काही दिवस ठीक गेले…
आणि किरणला त्या औषधांचंही काहीसं वाटेनासं होऊ लागलं. डॉक्टरांची काउन्सेलिंग औपचारिक, बेचव वाटू लागली. दिवस येत होते आणि निघून जात होते, पण प्रत्येक दिवसात एक पोकळी होती. ठरवूनही लकीचा विचार मनातून हद्दपार होत नव्हता. आठवणी मागे लागत होत्या. नकळत कल्पना, स्वप्नं, लपलेली आशा पुन्हा डोकं वर काढत होती… आणि प्रत्येक स्वप्नाचा शेवट मात्र नेहमी सारखाच... हताश, निराश होत होता.
कधी एखाद्या गाण्याचा अंतरा मोबाईलवर उतरायचा… आणि नकळत तो मेसेज बनून लकीकडे जायचा. लकी तो मेसेज वाचतो की न वाचताच डिलीट करतो, किरणला माहीत नव्हतं. पण पाठवणं मात्र थांबत नव्हतं. आपण स्वतःच्याच निर्धारांना तडा देतोय, याची जाणीव तिला बोचत होती. तरीही ती अपराधी भावने सोबत जगत होती…
आज शनिवार होता. कामावर जायचं मन नव्हतं. तरीही तिने स्वतःला सावरलं. सिंगल स्त्री म्हणून रोजचा संघर्ष तिला माहीत होता, मन मोडलं तरी काम थांबत नाही. आवरून ती स्टेशनकडे निघाली. ट्रेनच्या गर्दीत शिरतानाच फोन वाजल्याची टोन कानावर पडली. डब्यात स्थिरावल्या नंतर तिने मोबाईल पाहिला… आणि क्षणात तिच्या चेहऱ्यावर हसू फुललं.
मिस्ड कॉल... मोनिका. किरणच्या जिवाभावाची मैत्रीण.
मोनिकाचं पुण्याला ट्रान्स्फर झाल्यापासून किरणचं आयुष्य जणू निस्तेज झालं होतं. या गोंधळात आपण मोनिकाला दूर ढकललं, याचं दुःख तिला क्षणभर टोचून गेलं. पण आनंद जास्त होता. तिने तात्काळ फोन लावला. एका रिंगमध्ये मोनिकाने फोन उचलला.
“किरण!!! अगं किती दिवसांनी! तुझा फोन पाहून जीव भरून आला. मुंबईत आहेस का गं?”
किरण ट्रेनच्या गर्दीतही आपला आनंद लपवू शकली नाही.
“अगं हो! आणि ऐक... मी कालच पुण्याहून मुंबईत आलेय. काही दिवस इथेच आहे. आज संध्याकाळी वरळीच्या घरी ये. एक छोटंसं गेट टुगेदर ठेवलंय. निवडक मैत्रिणी आहेत. तुला यायचंच आहे. नकार नाही!” ... मोनिकाने हक्काने दम भरला.
“मोनिका… मला तुला भेटायचंच होतं. खूप काही सांगायचं आहे. आज हाफ डे आहे. ऑफिस सुटलं की थेट तुझ्याकडे येते.”
फोन ठेवल्यावर किरणचं मन हलकं झालं. मनातली सल, गोंधळ, प्रश्न... हे सगळं मोनिका समोर मोकळं करायचं होतं.
ऑफिसमधून सुटल्यावर किरण महालक्ष्मी स्टेशनला उतरली आणि वरळीची बस पकडली. बसचा वेग तिला आज फारच मंद वाटत होता. कधी एकदा मोनिकापर्यंत पोहोचतेय, असं झालं होतं. अखेर बस थांबली. किरण मोनिकाच्या सोसायटीत शिरली. लिफ्ट गाठताना मनात जुन्या आठवणी गर्दी करू लागल्या... त्या मोकळ्या गप्पा, हसणं, रडणं, निर्भीड बोलणं.
लिफ्ट थांबली. किरणने शेवटच्या फ्लॅटची बेल दाबली. दार उघडलं… समोर साध्या कॉटन कुर्त्यात, केस मोकळे सोडलेली, डोळ्यांत आपुलकीचं तेज घेऊन मोनिका उभी होती.
“ये गं… माझी किरण!”
मोनिकाने तिला घट्ट मिठी मारली. त्या मिठीत कित्येक दिवसांचा थकवा विरघळून गेला. आत अजून कोणी आलं नव्हतं. दोघी सोफ्यावर बसल्या. किरणचा बांध फुटला. तिने पुन्हा मोनिकाला मिठी मारली… आणि अश्रू ओघळू लागले.
“काम डाऊन किरण! नक्कीच काहीतरी घडलेय या काही महिन्यात... डोन्ट वरी, मी आलेय ना आता, तू काळजी करू नकोस. आपण यावर जरूर मात करू आणि तुझा आनंद पुन्हा मिळवून देऊ. चल, हास आता! पहिली फ्रेश हो. तो पर्यंत मी आपल्यासाठी कॉफी बनवते... कॉफीचा मग संपल्यावर मला सगळे सांग, काय काय घडले ते.”
मोनिकाने त्याला टॉवेल दिला. किरणने बाथरूममध्ये जाऊन शॉवर घेतला. मोनिकाने तिच्यासाठी केप्री पॅंट आणि टी शर्ट काढून ठेवले होते. किरणला येथे एकदम आश्वासक वाटू लागले होते. तिने कपडे बदलले आणि सोफ्यावर बसकण मारली. इतक्यात मोनिकाने ट्रेमध्ये वाफाळलेले कॉफीचे मग्स आणि गरमागरम पॉपकॉर्न आणले आणि टीपॉयवर ठेवले.
किरण आपल्या मैत्रिणीला न्याहाळत होती. टवटवीत चेहऱ्यावर समाधानाची एक तकाकी दिसत होती. सळसळणारे मोकळे रेशमी लांब केसांच्या अवखळ बटा चेहऱ्यावर येत होत्या, आणि ती त्या बटांना लांबसडक बोटांनी मागे सारत कॉफी ढवळत होती. तिने कॉफीचा मग किरणकडे उचलून दिला आणि पुन्हा स्मित करत संवाद सुरु केला.
किरणने गरमागरम कॉफीचे दोन घोट घेतले. मेंदू अगदी तल्लख झाल्यासारखा वाटला. तिची आणि लकीची कहाणी तिने थोडक्यात मोनिका समोर मांडली.
त्या दरम्यान आपण मानसोपचार घेतोय हे पण सांगितले. मोनिकाने सगळे गंभीरपणे ऐकून घेतले. एक स्मित केले आणि पॉपकॉर्नचा बाउल किरणकडे सरकवला. स्वतःही थोडे पॉपकॉर्न तोंडात टाकत त्याची चव चाखत विचार करू लागली...
मोनिका शांतपणे विचार करत होती. थोडा वेळ गेला. मग ती बोलू लागली.
“किरण… तुला एक गोष्ट स्पष्ट सांगते.
आपण स्त्रिया... विशेषतः सिंगल असलेल्या, खूप लवकर भावनिक आधार शोधतो.. आणि तो आधार बहुतेक वेळा चुकीच्या ठिकाणी नेतो.”
किरण गप्प होती.
“तो लकी… तुला सोबत देतो का? तुला सुरक्षित वाटतं का? तुला निवडतो का?”
मोनिकाने थेट प्रश्न विचारले.
किरणकडे उत्तर नव्हतं.
“मग हे प्रेम नाही किरण. हे भावनिक अवलंबित्व आहे. आपण आपल्या आयुष्यातील पोकळी भरायला एखाद्या पुरुषाकडे नकळत आकर्षित होती… आणि हळूहळू स्वतःच हरवतो.” ... मोनिकाचा आवाज ठाम होता.
“स्त्री म्हणून आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं.. समजूत काढ, सहन कर, वाट बघ. पण कधीच शिकवलं जात नाही... स्वतःला प्राधान्य दे.”
"आपल्या आसपास सगळ्या स्त्रिया फक्त दुःख भोगताना आपण पाहत असतो म्हणूनही आपली तशी मानसिकता झाली असेल. परंतु जेव्हा आपण परिपक्व होत जातो, या दास्याच्या जोखडातून स्वतःला मुक्त करत स्वाभिमान शोधतो, तेव्हाही आपली मानसिकता तीच का राहते? मला नाही पटत या सगळ्या गोष्टी. इनफॅक्ट मला समाजाने स्त्रियांच्या माथी लावलेले लेबल्स मान्य नाहीत. म्हणून माझ्या आयुष्यात अशा वावटळी आल्या नाहीत.”
मोनिका बोलत होती आणि किरण शांतपणे तिचे विचार ऐकत होती. दोघींचे कॉफीचे मग आणि पॉपकॉर्नचा बाउल रिकामे झाले होते. तिने थोडा पॉज घेतला आणि पुन्हा बोलू लागली,
“किरण, आता आपल्या स्त्रियांनी स्वतःला बदलले पाहिजे, तरच हे प्रेमाचे ट्रॅप, प्रेमभंग, प्रतारणा वगैरे प्रकार संपतील. नाहीतर अशाच आपल्या मैत्रिणी पतंगा प्रमाणे दिव्याच्या प्रेमात जळून कोळसा होत राहतील."
“आपणच या पुरुषांना पायघड्या अंथरून देतो... प्रेम, त्याग, विश्वास या गोड शब्दांच्या आड लपवून आपल्या मनावर हृदयावर सत्ता गाजवायला. पण किरण, स्त्रियांना कुणाच्या तरी आयुष्यावर, भावनांवर अधिकार गाजवायचा अधिकार नाही का? उच्चशिक्षित, समजूतदार स्त्रियाही जेव्हा अबला होऊन अन्याय गिळतात, तेव्हा माझ्या अंगात आग पेटते. त्या का पेटून उठत नाहीत? का ‘पुरे झाले’ असं ठामपणे सांगत नाहीत?”
“हे काही छंदीफंदी पुरुष अगदी थंड डोक्याने स्त्रियांच्या मनांची, हृदयांची कत्तल करतात. प्रेम उपभोगतात, देहसुख लुटतात… आणि मग दिमाखात लग्न करून ‘सभ्य’ संसारात स्थिरावतात. त्यांना प्रेयसी म्हणजे फक्त टाइमपास, फक्त रोमान्स. पण या प्रेमात फसलेल्या स्त्रिया? त्या आयुष्यभर आठवणींच्या जखमा उराशी बाळगून जगत राहतात. नाही... हे असंच चालू राहू शकत नाही. हे बदलायला हवं.”
“किरण, आपण स्वतःवर प्रेम करायला का विसरतोय, हे तू जाणून घे... आणि स्वतःत बदल कर, तरच तुझं भलं होईल.”
मोनिकाच्या या बोलण्याने किरणला फारच ओशाळल्या सारखे झाले. आपण खरोखरच चुकलो याची जाणीव आणखीन तीव्र झाली. तिला क्षणभर लकीचा राग यायला लागला. मनात एक ठाम निर्णय आकार घेत होता... ही बेडी उलथवून लावायचीच आणि पुन्हा आपले सुंदर आयुष्य जगायचे.
तिने हलकेच चेहरा वर केला आणि मोनिकाकडे पाहिले. तिच्या नजरेच्या तेजाने किरणची नजर झाकोळली. मोनिकाने मायेने किरणच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि नेहमीच्या स्मितासह म्हणाली...
“किरण, मला माहित आहे तू आता पूर्णतः त्या लकीच्या व्यसनात गुरफटली आहेस. त्याच्या पासून सुटका हवी असेल तर तुला त्याचीच मदत घ्यावी लागेल. अबोला करून चालणार नाही, हळूहळू त्याच्या पासून दूर व्हावं लागेल. कारण एकदम दूर जाण्याचा प्रयत्न केलास तर उलट त्याच्या व्यसनात आणखीन रुतशील."
मोनिकाने तिचा हात हातात घेतला.
“तू एकटी आहेस, पण दुर्बल नाहीस. तू सिंगल आहेस म्हणजे अपूर्ण नाहीस. तुला कोणाच्याही मान्यतेची गरज नाही.”
किरणच्या डोळ्यांत पहिल्यांदा ठामपणा चमकला.
“आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे... लकीने आता तुझ्या भावनिक गुंतवणुकीचा अंदाज घेतला आहे. अशा परिस्थितीत काही पुरुषांच्या आतले सत्ताकेंद्र जागे होते. समोरची व्यक्ती जितकी असहाय दिसते, तितकेच त्यांना छळण्यात, दूर ढकलण्यात, तरीही सोडून न देण्यात अशा पुरुषांना आनंद मिळतो. म्हणूनच तुला आता अत्यंत सजगपणे वागावं लागेल. कसं ते आपण मिळून ठरवू.”
किरणने खोल श्वास घेतला. मनात घट्ट बसलेला गुंता सुटू लागला... डोक्यातील ताण सैल होऊ लागला. आज पहिल्यांदा तिला जाणवलं... लकीपासून दूर जाणं म्हणजे हरवणं नाही… तर स्वतःकडे परत येणं आहे. मोनिकाच्या डोळ्यांत पाहत तिने हळूच मान हलवली. आज मैफिल सजणार होती… पण या वेळी किरण स्वतःच्या शोधासाठी सज्ज झाली होती.
क्रमशः
©किशोर तरवडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा