स्वप्नभूल..भाग १५

स्वप्नभूल.. कथा एका रहस्याची..
स्वप्नभूल - भाग १५
© शिवप्रिया


“कोणती घटना? नंदिनी, तुला मला काही सांगायचंय का? तू मला निर्धास्तपणे सांगू शकतेस. काही वाईट घडलंय का?”

नंदिनीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलू लागले. नीरजा तिचं सूक्ष्म निरीक्षण करत होती.

“नाही असं काही नाही. सगळं छान आहे. मला काहीही झालेलं नाही.”

तिच्याकडे पाहून डॉक्टर नीरजा म्हणाली,

“नंदिनी, मी तुझी डॉक्टर जरी असले तरी त्याआधी मी तुझी मैत्रीण आहे. तुझ्या सुप्त मनात काय दडून राहिलंय ते समजल्याशिवाय मला तुझ्यावर योग्य ते उपचार करता येणार नाही. तुझ्या मनाला मला बरं करता येणार नाही. त्यामुळे तुला मला सहकार्य करावं लागेल ना? जर लवकरात लवकर बरं व्हायचं असेल तर तूझ्या आयुष्यातल्या हरेक घटना मला माहित असायला हव्यात नां? हे बघ नंदिनी, आपल्या शरीरावर झालेल्या जखमा आपल्याला दिसतात त्यामुळे त्यावर औषधोपचार करता येतात. त्या जखमा बऱ्या होऊ शकतात; पण मनाचं काय? मनाला झालेल्या जखमा कोणालाच दिसत नाही आणि त्यामुळे मनाच्या जखमा बऱ्या करण्यासाठी तुला व्यक्त व्हावं लागेल. मनाला बरं व्हायचं असेल तर तुला माझ्याशी बोलावंच लागेल.”

डॉक्टर नीरजाचे शब्द नंदिनीच्या कानावर जाऊन फक्त आदळत होते; पण ती काहीच बोलत नव्हती. नीरजाच्या लक्षात आलं की, नंदिनी तिच्यापासून काहीतरी लपवतेय म्हणून मग तिने दीर्घ श्वास घेत पुन्हा बोलायला सुरुवात केली,

“नंदिनी, ठीक आहे. तुला हा टास्क नाही करायचा नं राहू देत. काही हरकत नाही. आज आपण मागच्या सेशनमध्ये केलेल्या गोष्टींची उजळणी करू. योगसाधनेला सुरुवात करू. युनिव्हर्सला थँक्यू म्हणू.. सकारात्मक गोष्टींना आभार देऊ. आता आपण डोळे मिटून मन एकाग्र करू.”

नंदिनीने मान डोलावली आणि डोळे मिटून घेतले. मेडिटेशनला सुरुवात झाली. मन शांत होत नव्हतं. असंख्य विचार तिच्या मनात फेर धरत होते; पण तरीही ती मनाला शांत करण्याचा प्रयत्न करत होती.

“नंदिनी, आता आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचाय आणि शांतपणे श्वास सोडायचा आहे. आपलं संपूर्ण लक्ष श्वासाच्या गतीवर केंद्रित करायचं आहे. मनातल्या नकारात्मक विचारांना पुसून टाकायचं आहे आणि म्हणायचं आहे, हे जग खूप सुंदर आहे. हे युनिव्हर्स, माझ्या सुंदर आयुष्यासाठी मी तुझी आभारी आहे. माझे सगळे इमोशन्स आता रिलीज होताहेत. आयुष्यात घडलेल्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींसाठी मी तुझे आभार मानते. थँक यू सो मच डिअर युनिव्हर्स. आय लव्ह यू..”
.
नीरजा हळू आवाजात नंदिनीला सूचना देत होती आणि नंदिनीही नीरजाने सांगितलेल्या सूचनांचं पालन करत युनिवर्सला धन्यवाद म्हणत होती. पंधरा वीस मिनिटं नीरजा आणि नंदिनी त्याच योगसाधनेच्या अवस्थेत बसून होत्या. योगसाधना झाल्यावर नीरजाने तिला डोळे उघडायला सांगितलं. पुन्हा दीर्घ श्वास घेत बोलायला सुरुवात केली.

“कसं वाटतंय नंदिनी?”

“ थोडं बरं म्हणजे थोडं हलकं वाटतंय.”

“ओके, आजच्या दिवसासाठी इतका एक्सरसाईज पुरे.. मी तुला दोन दिवसांनंतरची अपॉइंटमेंट देते. तेंव्हा भेटू आणि बोलू. तोपर्यंत आधी सांगितलेल्या गोष्टी फॉलो कर.. मेडिटेशन कर.. मी तुला काही बीएफटी मेडिसिन्स देतेय ते सुरू कर.. पुन्हा दोन दिवसांनी भेटू. चालेल?”

“हो चालेल.. मी निघू?”

नंदिनीच्या प्रश्नावर नीरजाने होकारार्थी मान डोलावली. नंदिनी तिथून बाहेर पडली. दुपारचं कडकडीत ऊन डोक्यावर आलं होतं. उन्हाच्या झळा चांगल्याच लागत होत्या. तशा भर उन्हात नंदिनी रस्त्यावरून चालत निघाली होती. तिला कशाचंच भान राहिलं नव्हतं. ती आपल्याच तंद्रित रस्ता कापत पुढे जात होती. कुठेतरी खोलवर हृदयावर झालेल्या जखमांवरची खपली पुन्हा निघाली. घाव हिरवा झाला. जखम भळभळून वाहू लागली.

“का पुन्हा ती वाईट आठवण? इतकी वर्षे मी ती गोष्ट मनात पार गाडून टाकली होती. त्या भयंकर गोष्टींची आठवण का? नको.. नको.. मला काही आठवायचं नाही. मला कोणाला काही सांगायचं नाही.”

मनात विचारांचं वावटळ थैमान घालत होतं. डोळ्यातलं पाणी वाहू लागलं होतं. काहीच करण्याची इच्छा नव्हती म्हणून मग तिने ऑफिसला जाण्याचा बेत रद्द केला. नंदिनीने ऑफिसला येत नसल्याचं नेहाला कळवून टाकलं आणि रिक्षा करून ती तडक घरी निघून आली.

इकडे नंदिनी डॉक्टर नीरजाच्या क्लिनिकमधून बाहेर पडल्यानंतर नीरजाच्या मनात नंदिनीचेच विचार घोळत होते.,

“काय करावं? इतकं विचारल्यावरही ती काहीच बोलली नाही. कसं बोलतं करावं तिला? ती बोललीच नाही तर तिच्या मनातलं कसं कळेल? इतकी गोड मुलगी स्वतःशीच, स्वतःच्याच विचारांशी झुंजतेय. मला काहीतरी करायला हवं.. तिला माझ्या मदतीची गरज आहे; पण काय करू? कोणाची मदत घेऊ?”

नीरजा विचारात मग्न झाली. आणि अचानक तिला युवराजची आठवण झाली आणि तिच्या चेहऱ्यावर एक आशेचा किरण चमकला.

“अरे हो! युवराजला विचारलं तर! तो नंदिनीचा मित्र आहे. तो नक्कीच नंदिनीला बरं करण्यात मदत करू शकेल; पण त्याला कसं शोधू? त्याचा नंबर कुठे सापडेल?”

नीरजा विचार करू लागली. इतक्यात तिला त्याने दिलेल्या व्हिजिटिंग कार्डची आठवण झाली आणि नीरजाने तिच्या टेबलच्या डाव्या बाजूच्या ड्रॉवरमधून व्हिजिटिंग कार्ड्सचं फोल्डर काढलं आणि ती युवराजचं कार्ड शोधू लागली. फोल्डरची दोन तीन पानं पलटल्यानंतर तिला युवराजचं कार्ड सापडलं. त्याचं कार्ड पाहून तिला खूप आनंद झाला. तिने पटकन टेबलवरचा मोबाईल उचलला आणि कार्डवरचा युवराजचा मोबाईल नंबर डायल केला. समोरून युवराजने ‘हॅलो’ म्हणताच नीरजाने बोलायला सुरुवात केली.

“हॅलो युवराज..”

“हॅलो, डॉक्टर नीरजा, बोल ना.. कशी आहेस?”

युवराजने प्रश्न केला.

“हो मी मजेत.. मी तुला नंदिनीबद्दल सांगण्यासाठी कॉल केलाय..”

“नंदिनीबद्दल? का? काय झालं? काही प्रॉब्लेम?”

नंदिनीचं नाव ऐकताच युवराजने काळजीने विचारलं.

“युवराज, तू नंदिनीला माझ्याकडे घेऊन आला होतास. त्यामुळे मला असं वाटलं की, तू तिचा चांगला मित्र आहेस आणि तूच तिला नीट समजावून सांगू शकतोस.”

नीरजा सावकाशपणे बोलत होती.

“काय झालंय नीरजा, स्पष्ट बोल..”

“नंदिनी आज माझ्याकडे आली होती. तिच्याशी बोलताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की, ती माझ्यापासून काहीतरी लपवतेय. मी तिच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला; पण ती काहीच सांगत नाहीये. मला तिची फार काळजी वाटतेय. तिला बोलतं करण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्याला संमोहन उपचार पद्धतीचा अवलंब करावा लागेल.”

“हिप्नॉटिझम?”

“हो, तिच्या सुप्त मनात काहीतरी आहे, जे ती बाहेर काढत नाहीये. त्यासाठी हिप्नॉटिझमशिवाय पर्याय नाही. कदाचित तिला पडणाऱ्या स्वप्नांची लिंक आपल्याला तिथेच सापडेल.”

“मग विचार कसला करतेय? तू एक डॉक्टर आहेस आणि तुला वाटतं नां, त्यामुळे ती बरी होईल तर मग तुला योग्य वाटते ती उपचार पद्धती वापरू शकतेस.”

युवराजने बोलणं ऐकून नीरजा म्हणाली,

“पण संमोहन प्रक्रिया सुरू करण्याआधी आपल्याला तिला त्या प्रोसेसबद्दल सांगायला हवं. एक डॉक्टर म्हणून माझ्या पेशन्टला त्याची पूर्वकल्पना देणं माझ्यासाठी महत्वाचं आहे. तिच्या परवानगीशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. तू तिच्याशी बोलून घे आणि तिला या प्रोसेससाठी तयार कर.. आपल्याला मिळून नंदिनीची मदत करायला हवी.”

“पुढची अपॉइंटमेंट कधीची आहे?”

युवराजने विचारलं.

“मी दोन दिवसांनी तिला यायला सांगितलंय. ती येईल अशी आशा करते.”

नीरजाने उत्तर दिलं.

“बरं, चालेल. मी बोलतो नंदिनीशी.. मीच येईन तिच्यासोबत. तू काळजी करू नकोस. मला तिला मदत करायचीय. तिला या त्रासातून मला बाहेर काढायचंय नीरजा.. त्या स्वप्नांमूळे किती खचून गेलीय ती बिच्चारी!”

युवराज तिच्या काळजीने व्यथित झाला. नीरजा त्याला समजावणीच्या सुरात बोलत होती. थोडं बोलून तिने कॉल कट केला. युवराजच्या मनात नंदिनीचे विचार घोळत होते. त्याने नंदिनीला कॉल करण्यासाठी मोबाईल हातात घेतलाच होता की, इतक्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. मोबाईल स्क्रीनवरचं नाव बघून त्याच्या कपाळावर किंचित आटी पडली.

“ही का कॉल करतेय मला?”

तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला.

युवराजला कोणाचा कॉल आला होता? पुढे काय होईल? युवराज नंदिनीला संमोहन प्रक्रियेसाठी तयार करू शकेल? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©शिवप्रिया


🎭 Series Post

View all