“फासे व्यवस्थित पडले… तर या भिकारी अवस्थेतून सुटका होईल. आपण मुक्त होऊ… आणि पुन्हा पूर्वीचं आयुष्य जगू.”
किरणच्या डोक्यात विचारांची चक्रं फिरत होती. पण त्या आनंदामागेही एक धूसर भीती होती... "आपण जे करत आहोत ते खरंच सुटका आहे की आणखी एक सापळा?"
इतक्यात तिला जाणवलं की प्यून तिलाच पाहतोय. किरणने उसनं हसू आणत त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर नाराजगी स्पष्ट होती. तिला माहीत होतं, हा काहीतरी बोलणार.
“किरण मॅडम, या खवचटला कशाला बोलावताय! लय बाराचे बेणं आहे ते! तुमची पार्टी खराब करायचं ते!” ... इतकं बोलून डोकं हलवत तो निघून गेला.
किरणने ती लिस्ट समोर ठेवली आणि इंटरकॉमवर ऑफिसमधील आपल्या गेस्ट्सना आमंत्रण देऊ लागली. अर्ध्या तासात लिस्ट फायनल झाली. क्षणभर तिला हलकं वाटलं. दोन-तीन दिवसांत खरेदी, ऑर्डर्स… सगळं करायचं होतं. पण तिच्या डोक्यात आणखी एक कल्पना ठाम झाली होती, आलेल्या प्रत्येकाला वॅलेट गिफ्ट द्यायचं. त्यासाठी तिला धारावीमधील मैत्रिणीची आठवण झाली.
तिने लगेच फोन फिरवला. तिसऱ्या रिंगमध्ये समोरून फोन उचलला.
“मुमताज जी, सलाम! कैसे हो आप? आपके पास एक अर्जंट काम है.”
“वालेकुम-ए-सलाम किरणजी! बड़े दिनों बाद याद किया. बताओ, क्या काम है?”
“मी माझ्या काही कलिग्सना घरी पार्टी देणार आहे… आणि मला सगळ्या गेस्ट्सना लेदरचे वॅलेट द्यायचे आहे.”
“इसमें कौन सी बड़ी बात है! धारावीला माझ्या एका जवळच्या नातलगाच्या कारखान्यात घेऊन जाते. एक से एक एक्सपोर्ट क्वालिटीचे वॅलेट रिझनेबल दाम में मिलेंगे.”
हे ऐकताच किरणला अत्यानंद झाला. त्याच दिवशी ऑफिस सुटल्यावर ती धारावीत पोहोचली. मुमताजने तिला कारखान्यात नेलं. कारखान्याच्या मालकाच्या मुलाला पाहून किरणचे डोळे विस्फारले. गोरा पान वर्ण, तरुणाईने मुसमुसलेला, तरणाबांड, आधुनिक शेहजादा. फॅशनेबल कपडे, उंची शूज, दाढीचा कट, अत्तराचा हलका शिडकावा…
तो उमदा तरुण पाहून किरणच्या मनात नकळत एक कंप उमटला. आपण वयस्क आहोत… तरीही मन अजून जिवंत आहे का? त्याचे डोळे काळजात खंजीर खुपसवणारे होते.
मुमताजने ओळख करून दिली...
“इनसे मिलो, ये मेरी अजीज सहेली किरण हैं. इन्हें अपने ऑफिस के बन्दों को लेदर के वॅलेट गिफ्ट देने हैं. कुछ अच्छा माल दिखाओ, और ज़रा रीजनेबल रेट लगाना.”
त्या हँडसम तरुणाने एक मादक हास्य किरणकडे फेकलं आणि हात पुढे केला.
“मैं हूँ असगर खान. आप सही वक्त और सही जगह आये हो. आज ही मेरा माल ओबेरॉय शॉपिंग सेंटर से वापस आया है. आपके गिफ्ट के लिए एकदम सही रहेगा.”
असगरने तिचा हात जरा जास्त वेळ धरून ठेवला. क्षणभर किरण अस्वस्थ झाली. "हे लक्ष… हे आकर्षण… हे सगळं आपल्या वयाला शोभतं का?" पण त्याचवेळी तिच्या आतली हरवलेली स्त्री जागी झाली. किरणने हात अलगद सोडवून घेतला आणि गोड स्मित केलं. असगरने हसत आपल्या माणसाला माल दाखवायला सांगितलं. चार रंगांतील उंची लेदर वॅलेट्स टेबलवर मांडले गेले.
किरणने लगेच पसंत करून गेस्ट लिस्टप्रमाणे खरेदी केली. असगरने रिझनेबल भावात माल दिला. माल पटकन संपल्यामुळे असगरची कळी खुलली होती. त्याने स्पेशल चहा आणि चिकन सामोसे मागवले.
तो एका मॉडेलला लाजवेल इतका आकर्षक होता… पण किरणला जास्त जाणवत होतं ते म्हणजे... तो तिच्याशी आदराने, सहजतेने बोलत होता. चहापान झाल्यावर त्याने विचारलं...
“किरणजी, एक बात पूछूं? इन वॅलेट्स के अलावा आपने अपने लिए कुछ भी नहीं खरीदा?”
“नहीं… मैंने कभी वॅलेट यूज़ नहीं किया. ये सब मेरे गेस्ट्स के लिए हैं.”
असगरने मान हलवली.
“मेरा अंदाज़ा सही निकला. चलो, मुझे आपसे दोस्ती का मौका मिल गया. वेट अ मिनिट.”
तो कपाट उघडून एक सुंदर लेदर फोल्डर काढून तिच्यासमोर ठेवतो. किरणने उघडून पाहिलं... पासपोर्ट, कार्ड्स, बँक पासबुक… मल्टी-पर्पज. तिला ते खूप आवडलं. असगरने ते गिफ्ट पॅक केलं आणि म्हणाला...
“यह मेरी तरफ से आपको गिफ्ट. मैंने आजतक इतना नेक दिल इंसान नहीं देखा. आपकी आवाज़ ही बता देती है कि आपका दिल कितना मोम है…”
त्याने कार्ड दिलं.
“कभी याद आये तो कॉल कर देना…”
किरणला फार बरं वाटलं. तिने आभार मानले आणि वॅलेटची बॅग घेऊन मुमताजसोबत बाहेर पडली. किरण तरंगतच चालत होती. मनात असगरचाच विचार…
"आपण त्याला आवडलोय का?"
हृदय, डोके, मेंदू... क्षणभर मोकळे झाले होते. लकीच्या प्रेमाच्या भुताला उतरवण्यासाठी असाच कुणीतरी आयुष्यात यायला हवा… असगरचं रूप डोळ्यांसमोर नाचत होतं. सायन स्टेशनवर ट्रेनमध्ये बसताना तिने त्याचं कार्ड सेव्ह केलं.
गाडी पुढे सरकत होती. खिडकीबाहेर झाडं पळत होती. मेंदू थोडा हलका झाल्याने तिला डुलकी लागली… इतक्यात मोबाईल व्हायब्रेट झाला. ती दचकून जागी झाली.
एस. एम. एस.
लकीचं नाव दिसताच क्षणात तिच्या मेंदूत बदल घडू लागले. जणू काही त्या काही तासांच्या मुक्ततेवर पुन्हा सावली पडली. थरथरत्या हाताने तिने मेसेज उघडला. तो प्रेमाने ओथंबलेला होता. आणि किरण पुरती घायाळ झाली. मनात अपराधी विचार गर्दी करू लागले...
“शी! आपण असगरबद्दल असा कसा विचार केला?” ... मन स्वतःचीच निर्भत्सना करू लागलं.
“आपण हे सगळं लकीला सांगावं का?”
पुढच्याच क्षणी...
“नको… नको… उगाच लकीला वाईट वाटेल.”
तिने रिप्लाय दिला. बराच वेळ स्क्रीनकडे टक लावून पाहत राहिली. पण लकीकडून काहीच प्रतिक्रिया आली नाही. शेवटी तिने डोके खिडकीला टेकवलं. डोळे मिटले. कल्याण येताच ती उतरली. बाजारातून घरच्यांसाठी काही सामान घेतलं. शेअर रिक्षा पकडली. आणि घरी पोहोचली.
क्रमशः
©किरण किशोर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा