सकाळच्या गजराने किरणला जाग आली. डोळे उघडताच तिला जाणवले... डोक्यात एक मंद गुंगी आहे. शरीर जड भासत होतं. काही क्षण ती तशीच पलंगावर बसून राहिली. हळूहळू कालच्या गोष्टी आठवू लागल्या... डॉक्टर, त्यांचे शब्द, औषध, आणि ती एक छोटीशी गोळी.
“आज पासून पुन्हा ऑफिस,” तिने स्वतःला आठवण करून दिली.
औषधामुळे रात्री जी काही स्वप्नं पडली होती ती तिला धूसरच आठवत होती. जणू काही कुणीतरी मनाच्या पडद्या वरून पुसून टाकली होती. तिचा मेंदू बधिर, पण मन किंचित हलकं वाटत होतं. यंत्रवतपणे ती आवरू लागली, दात घासले, साडी/ड्रेस नीट केला, बॅग घेतली आणि निघाली.
रस्त्यावर चालताना विचारांची गर्दी होती,
“ऑफिसमध्ये कोण काय बोलेल? माझ्या गैरहजेरी बद्दल काय विचार करतील? लकी समोर आला तर काय?”
मनात शंकेचे सावट दाटत होते. तरीही ती स्वतःला सावरत ऑफिसकडे निघाली.
काचेचे दार ढकलताच रिसेप्शनवर बसलेला नवीन अटेंडंट पळतच आला आणि म्हणाला,
“मॅडम! किती दिवसांनी आलात, वेलकम बॅक!”
त्याने किरणला आपुलकीने नमस्कार केला. त्या छोट्याशा कृतीने किरणच्या मनातील भीतीचा थर थोडासा विरघळला.
सीटवर बसताच बाकीचे कलीग्ज तिच्या भोवती जमले,
“किरण, कशा आहात?”
“आराम मिळाला ना? खुप मिस केले तुम्हाला”
“खूप दिवसांनी पाहिलं तुम्हाला!”
त्यांच्या बोलण्यातली आपुलकी तिला स्पर्शून गेली. ऑफिस मधील गडबडीत तिचा एकाकीपणा मागे पडू लागला. तिने मनाशीच म्हटलं,
“हो, आता सगळं पुन्हा नव्याने सुरू करायचं आहे....”
त्या दिवसा पासून तिने ठरवलं, आपली सीमारेषा ओळखून जगायचं. कुणाकडेही भावनिक गुंतवणूक नाही, कुणावर अवलंबित्व नाही. मनानेही जणू ती खूणगाठ घट्ट बांधली.
दिवस सरत गेले. कामाच्या गतीत पुन्हा ती स्थिर होत गेली. औषधांचा परिणाम जाणवत होता, विचारांमध्ये शांतपणा येत होता, भावनांचा उद्रेक थंडावत होता. तिला उमजत होतं की,
“प्रेम म्हणजे जबरदस्तीने मिळवायचं काही नसतं... आणि जेथे आपल्या कळकळीची किंमत नाही, तिथे जास्त थांबणं म्हणजे स्वतःशी अन्याय.”
हळूहळू तिच्या मनात स्वीकार वाढू लागला.
“आपल्या भावना कोणावर लादता येत नाहीत, त्या फक्त स्वतःसाठी जगायच्या असतात.”
डॉक्टरांच्या नियमित फॉलोअप्समुळे किरणचा आत्मविश्वास वाढत गेला. एकदा भेटीत डॉक्टर म्हणाले,
“किरण, बरे होण्याचा तुमचा प्रगतीदर खूप चांगला आहे. अजून काही दिवसांत औषधे बंद करून फक्त काउन्सेलिंग पुरेसे राहील.”
त्या शब्दांनी तिच्या मनात नवा प्रकाश पडला.
परंतु त्या दिवशी बाहेर पडताच अचानक तिच्या अंगात विचित्र उष्णता पसरली. श्वास चढत होता, छातीत धडधड वाढत चालली. जणू मेंदूत काहीतरी बंड सुरु होतंय.
“हे काय चाललंय माझ्या आत?” तिने स्वतःलाच विचारलं.
त्या क्षणी तिला जाणवलं... औषधांनी दडवलेल्या भावनांचा पूर मनाच्या गाभ्यातून पुन्हा वर येऊ लागला होता. ती स्वतःलाच आवर घालत म्हणाली,
“नाही... हे योग्य नाही. मी ठरवलंय... यावर मीच मात करणार.”
घरी पोहोचताच तिने स्वतःला सोफ्यावर झोकून दिलं. डोकं गरगरत होतं. शांत घरातील पिनड्रॉप सायलेन्स तिला अधिक त्रास देत होता.
“काय करू म्हणजे मनाला शांती मिळेल?” असा प्रश्न तिला सतावू लागला.
तिने बाहेरून जेवण मागवलं. वेळ घालवण्यासाठी गाणी लावली, पण एकही गाणं मनास भिडेना. टीव्ही लावला, पण लक्षच जात नव्हतं. जेवण आलं तेव्हा भूक असूनही प्रत्येक घास बेचव लागला. कसेतरी काही घास पोटात ढकलले आणि उरलेलं जेवण कागदात बांधून डस्टबीन मध्ये टाकलं.
थोड्याच वेळात तिने दुधाचं भांडे गॅसवर ठेवून स्वतः टेबलावर बसली. विचारांच्या खोल तंद्रीत हरवली. बराच वेळ गेला... आणि दूध उतू गेलं. जळल्याचा वास पसरला तेव्हा कुठे ती वास्तवात परतली.
तिने त्वरित गॅस बंद केला, स्वयंपाकघर आवरलं. औषधं घेतली आणि बेडवर पडली.
लाईट बंद होताच पुन्हा मनात विचारांचा कल्लोळ सुरु झाला...
“असं वाटतंय की लकीच्या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी आपण औषधं घेतोय... पण आता या औषधांच्याच व्यसनात अडकलोय... नाही! आता थांबायलाच पाहिजे. स्वतःच्या बळावर मात करायची आहे. ह्याच क्षणी ठरवते... आता मी स्वतःला मुक्त करणार.”
तिच्या डोळ्यासमोर लकीचा चेहरा क्षणभर चमकला, पण त्या चेहऱ्याला बघून तिच्या मनात कसलीच ओढ निर्माण झाली नाही. ऑफिसमध्येही लकीचं वागणं बदललं होतं... फक्त कामापुरतं बोलणं, बाकी काही नाही. कदाचित तो स्वतःला सुरक्षित ठेवत होता.
किरणने स्वतःशीच शांतपणे म्हटलं,
“ठीक आहे... मग मीही आता अलिप्तच राहीन. आपलं नातं फक्त ऑफिसपुरतं... व्यावहारिक आणि मर्यादेत.”
त्या निर्धाराच्या विचारांसोबत तिचे डोळे मिटले.
थकलेल्या मनाला अखेर थोडी शांती लाभली,
आणि किरण झोपेच्या अधीन झाली... एक अशा झोपेत, जिथे तिने पहिल्यांदा स्वतःकडे परत पाहिलं होतं.
क्रमशः
©किशोर तरवडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा