Login

स्वप्नातला क्षण

आई आपल्या सोबत हवी
स्वप्नातला क्षण

रात्रभर पावसाच्या सरींनी खिडकी ठोठावत होत्या. स्वरा उशिरा झोपली होती. मनात एकच विचार — "आईची आठवण झाली, फार दिवस झाले तिला भेटून." तिला असे वाटतं होते. आई तर नव्हती.

आई गेली, तेव्हा स्वरा फक्त १६ वर्षांची होती. वयाच्या एका नाजूक वळणावर आईचं छत्र हरवलं. तीचं हसू, तिचा आवाज, ती केसांवरून फिरवायची बोटं — सगळं आठवत राहायचं. पण आज तिला अचानक खूप खोल आठवण आली होती.

रात्री एक स्वप्न पडतं…

स्वरा एका फुलांनी भरलेल्या बागेत चालत असते. हवेत मंद सुवास. समोरच्या झाडाखाली एकजण बसलेली असते — पांढऱ्या साडीत, हसत... आई!

स्वराचं काळीज धडधडायला लागतं. ती तिच्याकडे धावते, पण आवाज फुटत नाही.

आई तिला बघून म्हणते,
"स्वरा, तू खूप मोठी झालीस ग! तुझा अभिमान वाटतो मला."
स्वरा रडत रडत तिच्या मांडीवर डोकं ठेवते.
"आई, अजून खूप काही बोलायचं होतं तुझ्याशी. माझं सगळं दाखवायचं होतं."

आई तिच्या केसांतून हात फिरवत म्हणते,
"माझं प्रेम तुला प्रत्येक क्षणी जाणवतंय, नाही का?"
स्वरा डोळे मिटून होकार देते.
आई थोडा वेळ शांत बसते आणि म्हणते,
"स्वप्नं लवकर संपतात ग... पण आठवणी कायम राहतात."

त्या शब्दांसोबतच त्या बागेतला प्रकाश मंद व्हायला लागतो... आणि स्वरा जागी होते.

डोळ्यात पाणी. हृदयात शांतता.
ती खिडकी उघडते, सकाळचा नवा उजेड आत येतो. मनात एक वेगळा नवा प्रकाश.

"आई भेटली होती... खरंच."
क्षणभरच का होईना, पण तो स्वप्नातला क्षण — तिच्या आयुष्यातली एक नवी भेट घेऊन गेला होता..

त्या दिवसानंतर स्वराच्या आयुष्यात काहीसं बदललं.
तिला जाणवलं, आई कुठे हरवली नव्हती — ती तिच्याच आत कुठेतरी होती.
स्वराने आईच्या जुन्या डायऱ्या काढल्या, जुने फोटो पाहिले, आणि प्रत्येक क्षण जपून ठेवू लागली.
ती दर सकाळी आईसारखी चहा बनवू लागली, तिच्या फेव्हरिट जाईचा गजरा केसात घालू लागली.

आईचं प्रेम आता एका स्वप्नापुरतं नव्हतं —
ते तिच्या रोजच्या जगण्यात दिसू लागलं.

कधी एखाद्या मंद वाऱ्यात,
कधी एका ओळीत,
कधी स्वतःच्या हास्यात.

आता स्वरा एकटी नव्हती.
ती आईसोबत होती…
मनाने, आठवणीने, आणि त्या "स्वप्नातल्या क्षणा" च्या आधाराने.