Login

स्वतःला शोधताना : भाग २८.

.
त्यानंतर पिलेल्या लकीचा इगो आणखीनच सुखावला होता. त्याने अशा एका नजरेने किरणकडे पाहिलं, की किरणच्या मनात एक क्षणभर विजेसारखी आशा चमकून गेली.


"आज… आज तो माझा होईल."


किरणने स्वतःला सावरत लकीच्या हातात गिफ्टची पिशवी दिली. त्याने उत्सुकतेने पिशवी उघडली. सुबक बॉक्समधून निळसर छटा असलेलं प्युअर लेदरचं वॅलेट बाहेर आलं, आणि सगळेच त्या वस्तूच्या प्रेमात पडले. किरणने मग इतरांनाही त्यांची गिफ्ट्स दिली.


प्रत्येकाने मनापासून तारीफ केली, कारण पुरुषांसाठी वॅलेट ही फक्त वस्तू नसते… ती त्यांची शान असते. थोड्याच वेळात अनेकांनी निरोप घेतला. स्टेशनला जाण्यासाठी लोकांची धावपळ सुरू झाली. किरणच्या मनात मात्र एकच विचार होता... जितके लोक जातील… तितका आपल्याला एकांत मिळेल. रात्री बारापर्यंत खोलीत फक्त पाच जण उरले. नशा आणि जेवणाच्या थकव्यामुळे ते सतरंजीवर ताणून दिल्या सारखे झोपून गेले.


किरणचा इरादा होता… लकीला घेऊन आत बेडरूममध्ये जायचा. पण बेडरूममध्ये डोकावून पाहिलं, तर एक गेस्ट तिथेच लुढकलेला होता. किरणच्या डोक्यातच गेला तो. त्याला उठवणंही शक्य नव्हतं, आणि तसंच सोडून देणंही विचित्र वाटत होतं. मनात गोंधळ आणि निराशा दाटून आली... शरीरात आणि मेंदूत एक वेगळीच धुंदी पसरली होती. मनावरील ताण सैल व्हावा म्हणून किरणने अंघोळ केली, रेशमी नाईट ड्रेस घातला, त्यामागील इरादा तिच्या डोळ्यात दिसत होता.


अंगावर सुगंधी सेंटचा शिडकावा करून ती हॉलमध्ये आली. लकी खुर्चीवर बसून मोबाईलमध्ये गेम खेळत होता. किरणला अचानक तीव्र इच्छा झाली...  त्याला मागून आपल्या कवेत घेऊन एकदा तरी शांतपणे विचारावं… "तुझ्या मनात माझ्याबद्दल काही आहे का?" 


पण तिने आजूबाजूला अंदाज घेतला आणि हलकेच त्याच्या बाजूला जात तिने हळूच विचारलं,


“लकी… जरा माझ्या सोबत खाली येशील का? हा जमलेला कचरा फेकून येऊ. घरात ठेवला तर वास पसरेल आणि बाहेर ठेवला तर उंदीर रात्री पिशव्या फाडतील…”


लकीने तिच्याकडे वळून पाहिले, रेशमी नाईट ड्रेस आणि सैल सोडलेले कुंतल... किरण मादक दिसत होती. लकीची नशिलेली नजर किरणला अधिक अस्वस्थ करत होती. तो उठला. दोघे बाहेर पडले. दार बाहेरून लावून घेतलं. कचऱ्याच्या पिशव्या हातात घेऊन ते खाली उतरले. हायवेवरून गाड्या सुसाट जात होत्या. इमारती समोरील सर्विस रोड सुनसान होता. किरणच्या मनात मात्र वादळ उसळले होते. कचराकुंडीत पिशव्या टाकून ते परत येऊ लागले. त्या शांततेत किरणचा संयम सुटला.


चालताना तिने नकळत लकीचा हात हातात घेतला. क्षणभर…


पण लगेच लकीने हात सोडवून घेतला. किरण पुन्हा हात पकडू पाहत होती, त्याने तिच्या डोळ्यात पाहिले... क्षणभर त्याच्या डोळ्यात एक ठिणगी दिसली पण दुसऱ्याच क्षणी तो हसत म्हणाला.


“किरणजी… क्या कर रही हो? आपको क्या हो गया है. चलो, घर जाकर सो जाओ…”


त्या निराश शब्दांनी किरण गोठली. मनातला रेशमी उत्साह एका क्षणात विस्कटला. तिची पाऊले संथ झाली. तिने त्याला रस्त्याच्या कडेला असलेल्या सीटवर बसवलं. स्वतःही बाजूला बसली. लकी अजूनही हसत होता, पण त्या हास्यात एक वेगळाच स्वर होता. विजयाचा की पारध केल्याचा? किरणने त्याचा हात अलगद आपल्या हातात घेतला आणि स्वप्नील होत त्याला विचारले.


“लकी तुला कळतंय ना… माझं मन किती काळापासून…?”


पण त्याने पटकन आपला हात सोडवून घेत म्हणाला...


“अरे यार चलो यहा से… ऑफिसमध्ये बोलू ना. चलो, मुझे नींद आ रही है…”


इतके बोलून तो उठला. किरणच्या सगळ्या आशा मावळल्या, ती उठून उभी राहिली. लकीने तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला घराकडे घेऊन आला. किरणने कचऱ्याचा डबा बाहेर ठेवला आणि दरवाजा उघडला. लकी आत गेला आणि सरळ हॉलमधल्या सतरंजीवर झोपला. जणू… सगळे कळत असूनही जाणूनबुजून अंतर ठेवण्यासाठी त्याने ते केले असावे. किरण दार लावून आत आली. तिने पाहिलं... लकी हॉलमध्ये झोपलेला होता, आणि आसपास इतरही दोन-तीन जण अस्तव्यस्त झोपले होते. लकीच्या कृतीने तिला कळून चुकलं. तो मुद्दाम तिथे झोपलाय. तिने हताश नजरेने तिने त्याच्याकडे पाहिलं. क्षणभर तिला स्वतःवरच चीड आली आणि दुसऱ्याच क्षणी तिला स्वतःची कीव वाटू लागली. हताश मानाने ती बेडरूममध्ये गेली. पण झोप येईना. तळमळत ती बेडवर सुस्कारे भरत कूस बदलत होती.. पेटलेलं मनाची धगधग शरीरभर पसरत होती. 


अचानक तिच्या डोक्यात वेडं काहीतरी शिजलं. तिने मनातील विवेकाला धुडकावून लावलं... बेडवरुन ती उठली आणि तडक हॉलमध्ये येऊन लकीच्या बाजूला झोपली. बराच वेळ तिचा स्वास जोरात वाजत होता.. थोड्या वेळाने… तिचा हात नकळत त्याच्या केसांमध्ये फिरू लागला. त्या स्पर्शात प्रेम होतं… पण या क्षणी त्याहून अधिक... एक व्यसन होतं, एक असहायता होती. तिच्या प्रेमाने आणि व्यसनाने केलेल्या स्पर्शाचा लकीवर कसलाच परिणाम होत नव्हता.. तो मात्र शांत निर्विकार पसरला होता. तिने हलकेच त्याला पाहिले आणि किरणचा श्वास वाढत गेला. मनात एक वेडी आशा थुईथुई नाचू लागली.


कदाचित लकीला तिच्या असण्याची जाणीव झाली असावी... तेवढ्यात लकीने कूस बदलली आणि तोंड भिंतीकडे केलं. लकीच्या त्या कृतीने किरण स्वप्नांच्या मनोऱ्यावरून धाडकन खाली कोसळली. बराच वेळ ती तळमळत तिथेच पडून राहिली. लकी जागा होता.. त्याला तिची उपस्थिती कळत होती. किरण ने पुन्हा एकदा धीर करत त्याला स्पर्श केला आणि लगेचच लकीने मंद आवाजात म्हटलं... 


“किरणजी… रात बोहोत हो गयी है, सो जाओ. मुझे भी सोने दो. अंदर जाकर सो जाओ…”


त्याच्या वाक्याने ती एकदम शहारली... तिच्या अंगात भीती दाटून आली. स्वतःच्या वागण्याची भयंकर लाज वाटली... न्यूनगंड, अपराधभाव तिला छळू लागला... लज्जेने ती हळूच त्याच्या पासून दूर सरकली. खोली अंधारात बुडालेली होती. काही वेळ तिला भास झाला की आजूबाजूला झोपलेल्या आकृत्या तिलाच बघताहेत... तिने तोंडावर हात ठेवला आणि किरण उठली. स्वतःला सावरत सावकाश किचनमध्ये गेली. लाजेने अंग अजूनही थरथरत होते.. तिने फ्रीजमधून थंड पाण्याची बाटली काढून घटाघट प्यायली आणि दुसऱ्याच क्षणी खुर्चीवर कोसळली. आपण केलेल्या कृतीचा पश्चाताप करत तिने कपाळावर हात मारून घेत पुटपुटली. 


“किती ठरवलं होतं… आज या प्रेमाच्या वेदनेतून मुक्त व्हायचं… पण नियतीला ते मान्यच नाही…”


मनात गडद हताशा पसरली. तरीही… मन हार मानायला तयार नव्हतं. काही वेळ शांत बसून किरण पुन्हा उठली. हॉलमध्ये परत आली. सगळे झोपलेले होते. खोलीत काळोख पसरला होता परंतु तिच्या मानतील काळोख तिच्या सर्वांगावर मातु लागला होता.. तिच्यात काहीतरी संचारू लागले... एक कैफ..नशा... वाढू लागली... त्यातच ती हळूहळू लकीच्या जवळ जाऊ लागली..