स्वप्नभूल.. भाग १०

स्वप्नभूल.. कथा एका रहस्याची..
स्वप्नभूल - भाग १०
© शिवप्रिया


नंदिनीने युवराजकडे पाहिलं आणि विचारलं,

“तू कसा ओळखतोस डॉक्टर नीरजा सोहनी यांना? कोणी संपर्क करून दिला?”

“अगं, ती मला एका कार्यक्रमात भेटली होती. ‘मानसोपचार आणि स्वास्थ’ या विषयावर तिचं व्याख्यान होतं. तीच बातमी कव्हर करायला मी आपल्या दैनिक नवप्रभाच्या वतीने गेलो होतो. तेंव्हा ओळख झाली. खूप चांगली डॉक्टर आहे ती! एकदा भेटून तर बघ.. मग नंतर ठरव काय करायचं ते.”

असं म्हणत त्याने नंदिनीकडे पाहिलं. थोडा वेळ विचार करून नंदिनी म्हणाली,

“बरं ठिक आहे. तू इतकं म्हणतोयस तर चल जाऊया.. मला माझ्या स्वप्नांचं कोडं सोडवायचं आहे. मलाही त्या गोष्टींपासून सुटका हवीय रे.. बघूया, त्यांना भेटून पाहूया काय फरक पडतोय का ते.”

तिने डॉक्टर नीरजाच्या क्लिनिकला येण्यास होकार दिला. ते ऐकून युवराजला खूप आनंद झाला होता.

“चल निघूया? मी ऑफिसला आपण उशिरा येत असल्याचं कळवतो.”

युवराजने बोलता बोलता खिश्यातून मोबाईल बाहेर काढला आणि त्याने एच आर असिस्टंट नेहाला कॉल लावला. नेहाने ‘हॅलो’ म्हणताच युवराजने बोलायला सुरुवात केली.

“हॅलो नेहा, युवराज हियर. मी आणि नंदिनी थोडं उशिरा ऑफिसला येणार आहोत. एक तातडीचं काम आलंय. दुपारपर्यंत आम्ही येतोच. प्लिज आपल्या सरांना निरोप देशील?”

“हो ठीक आहे. तुझा मेसेज मी सरांना नक्की सांगते. चल बाय.”

असं म्हणून नेहाने कॉल कट केला. नंदिनी सोफ्यावरची पर्स उचलून युवराजसोबत जाण्यासाठी उठून उभी राहिली. गॅस, दिवे, पंखे, खिडक्या नीट बंद आहेत ना याची खात्री करून घेतली. दार लावून कुलूप लावलं आणि ते दोघे तिथून बाहेर पडले. युवराजने पार्किंगमधली त्याची कार बाहेर काढली. दार उघडून त्याने नंदिनीला आत बसायला सांगितलं आणि कार चालवण्यासाठी तो तिच्या शेजारी येऊन बसला. त्याने कार सुरू केली. त्याने गाडीत छान शांत जुनी हिंदी गाणी लावली. रफीची जुनी हिंदी गाणी ऐकताना नकळत ती रमून गेली. तिचा मूड हळहळू बदलू लागला होता. चेहऱ्यावरचा ताणतणाव कमी होऊ लागला. आता गाडी ‘डॉ.नीरजा सोहनी’ यांच्या क्लिनिकच्या दिशेने धावू लागली. सकाळची रहदारीची वेळ होती. कोवळ्या उन्हाची किरणं तिच्या चेहऱ्यावर स्पर्श करत होती. त्यामुळे सोनेरी रंगांची तिची कांती फारच सुरेख दिसत होती. आज पुणे कॅम्पमधला रस्ता रोजच्यासारखाच बसेस, चारचाकी, दुचाकी वाहानांनीं तुडुंब भरला होता. फुटपाथवर भाजीविक्रेत्यांची, फळविक्रेत्यांची गर्दी सुरू होती. नोकरदार माणसांची कामावर जाण्याची घाई सुरू होती. फेरीवाले विक्रेते अधून मधून आवाज देत होते. सिग्नलवर गजरे विकणाऱ्या चिमुरड्या मुलीची सिग्नलला थांबलेल्या चारचाकी, दुचाकी गाडीवाल्यांना गजरे विकण्यासाठी धडधड सुरू होती. नंदिनी बाहेरची गर्दी न्याहाळत होती आणि युवराज गर्दीतून वाट काढत सावकाश कार चालवत पुढे जात होता.

थोड्याच वेळात युवराजची गाडी एका दोन मजली इमारतीसमोर येऊन थांबली. नंदिनीचं लक्ष त्यावर असलेल्या बोर्डकडे गेलं. ‘माईंड मंत्रा कॅन्सल्टन्सी’ नाव वाचून तिच्या मनात अनेक प्रश्न उभे राहू लागले. अचानक हृदयाची धडधड वाढू लागली. हातपाय गार पडू लागलेत की काय असं तिला वाटू लागलं. कारमधला एसी चालू असतानाही तिला दरदरून घाम फुटला होता. नंदिनीला खूप अस्वस्थ वाटू लागलं.

“रिलॅक्स नंदू, टेन्शन घेऊ नकोस.. शांत रहा. मी आहे ना?”

युवराज तिचा हातावर त्याचा हात ठेवत म्हणाला. त्याच्या स्पर्शाने नंदिनी चमकली.

“एक अनोळखा स्पर्श.. पण किती आधार देणारा, आश्वस्त करणारा वाटला.”

तिच्या मनात अचानक हा विचार चमकून गेला. ते दोघेजण गाडीतून खाली उतरले. युवराजने क्लिनिकच्या आवारात गाडी पार्क केली आणि ती दोघे आतल्या दिशेने चालू लागले. आतमध्ये येताच रिसप्शनिस्टने त्यांना स्वागतकक्षेत बसायला सांगितलं. त्यांच्या आधी एक दोन पेशन्ट्स नंबर लावून बसले होते.

“हे दोन नंबर्स झाले की तुम्ही आत जा. मी डॉक्टरांना तसं कळवते. थोड्याच वेळात डॉक्टर तुम्हाला बोलवतीलच. त्याआधी तुम्ही मला हा फॉर्म भरून द्या.”

असं म्हणत तिने युवराजच्या हातात एक फॉर्म दिला. युवराजने तो फॉर्म घेतला आणि नंदिनीसोबत स्वागतकक्षेत मांडलेल्या खुर्चीत जाऊन बसला. त्याने तो फॉर्म वाचून पाहिला. नंदिनीकडे पाहून तो फॉर्म तिच्यापुढे धरत युवराज म्हणाला,

“नंदू, यात तुझी पर्सनल इन्फॉर्मशन भरायची आहे. लिहतेस का?”

नंदिनीने मान डोलावली आणि त्याच्या हातातून फॉर्म घेऊन त्यात तिची माहिती भरू लागली. नंदिनीने तो फॉर्म भरून रिसप्शनिस्टच्या हातात दिला आणि रिसप्शनिस्टने तो फॉर्म आत जाऊन डॉक्टरांना दिला. नंदिनीची नजर आता समोरच्या भिंतीकडे गेली. तिथे काही मानवी शरीराची ध्यानअवस्थेत बसलेली चित्रं दिसत होती. एका चित्रात योगसाधनेचे फायदे सांगितले होते. एका चित्रात संमोहन प्रक्रियेचे फायदे दिसत होते तर दुसऱ्या चित्रात कुंडलिनी जागृतीची प्रक्रिया दिसत होती. दुसऱ्या भिंतीवर डॉक्टर नीरजा सोहनींना पुरस्काराने सन्मानित केलेली चित्रं दिसत होती. नंदिनी भिरभरत्या नजरेने सर्वत्र पाहत होती. थोड्याच वेळात त्यांचा नंबर आला आणि रिसप्शनिस्टने त्यांना खुणेनेच आत जायला सांगितलं. दोघंही डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेले. डॉक्टर नीरजाने हसून दोघांकडे पाहिलं आणि त्यांना खुर्चीत बसायला सांगितलं. युवराज आणि नंदिनी समोरच्या खुर्चीत बसले. नंदिनीची नजर डॉक्टर नीरजाच्या चेहऱ्यावर स्थिरावली. साधारण पस्तीशीची, निळ्या रंगांची सुती साडी नेसलेली, गोरा वर्ण मध्यम शरीरयष्टी, प्रसन्न मुद्रा, खांद्यापर्यंत रूळणाऱ्या मुलायम केसांचा बॉबकट, तेजस्वी डोळे, त्यावर सोनेरी फ्रेम असलेला नाजूक चष्मा, ओठांवर किंचित फुललेलं स्मित हास्य, गळ्यात जाड काळ्या मण्यांची माळ, कानात छोटेशी सोन्याची कर्णफुले, एका हातात दोन मोत्यांच्या बांगड्या आणि दुसऱ्या हातात छोटंसं घड्याळ तिला शोभून दिसत होतं. प्रथमदर्शनीच डॉक्टर नीरजाला पाहिल्यावर नंदिनीला काहीसं हलकं वाटू लागलं होतं. डॉक्टर नीरजा तिच्या हातातल्या फॉर्मवरील नंदिनीची माहिती वाचत होती. इतक्यात युवराज डॉक्टर नीरजाकडे पाहून म्हणाला,

“गुडमॉर्निंग नीरजा, ही माझी मैत्रीण नंदिनी कोंडे देशमुख.. हिच्याचसाठी मी तुझी अपॉइंटमेंट घेतली होती.”

डॉक्टर नीरजाने नाकावर आलेला चष्मा वर सरकवत युवराजकडे हसून पाहिलं.

“अच्छा, हो का? आपण कॉलवर जिच्याबद्दल बोललो होतो ती हीच नंदिनी का?”

“हो..”

डॉक्टर नीरजाच्या प्रश्नावर युवराजने उत्तर दिलं.

“हॅलो नंदिनी, मी आता तुझीच माहिती वाचत होते. बोल काय होतंय तुला?”

“डॉक्टर, म्हणजे तशी मी ठीक आहे. हा युवराज आहे ना, याला असं वाटतं की मला बरं नाहीये. मला काहीतरी मानसिक आजार झालाय आणि म्हणूनच तो मला इथे तुमच्याकडे घेऊन आलाय.”

नंदिनी खांदे उडवत म्हणाली. तिच्या आवाजात नाराजीचा सूर स्प्ष्ट दिसत होता. ही गोष्ट डॉक्टर नीरजाने अचूक हेरली. म्हणून मग तिने नंदिनीला बोलतं करण्यासाठी पुन्हा बोलायला सुरुवात केली.

“नंदिनी, सर्वांत आधी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जशी मी युवराजची मैत्रीण आहे तशीच मी तुझीही मैत्रीण आहे. तू मला एक डॉक्टर म्हणून भेटण्यापेक्षा एक मैत्रीण म्हणून भेटलीस तर मला फार आवडेल. तू मला तुझी ताई, आई काय हवं ते समज. याचीच सुरवात करायची झाली तर आतापासून तू माझ्याशी आहोजावो न करता युवराजप्रमाणेच अरेतुरे करणार आहेस. जास्त औपचारिक होण्याची गरज नाही.”

डॉक्टर नीरजा हळूहळू तिच्याशी मैत्रीपूर्ण वागण्याचा प्रयत्न करत होती. दोघींमधलं वयाचं, नात्यातलं अंतर कमी करण्याचा प्रयत्न करत होती. ती पुढे म्हणाली,

“नंदिनी, आता तू माझ्याकडे आली आहेस. हळूहळू आपल्यात एक वेगळं अनामिक नातं तयार होईल. एकमेकांबद्दल जिव्हाळा वाटेल. एक गोष्ट लक्षात ठेव नंदिनी, मी तुझ्या मनातला गुंता सोडवायला तुला मदत करणार आहे. तुझ्या आयुष्यात आनंद आणण्यात मी तुझी मदत करणार आहे. त्यामुळे तू माझ्याशी काहीही बिनधास्त बोलू शकतेस. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुझ्या या लढाईत काहीही झालं तरी मी तुझ्यासोबत कायम असणार आहे. विश्वास ठेव, ही तुझी मैत्रीण नीरजा तुझा हात कधीच सोडणार नाही. सो, आता तू क्लिनिक, उपचार, औषधं हे सगळं विसरून जा. आपण छान गप्पा मारू.. चालेल न तुला?”

डॉक्टर नीरजाच्या बोलण्याने नंदिनीच्या मनावरचं दडपण बऱ्यापैकी कमी झालं होतं. आता तिच्या वागण्यात मोकळेपणा आला होता. नीरजाच्या प्रश्नावर तिने हसून होकारार्थी मान डोलावली. थोड्याच वेळात सेशनला सुरुवात होणार होती.

पुढे काय होईल? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©शिवप्रिया

🎭 Series Post

View all