स्वप्नभूल.. भाग १४

स्वप्नभूल.. कथा एका रहस्याची..
स्वप्नभूल - भाग १४
© शिवप्रिया


नंदिनीने डॉक्टर नीरजाच्या क्लिनिकला कॉल करून अपॉइंटमेंट घेतली. तिला सकाळी दहा वाजताची अपॉइंटमेंट मिळाली होती. त्यामुळे नंदिनीने भराभर आवरायला घेतलं. ब्रश, अंघोळ वगैरे आटोपलं. गजाननाच्या तस्वीरीला फुलं वाहिली. अगरबत्तीच्या मंद सुवासाने घर अगदी भरून गेलं होतं. तिने देवापुढे निरंजन प्रज्वलीत केलं.

“देवा, माझ्या आयुष्यात काय वाढून ठेवलंय रे? मला का हा त्रास होतोय? गजानना, मला मार्ग दाखव. मला या संकटातून बाहेर पडण्याची शक्ती दे. मला या स्वप्नांचा अर्थ लागू दे.. माझ्या घरच्यांना, जवळच्या मित्रामैत्रिणींना आनंदात ठेव. त्यांना उदंड आयुष्य लाभू दे.. माझ्या आईला सुखरूप ठेव.. प्लिज ईश्वरा..”

नंदिनी देवाजवळ आर्जवे करत होती. प्रार्थना करताना तिच्या डोळ्यातून आपोआप पाणी वाहू लागलं. क्षणभर थांबून तिने डोळ्यातलं पाणी टिपलं. मन भीतीने भरून गेलं होतं. देवाच्या मूर्तिकडे पाहत ती स्वतःला सावरत नमस्कार करून जागेवरून उठली. थोड्याच वेळात तिने दोघींसाठी कॉफी आणि नाष्टा बनवला आणि ती कॉफीचा ट्रे घेऊन बेडरूममध्ये आली,

“त्रिशा, ए त्रिशा ऊठ बरं..”

तिने त्रिशाला आवाज दिला. तिच्या आवाजाने त्रिशा झोपेतून जागी झाली आणि डोळे चोळत म्हणाली,

“काय गं? काय झालं?

“काही नाही ऊठ आता.. आवर पटकन.. आज माझी एक महत्वाची मीटिंग आहे. मी आता सकाळी दहा वाजताची अपॉइंटमेंट घेतलीय; त्यामुळे मला लवकर निघावं लागेल.”

कॉफीचा कप तिच्या हातात देत नंदिनीला विचारलं,

“नंदू, काल इतकी का घाबरली होतीस? पुन्हा तेच स्वप्न?”

“हो गं.. पुन्हा तेच.. यावेळीस तर स्वप्नात आईसाहेब आल्या होत्या आणि फारच मलूल वाटत होत्या. जणू काही बऱ्याच दिवसांपासून आजारी असाव्यात. म्हणून मग उठल्या उठल्या त्यांना आधी कॉल केला. मला फार भीती वाटते गं..”

नंदिनी कालच्या स्वप्नाच्या आठवणीने भयभीत झाली.

“हे सगळं फार विचित्र आहे गं; पण तू काळजी करू नकोस. सगळं ठीक होईल. देवावर विश्वास ठेव.”

“हं.. तोच आता पाठीराखा..”

दीर्घ श्वास घेत नंदिनी म्हणाली. थोड्याच वेळात त्रिशा आवरून ऑफिसला निघून गेली. नंदिनीनेही स्वतःचं आवरलं आणि क्लिनिकला जाण्यासाठी तयार झाली.

“युवी सांगावं का? तो सोबत असेल तर तेवढाच आधार मिळेल. काय करू? नको, नाहीतर राहू देत.. कुठे त्याला सारखा त्रास द्यायचा! त्याने आजवर खूप मदत केली आहे. आता नको. मलाच माझा मार्ग शोधावा लागेल.”

ती स्वतःशीच पुटपुटली. घरातून निघताना दिवे, पंखे, गॅस, पाण्याचा नळ बंद असल्याची खात्री करून घेतली. दार बंद करून कुलूप लावलं आणि ती घराबाहेर पडली. सोसायटीच्या बाहेर पडल्यावर ऑटो करून ती थोड्याच वेळात ती डॉक्टर नीरजाच्या क्लिनिकमध्ये पोहचली. थोडा वेळ बाहेर बसल्यानंतर डॉक्टर नीरजाने तिला आत बोलावलं. ती आत आली. नीरजा तिच्याकडे हसून पाहत म्हणाली,

“गुडमॉर्निंग नंदिनी, कशी आहेस?”

नंदिनी फक्त किंचित हसली.

“मनात इतकं काही सुरू असताना मी बरी कशी असेन?”

“म्हणजे?”

“नीरजा, मला पुन्हा तेच स्वप्न पडलं. माझी आई तिथे माझ्यासोबत अडकलीय..”

असं म्हणत नंदिनीने नीरजाला काल रात्री पडलेलं स्वप्न तिला सांगितलं. ते सांगताना ती खूप घाबरली होती. खूप रडत होती. नीरजाने तिला रडू दिलं. शांत होऊ दिलं. आणि मग तिच्यापुढे पाण्याचा ग्लास ठेवला. दोन घोट पाणी प्यायल्यावर नंदिनीला हुशारी वाटली. नीरजाने बोलायला सुरुवात केली.

“नंदिनी, शांत हो आणि मी काय सांगते ते ऐक.. आपल्याला स्वप्न का पडतात माहितीये?”

“नाही.. का पडतात?”

नंदिनीने प्रश्न केला.

“खरंतर सुप्त मनाचा आविष्कार म्हणजे स्वप्न.. मनोवैज्ञानिक दृष्टिकोनातून, माणसाच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी स्वप्नं पडणं ही अत्यंत महत्वाची बाब आहे. स्वप्ने आपल्या मनाची उत्पत्ती आणि कार्यक्षमता प्रतिबिंबित करतात. आपण जे काही विचार करतो किंवा ज्या काही गोष्टी आपल्या दिवसभराचा भाग आहे, त्यावरून आपली स्वप्ने प्रभावित होतात आणि त्याच्याशी संबंधीत गोष्टी स्वप्नात दिसतात. दिवसा अती श्रम पडले तरी स्वप्न पडतात. एखादी दुःखद घटना घडली तरी स्वप्न पडतात. सहसा स्वप्नशिवाय झोप नसते. कधी कधी स्वप्न ही निरर्थक असतात आपण उगीच त्यांना अर्थ लावून मनस्थिती बिघडवून घेतो. आपल्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छा, तृप्त झालेल्या इच्छा, किंवा घाबरलेली मनस्थिती जे जे काही दिवसा आपण बघतो अनुभवतो. ते एखाद्या पिक्चरप्रमाणे रंगवून स्वप्नात आपण पाहत असतो.”

“पण नीरजा, मी असं काही अनुभवलंच नाही., कधी पाहिलं नाही. तरी ते माझ्या स्वप्नात येतं. स्वप्नाला सुरुवात कुठूनही होऊ देत; पण शेवट मात्र त्या तिथेच होतो.”

नंदिनी निक्षुन म्हणाली.

“बरं ठीक आहे. कदाचित तू म्हणतेस ते बरोबर असेल. तू कधी विचार केला नाही तरीही तुला तशी स्वप्न पडताहेत. पण असं का होतंय? कधी विचार केलायस? तुझ्या सुप्त मनात काहीतरी खळबळत आहे आणि तेच स्वप्न बनून समोर येतंय.”

नीरजा तिच्या डोळ्यात पाहून म्हणाली.

“म्हणजे? असं काही माझ्या मनात नाहीये. आय ऍम परफेक्टली ऑल राईट नीरजा..”

नंदिनी पुन्हा निग्रहाने म्हणाली.

नक्की? तसं असेल तर चांगलंच आहे. मला सांग तू रोज चांगल्या गोष्टींना ग्रॅटित्यूड देतेस नां? मेडिटेशन करतेय नां?”

“हो.. रोज करतेय.”

“व्हेरी गुड.. आता आज आपण एक वेगळा टास्क करणार आहोत.”

नंदिनीच्या बोलण्यावर नीरजा कागद पेन तिच्या हातात देत म्हणाली. नंदिनीने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं.

“नंदिनी, मागच्या सेशनमध्ये तू तुझ्या आयुष्यात घडलेल्या चांगल्या गोष्टीसाठी कृतज्ञता व्यक्त केलीस. त्यांचे आभार मानलेस. आता आज तुला तुझ्या आयुष्यात घडलेल्या नकारात्मक घटना लिहून काढायच्या आहेत आणि त्यांचे तुला आभार मानायचेत.. चला, त्या नकारात्मक घटना लिहून काढा.. लेट्स स्टार्ट नंदिनी..”

नंदिनीला तिच्या बोलण्याचं खूप आश्चर्य वाटलं.

“असं कसं निगेटिव्ह गोष्टींसाठी आभार मानता येईल? ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास झाला, डोळ्यात पाणी आलं; त्यांचे आभार मानता येणार नाहीत.”

“का येणार नाही? नकारात्मक गोष्टींही आपल्याला खूप काही देऊन जातात. म्हणजे बघ जसं की, मी दहावीला नापास झाले. ही निगेटिव्ह गोष्ट.. पण त्यामुळे मी अपयशाला सामोरी जायला शिकले. मला प्राध्यापिका व्हायचं होतं. नाही झाले; पण माझं वाईट काय झालं सांग? आज मी तुमच्या सर्वांशी बोलतेय. समुपदेशन करतेय. छान वाटतं. आयुष्यात त्या घटना आयुष्यात घडल्या नसत्या तर आज आपण जे आहोत ते झालो असतो का? मग त्या सर्व नकारात्मक गोष्टींना आपण थँक्यू म्हणायला हवं नां?”

नीरजा क्षणभर थांबली. नंदिनी विचार करू लागली आणि तिला तिच्या आयुष्यात काय वाईट घडलं, दुःखद घडलं ते आठवू लागली.

“प्रत्येकवेळी मुलगा म्हणून आईसाहेबांनी घेतलेली दादाची बाजू, मामाच्या गावाला गेल्यावर समरजीत दादाने सर्वांसमोर केलेला अपमान, वर्गात सर्वांसमोर गोखले मॅडमनी वेताच्या छडीने मेहंदी काढलेल्या हातावर दिलेला मार, कॉलेजमध्ये असताना सर्वेशशी बोलताना पाहिल्यावर दादाने भर रस्त्यात कानाखाली मारलेला फटका.. सारं काही किती भयानक होतं.”

ती पुटपुटली आणि कागदावर लिहू लागली. लिहून झाल्यावर तिने तो पेपर नीरजाकडे सरकवला. कागदावर लिहिलेलं वाचत नंदिनीकडे नीरजा म्हणाली,

“आता हे बघ, तुझ्या आईने कायम भावाची बाजू घेतली त्यामुळे तू किती स्ट्रॉंग झालीस. तुझं चांगलं वाईट तुला समजत गेलं. समरजीत दादाने सर्वांसमोर तुझा अपमान केला तुला वाईट वाटलं पण तुला नक्की हे चांगलंच समजलं की, असा अपमान झाल्यावर आपल्याला किती वाईट वाटलं. यापुढे तू कोणाचा असा अपमान करणार नाहीस. कधी कधी समोरच्याच्या वाईट वागण्यातूनही आपण शिकतो हेच खरंय. गोखले मॅडमनी शिक्षा केली नसती तर तू आज इतकी शिकली नसती. छडीच्या माराने का असेना तुला अभ्यासाची गोडी लागली. आज तू इतक्या मोठ्या पदावर कार्यरत आहेस. एकंदरीत काय तर आपण वाईट गोष्टीतूनही बरंच काही शिकत जातो. आयुष्यात घडणारी प्रत्येक चांगली वाईट घटना आपल्याला शिकवत जातात.”

नीरजा हसून म्हणाली.

“पण ती घटना? मी कशी पुसून काढू? कसं थँक्यू म्हणू?”

नंदिनीच्या डोळ्यात पाणी दाटू लागलं. भीतीने अंग थरथरू लागलं.

पुढे काय होईल? नंदिनीच्या आयुष्यात काय घडलं असेल? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©शिवप्रिया

🎭 Series Post

View all