तोंडावर ऊन आल्याने किरणला जाग आली. ती धडपडत उठली, बाजूला पाहिले... लकी बाजूला नव्हता. इतर ऑफिस कलिग्स पैकी फक्त एकच झोपलेला दिसत होता. ती धडपडत उठली, पळतच तिने बेडरूम मध्ये पाहिले, त्यात दोन कलिग्स झोपलेले होते. बाथरूम, टॉयलेट सगळीकडे तिने चेक केले, परंतु लकी कोठेच दिसत नव्हता. किरणने दरवाजा उघडून बाहेर पाहिले आणि पुन्हा दार लावून घेतले.
"कुठे गेला असेल हा? आपल्याला जाग कशी नाही आली? रात्री त्याची जी हार झाली, त्याच्या पश्चात्तापाने, लाजेने आपल्या डोळ्यांचा सामना करण्यास त्याला लाज वाटेल म्हणून निघून गेला असेल..."
किरणला जिंकल्याचा माज चढू लागला होता. आता बाजी आपल्या हातात आलीय या विचारांनी किरण उठली. तिने भराभर घर आवरले. झोपलेल्या कलिग्सना उठवले. त्यांनीही आपले आवरून तिचा निरोप घेतला. किरणने दार लावून घेतले आणि आनंदात स्वतःभोवती गिरकी घेत आनंद व्यक्त केला.
"आता मस्तपैकी अंघोळ करायची, गरमागरम कॉफी पिऊन ताणून द्यायची," ... किरण स्वतःशीच बोलली.
किरण पटकन उठली आणि बाथरूम मध्ये शिरली. समोरील पूर्ण आरशात ती स्वतःला न्याहाळत होती. निस्तेज चेहऱ्यावर एक वेगळेच तेज पसरले होते. शॉवरच्या झऱ्यातून सर्वांगावर पसरणारे तुषार सुखद वाटत होते. बराच वेळ ती अंगावर शॉवर घेत मुक्तीचा आनंद घेत होती..
मनसोक्त अंघोळ केल्यावर ती बाहेर आली. अंग कोरडे करून तिने कपडे बदलले आणि खुर्चीत बसून विचार करू लागली.
"आता उद्या ऑफिसला मज्जा येणार. लकी आपल्याला टाळू लागला तर आपण मुद्दामहून त्याला हाक मारून बोलावुया. लाजेने त्याला खाली बघायला लावूया. बघू मग त्याची प्रतिक्रिया काय येते."
किरणचे विचार उद्यापर्यंत पळत होते. तिच्यावर पुन्हा आळसाचा विळखा पडत होता. तिने दाराच्या कड्या चेक केल्या आणि बेडरूम मधील बेडवर स्वतःला झोकून दिले.
"आज उठायला संध्याकाळ जरी झाली तरी चालेल," ... असा विचार करून तिने डोळे मिटले.
काही वेळातच तिला शांत झोप लागली. झोपेत बऱ्याच प्रसंगांच्या मालिका डोळ्यांसमोर नाचत होत्या. एका तुकड्याचा दुसऱ्याशी मेळ बसत नव्हता. पण जे काही चालले होते ते आनंददायक नव्हते. सारखी झोप चाळवत होती.
किरण उठून बसली. टाईमपास करत संध्याकाळ सरली... अंधार झाल्यावर तिने दिवे लावले. मन अस्वस्थ होऊ लागले. मन रमवायला तिने जेवण बनवले. गाणी ऐकून पण कंटाळा येऊ लागला. घड्याळ जणू मख्ख झाले होते. रात्र झाली. जेवणाची भांडी घासून किरण बेडवर आडवी झाली. रात्री बेडवर पडल्यावर किरणला पुन्हा एकटे आणि असहाय वाटायला लागले. डोळ्यासमोर लकीचा चेहरा फिरू लागला. भावना उत्सव म्हणून येऊ लागल्या. असे वाटू लागले.. आत्ताचे आत्ता त्याच्या जवळ जावे!
मन हट्टच करू लागले. काही नाही तरी त्याचा आवाज तरी कानावर पडावा, म्हणून हृदयातून आक्रमण सुरू झाली. फॅन फास्ट असूनही किरणच्या अंगाला दरदरून घाम फुटला. मनात पुन्हा काटे टोचू लागले. पार्टी नंतर मिळवलेली स्वातंत्र्याची स्थिती क्षणभंगुर ठरली होती.
"आपण उगाच हुशारी मारत होतो. लकी बरोबर प्रणय केल्याने त्याचे भूत आपल्या वरून निघून जाईल, हा आपला अंदाज खोटा ठरला होता."
किरणला आपल्या या विचारांनी खूप भीती वाटू लागली.
"आता पुढे काय करायचे?"
मनातील सल खूपच असह्य होत होती. लकीच्या विचारांनी मन व्याकुळ झाले होते.
"तो माझा आहे... तो माझाच आहे... मी त्याच्या शिवाय नाही राहू शकत! लकी ए लकी, ये ना माझ्या जवळ, ये ना... मला अंतर देऊ नकोस... मी तुझ्या शिवाय नाही राहू शकत!"
स्वतःचे व्याकुळ मन लकीचा धावा करू लागले. आता मात्र खूप त्रास जाणवू लागला. किरणने मोबाईल घेतला आणि सरळ लकीला फोन लावला. सगळे प्राण कानात येऊन बसले होते. बराच वेळ वाजली, परंतु त्याने फोन काही उचलला नाही.
बेल वाजत होती आणि किरणचा धीर सुटत होता. शेवटी आपोआप फोन डिस्कनेक्ट झाला आणि किरण धायमोकलून रडू लागली.
"हे आपल्या बरोबर असे का होते? का नियतीला मला सुखी बघायचे नाहीये? मी असे कोणते पाप केले की त्याची ही सजा मला मिळतेय? किती आनंदाने मी पार्टीचा प्लॅन केला.. की माझी सुटका होईल. परंतु मी आता तर जास्तच अडकू लागलोय. देवाला मी या धरतीवर नकोय का? मी मरून जावे असेच जर ठरलेले असेल तर खरंच विष प्राशन करून मरून जावे..."
किरण असंबद्ध बडबडत अंधारात बघत होती. इतक्यात तिला डॉक्टरने दिलेल्या गोळ्या आठवल्या. धडपडतच तिने लाईट लावली आणि कपाटात गोळ्यांच्या डब्यात शोधू लागली. परंतु तेथे एकही गोळी तिला सापडली नाही.
"आपण यातच गोळ्या ठेवल्या होत्या ना? मग गेल्या कुठे!?" ... तिचा स्वतःवरच संताप वाढत होता.
तिने भिंतीला डोके आपटायला सुरुवात केली. डोक्याला लागत होते, परंतु मनातील शल्यापुढे ती वेदना नगण्य वाटत होती. डोके आपटून डोक्याला सूज आली आणि किरण खाली जमिनीवर बसली. विचार चारी बाजूंना फिरत होते. पुन्हा डोक्यात एक विचार चमकला...
"पार्टी मध्ये उरलेली दारू... बस्स झाले तर!!"
किरण तिरमिरीत उठली आणि तिने किचन मध्ये दडवून ठेवलेली दारूची बाटली काढली. भराभर ग्लास काढला, फ्रिज मधून कोल्ड्रिंकची बाटली काढली आणि मोठा लार्ज पेग बनवला. मेंदूला भूल देण्याची तिला इतकी घाई झाली होती की किरणने एका क्षणात ग्लास गटगट आपल्या नरडीखाली घातला. संपूर्ण जहाल लाल रसायन घशातून पोटात उतरले, पोटातून रक्तात आणि रक्तातून मेंदूपर्यंत नशा पोचू लागली. किरण पेग भरत होती आणि पोटात रिचवत होती. चार पेग नंतर तिची हालचाल मंदावू लागली. मेंदू शिथिल होऊ लागला. मनात टोचणारी सल मेंदू विसरू लागला. किरण लकी बरोबरच्या स्वप्नात रममाण होऊ लागली. त्या अवस्थेतच ती बेडवर येऊन पडली आणि पुढील काही मिनिटांत तिला झोप आली.
क्रमशः
किशोर तरवडेDownload the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा