स्वप्नभूल.. भाग ११

स्वप्नभूल.. कथा एका रहस्याची..
स्वप्नभूल - भाग ११
© शिवप्रिया

“युवराज, आता मी सेशन सुरू करतेय. आमच्या प्रोफेशनमध्ये आम्हाला क्लाईंट आणि आमच्यामध्ये काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात. तर मला असं वाटतं की, हे सेशन संपेपर्यंत तू बाहेर बसलास तर बरं होईल. मला तिच्या एकटीशी बोलायचं आहे.”

डॉक्टर नीरजा युवराजकडे पाहून म्हणाली.

“ हो.. हो चालेल ना, नो प्रॉब्लेम.. तुमचं होईपर्यंत मी बाहेर बसतो.”

युवराज खुर्चीतून उठून उभं राहत म्हणाला तसा नंदिनीचा चेहरा घाबराघुबरा झाला. तिने युवराजकडे पाहिलं. त्याने बाहेर जाऊ नये असंच तिला वाटत होतं. चेहऱ्यावर काकूळतीचे भाव दाटून आले.

“नंदू, अजिबात घाबरू नकोस. तुझ्या मनातलं सगळं सगळं बिनधास्तपणे डॉक्टर नीरजाला सांग. मी बाहेरच आहे.”

युवराज नंदिनीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला आणि लगेच केबिनमधून बाहेर गेला. नीरजा नंदिनीकडे पाहून म्हणाली,

“नंदिनी, सेशनला सुरुवात करण्यापूर्वी आपण दोन मिनटं ध्यानसाधना करणार आहोत. एक वचन देणार आहोत आणि घेणारही आहोत. एक प्रतिज्ञा करणार आहोत. सर्व प्रथम तू त्या खुर्चीत शांतपणे डोळे मिटून बस ओके?”

नंदिनीने मान डोलावली आणि तिने तिचे डोळे मिटून घेतले. नीरजाचा आवाज तिच्या कानावर पडत होता.

“नंदिनी, डोळे मिटून घे आणि सावकाश एक दीर्घ श्वास घे. हळूहळू श्वास सोडायचा आहे. पुन्हा दीर्घ श्वास घेऊन सावकाश श्वास सोडायचा आहे. आता तुझं संपूर्ण लक्ष तुझ्या श्वासांच्या गतीवर केंद्रित कर. कपाळावरच्या आट्या कमी करण्याचा प्रयत्न कर आणि मी जे म्हणते, ते माझ्या मागे म्हण..‘ॐ.. ॐ.. ॐ.. ॐ.. ॐ”

नंदिनी नीरजाच्या मागे ॐ नामाचा जप करत होती. तिचं मन स्थिर होऊ लागलं. नीरजा पुढे म्हणाली,

“हे युनिव्हर्स, मी तुझ्या जगातला इतरांप्रमाणेच एक साधारण जीव आहे. मला जे तू चांगलं आयुष्य दिलंस त्याबद्दल मी तुझे खूप आभारी आहे. या क्षणाला माझा श्वास सुरू आहे. त्या प्रत्येक श्वासासाठी खरंच मी तुझी खूप आभारी आहे. माझ्या आयुष्यात तू मला जे काही दिलंस, जी माणसं दिलीस, माया, प्रेम आशीर्वाद दिलेस त्या सर्वांसाठी मी तुझे खूप आभार मानते. आता मी स्वतःला संपूर्ण विश्वासाने तुझ्या स्वाधीन करतेय. मला बरं करण्यासाठी हे युनिव्हर्स, मला मदत कर.. इथे या सेशनमध्ये बोलल्या गेलेल्या संपूर्ण गोष्टी गोपनीय राहतील याची मी शाश्वती देते. डिअर युनिव्हर्स, आय थँक यू.. आय लव्ह यू सो मच.”

नीरजाच्या मागे नंदिनी बोलत होती.

“नंदिनी, हळूहळू तू तुझे डोळे उघड आणि सांग मला आता तुला कसं वाटतंय?”

नीरजाच्या बोलण्यावर नंदिनीने सावकाश डोळे उघडले.

“आता मला खूप बरं वाटतंय.”

“मग आपण मोकळेपणाने बोलू शकतो ना?”

नंदिनीने मान डोलावली. नीरजाने नंदिनीला विचारलं,

“हं, नंदिनी मघाशी तू काय म्हणत होतीस?”

“तेच सांगत होते, युवराजला वाटतं की, मला सायकोलॉजिस्टची गरज आहे.”

“हो का? बरं.. पण असं का वाटतं त्याला? काहीतरी कारण असेलच ना?”

नंदिनीच्या वाक्यावर डॉक्टर नीरजाने तिच्याकडे पाहून तिला विचारलं. नंदिनीच्या हातापायांची चुळबुळ सुरू झाली. डोळ्यांची विचित्र हालचाल सुरू झाली. नीरजा तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपत होती.

“हो.. म्हणजे तसं कारण आहे. पण त्याचा आणि माझ्या मनःस्थितीचा काहीही संबंध नाही. मला काहीही झालेलं नाही.”

ती ठामपणे म्हणाली.

“अगदी खरंय.. तुला काहीही झालेलं नाही. तुझी मानसिक स्थिती उत्तम आहे. त्याबद्दल मला काहीच शंका नाही. पण तुला जो त्रास होतोय त्यावर उपाय करण्याची गरज आहे ना? त्यासाठी तरी माझ्याशी तुला बोलावं लागेल नां?”

नीरजा नंदिनीला आश्वस्त करण्याचा प्रयत्न करत होती. ती नंदिनीला विश्वासात घेण्याचा प्रयत्न करत होती जेणेकरून नंदिनी मनमोकळेपणाने बोलू शकेल. नंदिनीने बोलायला सुरुवात केली.

“नीरजा, मला एक स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नात मला कधीही न पाहिलेल्या गोष्टी दिसतात. ज्या गोष्टींचा मी आजवर कधीही विचार केला नाही. रेडलाईट एरिया दिसतो आणि मी त्या लोकांच्या तावडीत सापडलेय असं दिसतं. मी तिथून बाहेर पडण्याचा जीवाच्या आकांताने प्रयत्न करते पण दुर्दैवाने त्यात मी अयशस्वी होते आणि मग ती बाई..”

नंदिनी स्वप्न सांगताना प्रचंड घाबरली होती. तिच्या अंगाचा थरकाप उडाला होता. डोळ्यातून पाणी वाहू लागलं. नीरजा तिच्या खुर्चीतून उठली आणि तिने नंदिनीला पाणी प्यायला दिलं.

“रिलॅक्स नंदिनी.. शांत हो.. आपण त्यावरही उपाय शोधणार आहोत. आपल्या सगळ्याच समस्यांवर उपाय शोधणार आहोत. मला खात्री आहे, आपल्याला नक्कीच मार्ग सापडेल. त्याआधी मला तुझ्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे तुझे आईबाबा, तुझं कुटुंब, तुझं बालपण..”

नीरजाच्या प्रश्नावर नंदिनी बोलू लागली.

“मी मूळची कोल्हापूरची.. माझे बाबा सयाजीराव कोंडे देशमुख, कोल्हापुरातली बडी आसामी. दोन चार साखरकारखान्याचे मालक. माझ्या आईसाहेब सुमित्राबाई गृहिणी आहेत. माझा मोठा भाऊ समरजीत माझी खूप काळजी घेतात. असं आमचं चौघाचं कुटुंब. कोल्हापूरात आमचा खूप मोठा वाडा आहे. दारात प्राजक्ताचं मोठं झाडं आहे. ते मला फार आवडतं. त्याची पांढरी शुभ्र केशरी देठांची फुलं तर काही विचारूच नकोस. इतकी सुंदर दिसतात नां! त्याला कशाचीच तोड नाही.”

नंदिनी आपल्या घराच्या आठवणीत रमून गेली. ती पुढे सांगू लागली.

“माझ्या आबांनी मला शिक्षणासाठी सगळ्यांचा रोष पत्करून पुण्याला पाठवलं. मला शिकवलं, नोकरी करण्याची परवानगी दिली. सगळं अलबेल आहे.”

“रोष पत्करून म्हणजे? कोणाचा रोष?”

“आम्ही गावाकडची माणसं.. आमच्याकडे अजूनही मुलींना पुण्या-मुंबईच्या मुलींसारखं स्वातंत्र्य नाही. जुने विचार, रूढी, परंपरा, चालीरिती याचा पगडा जास्त. मुलींनी कसं वागावं, कसं वागू नये याचे काही नियम आहेत. त्या नियमांना तोडून चालत नाही. माझ्या आईला आणि भावाला मी घर सोडून शिक्षणासाठी पुण्याला येणं, एकटं राहणं मान्य नव्हतं; पण आबांनी माझ्या मनाचा विचार केला आणि त्यांनी मला पुण्याला राहण्याची परवानगी दिली. त्यांच्यामूळे मी शिकू शकले. नोकरी करतेय.”

निराजाच्या प्रश्नावर नंदिनीने उत्तर दिलं. आबांच्या विचारांनी तिची छाती अभिमानाने फुलून गेली. तिच्या डोळ्यात आनंदाची चमक दिसत होती. तिचं बोलणं ऐकून नीरजाने पुन्हा तिला विचारलं

“आई आणि तुझं नातं कसं आहे? आणि तुझा दादा?”

“दादा?”

नंदिनीच्या तोंडून अस्पष्ट शब्द बाहेर पडले. चेहऱ्यावर भीतीचं सावट पसरलं.

“दादा तसा चांगला आहे; पण कधी कधी फार विचित्र वागतो आणि आईही त्याची बाजू घेते याचा खूप राग येतो.”

“म्हणजे?”

नंदिनी जुन्या आठवणी सांगू लागली. तिची काळजी करण्याच्या प्रयत्नात समरजीत तिच्याशी कसं वागला हे सांगत होती.

“नीरजा, मला कधी माझ्या भावाकडून आदर मिळाला नाही. त्याने कायम मला दुय्यम लेखलं. सारखं माझ्यावर रागावणं, चिडणं, हे करू नको, ते करू नको, सारख माझ्यावर पाळत ठेवणं सुरू असायचं. कोणा मुलांशीच काय मुलींशीही बोलू द्यायचा नाही. फक्त घर ते एके घर इतकंच काय ते आयुष्य राहिलं होतं. आईला मी एक चांगली गृहिणी व्हावं असं वाटत होतं. एखाद्या चांगल्या मुलाशी लग्न करून चारचौघींसारखा संसार करावा करावा असं तिला वाटत होतं म्हणजे अजूनही वाटतं; पण मला त्यात इंटरेस्ट नाही. मला अजून शिकायचंय करियर करायचं आहे. पण आई.. दादा ते घडू देणार नाहीत.”

“का? असं का वाटतं तुला? आबा आहेत नां? ते तुझी बाजू नक्की घेतील.”

नीरजा तिला समजावणीच्या सुरात म्हणाली,

“नाही, आतापर्यंत आबांनी माझी बाजू घेतली; पण यापुढे त्यांना तसं करता येणार नाही. त्यांनी फक्त एक वर्ष काम करण्याची मुभा दिलीय. त्यानंतर मात्र मला परत घरी जावं लागेल आणि मग संसाराचं राहटगाडे ओढावंच लागेल.”

ती हिरमूसली.

“ठीक आहे. आता एक काम कर.. तुझ्या बालपणीच्या तुला आवडणाऱ्या दहा गोष्टीची यादी कर. हे घे पेन पेपर आणि त्यावर दहा आवडत्या गोष्टी लिहून काढ.. ओके?”

पुढे काय होईल? नंदिनीच्या स्वप्नाचं रहस्य तिच्या बालपणात दडलेलं आहे का? डॉक्टर नीरजा तिला बरं करू शकेल? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©शिवप्रिया

🎭 Series Post

View all