Login

स्वतःला शोधताना : भाग १९.

.

नवीन शांतपणे किरणकडे पाहत होता. तिच्या चेहऱ्यावर उमटलेले ते क्षीणसे स्मित त्याच्या नजरेतून सुटले नाही. काही वेळापूर्वी तिच्या डोळ्यांत साचलेली असहाय्यता आता जरा निवळलेली वाटत होती. त्या बदलाची नोंद घेत तो स्मित करत म्हणाला... 


“किरण दिदी… तुम्ही असेच हसताना आम्हाला सगळ्यांना फार आवडता. तुमचं हे हसू… खूप काही सहन करून उभं राहिलेलं आहे असं वाटतं.”


क्षणभर थांबून तो पुढे बोलू लागला. त्याचा स्वर गंभीर झाला,  मनातील त्या आठवणींनी त्याच्या चेहेऱ्यावरील भाग क्षणात बदलले.. 


“माझ्याही आयुष्यात एक प्रसंग घडला होता… तेव्हा मी बारावीत होतो. कॉलेज मधून येताना रस्त्याच्या कडेला एक झोपडपट्टी लागायची. तिथे किन्नरांची एक वस्ती होती. सुरुवातीला कुतूहल म्हणून, मग सवयीने, आणि नंतर नकळत… माझं लक्ष तिकडे जायचं.


एके दिवशी मला माझ्याच वयाचा, फारच कोवळा किन्नर तेथे दिसू लागला. तो आपल्या गुरूंच्या खाटेजवळ खाली मान घालून सेवा करत असायचा. त्याच्या हालचालीत भीती होती… आणि डोळ्यांत एक प्रचंड एकटेपणा.”


नवीन क्षणभर थांबला. आठवणींची गर्दी त्याच्या डोळ्यांत उतरली होती.


एके दिवशी आमची नजरा नजर झली. त्याच्या नजरेत मला प्रचंड एकटेपणा दिसला. माझ्या मनात अस्वस्थतः पसरली. डोक्यात सतत त्याचाच विचार येऊ लागला. "हा कोण असेल? कोठून आला असेल? त्याला पळवून तर आणले नसेल ना? की विकत घेतले असेल? याच्या आई बाबांनी त्याला घरातून हाकलून दिले तर नसेल ना? याच्या मनात काय दुःख असेल. एक नाही तर असंख्य प्रशांनी मी पुरता दुखी झालो होतो. आपण त्याची मदत करावी... पण नक्की कशी मदत करावी? काहीच सुचत नव्हते."  


एके दिवशी तो हलकेच हसला... ते हसू वेदनेचं होतं.


"रोज तो जणू माझी वाटच पाहत असायचा. मी तेथून जाताना मला एकटक पाहत राहायचा. मला पाहताच त्याच्या डोळ्यात आनंद दिसायचा, त्याच्या रुक्ष आयुष्यात माझे दिसणेच ओऍसिस असावे असा तो फुलायचा. अगदी लांब गेल्यावरही मी मागे वळून पाहायचो. त्याची नजर माझ्या माघारीच असायची. पुढे ती नजर जणू माझी सावली झाली होती." 



"कॉलेज व्हेकेशन मध्ये मी माझ्या गावी केरळला गेलो होतो. जेव्हा पुन्हा कॉलेज सुरु झाले मी उत्साहात त्या रस्त्याने त्याला पाहण्यासाठी गेलो. परंतु तो काही दिसला नाही. मी त्याच्यासाठी दोन तीन राउंड मारल्या, वाटले कदाचित घरात काम करत असेल. नंतर मी रोज एक दोन तास लांब उभे राहून त्याची वाट पाहू लागलो परंतु तो मला कधीच दिसला नाही." 


"पुढील महिनाभर मला खूप चुटपुट लागून गेली होती. तो कुठे असेल, त्याचे काही बरेवाईट तर झाले नसावे ना? भावनांचा कल्लोळ माजला होता. अपराधी वाटत होते की आपण त्याला मदती विषयी विचारायला पाहिजे होते"


"माझी अस्वस्थता माझ्या आई पासून लपून राहिली नव्हती. एकदा मी झोपलेलो असताना आई माझ्या बाजूला आली. माझ्या केसात चेहेऱ्यावर तिचा साई सारखा मऊ हात फिरवत मला माया करू लागली. मी अलगद आईला बिलगलो. आईने मला कुशीत घेत प्रेमाने माझ्या चेहेऱ्यावरून हात फिरवत विचारले."
 

"बाळा! केरळ वरून आल्या पासून मी बघतेय, तू अस्वस्थ दिसतोस... कॉलेज मध्ये काही घडलेय का? कुणा मुलीवर तुझे मन आलेय आणि ती तुला टाळतेय असे तर नाही ना?"

नवीनच्या ओठांवर हळूच स्मित उमटलं.


"आईचा मनकवडा स्वभाव मला माहीतच होता आणि मी माझ्या आई पासून काहीच लपवत नाही. मी तिला त्या किन्नर वस्ती बद्दल आणि त्या कोवळ्या किन्नराच्या नजरेतील भावने बद्दल सगळे काही सांगितले... माझ्या मनातील अपराधी भावही आईला सांगितला. आईने मला आणखीन जवळ घेतले आणि म्हणाली." 

"बाळ माझे ते!! इतक्या लहान वयात दुसऱ्याच्या मनाचा विचार करतेय... स्त्री असो, पुरुष असो की किन्नर असो, शेवटी आपण सगळे हाडामासाची माणसंच आहोत. लिंग भेद आणि दुजाभाव कधीही करू नये. राहिली त्या किन्नराची गोष्ट त्यांचे जीवन काटेरीच असते. त्याच्या प्राक्तनात जे होते ते होणारच होते. तू तुझे कर्म चांगले करत जा बस. आता तू जास्त विचार करून नकोस.. दुनिया गोल आहे. त्या किन्नराला तुझ्याशी काही बोलायचे असेल तर पुन्हा कधीतरी तो नक्कीच तुला भेटेल. चल आता झोपी जा. शिकून खूप मोठा हो"


नवीनचा आवाज जड झाला. नवीनने किरणकडे पाहत पुढे सांगितले... 


“त्या दिवसापासून मी लैंगिकते विषयी वाचायला सुरुवात केली. समज वाढत गेली. तेव्हा कळलं... आपण सगळे वेगवेगळ्या संघर्षातून जात असतो.”


तो थोडा थांबला, शब्द जपून वापरत म्हणाला... 


“किरण दिदी… मला असं वाटतं की तुम्ही फार वर्षं एकाकी आयुष्य जगलात. मनात प्रेमाची, साथ मिळण्याची इच्छा असणं चुकीचं नाही.
पण कधी कधी मन इतकं थकलेलं असतं की चुकीचा धागा धरून बसतं… आणि त्यातून बाहेर यायलाच घाबरतं.”


नवीन थोडा संकोचत म्हणाला... 


“गैरसमज करून घेऊ नका, पण मला वाटतं तुम्ही एखाद्या चांगल्या मानसोपचारतज्ञाची मदत घ्यावी. समाजात गैरसमज आहेत… पण मनाचं दुखणंही दुखणंच असतं. योग्य मदत मिळाली तर मनाला बळ येतं.”


किरण शांतपणे ऐकत होती. प्रत्येक शब्द तिच्या आत खोलवर उतरत होता.


"इतक्या कमी वयात हा मुलगा इतका प्रगल्भ कसा?" आणि आपण… मनाच्या थकव्याला दोष देत आयुष्य फरफटत नेलं." 


क्षणभर तिला अंगावर काटा आला. ती भीती नव्हती... तर या क्षणी झालेल्या जाणिवेचा शहारा होता. तिने नवीनकडे पाहत त्याचे दोन्ही हात हातात घेतले.


“नवीन… तुझ्यामुळे मला एक नविन मार्ग, एक आशेचा किरण दिसतोय. मी नक्कीच मानसोपचारतज्ञाची भेट घेईन. आणि हो... कितीही अवघड वाटलं तरी सोमवार पासून ऑफिस जॉईन करेन. तू फॅमिली फंक्शन सोडून माझ्यासाठी आलाय मी तुझा जास्त वेळ घेतला"


नवीनने किरणला निरोप दिला आणि सगळे व्यवथित होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. किरण तेथून निघाली... बस पकडायला हायवेवर आली. मनात विचारांचे चक्र सुरूच होते. तिने स्वतःलाच बजावलं... 


"मनाच्या कमकुवत पणामुळे आपले किती नुकसान झालेय, त्या सगळ्या मुळेच काल रात्रीचा घाणेरडा प्रसंग घडला... मन रक्तबंबाळ झालेय. एकावर एक आफत येतेय फक्त. मानसिक आघातावर इलाज करण्या अगोदर काल जे घडले त्यासाठी औषोधोपचार करणे प्रथम गरजेचं आहे"

तिने जवळचं मेडिकल गाठलं. अँटिसेप्टिक क्रीम, काही वेदनाशामक गोळ्या घेतल्या. पिशवी घट्ट धरत, किंचित थकलेल्या पण अधिक सजग पावलांनी, किरण घरी निघाली.


क्रमशः

©किशोर तरवडे 


0

🎭 Series Post

View all