Login

स्वतःसाठी जगायचं...भाग 2

स्वतःसाठी जगायचं

स्वतःसाठी जगायचं...भाग 2
©® ऋतुजा

दरम्यान, मुलांना वाढवणं, वडिलांच्या स्वभावाची सावली त्यांच्यावर पडू नये याची काळजी घेणं, हेही जरुरी. अशा ‘हिटलरी’ घरात मुलं एकतर विझून जातात किंवा बंडखोर होतात. मात्र वडिलांचा स्वभाव समजून घेणं, त्यांच्याविषयी मुलांच्या मनात अप्रीती निर्माण होऊ न देणं, ते करत असलेल्या चांगल्या गोष्टींची जाणीव ठेवणं, या संस्कारांच्या परीक्षेत रमाआजी उतरल्या. दोन्ही मुलं तशी शांत स्वभावाची निघाली. आपलं शिक्षण पूर्ण करून संसाराला लागली. थोरला शिकला त्याच कॉलेजमध्ये प्राध्यापक झाला, तर धाकटा केंद्र शासनाच्या नोकरीत दूर शिमल्याला निघून गेला.


घरात थोरली सून आली. आता तरी नवऱ्याचा स्वभाव शांत होईल असं रमाआजींना वाटलं, पण माणसाचा स्वभाव शरीराला त्वचा चिकटून असावी तसा चिकटलेला असतो.

वयानं तो सौम्य होतो, म्हणण्यापेक्षा तो सहन करून घेणारे घटत गेले की तो व्यक्त करायला माणसं उरत नाहीत हे अधिक सत्य.

विळीला धार उरली नाही, की ती बोथट होऊन काहीच चिरलं जाऊ नये आणि निरुपद्रवी होऊन ती कोपऱ्यात पडून राहावी तसं झालं होतं. मुलं आपल्या व्यापात अडकली. त्यात सून नोकरी करणारी असल्यानं तरुण पिढी व्यग्र होऊन गेली. हक्काची ऐकून घेणारी उरली बायको!
मात्र नवरा निवृत्त झाला, आजोबा झाला,  मालूआजी ' आजी ' झाल्या.

त्यासरशी त्यांनी आपल्या आयुष्याची घडी नव्यानं बसवायला सुरुवात केली. साधारण चाळिशीतच त्यांना पहाटे उठून फिरायला जायची सवय लागली होती, ती पुढे त्यांनी सातत्यानं जपली होती. अगदी मुलांची लग्नं लागली त्या दिवशीही त्या मंगल कार्यालयाभोवती अर्धा तास फिरून आल्या होत्या. नवऱ्याकडून त्याबद्दल बोलणीही खाल्ली होती, कारण एरवी त्यांचं फिरणं आटपेस्तोवर ढाराढूर झोपणारा नवरा त्या दिवशी लवकर उठून बसला होता.


नवरा निवृत्त झाला, सून आली आणि घराचे अग्रक्रम बदलले. सर्वसाधारण कुटुंबांत सूत्रं मुलाच्या हाती जाणं आणि ज्येष्ठांनी व्यवस्थापनात मानद सल्लागार होऊन राहणं अभिप्रेत. सुभेदार घराण्यात मात्र आजोबांनी नातू येईपर्यंत कारभार हाती ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र लवकरच घरची आणि बाहेरची कामं करण्याची धावपळ आपल्याला जमत नाही, हे त्यांच्याही लक्षात आलं. मग त्यांनी नाईलाजानं शस्त्रं खाली ठेवली. रमाआजींनी सूज्ञपणे ज्याला एकेकाळी ‘कमरेच्या किल्ल्या हवाली करणे’ म्हणायचे, ते काम केलं.

सहजतेनं सारे अधिकार सुनेच्या हवाली करून टाकले. स्वयंपाकघरात लुडबुड न करणं, फक्त गरज असल्यास आणि मागितल्यास मदत करणं, हे पहिलं सूत्र. कारण संघर्षाची पहिली ठिणगी स्वयंपाकघरातल्या लायटरनं उडते हे अनेक घरांत त्यांनी पाहिलं होतं. काही गोष्टींकडे कानाडोळा करणं घरातल्या शांतीच्या दृष्टीनं इष्ट, हे रमाआजी ओळखून होत्या. वय वाढतं तसं ऐकायला कमी येणं आणि दृष्टी अधू होणं, ही निसर्गाची योजना आणि याचसाठी साधारण सकाळी सहाला त्या घराबाहेर पडत. एक दोन किलोमीटर अंतरावर पालिकेच्या बगिचात जात. तिथे गोल फिरून हिरवळीवर बसत. इतर बायकाही येऊन टेकत.

रमाआजी त्यांच्याशी आपणहून बोलत, ओळख काढत. गप्पा मारत. एकेकींची सुखदु:खं ऐकून घेत. नुसतं गाऱ्हाणं ऐकून घेणंही त्यांच्या मनाला शांत करतं, हे आजींना माहीत होतं. होता होता एक वर्तुळ तयार झालं. फिरता फिरता आधी लोकांच्या चेहऱ्यावर जे परके भाव असायचे, त्याची जागा स्मितहास्यानं घेतली. हसरी माणसं सुंदर दिसतात, वयापेक्षा तरुण दिसतात, असं रमाआजींचं निरीक्षण. हसणं, हात हलवणं, म्हणजे एकमेकांच्या अस्तित्वाची दखल घेणं. काहींना बरं वाटायला एवढंही पुरेसं असतं.