Login

स्वीकार.. द ॲक्सेप्टन्स भाग ४

स्वीकार.. द ॲक्सेप्टन्स



अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
पहिली फेरी :- कथामालिका
कथेचे नाव :- स्वीकार.. द ॲक्सेप्टन्स

स्वीकार.. द ॲक्सेप्टन्स- भाग चार


“बरं.. बरं कळलं मला.. आता झोपा थोडं.. वैदू आली की तुम्हालाच दार उघडण्यासाठी उठावं लागणार आहे. तेंव्हा आता झोपा.”

कुसुम हसून म्हणाली तसं प्रभाकरने मान डोलावली आणि तो बेडवर आडवा झाला. कुसुम बराच वेळ जागी होती. दिवसभराच्या दगदगीने तीही कंटाळली होती. खुर्चीत बसल्या जागीच ती झोपी गेली. पहाटे तिला जाग आली. तिने घड्याळात पाहिलं.

“पहाटेचे सहा वाजले.. अजून कशी आली नाही वैदू? हे तर म्हणाले होते तीन चार तासात येईल.मग इतका वेळ का लागलाय? कॉल करू पाहू का तिला?”

कुसुमला वैदेहीची चिंता वाटू लागली. तिने वैदेहीला कॉल केला पण तिचा मोबाईल स्विच ऑफ सांगत होता. तिने प्रभाकरला जागं केलं.

“अहो, वैदू अजून नाही आली. इतका वेळ का लागतोय तिला?”

“अगं फ्लाईट उशिरा असेल.. ती येईलच.. तू काळजी करू नकोस. आपण थोडा वेळ तिची वाट पाहू.. आलीच तर ठीक आणि नाही आली तर तिच्या ऑफिसमध्ये फोन लावू.. मग तर झालं?”

प्रभाकर कुसुमला समजावत होता पण तोही मनातून घाबरला होता. पूर्ण दिवस उलटून गेला पण वैदेही घरी आली नाही. तिचा फोनही लागत नव्हता. आता मात्र प्रभाकर आणि कुसुम खूप घाबरले. त्यांनी वैदेहीच्या ऑफिसमध्येही फोन करून पाहीलं. कोणालाच काहीच माहित नव्हतं. ऑफिसमधल्या तिच्या मैत्रिणीने वैदेही ज्या हॉटेलमध्ये थांबली होती तिथे फोन केला. हॉटेलच्या मॅनेजरकडून तिला समजलं की वैदेहीने रात्री साडे दहा वाजता हॉटेलमधून चेक आऊट केलं आणि तिथूनच तिने एअरपोर्टला जाण्यासाठी कॅब बुक केली होती आणि त्यानंतर थोड्या वेळाने ती कॅबमध्ये बसून तिथून निघून गेली. वैदेहीच्या मैत्रिणीने ही बातमी प्रभाकरला सांगितली. प्रभाकर चिंतीत झाला. वैदेही हॉटेलमधून निघाली होती तर मग वैदेही कुठे गेली? कोणालाच काही माहित नव्हतं. सुधाकर आणि कुसुमने तिच्या जवळच्या सर्व मित्रमैत्रिणींना कॉल केले पण वैदेहीचा कुठेच थांगपत्ता लागत नव्हता.

हळूहळू वैदेही घरी परत न आल्याची खबर संपूर्ण बिल्डिंगमध्ये पसरली. सर्वत्र कुजबुज, चर्चा सुरू झाल्या.

“कुसुम, मला काय वाटतं आता जास्त वेळ घालवायला नको. आपण पोलिसांत जाऊन वैदेही हरवल्याची तक्रार करूया.. मी आणि आपला शेजारचा माधव दोघे पोलीस स्टेशनला जाऊन येतो.. तू घरीच थांब म्हणजे ती आली तर आपल्या दारावर कुलूप दिसलं की चिडेल. तू थांब, मी जाऊन येतो हं ”

असं म्हणून तो निघणार इतक्यात दारावरची बेल वाजली.

“बघ आली वाटतं वैदू..”

प्रभाकरने धावत येऊन आनंदाने दार उघडलं.

“काय हे वैदू? किती उशीर..”

त्याचे शब्द तोंडातच विरून गेले. समोर पोलीस उभे होते.

“वैदेही कर्णिक यांचं घर?”

“हो माझी मुलगी.. काय झालं साहेब? माझी वैदू ठीक आहे ना?”

प्रभाकर घाबरून म्हणाला. इतक्यात कुसुमही लगबगीने बाहेर आली. वैदेहीला काही झालं तर नसेल ना या विचारांनी प्रभाकर आणि कुसुम धास्तावले होते.

“मी इन्स्पेक्टर देशमाने, कर्णिकसाहेब एक वाईट बातमी आहे. आम्हाला काही तासांपूर्वीच दिल्ली पोलीसस्टेशनहून कॉल आला होता आणि त्यांच्याकडून आम्हाला समजलं की, तुमच्या मुलीचा भीषण अपघात झाला आहे.”

“काय? कधी आणि केंव्हा? साहेब, माझी मुलगी कुठे आहे कशी आहे आता?”

इन्स्पेक्टर साहेबांचे शब्द ऐकून प्रभाकरला खूप मोठा धक्का बसला. कुसुम डोळ्यातून पाणी वाहू लागलं.

“शांत व्हा, कर्णिकसाहेब, तुमची मुलगी दिल्लीच्या सिटी हॉस्पिटलमध्ये आहे. आपल्याला ताबडतोब दिल्लीला जावं लागेल.”

प्रभाकर आणि कुसुम मुंबई पोलिसांसोबत दिल्लीच्या सिटी हॉस्पिटलमध्ये येऊन पोहचले. दिल्ली पोलीस त्यांच्या आधीच तिथे हजर होते. तिथे गेल्यावर त्यांच्या जे ऐकलं त्यावरून तर त्यांची पायाखालची जमीनच सरकली.

“वैदेही कर्णिक बहुत सिरियस है! उसे कल रात करोल बाग सुनी सडक पे जखमी हालत मे पाया गया! हम लोगोने उसे हॉस्पिटलमे लाया और मुंबई पोलीस याने आपको खबर कर दी! हॉस्पिटलमे आने के बाद डॉक्टरोंसे हमे पता चला की उसका गँगरेप हुआ है! उसकी हालत बहुत खराब है! आयसीयूमे रखा है! अभी उनको होश नही आया है! ”

त्यांचं बोलणं ऐकून प्रभाकर सुन्न झाला. कुसुम मटकन खाली बसली. तिला भोवळ आली होती. कसंबसं तिला सावरत प्रभाकर आणि कुसुम आयसीयूच्या बाहेर उभे राहिले. काचेतून वैदेही दिसत होती. चेहऱ्यावर काळेनिळे डाग, अंगभर जखमा, नाकावर ऑक्सिजन मास्क आणि डाव्या बाजूला एका हाताला सलाईन सुरू होतं. तिची ती अवस्था पाहून प्रभाकर आणि कुसुमच्या डोळ्यातले अश्रू थांबण्याचं नावच घेत नव्हते. वैदेहीची अवस्था पाहण्यासारखी नव्हती. दोन दिवसांनी वैदेही शुद्धीवर आली आणि तिने एक आर्त किंकाळी फोडली. कुसुम तिच्या डोक्यावर हात फिरवत होती. तिला समजावत होती. हा हा म्हणता ही बातमी साऱ्या देशभर पसरली. प्रसारमाध्यमांनी ह्या बातमीला उचलून धरलं होतं. सारा देश पेटून उठला. चर्चेला उधाण आलं. वैदेहीला थोडं बरं वाटल्यानंतर सगळ्या पोलिसी प्रक्रिया पूर्ण करून कुसुम आणि प्रभाकर वैदेहीला घरी घेऊन आले होते. साऱ्या घटनावळी प्रभाकरच्या डोळ्यासमोरून पुढे सरकत होत्या. डोळ्यातून आपोआप पाणी वाहू लागलं. इतक्यात शेजारच्या शांताकाकू घाईघाईने आत आल्या. त्यांच्या आवाजाने त्याची तंद्री भंग पावली.

“वैदू आलीस का बाय? कशी आहेस? फार त्रास होत नाहीये नां? बघ बाई, शांताकाकूंना साऱ्या चाळीची काळजी असते म्हणून विचारायला आले हो.. बाकी काही नाही हो..”

वैदेहीच्या बाबा शांताकाकूंना अडवत म्हणाले,

“हो शांता वहिनी, वैदू ठीक आहे आता. डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय तिला..”

“बरं झालं बाई, आपली वैदेही घरी आली. कुसुम वहिनी तिला चांगला आराम करू द्या. फार वाईट झालं ओ बाई आपल्या वैदूसोबत.. फारच वाईट.. आता पुढे तिचं कसं होणार त्या रामेश्वरालाच ठाऊक!

“वहिनी तुम्ही का आलात इथे? आमच्या जखमेवर मीठ चोळायला? जा बरं तुम्ही..”

कुसुम शांताकाकूंवर चिडून म्हणाली.

“हे घ्या.. तुमच्याबद्दल वाईट वाटलं म्हणून बोलले. बाकी तुमची मर्जी.. जाऊ दे.. मला काय करायचंय? मला आता तुम्ही इथून जायला सांगाल. माझं तोंड बंद कराल पण वहिनी, बाकीच्या लोकांची तोंडं कशी बंद कराल? शेजारचे लोकं काय काय बोलताहेत तुम्हाला माहित नाही वहिनी.”

“कोण काय बोलतंय हे आम्हाला काही ऐकायचं नाही. आम्हाला माहित आहे आमची मुलगी कशी आहे? समजलं तुम्हाला? आता तुम्ही जा इथून.. आम्हाला एकटं सोडा..”

कुसुमच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. वैदेही निमूटपणे त्यांचं बोलणं ऐकत होती. मनावर होणारे घाव झेलत, सोसत ती तशीच उभी होती.

“ठीक आहे वहिनी, तुम्हीच असं म्हणताय म्हटल्यावर समोरच्याने काय बोलायचं? पण मी काय म्हणते वहिनी, इतक्या रात्रीचं तरण्याताठ्या मुलीला बाहेर का पाठवायचं? झालं न आता, अब्रूचे धिंडवडे निघाले नां? मुलीच्या जातीला फार जपून वागावं लागतं हेच खरं..”

“अहो पण त्यात तिची चुक काय? तिचा काय दोष? हे पहा वहिनी, माझ्या मुलीची यात काहीच चुक नाही..”

प्रभाकर चिडून म्हणाला.

“हे फक्त तुम्हालाच वाटतं नां? आता तुम्हीच सांगा वैदूला तुम्ही बाहेर पाठवलंच नसतं तर हा प्रसंग घडला असता का? पोरीच्या या दशेला कोण जबाबदार आहे, तुम्हीच नां? आता पुढे मुलीच्या भविष्याचं काय? कशी जगेल? ज्याच्यासोबत लग्न ठरलंय तो तरी साथ देईल का? याचा विचार केलाय का? कोण अशी आपली इभ्रत गमावलेल्या मुलीशी लग्न करेल? तुम्हाला आयुष्यभर पोसावं लागेल हिला.. आम्हाला काय करायचं? वैदेहीबद्दल वाईट वाटलं, काळजी वाटली म्हणून आले हो.. ‘ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं’ भलाईचा जमानाच नाही राहिला. जाऊ दे, येते मी..”

असं म्हणून शांताकाकू पाय आपटत तिथून निघून गेल्या. कुसुम वैदेहीच्या बाबांकडे पाहत रडवेल्या चेहऱ्याने म्हणाली,

“ हे काय झालं ओ? तळहाताच्या फोडाप्रमाणे जतन केलं. मुलगी असूनही मुलासारखं वाढवलं. सगळं स्वातंत्र्य दिलं. आपण दिलेल्या स्वातंत्र्यामुळे झालं असेल हे? पुढे काय होईल माझ्या पोरीचं?”

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)
0

🎭 Series Post

View all