स्वप्नभूल - भाग १२
© शिवप्रिया
नंदिनी हातात पेन पेपर घेऊन बसली होती. नीरजाने तिला तिच्या आयुष्यातल्या तिला आवडणाऱ्या गोष्टी, घटना लिहायला सांगितल्या होत्या. नंदिनी तिच्या लहानपणीतल्या घटना गोष्टी आठवू लागली आणि तिने पेपरवर लिहायला लागली.
“आईने स्वतःच्या हाताने बनवलेली पुरणपोळी, आमचा वाडा आणि दारातला प्राजक्त, माझी शाळा, माझ्या मैत्रिणी, माझी पुस्तकं, वक्तृत्वस्पर्धेत आलेला पहिला क्रमांक, मी दहावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले तो क्षण आणि आबांनी केलेलं कौतुक, पत्रकारितेच्या शिक्षणासाठी पुण्याला राहण्याची आबांकडून मिळालेली परवानगी, मी पदवीधर झाले, मला मिळालेली नोकरी आणि अजून बरंच काही..”
ती पुटपुटत पेपरवर लिहत होती. दहा गोष्टींची यादी झाल्यावर तिने तो पेपर नीरजाच्या दिशेने सरकावला.
“गुड, मला माहित आहे अजूनही बऱ्याच चांगल्या गोष्टी असतील नां, ज्या लिहायच्या राहिल्यात?”
नंदिनीने होकारार्थी मान डोलावली.
“सगळ्या लिहून काढ आणि त्या प्रत्येक चांगल्या गोष्टींना आज तुला थँक्यू म्हणायचं आहे. आयुष्यात घडलेल्या चांगल्या गोष्टींसाठी तुला युनिव्हर्सचे आभार मानायचे आहेत. चला पुन्हा डोळे मिटा आणि तुला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीसाठी आभार माना.”
डॉक्टर नीरजाच्या म्हणण्याप्रमाणे नंदिनीने डोळे मिटले. मन शांत केलं आणि तिला मिळालेल्या प्रत्येक गोष्टींसाठी थँक्यू म्हटलं. थोड्यावेळाने तिने डोळे उघडले.
“नंदिनी, कसं वाटतंय तुला? देवाने दिलेल्या आयुष्यात जे काही चांगलं घडलं त्याबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करताना कसं वाटतंय?”
नीरजाने नंदिनीला विचारलं.
“खूप हलकं वाटतंय नीरजा.. आजवर मी कधीच असं थँक्यू म्हणालेले नव्हते. खूप छान वाटतंय.. आयुष्यात कितीतरी गोष्टी चांगल्या घडून गेल्या की, मला त्या आठवाव्या लागल्या; पण त्याबद्दल आभार मानताना खूप भरून आलं. कृतज्ञता वाटू लागलीय.”
नंदिनीने शांतपणे उत्तर दिलं.
“गुड, आता तुला हे रोज रात्री झोपताना करायचंय. रोज तुला आवडत्या गोष्टींसाठी आभार व्यक्त करायचेत. समजलं? आज आपण इथेच थांबूया. दोन दिवसांनी पुन्हा भेटू.. चालेल?”
नीरजाच्या प्रश्नावर नंदिनीने होकारार्थी मान डोलावली.
“थँक्यू डॉक्टर नीरजा..”
असं म्हणून नंदिनी केबिनच्या बाहेर निघून आली. युवराज तिची वाट पाहत थांबला होता. ती बाहेर येताच दुसरे पेशन्ट आत गेले. युवराज आणि नंदिनी तिथून बाहेर पडले आणि गाडीत येऊन बसले. त्याने गाडी स्टार्ट केली. मुख्य रस्त्यावर आल्यानंतर गाडीने वेग धरला. नंदिनी शांत बसली होती. क्लिनिकमधून बाहेर पडल्यानंतर ती एका शब्दानेही बोलली नव्हती. युवराजनेच विषय काढला.
“नंदू, ठीक आहेस नां? काय वाटलं तुला डॉक्टर नीरजाला भेटून?”
नंदिनीने मान वळवून त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली,
“युवी, डॉक्टर नीरजा छान वाटली. मला खूप छान समजून घेत होती. माझं सगळं प्रेमाने ऐकत होती. तिच्याशी बोलताना मला खूप शांत वाटलं. पण युवी, ज्यासाठी आपण तिथे गेलो होतो तो हेतू तर साध्य झालाच नाही. नीरजा स्वप्नांबद्दल काहीच बोलली नाही. तिने मला काही टास्क करायला दिले, ते मी केले; पण मूळ मुद्दा तिथेच राहिला.”
तिच्या बोलण्याने नाराजीचा स्वर उमटला. युवराजने तिला विचारलं,
“कोणते टास्क दिले होते तिने?”
“आज तिने मला मेडिटेशन करायला लावलं. लहानपणापासून आतापर्यंत माझ्या आयुष्यात घडलेल्या चांगल्या गोष्टीसाठी कृतज्ञता व्यक्त करायला सांगितलं. मी ते केलं.”
“मग ते केल्यावर कसं वाटलं तुला?”
त्याने प्रश्न केला. तिने डोळे मिटून घेतले आणि म्हणाली,
“खूप शांत वाटलं अरे.. आजवर मी कधीच असं केलं नाही. चांगल्या गोष्टींसाठी त्यांना कधीच थँक्यू म्हटलं नाही. फार छान वाटलं.”
नंदिनीने डोळे उघडून युवराजकडे पाहिलं आणि म्हणाली,
“पण युवी, आपल्याला जे हवंय ते नाही नां झालं. स्वप्नांचं काय? त्याबद्दल काहीच बोलणं झालं नाही. ती मला माझ्याबद्दल विचारत राहिली. आणि मग स्वप्नांचा विषय मागे पडला. मला खूप भीती वाटते रे..”
“रिलॅक्स नंदू, ती तिच्या पद्धतीने जातेय, तर जाऊ दे नां.. तिची उपचारपद्धती तशी असेल. आपण थोडा संयम राखायला हवा.”
नंदिनी त्याच्या बोलण्याचा विचार करत होती. तिला त्याचं म्हणणं पटू लागलं होतं. थोड्याच वेळात ती दोघं ऑफिसला पोहचले. दिवसभर दोघेही कामात गुंग झाले. कामाच्या रगाड्यात संध्याकाळ कधी झाली तिचं तिलाच समजलं नाही. सर्वजण आपापल्या घरी जाण्यासाठी निघाले; पण नंदिनी अजूनही कामात मग्न होती. तिच्या सहकारी मैत्रिणीने, पल्लवीने निघताना आवाज दिला.
“चल निघायचं नंदिनी? आधीच उशीर झालाय.”
“तू हो पुढे.. मी एवढं संपवते. एकदा वाळिंबेसरांना दाखवते. त्यांना ते आवडलं म्हणजे काम फत्ते झालं म्हणायचं. त्यांनी फायनल केलं की, मग मी लगेच निघते. तू सावकाश जा गं..”
नंदिनी पाठमोऱ्या वळलेल्या पल्लवीला म्हणाली. पल्लवीने निरोप घेतला. थोड्याच वेळात नंदिनीने सरांना तिने केलेलं स्तंभ लेखन दाखवलं. सुश्रुषा वृद्धाश्रमाची कव्हर स्टोरी दाखवली. सर तिच्या कामावर प्रचंड खूष झाले.
“वॉव, नंदिनी मस्तच झालंय आर्टिकल आणि ती सुश्रुषा वृद्धाश्रमाची स्टोरीसुद्धा..”
वाळिंबे सरांनी कौतुकाने तिच्याकडे पाहिलं.
“थँक्यू सर..”
नंदिनी हसून म्हणाली. युवराजही तिच्या कौतुकाने खूष झाला होता. नंदिनीचं काम खरंच कौतुकास्पद होतं.
“मग आता नवीन प्रोजेक्टवर काम करायचं?”
वाळिंबेसरांनी तिला विचारलं. तिने मान डोलावली. ते हसून म्हणाले,
“अरे व्वा! लगेच तयार.. व्हेरी गुड.. पण आता काम पुरे झालं. उद्या आल्यावर पाहू. शांतपणे घरी जा की मी सोडू तुला?”
“नको सर, जाईन मी.. आणि युवी आहेच नां..”
असं म्हणत तिने टेबलवरच्या वस्तू ड्रॉवरमध्ये ठेवल्या. कॉम्प्युटर बंद केला.
“मग ठीक आहे.. युवी, बराच उशीर झालाय. तू नंदिनीला सुखरूप घरी सोड आणि मग तू पुढे तुझ्या घरी जा. समजलं?”
वाळिंबेसर युवराजकडे पाहून म्हणाले आणि ते तिथून आपल्या केबिनमध्ये निघून गेले. थोड्याच वेळाने युवराज आणि नंदिनीही ऑफिसमधून बाहेर पडले. तिच्या घराजवळ आल्यावर युवराज म्हणाला,
“नंदू, नीरजावर थोडा विश्वास ठेवून बघायला काय हरकत आहे? ती म्हणते तसं करून पाहूया. आपल्याला बरं होण्याशी कारण आहे; मग तिने सांगितलेलं ऐकायला नको का? करून बघ.. बरं वाटलं तर पुढे जाऊ नाहीतर मग दुसऱ्या डॉक्टरांना भेटू शकतोच की..”
“हं.. तुझं म्हणणं बरोबर आहे. तिच्या उपचारपद्धतीवर थोडा विश्वास ठेवून पहायला काही हरकत नाही. तिने सांगितल्याप्रमाणे आज रात्री मेडिटेशन करून पाहते. ग्रॅटिटूड देते. पाहूया कसं होतंय ते..”
नंदिनी त्याच्याकडे पाहून म्हणाली.
“नंदू, मनात शंका नको.. पाहूया, करूया असं नको. हे घडणार आहे. सगळं चांगलं होणार आहे यावर विश्वास ठेव. आता आपण स्वतःला नीरजाकडे सोपवलंय नां? मग तिच्याबद्दल मनात शंकाकुशंका नकोत. आणि काहीही झालं तरी मी तुझ्या सोबत आहे हे विसरू नकोस. मी प्रत्येकक्षणी तुझ्या बरोबर असणार आहे. समजलं?”
युवराज निग्रहाने म्हणाला.
“बरं बाबा, तू म्हणशील तसंच होईल. आता मी जाऊ? नाहीतर तू पूर्ण रात्रभर इथे गाडीतच लेक्चर देत बसशील.”
तिच्या वाक्यावर दोघंही खळखळून हसले. नंदिनीने त्याचा निरोप घेतला आणि ती घरी आली. त्रिशा आधीच आली होती. त्यामुळे तिने रात्रीचा स्वयंपाक करून ठेवला होता. फ्रेश होऊन नंदिनी आणि त्रिशाने एकत्रपणे जेवणं उरकली. झोपायला जाण्याआधी नंदिनीने नीरजाने सांगितल्याप्रमाणे तिच्या आवडत्या गोष्टींसाठी थँक्यू म्हटलं. थोडावेळ मेडिटेशन केलं आणि ती बिछान्यावर आडवी झाली. दिवसभराच्या दगदगीने ती प्रचंड दमली होती. बिछान्यात पडताक्षणी तिला झोप लागली. त्रिशाही तिचं काम उरकून तिच्या शेजारी येऊन झोपली.
रात्रीच्या दोन अडीजचा सुमार.. काळाकुट्ट अंधार.. मध्येच कुत्र्यांचा भुंकण्याचा, विव्हळण्याचा आवाज.. ‘जागते रहो..’ असं ओरडत रस्त्यावरून काठ्या ठोकत फिरणाऱ्या रखवालदाराने दिलेली आरोळी कानावर पडत होती. निद्रादेवी नंदिनीच्या डोळ्यावर चांगलीच आरुढ झाली होती. आणि पुन्हा सुरू झाला तो स्वप्नांचा ससेमिरा.. तेच स्वप्न..
नंदिनी आपल्या आईसाहेबांना घेऊन बाजारात जातेय. अचानक बाजार गायब होतो आणि तिथे अनोळखी रस्ते दिसताहेत.. नंदिनीचा जीव घाबराघुबरा होतोय. हे कुठे आलो आपण हे तिला कळत नाहीये. आईचा हात घट्ट पकडून ती रस्ता शोधण्याचा प्रयत्न करतेय; पण तिला काहीच समजत नाहीये. ती तशीच अंधाऱ्या रात्री वाट शोधत आईला सोबत घेऊन वाट चालतेय.. आणि इतक्यात…
पुढे काय होईल? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©शिवप्रिया
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा