स्वप्नभूल.. भाग १३

स्वप्नभूल.. कथा एका रहस्याची..

स्वप्नभूल - भाग १३
© शिवप्रिया


नंदिनी स्वप्नात आईला घेऊन रस्त्याने भराभर चालत होती. इतक्यात दोन बायका तिला रस्त्याने जाताना दिसल्या. तिने त्यांना विचारलं,

“इथून बाहेर जायला रस्ता आहे का?”

त्यांनी होकारार्थी मान डोलावली. त्या बायकांपैकी एक बाई तिला म्हणाली,

“हो आहे नां.. त्या रस्त्याने पुढे गेलीस की रस्ता सापडेल. चल तुला रस्ता दाखवतो.”

नंदिनीला खूप आनंद झाला. ती आईचा हात हातात घट्ट पकडून म्हणाली,

“चला आईसाहेब, त्या ताई आपल्याला रस्ता दाखवतील. आपण लवकरच आपल्या घरी जाऊ.”

नंदिनी आणि आई झपाझप पावलं टाकत त्या बायकांच्या मागे जाऊ लागल्या. त्या बायकांनी त्यांना त्या रस्त्यापर्यंत नेलं आणि त्या तिथल्या गर्दीत गायब झाल्या. नंदिनीच्या नजरा त्या बायकांना शोधत होत्या; पण त्या बायका तिला दिसत नव्हत्या.

“कुठे गेल्या त्या?”

ती चारी दिशांना त्यांना शोधत होती. अचानक आई सुद्धा तिला दिसेनाशी झाली.

“आई… आई कुठे आहेस तू? आई गं..”

ती जीवाच्या आकांताने ओरडत होती; पण नंदिनीला तिची आई कुठेच दिसत नव्हती. आणि मग अचानक त्या रस्त्यावर छोटी छोटी घरं दिसू लागली. कोणत्याही वाटेने गेलं तरी मोठी भिंत समोर येत होती. सर्वत्र बंद खोल्या आणि तोंडावर भरमसाठ मेकअप फासलेल्या त्या बायका तिला समोर दिसत होत्या. नंदिनी तिथून बाहेर पडण्यासाठी गयावया करत होती; पण त्या बायका तिच्याकडे पाहून छद्मी हसत होत्या. इतक्यात तिला आईसाहेब पलंगावर झोपलेल्या दिसल्या. आईचा चेहरा खूपच निस्तेज आणि थकलेला दिसत होत्या. जणू काही आई बऱ्याच दिवसापासून आजारी होती. नंदिनी धावतच आईजवळ आली.

“आईसाहेब उठा लवकर.. हे आपण कुठे अडकून पडलोय? ही जागा आपल्यासाठी नाही. आपल्याला लवकरात लवकर इथून बाहेर पडायला हवं. उठा आईसाहेब..”

नंदिनी आईला हलवून उठवण्याचा प्रयत्न करत होती; पण आई तिला काहीच प्रतिसाद देत नव्हती. तिचा मलूल चेहरा पाहून तिला खूप रडू येत होतं. ती पुन्हा पुन्हा आईला आवाज देत होती; पण आई तशीच निपचित पडून होती. इतक्यात आई अस्पष्टपणे हळू आवाजात तिच्या कानात कुजबुजली.

“नंदू, आता आपली इथून सुटका नाही. आता या दलदलीतच आपला अंत होणार. आता इथून आपण अंतिम यात्रेलाच बाहेर पडू.. आपली सुटका नाही नंदू.. आता सुटका नाही..”

आईचा आवाज क्षीण होत चालला होता. नंदिनी खूप घाबरली होती तरीही उसणं अवसान आणत ती म्हणाली,

“नाही आईसाहेब, तुम्ही अशी हिंमत हारू नका. आपण इथून नक्की बाहेर पडू..”

नंदिनी आईला उठवण्याचा प्रयत्न करत होती. इतक्यात तोच काळा जाडा, जाड मिशा असलेला आडदांड माणूस तिथे आला. त्याचं आसुरी हसू ऐकून तिच्या जीवाचा थरकाप झाला. त्याने तिच्या दंडाला पकडलं आणि तो तिला फरफटत ओढत घेऊन जाऊ लागला.

“सोडा मला.. कोण आहात तुम्ही? कुठे घेऊन जाताय मला? मला इथे राहायचं नाही. सोडा प्लिज.. आईसाहेब, आईसाहेब..”

नंदिनी जीवाच्या आकांताने ओरडत होती. तो नराधम तिला खेचून नेत होता. त्याने तिला ओढत एका खोलीत आणलं. तिथे हिरव्या साडीत केस कमरेपर्यंत मोकळे सोडलेली बाई पाठमोरी उभी होती.

“इथे का आणलंय मला? सोडा मला.. कोण आहात तुम्ही?”

नंदिनी मोठ्याने ओरडली. तिच्या प्रश्नांसरशी ती बाई गरकन मागे वळाली.

“तू?”

नंदिनी भीतीने थरथरली. तीच लाल कुंकवाचा मळवट भरलेली बाई दात विचकत कमरेवर हात ठेवून उभी होती. तिचे डोळे जणू रक्त ओकत होते. तिच्या अंगावर धावून येत ती जोरात ओरडली,

“तुझी इथून सुटका नाही.. इथेच तुझा शेवट होईल.. इथेच मृत्यू.. हे बघ तुझी आई.. हा.. हा.. हा..”

नंदिनीला आई पलंगावर झोपलेली दिसली. तिला धाप लागत होती. श्वास घेताना तिला त्रास होत होता.

“आईसाहेब….”

नंदिनी जोरात ओरडली तशी तिला जाग आली आणि ती खाडकन जागेवरून उठून बसली. शेजारी झोपलेल्या त्रिशालाही जाग आली.

“नंदू, काय झालं?”

त्रिशाने टेबलवरचा दिवा लावत विचारलं.

“आई, आईसाहेब.. तिथे अडकल्यात. त्यांना सोडवायला हवं. आईसाहेब..”

“जागी हो नंदू.. कुठे आहेत आईसाहेब?”

“आई संकटात आहे. आईला कॉल लाव. मला तिच्याशी आतच्या आता बोलायचं आहे. प्लिज..”

ती घाबरीघुबरी होत म्हणाली. ती प्रचंड अस्वस्थ झाली. नंदिनी तिचं ऐकत नव्हती. पलंगावरून उठून त्रिशाच्या हात झटकून देत, तिला ढकलून ती बाहेरच्या दिशेने निघाली होती. म्हणून मग रागातच त्रिशा तिला अडवत जोरात तिच्यावर ओरडली,

“थांब नंदू, जागी हो.. भानावर ये.. इथं कोणी नाहीये. स्वप्न पडलंय का तुला?”

त्रिशाच्या जोरात ओरडण्याने नंदिनी भानावर आली. डोळयात पाणी दाटलं आणि काकुळतीला येऊन म्हणाली,

“हो त्रिशा.. पुन्हा तेच स्वप्न गं..”

नंदिनीने तिला घट्ट मिठी मारली आणि हमसून हमसून रडू लागली. नंदिनीची मिठी इतकी घट्ट होती की त्रिशाच्या कानांना तिच्या हृदयाची धडधड खूप स्पष्टपणे ऐकू येत होती. तिला दरदरून घाम फुटला होता. तिच्या घश्याला कोरड पडली होती. त्रिशाने तिला पाण्याची बॉटल हातात दिली. नंदिनीने पटकन बाटलीचं झाकण उघडलं आणि गटागट पाणी प्यायली.

“घाबरू नकोस. मी तुझ्या शेजारीच आहे.. काळजी करू नकोस. झोप शांतपणे..”

त्रिशा नंदिनीच्या हातातली पाण्याची बाटली घेऊन टेबलवर ठेवत म्हणाली आणि तिने नंदिनीला झोपायला सांगितलं. नंदिनी पलंगावर आडवी झाली; पण तिला झोप येत नव्हती. ती सारखी एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळत होती. तिचा जीव कासावीस झाला होता. डोळ्यातून पाणी वाहू लागलं होतं आणि प्रश्नांचा ससेमिरा पाठ सोडत नव्हता. डोकं जड झालं होतं. ती उठून बाहेर बाल्कनीत जाऊन विचार करत फेऱ्या मारू लागली.

“काय करायचं या स्वप्नांचं? काय अर्थ असेल या स्वप्नाचा? आईसाहेब ठीक असतील ना? कधी संपेल हे सगळं? कोण आहे तो माणूस? कोण आहे ती बाई? काही समजायला मार्ग नाही. मला हे डॉक्टर नीरजाला सांगायला हवं. तिच्या उपचारांचा तरी काही उपयोग होईल का?”

तिच्या मनात शंका येऊ लागल्या. इतक्यात तिला युवराजचे शब्द आठवले.

“नंदू, आपण स्वतःला नीरजाच्या स्वाधीन केलंय नां? मग तिच्यावर विश्वास ठेवायला हवा. ती एक डॉक्टर आहे. तिच्याकडे यावर नक्कीच काहीतरी उपाय असेल. प्रत्येक गोष्टींवर उपाय असतोच मग यावरही नक्की असेल. फक्त तू तिच्यावर विश्वास ठेव.”

नंदिनीला त्याचं म्हणणं पटलेलं होतंच. तिने पुन्हा एकदा त्यावर शिक्कामोर्तब केलं.

“उद्या सकाळी पहिलं आईसाहेबांना आणि नीरजाला कॉल कारायला हवा. तिला सगळं सांगायला हवं. ती यावर नक्की मार्ग काढेल. मला तिच्यावर विश्वास ठेवायलाच हवा.”

नंदिनीने स्वतःशी निर्धार केला आणि पुन्हा एकदा ती आपल्या बेडरूमच्या दिशेने चालू लागली. पलंगावर अंग टाकून ती शांत झोपण्याचा प्रयत्न करू लागली. कधीतरी उशिरा तिचा डोळा लागला.

दुसऱ्या दिवशी सकाळी पाखरांच्या किलबिलाटाने तिला जाग आली. उठल्या उठल्या तिने पहिलं घरी तिच्या आईला कॉल केला.

“हं हॅलो नंदू, एवढ्या आरवाळी फोन? समदं ठीक हाय नव्हं? बरी हाईस नव्हं?”

“हो आईसाहेब, मी ठीक आहे. तुम्ही कशा आहात? मला फार आठवण येतेय आई..”

तिचा आवाज कापरा झाला. डोळ्यातून पाणी वाहू लागलं.

“अगो बाय माजी.. आठव येती तर मंग दोन दिस येऊन जा हिकडं..”

मुलीच्या काळजीने जीव गलबलून गेला.

“नाही आईसाहेब.. खूप कामं आहेत. आता येता येणार नाही. कामं संपली की दोन दिवसांची सुट्टी घेऊन येईन.”

“बरं.. तसंच करा. आमालाबी लई आठवण येती बगा तुमची. या लवकर.. ”

सुमित्राबाई मनापासून बोलत होत्या. थोडा वेळ बोलून नंदिनीने कॉल कट केला आणि सुटकेचा निःश्वास टाकला.

“हुश्श! आईसाहेब ठीक आहे. किती घाबरले होते मी!”

ती स्वतःशीच पुटपुटली. त्यानंतर लगेच तिने डॉक्टर नीरजाच्या क्लिनिकमध्ये कॉल करून तिची अपॉइंटमेंट घेतली.


पुढे काय होईल? नीरजा तिला मदत करू शकेल का? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©शिवप्रिया

🎭 Series Post

View all