Login

स्वतःसाठी जगायचं... भाग 1

स्वतःसाठी जगायचं
स्वतःसाठी जगायचं...भाग 1
©® ऋतुजा

सुभेदार आजोबा गेल्याच्या तिसऱ्याच दिवशी रमाआजी आपले नेहमीचे कापडी बूट घालून रोजच्याप्रमाणे भल्या सकाळी ‘मॉर्निंग वॉक’ला बाहेर पडल्या, तेव्हा वेटाळातल्या काहींना आश्चर्याचा सौम्य धक्का बसला. काहींना ते निष्कारण आगाऊपणाचं वाटलं. मात्र जे आजींना जवळून ओळखणारे होते, त्यांना काहीसं बरंच वाटलं. या वयात टिकवलेल्या त्यांच्या उत्साहाचं ते उत्तम लक्षण वाटलं.


‘‘काय आजी? फिरायला?…’’ लठ्ठपणामुळे दोन्ही गुडघे धरून बसलेल्या, अजिबात व्यायामबियाम न करणाऱ्या सुलोचनामावशींनी टोकलंच. त्यांच्या मुलानं नुकतीच त्यांच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया करवून घेतली होती. ‘दीड लाखाला वाटी पडली,’ हे साऱ्या आळीला माहीत झालं होतं! खरंतर त्यांना ‘तिसऱ्याच दिवशी?’ असं विचारायचं होतं, पण रमाआजींच्या दमदार चालीमुळे ते म्हणायची हिम्मतच झाली नाही! ‘‘काय करणार घरी बसून? आपल्या तब्येतीची आपणच काळजी घ्यावी… म्हणजे मुलांवर आपल्या आजाराचा भार नको!’’ रमाआजींनी क्षणभरही न थांबता सुलोचनामावशींचं तोंड बंद केलं आणि त्या नेहमीप्रमाणे झपझप चालू लागल्या.

रमाआजीचं लग्न होऊन त्या सासरी आल्या, तो काळ असेल साठीचा. पोष्टात नोकरी करणारा जावई मिळाला, यातच आई-वडील खूश होते! ‘संसार उत्तम झाला’ म्हणण्यापेक्षा रमाआजींनी तो केला, असं म्हणणं अधिक सयुक्तिक. याचं कारण नवऱ्याचा तापट स्वभाव. जिथे सुभेदार घराण्यानंही त्याच्या स्वभावाचा चांगलाच ताप भोगला होता, तिथे नव्यानं घरात आलेल्या नवरीचं काय?

सासू-सासऱ्यांचा स्वभाव शांत होता, एवढाच रमाआजींना दिलासा.
काही गुण एक पिढी ओलांडून जातात म्हणे. याचा अर्थ आपला नातू एखादवेळी संतापी निघेल, मात्र पोरं शांत असतील, एवढाच बोध रमाआजींनी या चर्चेतून घेतला! पण ज्याच्याबरोबर सारं आयुष्य काढायचं आहे त्या सहचराचं काय?…

‘मनानं दादा चांगला आहे हो! फक्त कधी कधी रागात आला, की आपण चांगले आहोत हे विसरून जातो,’ असं नणंद म्हणत असत.

आता या वाक्यातून नेमका काय अर्थ काढायचा त्याच जाणोत.

‘चावतो आमचा कुत्रा. पण दात खूप स्वच्छ असतात बरं का त्याचे.’ असं म्हटल्यासारखंच हेही.

स्वच्छ दातांनी काय जखमा होत नाहीत? की त्या जखमा सुगंधी असतात?

सुरुवातीला कशाकशानं नवऱ्याचा पारा चढतो, हे समजून घेण्यात काही वर्षं गेली. नंतर तो कशानं उतरतो, हे शोधून काढण्यात गेली. वस्तू जागच्या जागी सापडल्या नाहीत की तो रागावतो, वेळेवर पान वाढलं नाही की संतापतो, जेवणात रोज गरम कढी हवी, ती नसली की उखडतो, संध्याकाळी घरी आल्यावर बायको कुणी शेजारीण घेऊन गप्पा मारत बसलेली दिसली की त्याचा पारा चढतो… एक ना दोन. नवऱ्याला शांत ठेवणं आणि संसार करणं या कसरतीत जवळपास सारं क्रियाशील आयुष्य निघून गेलं.