Login

स्वप्नांच्या शहरातून गावाकडे भाग -4 अंतिम भाग

स्वप्नांच्या मागे शहरात गेलेला मनीष, संघर्षातून शिकतो की खरं सुख पैशात नाही, तर आपल्या माणसांत असतं.शेवटी तो गावात परत येऊन स्वतःचं छोटं पण समाधानाचं आयुष्य उभारतो.
स्वप्नांच्या शहरातून गावाकडे
भाग - 4  अंतिम भाग

मनीष घरी आला.
आई आणि बाबांना खूप आनंद झाला. मनीषने आई, बाबांसाठी जे आणले होते, ते त्यांना दिले.
आई, बाबांनी आनंदाने घेतले.

"तुम्हाला आवडलं ना?" मनीष म्हणाला.

"खूप छान आहे," आई म्हणाल्या.

"बाबा, तुम्हालाही आवडलं?" मनीष म्हणाला.

"खूप छान आहे. आता मस्त आंघोळ करून आराम कर," बाबा म्हणाले.

"आई, चांगलं खायला कर. तिथलं खाऊन मी बोर झालो आहे. तुझ्या हातची चवच नाही," मनीष म्हणाला.

"तू आधी तुझं आवरून घे, मी बनवते," आई म्हणाल्या.

मनीष आवरायला गेला.
"मी पण दुकानात जातो, दुपारी जेवायला येईन," बाबा म्हणाले आणि ते निघून गेले.

आई किचनमध्ये गेल्या. मनीषला आवडतं तेच खायला बनवत होत्या.

मनीष तयार झाला. प्रवास करून दमला होता, म्हणून तो बेडवर आडवा झाला.  त्याला झोप लागली.

आई त्याला एकदा बघून गेल्या आणि आपल्या कामाला लागल्या.

थोड्यावेळाने बाबा पण आले. दुपार झाली होती.

"मनीष झोपला आहे का? त्याला भूक लागली असेल," बाबा म्हणाले.

"मी त्याला उठवते," आई म्हणाल्या.

तोवर मनीष स्वतःच रूमच्या बाहेर आला.

आईने जेवण बाहेर आणले. तिघांनी एकत्र जेवण करून घेतले.

"बाबा, मी पण दुकानात येतो. आपलं जुनं घर आहे ना, ते पण उघडून बघू आणि साफ करून घेऊ," मनीष म्हणाला.

"हो, करूया," बाबांनी काही विचारलं नाही, फक्त ‘हो’ म्हणाले.

"मी पण दुकानात येतो," मनीष म्हणाला आणि तयार व्हायला गेला.

"मी पण येऊ का?" आई म्हणाल्या.

"तू पण चल," बाबा म्हणाले.

मनीष आला, आणि तिघेही दुकानात जायला निघाले.

बाबांनी दुकान उघडलं. आई आणि मनीष जुन्या घराजवळ गेले. ते दुकानाजवळच होतं.

आई आणि मनीषने ते घर साफ केलं. ते फक्त एक रूम होतं. मनीषने तिथे थोडं काम पण करून घेतलं.

आई आणि तो पुन्हा दुकानात आले, बाबांना मदत केली.
संध्याकाळी ते सगळे घरी निघून गेले.

बाबांच्या डोक्यात विचार सुरू झाले,
"मनीषने ती रूम का साफ केली असेल? त्याच्या डोक्यात काय चाललं असेल? त्याला विचारू का?
तो किती दिवस सुट्टी काढून आला असेल? दोन महिने झालेच... एवढ्या लवकर सुट्या त्याला कशा काय मिळाल्या?"
बाबा मनात विचार करत होते.

मनीषने आईला जेवण बनवायला मदत केली.
थोड्यावेळाने त्यांनी जेवण करून घेतलं.

"मनीष त्या रूममध्ये काय करणार आहे?" बाबा म्हणाले.

"मी विचार करत होतो, लहान मुलांच्या कपड्यांचं दुकान सुरू करूया. गावात असं दुकान नाही. लोक घेण्यासाठी आपल्याकडे येतील," मनीष म्हणाला.

"त्या दुकानावर आईला बसवणार आहेस का? मी तुझ्या आईला तिथे काम करू देणार नाही.
माणूस ठेवला तर आपल्याला परवडणार नाही," बाबा म्हणाले.

"कशाला माणूस ठेवायचा? मीच थांबत जाईन. एका दुकानात तुम्ही, दुसऱ्यात मी राहीन," मनीष म्हणाला.

आई, बाबा एकमेकांकडे पाहू लागले.

"मी आता इथेच राहणार आहे. नोकरी सोडून आलो आहे. तिथे काही परवडत नव्हतं. पगार खूप कमी होता. म्हणून नवीन दुकान सुरू करण्याचा विचार केला," मनीष म्हणाला.

"तू खरं बोलतोयस का?" आई आनंदाने म्हणाल्या.

"हो, खरंच बोलतोय," मनीष म्हणाला.

"दुरून डोंगर साजरे दिसतात. आम्ही तुला सांगणार होतो, पण तुला जायचं होतं म्हणून आम्ही काही बोललो नाही. तुला जाऊ दिलं," बाबा म्हणाले.

"मलाही शहराची भुरळ पडली होती. पण आता आपण दुकान काढू आणि मेहनत करूया," मनीष म्हणाला.

त्याने नवीन दुकान सुरू केलं. दुकानातील माल खपायला लागला.
नंतर त्यांनी अजून एक दुकान उघडलं
एकात साड्या आणि लहान मुलांचे कपडे, तर दुसऱ्यात किराणा दुकान.  आपल्या आई,बाबांच्या जवळ आनंदात राहू लागला

नवीन दुकान, मेहनतीचा हात, आणि आई आणी बाबांचं आशीर्वाद
मनीषचं आयुष्य पुन्हा नव्यानं उजळलं.

आता त्याचं प्रत्येक सकाळी एकच स्वप्न असायचं
आईच्या चेहऱ्यावर हसू आणि बाबांच्या मनात अभिमान.