Login

स्वतःला शोधताना : भाग १५.

.
स्वतःला शोधताना : भाग १५.
 
मोबाईलच्या कर्कश आवाजाने तिला जाग आली. डोळे घट्ट झाले होते. प्रयत्नाने डोळे उघडून तिने घड्याळात पाहिले… दुपारचे बारा वाजले होते. पोटात कावळे ओरडत होते. किरण उठून बेडवर बसली. रात्रीचा सीन आठवताच ओहोटी लागली. आह्ह्ह… मेंदूत एक कळ उठली आणि लकीने तत्क्षणी किरणच्या मन-मस्तिष्कावर ताबा घेतला. ती पुन्हा त्याच्या आठवणीने व्याकुळ झाली. तिची भूक क्षणात मेली आणि ती घरात पुन्हा वेड्यासारखी फिरू लागली. काय करू, काय करू… असह्य वेदना वाढू लागल्या. परंतु या वेदना शरीराच्या कोणत्या अवयवाला होत आहेत, हे मात्र सांगता येत नव्हते.


रश्मी एक आसरा होती; पण आपल्या वर्तनाने आपण तिला गमावले, याची बोच आणखी ठणकावू लागली. आता आपला सहारा कोण? भाऊ, बहीण, शाळा-कॉलेजचे मित्र, ऑफिसचे सहकारी—यांपैकी कोणालाच आपण आपले दुःख सांगू शकत नाही… मग आता काय करायचे? या असह्य, वाढत जाणाऱ्या वेदनेने किरण तळमळत होती. उपाय म्हणून तिने थंड पाण्याने अंघोळ केली… पण संपूर्ण शरीरात ठसठसणारी वेदना कमी होत नव्हती. सारखे वाटत होते की रात्री जे केले ते पुन्हा करावे… मनाची त्रिशंकू अवस्था खरोखरच दयनीय होत चालली होती.


त्या वेदनेतून सुटका मिळावी म्हणून तिने मोबाईलमधून लकीचे फोटो शोधून काढले. मोबाईलच्या स्क्रीनवरील त्याचे अस्तित्ववाने तिच्या नजरेला वाहन बनवून किरणच्या शरीराचा ताबा घेतला.. तिचे सर्वांग एका अनामिक तगमगीने व्यापून गेले.. शरीरातून गरम वाफा येऊ लागल्या... अंगावरचे कपडे तिला नकोशी झाले आणि दुसऱ्याच क्षणी ते अस्तव्यस्त बाजूला पडले आणि तिने डोळे मिटले…

त्या क्षणी लकी जणू किरणच्या अस्तित्वात मिसळल्या सारखा वाटू लागला. त्याची उपस्थिती तिच्या संवेदनांच्या कडांवर नक्षी उमटवत तिच्या श्वासात, तिच्या स्पंदनात उतरू लागली. ओठांपासून मानेपर्यंत, कानांजवळून खाली उतरत अंतरंगा पर्यंत एक अनामिक ऊब पसरत होती. त्या उबेच्या लाटा वेग घेऊ लागल्या... मन हळूहळू वास्तवाच्या दुनियेला विसरून गेले… त्या सप्तरंगी अवकाशात फक्त किरण आणि लकीच उरले होते. तो तिच्यात पूर्णतः सामावून गेल्याचा भास तिला होत होता. ते दोघंही जणू गोल फिरत होते, प्रत्येक क्षणासोबत ते हवे हवेसे वाटणारे अस्तित्व तिच्यात उतरत होते. 

शरीराच्या प्रत्येक रोमात आनंदाची लाट उसळत होती… प्रत्येक आवर्तना बरोबर लकी तिच्यात विरघळत होता. शरीराच्या रोमारोमात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या… शरीराच्या गाभ्यात तीव्र ऊर्जा खदखदत होती. भावना शिगेला पोहोचताच मोतिया रंगाच्या ऊर्जेची आतिषबाजी झाली झाली…
आणि त्या क्षणी सगळं शांत झालं. किरण थकलेल्या पानासारखी जमिनीवर कोसळली आणि तिने समाधानाने डोळे मिटले…  


मध्ये किती कालावधी गेला, कोणालाच माहीत नव्हते… गारेगार लादीने अंग गारठून बधिर झाले होते… डोके गरगरत होते. पोटात भुकेने गोळा उठला होता… हळूहळू आजूबाजूची जाणीव परत येऊ लागली आणि किरणने कसाबसा स्वतःला सावरून उभे राहण्याचा प्रयत्न केला… पण बसण्या व्यतिरिक्त तिला काहीच करता आले नाही. घरात चहूबाजूंना मिट्ट काळोख पसरलेला होता. सोफ्याचा आधार घेत तिने दिव्याचे बटन दाबले. ट्यूबलाईटचा प्रकाश डोळ्यांना असह्य झाला.


काही वेळाने डोळे सरावले आणि तिची नजर घड्याळाकडे गेली. रात्रीचे दहा वाजले होते. टीपॉयवर ठेवलेला मोबाईल उचलून तिने पाहिला. ऑफिसमधून सात आठ मिस्ड कॉल दिसत होते. मनात पुन्हा वादळ घोंगावू लागले… लकीने तर कॉल केले नसतील ना? पुन्हा किरणची अवस्था अस्वस्थ झाली. बेडवर बसून तिने दोन्ही हातांनी स्वतःचा चेहरा झाकून घेतला. मन ओरडून सांगत होते… मला ही वेदना, ही भिकारी अवस्था नकोय… परंतु लकीच्या प्रेमरोगाची लागण फारच चिवट होती.


कसेतरी स्वतःला सावरून तिने रिसेप्शनिस्ट नवीन शेट्टीला कॉल केला. तिसऱ्या रिंगमध्ये त्याने फोन उचलला.


“हाय किरण ताई! काय झालंय? सगळं ठीक आहे ना? दोन दिवस ऑफिसला आलेल्या नाहीत, इन्फॉर्मही नाही केलं. सर विचारत होते. किती कॉल केले; तुमचे कॉलही उचलले गेले नाहीत.”


नवीनचे ते काळजीने विचारणे ऐकून तिच्या तोंडातून नकळत हुंदका फुटला. डोळ्यांना अश्रूंची धार लागली. त्या क्षणी तिला सांत्वनाचा स्पर्श हवा होता. ती खूप हतबल आणि एकाकी झाली होती. हे जीवन त्या क्षणी संपवावे, अशी प्रचंड इच्छा मनात उधळून आली होती. नवीनने तिचा हुंदका ऐकला आणि किरणच्या कानात काळजीचा स्वर गुंजला.


“किरण ताई! काय झालंय मला सांगणार नाही का? मी आत्ताच्या आत्ता तुमच्या घरी येतोय; पण तुम्ही रडू नका. मी आहे ना तुमच्यासाठी… बोला किरण ताई, बोला.”


अगदी बारावीमध्ये असतानापासून नवीन ऑफिसमध्ये काम करत आला होता. नवीन असताना किरणनेच त्याला मदत करत ऑफिसमध्ये स्थिरावले होते… नवीनला तिचे दुःख सहन होत नव्हते… शेवटी किरणलाच तिची लाज वाटली. इतके छोटे पिल्लू तिची काळजी घेत होते, तिला धीर देत होते… किरणने मन घट्ट केले आणि बोलली...


“नवीन बाळा, काही नाही झालं रे! खूप एकटं वाटत होतं म्हणून रडू आलं. थोडं बरं नव्हतं, मनस्थिती ठीक नव्हती; म्हणून ऑफिसला येता आलं नाही. झोप लागली म्हणून फोनही घेतले नाहीत. तू काळजी करू नकोस; मी सोमवारी येईन ऑफिसला.”


किरणच्या बोलण्याने त्याचे समाधान झाले नसावे; म्हणून त्याने पुन्हा विचारले...


“नाही नाही किरण ताई! मी उद्या माझ्या मम्मीसोबत तुमच्या जवळच्या एरियात लग्नाला येतोय. मम्मीला हॉलमध्ये सोडून मी तुम्हाला भेटायला येणार आहे.”


नवीनने हट्टच धरला. त्याचे ते निरागस प्रेम पाहून किरणला भरून आले. ऑफिसमधील जवळजवळ सगळ्यांचाच तिच्यावर जीव होता. तिला माहीत होते—नवीन आल्याशिवाय राहणार नाही. शेवटी किरण त्याला म्हणाली...


“नवीन राजा, मी एक काम करते... मीच लग्नाच्या हॉलकडे येते. त्या निमित्ताने माझं फिरणं होईल, तुझ्या आईलाही भेटता येईल आणि तुझ्याशीही बोलता येईल. तू मला हॉलचा पत्ता पाठव; मी दुपारी चार वाजता येईन तिकडे. चल, आता ठेवते फोन. तू माझी काळजी घेत असताना मला काहीच होणार नाही. गुड नाईट.”


“किरण ताई, जेवण वगैरे करून घ्या… काळजी करू नका. कसलीही मदत लागली तर अर्ध्या रात्रीही मला फोन करा. गुड नाईट ताई.”


नवीनच्या फोनने आणि त्याच्या सांत्वनाने किरणला धीर आला. त्या कोसळलेल्या क्षणी तिला खरोखरच त्याची गरज होती.