मोनिकाच्या पार्टीत किरण सगळ्यांना बारकाईने न्याहाळत होती. डॉक्टर, इंजिनिअर, अधिकारी, सरकारी उच्च पदस्थ, समाजाच्या विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वे, स्त्रियांबरोबर पुरुषही उपस्थित होते. प्रत्येकाच्या वागण्यात एक सहजता होती, आणि तरीही एक अंतर्मुख प्रगल्भता होती. कुणाच्याही नजरेत वासना नव्हती. सगळे आधुनिक विचारांचे, स्वतःच्या लैंगिकतेला प्रगल्भतेने स्वीकारणारे वाटत होते.
सगळ्यांनी आपापले ड्रिंक्स आणले होते. मोनिकाने मात्र सगळ्यांसाठी आईस क्युब्स, ड्रायफ्रुट्स आणि स्नॅक्सची नीटनेटकी सोय केली होती. रात्रीच्या जेवणाचा विशेष विचार कोणाच्याच चेहऱ्यावर नव्हता; कारण इथे आलेले सगळे जेवायला नव्हे, तर स्वतःच्या निखळ आनंदासाठी... एकमेकांना भेटण्यासाठी आलेले होते. प्रथम ओळख परेड सुरू झाली. प्रत्येकाने स्वतःची ओळख सांगताना स्वतःचे आयुष्य किती धाडसानं आणि पारदर्शकतेनं जगतोय, हे अभिमानानं मांडलं.
थोड्याच वेळात मोनिकाचा फिल्म इंडस्ट्रीतील समलैंगिक मित्र ऑल्विन उभा राहिला आणि म्हणाला,
“ही पार्टी आशा ताईं शिवाय कशी होईल?”
आणि मग तो ‘इन आँखों की मस्ती के दीवाने हजारों हैं...’ या गाण्यावर अगदी रेखाचा आत्मा स्वतःत उतरवून दिलखेच मुजरा करू लागला. त्याच्या हालचालीं मधले लालित्य, नजरेतली मस्ती, आणि देहातली सहज नाजूकता पाहून... सर्वांनी थक्क होऊन टाळ्या वाजवल्या. त्या क्षणी प्रत्येकात आत्मस्वीकाराची, स्वातंत्र्याची, आणि सौंदर्याच्या नितांत भावनेची संवेदना पसरली.
संगीत, गाणी, वैचारिक चर्चा, स्वतःच्या आयुष्याचा वेगळा पट उलगडून दाखवणे आणि सगळ्यांच्या ओठांवरचा हलकासा नशेचा रंग, पार्टी आपल्याच लयीमध्ये वाहत होती. किरणला ही वैचारिक मैफिल विलक्षण आवडली. तिला आठवले... तिने अटेंड केलेल्या अनेक पार्टींमध्ये, ‘स्त्री’ स्वातंत्र्याच्या नावाखाली, शरीराचा व्यापार आणि वापरच चालायचा. अशा पार्ट्यांमध्ये कुणी कुणाला समजून घेण्यासाठी नसतं, तर फक्त एकमेकांना ‘वापरण्यासाठी’ असतं... आणि इथे मात्र सगळे जण एकमेकांना ऐकण्यासाठी, समजण्यासाठी जमले होते. तिच्या मनात नकळत आदराची भावना निर्माण झाली.
रात्रीचे बारा वाजून गेले होते, अचानक तिच्या मोबाईलवर मेसेज झळकला. व्होडकाच्या पिसाट नशेने किरणचं मन पिसा सारखं हलकं झालं होतं. तिने ग्लास खाली ठेवला आणि स्क्रीनकडे पाहिलं...
“Lucky”
तिच्या हृदयाची धडधड क्षणात दुप्पट झाली.
तिच्या हृदयाची धडधड क्षणात दुप्पट झाली.
"Life’s most deepest feelings are often expressed in silence...
And the one who can read volumes from your silence is your dearest person!
Good Night!!"
("जीवनातील सर्वात गहन भावना अनेकदा निःशब्दतेतून प्रकट होतात...!
आणि तुमच्या त्या निःशब्दतेत दडलेले शब्द ओळखणारा व्यक्ती हाच तुमचा सर्वात जवळचा माणूस असतो!
शुभ रात्री!!")
आणि तुमच्या त्या निःशब्दतेत दडलेले शब्द ओळखणारा व्यक्ती हाच तुमचा सर्वात जवळचा माणूस असतो!
शुभ रात्री!!")
तो मेसेज जणू हृदयाच्या गुप्त दरवाज्यावर टकटक करत होता. किरणच्या भावनांचे सगळे दरवाजे उघडून टाकत होता. तिचे अर्धवट मिटलेले डोळे त्या ओळी पुन्हा पुन्हा वाचत होते. शब्दांचे ते मोहक जाळं तिच्या भानावर वेटोळं घालू लागलं. क्षणातच मोनिका सोबत ठरवलेला निर्धार “लकीच्या व्यसनातून बाहेर पडायचं!” ... त्या नशेत विरघळून गेला, नामशेष झाला...
मनाच्या खोल गाभाऱ्यातून एक दयनीय, हतबल आवाज उमटला.
“आपण त्याच्याशी बोलत नाही म्हणूनच त्याने हा मेसेज पाठवलाय...
त्यालाही कदाचित वाटत असेल आपण त्याच्याशी बोलावं...
आपल्याला दूर ठेवणं त्यालाही त्रासदायक झाले असेल...”
किरणच्या डोळ्यात पाणी आले. त्या काही शब्दांनी तिचं जग पुन्हा उजळलं आणि पुन्हा अंधारलंही. ती मोनिकाकडे पाहू लागली.. ती गप्पांमध्ये रमली होती. किरण हळूच उठली, आतल्या खोलीत आली. तिचा हात थरथरत होता, पण मनात एकच आग्रह उफाळून येत होता.. ‘उत्तर द्यायचंच!’
तिने मोबाईलचा स्क्रीन ऑन केला. बोटं कीपॅडवर धावू लागली. भावनांच्या ओघात लिहिलेला एक मोठा माफीनामा पाठवून दिला, त्या प्रत्येक शब्दातून तिचं हताश मन अक्रोशत होतं.
“Sorry Lucky... मला नाही कळलं कधी मी तुझ्यात एवढी गुरफटले...” .. ती तोंडात पुटपुटली.
त्या क्षणी तिला वाटलं, आपल्या मनावरील ओझं उतरलंय. तिने हळूच डोळे पुसले, आणि क्षणात चेहेऱ्यावर हलकेसे हसू उमटलं.
“आता माझा लकी वाचेल, आणि मला प्रेमाने ओथंबलेले उत्तर देईल...”
पण तास गेला... मेसेज ‘Seen’ झाला नाही. वाट बघत, थकून मोबाईल हातात धरूनच किरण झोपी गेली. सकाळी मोनिकाने हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला.
“किरण... उठ, कॉफी घे.”
किरण धडपडत उठली. डोळ्यांत अजूनही रात्रीचं स्वप्नं होतं. लकीला पाठवलेल्या मेसेज नंतर काय झालं, ते तिला धूसर आठवत होतं. मोनिकाचा चेहरा पाहताच तिला लाज वाटली. मनात विचार आला.. “त्याला सगळे सांगावं का?” पण लगेचच तिने स्वतःला थांबवलं. तिला आतूनच अस्वस्थ वाटू लागलं.
“सोमवारी ऑफिसमध्ये लकीकडे कसं पाहू? तो काय बोलेल मला ?”
अस्वस्थ विचारांमुळे तिने वॉशरूममध्ये स्वतःला गुंतवलं, पाणी चेहऱ्यावर मारलं, पण आतला गोंधळ धुवून निघत नव्हता. मोनिका काहीतरी बोलत होती, पण तिचे कान ऐकत नव्हते. मनात फक्त एक प्रश्न घुमत होता...
“आपण रात्री जे केलं ते बरोबर की चूक?”
शेवटी ती स्वतःशीच पुटपुटली...
“जे होईल ते होऊ दे... आता जे झालं ते बदलवता येणार नाही.”
तिने मोनिकाचा निरोप घेतला, टॅक्सी पकडली. टॅक्सीत बसताच किरणच्या मनात मोनिकाचे बोल पुन्हा घुमू लागले...
“तुला त्याच्या व्यसनातून बाहेर पडायचं असेल, तर त्याचीच मदत घ्यावी लागेल.”
या एका वाक्याचा तिच्या मनावर खोल परिणाम झाला होता. नकळत, मनातील एखाद्या कोळ्याने तडफडत नवे जाळे विणायला सुरुवात केली. एका गूढ योजनेचा आराखडा तिच्या विचारांत आकार घेत होता. काही क्षण त्या योजनेच्या चलचित्रात ती स्वतःच सहभागी झाली आणि आपल्या विकृत, बदललेल्या विवेकाचे नग्न रूप पाहून ती दचकली... भयभीत झाली.
मनातील अंधार मात्र आता हळूहळू हावी होऊ लागला होता. विचारांची दिशा विस्कळीत झाली होती.
“आपण आखलेली 'योजना'… हाच उपाय आहे या लकीच्या व्यसनातून सुटण्यासाठी... आणि... त्याने दिलेल्या यातनांचा सूड घेण्यासाठीही...”
या विचारांनी किरण थरारली.
“आपले मन असा कसा विचार करतेय? आपण चुकीच्या वाटेवर तर नाही ना चाललोय? हा प्रवाह... आपल्याला विनाशाकडे नेणारा प्रवाह तर नाही ना?”
क्षणभर तिला स्वतःवर राग आला.
“नाही नाही… या भावनांना आवरलं पाहिजे... आत्ता नाही थांबले, तर मागे परतणं अशक्य होईल...”
असे तिला लाखदा वाटले, तरीही तिच्या मनावर काहीतरी अदृश्य, अनामिक शक्ती जणू नियंत्रण करत होती… आणि ती त्या शक्तीच्या ताब्यात अलगद शिरत चालली होती.
'स्वतःला शोधताना'... ती आता स्वतःपासूनच हरवू लागली होती.
क्रमशः
किशोर तरवडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा