Login

स्वतःला शोधताना : भाग २५.

.

पार्टी नंतर किरण घरी आली, मोनिकाच्या वाक्याने मनात घर केले होते.. 'त्या' विचाराने मेंदू उन्मादीत झाला होता. डोक्यात निरनिराळ्या योजना बनत होत्या. बराच विचार केल्या नंतर तिने कॅलेंडर खाली काढले आणि भराभर वर खाली करत एखाद्या उत्सवाची सुट्टी शोधू लागली.


परंतु सुट्टी ऐवजी तरुणाईसाठी खास असे काहीतरी हवे होते आणि कॅलेंडर मधील फेब्रुवारी १४ तारीख तिला खुणावू लागली. संपूर्ण जगात साजरा होणार हा प्रेमाचा दिवस. बस्स झाले तर!! याच दिवशी आपण ते सगळे साध्य करायचे.... घरी मस्त ओली पार्टी ठेवायची... आता मागे हटायचे नाही. लाज, विवेक, बाजूला सारून या जळणाऱ्या मनावर थंड पावसाचा शिडकावा करून हृदयातील आग शांत करून घ्यायची. मग झाले तर...


उद्या ऑफिसला गेल्यावर लगेचच याची अनाउन्समेंट करायची, आपल्या निवडक स्नेह्यांमधे उत्साहाचे वातावरण पसरावायचे. फक्त लकीला आमंत्र द्यायचे नाही, परंतु त्याच्या पर्यंत बातमी पोहोचेल याची काळजी मात्र घ्यायची.


मनात पूर्ण योजना तयार झाली आणि किरणच्या अंगावर आनंदाचे रोमांच उभे राहिले. एक नावीन्य... एक वेगळीच ऊर्जा तिच्या अंगांगात कार्यान्वित झाली... तिने लगेच गेस्ट लिस्ट बनवायला सुरुवात केली. जवळ जवळ एक तासांनी तिची गेस्ट लिस्ट तयार झाली होती आणि पॅडच्या फाडलेल्या पानांचा ढिगारा बाजूला पडलेला होता.


तिने पुन्हा गेस्ट लिस्टचा कागद डोळ्यांसमोर पकडला.. एक एक नाव वाचत विचार करत तिने पुन्हा त्यातून दोन नावे काढून टाकली. आता कुठे तिचे समाधान झाले होते. चेहेऱ्यावर एक वेगळेच हास्य उमटले होते. गेस्ट लिस्टमध्ये नंबर्स खूपच जास्त वातूळ लागले होते. ऑफिस मधील तिच्या काही विवाहित मैत्रिणी आणि हितचिंतक महिलाही होत्या. त्यांना कदाचित मुलाबाळांना सोडून येता येणार नव्हते... त्यांना नाराज करून चालणार नव्हते. त्यासाठी तिने एक वेगळा प्लॅन आखला.


ज्यांना त्या दिवशी जमणार नव्हते त्यांना १४ फेब्रुवारीच्या अगोदरच गोमंतक हॉटेलमध्ये जेवण करण्याचा प्लॅन फिक्स केला. आपल्या योजनेवर खुश होत तिने स्वतःचीच पाठ थोपटली. कारण कुणीच नाराज होणार नव्हते. ज्यांना तिने वगळले होते त्यांच्याशी तिचे काहीच देणे घेणे नव्हते. हुश्श्य करत तिने समाधानाने ती लिस्ट आपल्या ऑफिसच्या बॅगमध्ये ठेवली. 


"उद्या ऑफिसला गेल्यावर लिस्ट प्रमाणे व्हेज आणि नॉन व्हेज जेवण याची माहिती करून घ्यायची." तिने स्वतःला बजावले. 


तिच्या या सगळ्या कामात दुपार टाळून गेली होती. भुकेची जाणीव केव्हा पासून होत होती. आज बाहेरचे काहीच खायची इच्छा नव्हती... तिने उठून कुकर लावला आणि फ्रिजमधून शेवटची उरलेली दोन अंडी बाहेर काढली. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत तिने ऑम्लेटसाठी लागणारा मसाला, कोथिंबीर, मिरच्या, कांदा, टोमॅटो चिरून ठेवला. डाळीला फोडणी देऊन तिने तव्यावर ऑम्लेट बनवून घेतले. ऑम्लेटच्या खमंग सुवासाने भूक आणखीन वाढली.


डाळ भात आणि खमंग ऑम्लेटवर ताव मारून तिने किचन तसेच घर आवरून गादीवर लोळत आपल्या पार्टीचा विचार करू लागली. विचार करता करता तिला वाटत होते की काहीतरी राहून जातेय... आणि मग शेवटी तिला आठवले... अरे, आपल्याला प्रत्येकाचे दारूचे ब्रँड पण विचारावे लागतील. याच बरोबर तिच्या डोक्यात आणखीन एक कल्पना आली की पार्टीत येणाऱ्या प्रत्येकाला काहीतरी गिफ्ट सुध्दा द्यायचे, त्यामुळे आपल्या पार्टीची चांगली आठवण राहिली पाहिजे.


बराच वेळ विचार केल्यावर तिच्या डोळ्यांसमोर लकी आला.... चहा पिऊन झाल्यावर तो मागील खिशातून रुबाबात त्याचे लेदरचे जीर्ण झालेले वॅलेट काढतो. आपण त्याला बरेचदा सांगूनही त्याने अजून ते बदलले नव्हते.... ठरले तर!! आपण सगळ्या पुरुष गेस्टना छानसे वॅलेट म्हणून द्यायचे आणि महिलांना छानसा डिओ. उद्या ऑफिसच्या लंच टाइममध्ये या सगळ्या गोष्टींचा निकाल लावायचा तिने ठरवले.


रात्री झोपे पर्यंत तिच्या मनात पार्टीचे संपूर्ण आयोजन आखून झालेले होते. थंड, फ्रुटी, चॉकलेट्स, जेवणानंतर गोड पान, चाखण्यासाठी तळलेले चिकन, लॉलीपॉप, माशांचे चौकोनी काप, बिर्याणी... सगळे शास्त्रोक्त प्लॅन तयार झाला होता. तिचा आनंद गगनात मावत नव्हता. आज तिने ठरवले की आजपासून मनोचिकित्सेच्या औषधाचे दास्यत्व संपवायचे. तिने रात्रीची गोळी खाल्लीच नाही... एक तासांनी गोळीचे विथड्रॉव्हल सिम्टम्स जाणवू लागले... संपूर्ण शरीराची तगमग सुरु झाली.... परंतु तिने मन घट्ट करून सगळे सहन करत रात्र काढली.


सकाळी कधीतरी डोळा लागला.. स्वप्नांच्या मालिका लकी भोवती फिरून संपत होत्या. लकीने तिचे संपूर्ण अस्तित्वच व्यापले होते. सकाळी गजर झाला आणि किरण उत्साहात उठली. गोळी खाल्ली नसल्याने घशाला कोरड पडली होती. डोक्यात एक त्रासदायक कलकलाट सुरु झाला होता. उलटी सारखे वाटत होते. तिने थंड पाण्याची बाटली तोंडाला लावली.


घशाची कोरड गेली. परंतु एक अनामिक चिंता अचानक त्रास देऊ लागली. बेसिन समोरील आरशा समोर उभे राहून तिने आपले प्रतिबिंब पाहिले. आज कित्येक दिवसांनी ती स्वतःला न्याहाळत होती. क्षणभर तिने स्वतःला ओळखलेच नाही.. किती म्लान झालोय, लाचार वाटतोय आपण, अगदी रसहीन, डोळ्यांखाली सावली पडू लागली होती, मनात एक हताशा दाटली. तिने पाण्याचे हबके चेहेऱ्यावर मारले. आता जरा बरे वाटू लागले.


औषध सोडल्याचे विथड्रॉव्हल सिम्टम्स कसे सहन करायचे या विचारात तिने आपले आवरायला घेतले. अंघोळी नंतर चहा आणि बिस्किट्स खाऊन ती घरातून बाहेर पडली... नेहमीच्या ट्रेनने सीएसटीला उतरली. डोक्यात पुन्हा पार्टीचा प्लॅन जागा झाला होता. आता या पार्टीतूनच आपल्या सुटकेचा, लकीच्या एकतर्फी प्रेमाच्या दास्यातून सुटकेचा मार्ग निघेल, याची मनोमन खात्री तिला पटली होती.


आपली सुटका होणार या विचारात ती ऑफिसला पोहोचली. नविनने गोड स्माईल दिली. किरणने त्याला अगदी जवळून पहिले... गोळीचा अंमल नव्हता... आज नविन तिला खूपच आकर्षक दिसत होता.... त्याला पाहता पाहता तिची नजर चेहेऱ्यावरून त्याच्या सर्वांगावरुन फिरली... जवानी त्याच्या प्रत्यंगातून बाहेर येऊ पाहत होती.


"मनाला कसली लागण झालीय???" अंतर्मनातील विवेकाने तिला फटकारले.... एक तीव्र झटकाच बसला.... मनाच्या लाजेने तिने नजर खाली वळवून स्वतःच्या सीटकडे निघाली. पेंडिंग कामाचा ढीग लागला होता. तिने भराभर सगळ्या पेंडिंग कामांची अर्जन्सी नुसार यादी बनवली आणि त्या प्रमाणे कामास सुरुवात केली. त्या दरम्यान तिने पार्टीची गेस्ट लिस्ट टाईप केली.


सामानाची यादी... जेवण व इतर वस्तूंची ऑर्डर कुठे द्यायची इत्यादी सगळं जणू एक प्रकल्पच तिने बनवला. गेस्ट लिस्टवरून शेवटची नजर फिरवत असतानाच तिचा ऑफिस बॉय मागे येऊन उभा राहिला. त्याने नावांची लिस्ट आणि त्यापुढील रकान्यात व्हेज, नॉन व्हेज, बुज टाईप, इत्यादी टाईप कॉलम पाहिले. त्याला राहवलेच नाही, त्याने पटकन किरणच्या खांद्याला स्पर्श करत तिचे लक्ष वेधून घेतले. 


त्या स्पर्शाने किरण मोठ्याने दचकली... तिच्या दचकण्याने प्यून घाबरून मागे सरकला... घसरून त्याचा तोलच गेला. परंतु खुर्चीला पकडून त्याने स्वतःला सावरले. किरणनेही पटकन वळून त्याला हात दिला. 


"काय मॅडम ! चांगलाच तोंडावर पडणार होतो, इतके काय दचकलात? जसा काही तुमच्या खांद्यावर सापच रेंगाळला" ... विलास प्यून नाराजीने म्हणाला.


किरणला फार ओशाळल्या सारखे झाले. परंतु तिची तोळामासा मनस्थिति ती प्यूनला सांगू शकत नव्हती. प्रथम तिला वाटले होते की लकीने येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवलाय. किरणने कसनुसं तोंड करत त्याची माफी मागितली. इतक्यात तिची नजर गेटमधून येणाऱ्या लकीवर पडली. हृदयात धडधड सुरु झाली. डोक्यात वेदनांचा कलकलाट होऊ लागला. लकीने तिरप्या नजरेने किरणकडे पाहिले आणि तो घाईनेच वर जाऊ लागला. किरणने पण आपले तोंड कंप्युटरमध्ये खुपसले... आणि तिच्या कानावर प्यूनने लकीला दिलेली हाक पडली.


"लकी सर!! जरा यहा तो आओ... किरणजीने एक लिस्ट बनायी है, उसमे आप का नाम एकदम उपर लिखा मैने देखा, कुछ इन्क्रिमेंट होने वाला है क्या?"


किरणच्या मनात धस्स झाले. आपण ठरवले होते की लकीचे नाव लिस्टमध्ये लिहायचे नाही, परंतु बातमी त्याच्या पर्यंत पोहोचेल याची काळजी घ्यायची... म्हणजे त्याने येऊन आपल्याला विचारले पाहिजे. परंतु आपल्या हातून चूक झाली आणि आपणच त्याचे नाव सर्वात पहिले टाईप केले आणि या नारदमुनी प्यूनने ती लिस्ट वाचली. आता काय होणार???? किरणने जराही आपली मान वळवली नाही...


प्यूनच्या बोलण्याचा लकीवर परिणाम झाला... त्याची पाऊले अडखळली... त्याने क्षणभर इकडे तिकडे पाहिले... कुणीच पाहत नाही असे बघून तो किरणकडे आला आणि अगदी जवळ उभा राहिला. किरणची हालत खराब होऊ लागली होती. मन मस्तिष्कात घण वाजू लागले होते.... अंगावर एक रोमांच पेटून फुटू लागला होता. इतक्यात तिच्या खांद्यावर लकीचा हलकेच हात पडला...


"स्स्स्स्स्स्स्सस" किरणचे अंग जळू लागले.... नाईलाजाने किरणने आपली खुर्ची फिरवली आणि नजर लकीकडे गेली. जवळून त्याचा चेहेरा तिचे मन जाळत होता... त्याचा डिओमिश्रित घामाचा पुरुषी सुगंध किरणला वेड लावत होता. तिची मती गुंग झाली होती. इतक्यात तिच्या कानावर लकीचे शब्द आदळले आणि तंद्री भंगली...


"किरणजी, ये प्यून क्या बोल रहा है? कसली लिस्ट बनवायला सांगितली आहे साहेबांनी?"


लकीचे विचारणे ऐकून किरणला अगदी मनासारखे झाले. तिने फाईलच्या वर ठेवलेली लिस्ट काढली आणि त्याच्याकडे पाहत उत्तर दिले...


"हम्म्म .... तसे काही विशेष नाही! म्हणजे मी माझ्या घरी एक लहानसे गेट टू गेदर ठेवतेय. त्याच्या गेस्टची लिस्ट बनवली आहे."


किरणची नजर लकीच्या चेहेऱ्यावर होती... तिने घरी गेट टू गेदरचे नाव घेतले तसे त्याची उत्कंठा वाढलेली दिसली की हिने कोणाकोणाला बोलावले आहे... आपले नाव त्यात आहे की नाही? लिस्टचा कागद थोडासा आपल्याच हातात धरून तिने पुन्हा लकीकडे पहिले... त्याच्या डोळ्यात नावे वाचण्याची घाई दिसत होती. शेवटी त्यानेच हात पुढे करत किरणच्या हातातून तो कागद घेतला आणि अधाश्या सारखा वाचू लागला.... लिस्टमध्ये त्याचे नाव पहिल्या नंबरला पाहून त्याला स्वतःचाच गर्व वाटू लागला... त्याने प्यूनकडे त्याच गर्वाने पाहिले आणि म्हणाला...


"पार्टीत सगळ्यात पहिले माझेच नाव आहे, म्हणजे मी नाही आलो तर पार्टीला काहीच अर्थ नसणार ना??"


प्यूनने काहीसे तोंड वाकडे केले.... त्याला लकीचा स्वभाव माहीत असल्याने त्याने मुद्दाम टोमणा मारला...


"तू नाही आला तर बरेच आहे, नाहीतरी मागच्या पिकनिक वरून आल्यावर किरण मॅडम आजारी पडल्या होत्या, तू काही केले नाहीस ना त्यांना... तुझीच नजर लागली असेल त्यांना."


प्यूनच्या टोमण्याने लकीचा तिळपापड झाला. परंतु तो काहीच बोलला नाही. किरणने त्याच्याकडून ती लिस्ट घेतली आणि पुन्हा आपल्या फाईलवर ठेवली. त्याच्या नावावर पेनने टिक केले आणि म्हणाली...


"तुझे येणे कन्फर्म झाले तर..."


तिने त्याच्या नावापुढे नॉन व्हेजच्या रकान्यांत टिक केली तसेच त्याचा ब्रँड आरसीवर टिक करत पुन्हा विचारले...


"आप पार्टी मी कितना पीओगे?"


पिण्याचा विषय आल्यावर जसा प्रत्येक पुरुषाचा मूड बनतो तसाच काहीसा त्याचा चेहेरा झाला. त्याने समोर उभ्या खवचट प्यूनकडे पाहिले आणि बोलला...

"वैसे मैने पिना चालू किया तो सुबह तक पिता हू... तरी माझ्यासाठी एक खंबा तरी लागेल, बाकी आपले बजेट, चलो मुझे काम है, मेरा आना कन्फर्म है."

असे म्हणत तो निघून गेला.


क्रमशः 
©किशोर तरवडे 


0

🎭 Series Post

View all