दिवस भराभर जात होते. पार्टीच्या तयाऱ्या सुरूच होत्या. बिर्याणीची ऑर्डर घेऊन झाली. कोल्ड्रिंक्स, चाखणा, इत्यादींच्या ऑर्डर्स पूर्ण झाली. लेदर वॅलेट्सचे गिफ्ट देण्यासाठी छानशा पिशव्या घेतल्या. घर स्वच्छ करून पडदे नवीन लावले. पार्टीसाठी खास काचेचे ग्लास, पेपर प्लेट्स, टिशूज इत्यादी सगळे सामान घेऊन झाले. या काही दिवसात किरणला अजिबात फुरसत नव्हती. रात्री झोपताना मात्र तिला पार्टीत लकीला कसे आकर्षित करायचे याचेच प्लॅन डोक्यात शिजायचे. त्यातच कधीतरी झोप यायची आणि लगेचच सकाळ व्हायची.
शेवटी तो प्रेमाचा दिवस उजाडला... किरण भल्या पहाटे उठली, आपले आवरून तिने प्रथम ऑर्डर्स वाल्यांना कॉल करत सगळे कन्फर्म करून घेतले. प्रत्येकाच्या ब्रँडच्या बाटल्या आणून सजवल्या, कोल्ड्रिंक्स आणून फ्रिजमध्ये भरून ठेवले. आईस क्युब्सची ऑर्डर आल्यावर तिने त्या पिशव्या डीप फ्रीझरमध्ये टाकल्या. संध्याकाळी पाच पर्यंत सगळी जय्यत तयारी झाली होती. तिने स्वतःच मस्त आवरले आणि खास पार्टी ड्रेस घालून आपल्या गेस्ट्सची वाट पाहत बसली.
साडेपाच पासून त्याला फोन येऊ लागले. घरी येण्यासाठी तिने सगळ्यांना पत्ता, लँडमार्क आणि मार्ग वॉट्सअप केला होता. त्यानुसार एक एक जण येऊ लागला. किरण हसत मुखाने त्यांचे स्वागत ऍपल ज्यूस देऊन करत होती. मंद संगीत सुरू होते. एअर फ्रेशनरने वातावरण प्रफुल्लित झाले होते. सगळे येत होते. परंतु तिचा लकी राजा अजून आला नव्हता. किरणचे डोळे दरवाजाला लागले होते. दाराची बेल वाजली की ती पळतच जाऊन दार उघडत होती. परंतु प्रत्येक वेळी तिची निराशाच होत होती. जीव अगदी कंठाशी आला होता... आणि तो क्षण आला... बेल वाजली, किरण लगबगीने पुढे गेली... दार उघडले आणि समोर तिचा लकी उभा...
हाफ स्लीव्ह टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घातलेला लकी खूपच आकर्षक वाटत होता. किरणने त्याच्या नजरेत पहिले आणि लाजतच त्याचे स्वागत केले. त्याला सोफ्यावर बसवून स्वतः त्याच्यासाठी ऍपल ज्यूसचा ग्लास घेऊन आली. लकीने संपूर्ण घरावर नजर फिरवली आणि एक वेगळेच स्मित केले. किरणच्या हातून ऍपल ज्यूसचा ग्लास घेऊन त्याने ‘थँक्स’ म्हटले. एकूण एक गेस्ट्स जमले होते... गप्पांचा पाऊस पडत होता. हसणे-खिदळणे, जोक्स सुरू होते. सात वाजले आणि ओली पार्टी सुरू झाली.
एका टेबल वर व्हिस्की, व्होडकाचे बॉटल्स मांडले होते, पेग मेजर्स आणि आईस क्युब्सचे लाकडाचे भांडे छानपैकी सजवले होते. तर दुसऱ्या बाजूला कोल्ड्रिंक्स आणि पाणी ठेवले होते. व्हेज चाखणा आणि नॉनव्हेज चाखणा वेगवेगळेच ठेवलेले होते. बिअर पिणाऱ्यांसाठी बाटल्या आणि कॅन्स फ्रिजमध्ये सजवलेले होते. पार्टीची इतकी अप्रतिम मांडणी पाहून सगळेच चकित झाले होते. त्यातील कित्येकांनी हॉटेलातील पार्टीचा वाईट अनुभव घेतलेला होता तर काहींनी मित्रांच्या घरी केलेल्या ओल्या पार्टीची दुरावस्था पाहिलेली होती. परंतु किरणने चोख आणि मुक्त हस्ते केलेले आदरातिथ्य डोळ्यात भरणारे होते. कोणालाही कुठेच आणि कसलीच कमतरता पडत नव्हती.
किरण स्वतःहून लकीची सोय पाहत होती. जणू तो म्हणजे पार्टीची शान होता. किरणचे ते स्पेशल अगत्य लकीला झाडावर चढवत होते. परंतु त्याच्या गोटातील एकाने खवचट कमेंट केलीच.
“यार, किरणने फक्त तुलाच पार्टी दिलीय असे वाटतेय, क्या बात है!”
परंतु जेव्हा दोन-तीन पेग्स पोटात गेले, तेव्हा गेस्ट्स सगळे विसरून पार्टीचा आणि चविष्ट चाखणाचा आनंद घेऊ लागले. इतक्यात कुणीतरी बोलले...
“किरण जी, हे मंद संगीत बदला आता, एखादे भन्नाट गाणे लावून वातावरण काहीसे तापवा की! आम्हाला डान्स करायची इच्छा झालीय!”
या विनंतीला सगळ्यांनी दुजोरा दिला आणि किरण उठली. तिने पार्टी सॉंग्सची लिस्ट मधील गाणी स्टार्ट केली. हिंदी नंतर इंग्लिश नंबर्स सुरू झाले... काही कलिग्सनी खूपच सुंदर डान्स केले. पार्टी अगदी रंगत आली होती. वेळ कसा उडत होता, कुणालाच समजत नव्हते.
रात्रीचे दहा वाजले आणि बेल वाजली. जेवणाची ऑर्डर आली होती. किरणने ड्रिंक्सचे टेबल रिकामे केले आणि त्यावर जेवणाचे पदार्थ रचले... चिकन बिर्याणी, चिकन पुलाव, तंदुरी, चिकन टिक्का, प्रॉन्स कोळीवाडा, लुसलुशीत पाव, सलाड. व्हेज जेवण दुसऱ्या टेबलवर रचले. पटकन पेपर प्लेट्स, टिशूज, चमचे काढले आणि बुफे डिनर सुरू केले. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या एका बाजूला मांडल्या.
सगळ्यांनी रुचकर जेवणाचा आनंद घेतला. त्यानंतर आवरा-आवार करायला सगळ्यांनी मदत केली. मोठ्या झोला बॅग्स मध्ये कचरा भरून तिने बाहेर पॅसेजमध्ये ठेवला. झाडू मारून फडके मारून हॉल स्वच्छ केला. हॉलच्या सगळ्या भिंतींना लागून संतांच्या अंथरल्या आणि टुटी-फ्रुटी आईस्क्रीम डेझर्ट बाहेर काढले. ज्यांना गोड पान खायचे होते, त्यांच्यासाठी गोड पाने तबकात ठेवली. किरणच्या इतक्या आदरातिथ्याने गेस्ट्स अगदी तृप्त झाले.
लकी पण चांगलाच तट्टू झालेला होता आणि वधारला पण होता. कुणास ठाऊक, त्याला असे वाटत होते की तो म्हणजे चीफ गेस्टच! अगदी तसाच तो वागत होता. आईस्क्रीमची पार्टी चालूच होती की किरणने आत बेडरूम मध्ये ठेवलेल्या गिफ्ट्सच्या पिशव्या हॉलमध्ये आणून ठेवल्या. आता हे आणखीन काय आहे? म्हणून सगळ्यांच्या विस्फारलेल्या नजरा त्या आकर्षक पिशव्यांकडे लागल्या.
लकी पण डोळे फाडून पाहत होता. शेवटी त्याच्याच्याने राहवेना. त्याने किरणला विचारले..
“किरणजी, यात काय आहे?”
त्याच्या प्रश्नाने किरणला पार्टी दिल्याचे सार्थकच वाटून गेले. अतिशय हर्षाने तिने त्या पिशव्या मधून निवडून एक पिशवी काढली आणि उंच धरत बोलली...
“माझ्या प्रिय कलिग्स मित्र मैत्रिणींनो, गेली काही वर्षे आपण एकत्र काम करतोय. तुमचे सगळ्यांचे सहकार्य आणि प्रेम असल्यामुळेच आज इतका आनंद उपभोगत आहे. आपल्या सगळ्यांचा स्नेह माझ्या प्रति असाच राहावा. आपण दिलेल्या प्रेमाची आठवण म्हणून माझेही कर्तव्य बनते की मी आपणास काहीतरी देऊ इच्छितेय. तेच या पिशवीत दडलेय. तर सगळ्यात पहिला मान मी देणार आहे लकीला.”
क्रमशः
©किशोर तरवडे
©किशोर तरवडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा