या विचारांमध्ये बुडू लागली. गोळीचा परिणाम होऊ लागला होता… किरण झोपेच्या अधीन होऊ लागली. काही वेळातच ती गाढ झोपी गेली.
क्रमशः
©किशोर तरवडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा