Login

स्वप्नांच्या शहरातून गावाकडे भाग -3

स्वप्नांच्या मागे शहरात गेलेला मनीष, संघर्षातून शिकतो की खरं सुख पैशात नाही, तर आपल्या माणसांत असतं.शेवटी तो गावात परत येऊन स्वतःचं छोटं पण समाधानाचं आयुष्य उभारतो.
स्वप्नांच्या शहरातून गावाकडे
भाग – 3

मनीष मन लावून काम करत होता. असाच एक महिना होऊन गेला.
आज त्यांचा पगार होणार होता. तो खूप खुश होता.
"आज आई, बाबांना पैसे पाठवतो, नंतर त्यांच्यासाठी काही तरी घेतो,"
असं मनीषने मनात ठरवलं होतं.

असंच विचार करत तो कामावर गेला. दिवसभर मेहनत घेतली.
संध्याकाळी जाताना त्याला पगार मिळाला. त्याला खूप आनंद झाला.
तो रूमवर गेला.

रूमचे भाडे घेण्यासाठी तिथला माणूस आला. मनीषने त्याला भाडे दिले.
आपल्या लागणाऱ्या गोष्टींसाठी थोडे पैसे बाजूला काढले,
आणि आई, बाबांना पहिल्या पगारातून थोडे पैसे पाठवले.
आता त्याच्याकडे फक्त दोन हजार रुपये राहिले.
मनीषने ते नीट ठेवून दिले.

पहिला पगार होता.
"आता पुढच्या महिन्यात अजून चांगला पगार येईल,"
मनीष स्वतःशी म्हणाला.

पुन्हा त्याचं रोजचं सकाळी आवरून कामावर जाणं चालू झालं.
तो खूप काम करू लागला.
एक दिवशी आजारी पडला.
त्याने बाजूला ठेवलेले दोन हजारांपैकी एक हजार खर्च झाले.
असेच दिवस जात होते.

दुसऱ्या महिन्यात तेवढेच पैसे आले.
रूमचे भाडे, घरचे पैसे, सगळं करून
त्याच्याकडे जास्त काहीच शिल्लक राहत नव्हतं.
एवढं काम करायचं आणि पैसे पहिल्याच तारखेला संपायचे!
मनीष आता विचार करायला लागला
"मी काय करू? किती इथे काम केलं, तरी हातात काहीच राहत नाही.
आई, बाबांपासून लांब राहतो.
मला शहरात यायचं होतं, किती चांगल्या गोष्टी ऐकल्या होत्या,
पण प्रत्यक्षात तर सगळंच वेगळं आहे.

जेवढं कमवायचं, तेवढंच भाडं, रिक्षा, आणि
भूक लागली तर बाहेरचं खाणं.
घरी असतो तर आई काही ना काही बनवून द्यायची..."

मनीष खूप वेळ विचार करत बसला.
"मी घरी जाऊ का?
बाबांच्या दुकानात काम करून त्यांना मदत करेन,"
तो स्वतःशीच म्हणाला.

त्याने ठरवलं,  नोकरी सोडायची.
घरी जायला निघतोय.
‘दुरून डोंगर साजरे’
आई म्हणत होती, पण तेव्हा ऐकलं नाही,
मनीष स्वतःशीच बोलला.

मनीषने कामावर सांगितलं,
"मी आता नोकरी सोडून गावाला जाणार आहे."

त्यांचे काही पैसे कंपनीत बाकी होते,
तेही त्याने घेऊन घेतले.

शहरात थोडं फिरला.
आई, बाबांसाठी काही ना काही घेतलं.

"हे सगळं बघून आई, बाबा खुश होतील,"
मनीष स्वतःशी म्हणाला.

रूममधल्या मुलांसाठी बाहेरून खायला आणलं.
त्यांची चांगली मैत्री झाली होती.
दोन महिन्यांत त्यांची घट्ट ओळख झाली होती.
ते सगळे आपापलं सुख-दुःख एकमेकांना सांगायचे.

त्या रात्री खूप गप्पा मारल्या.
नंतर पुन्हा भेटायचं असं ठरवलं.
दुसऱ्या दिवशी मनीष घरी जाणार होता.