स्वप्नभूल - भाग १८
© शिवप्रिया
© शिवप्रिया
नंदिनीचा हात हातात घेऊन प्रेमाने तिच्याकडे पाहत नीरजा म्हणाली,
“नंदिनी, हे बघ, इथे आजूबाजूचं वातावरण पाहून अजिबात घाबरायचं नाही. कसलंही दडपण मनावर येऊ द्यायचं नाही. ही एक उपचाराची पद्धत आहे. ही प्रक्रिया म्हणजे जादू वगैरे असं काही नसून मानसिक त्रासावर आराम मिळवण्याची पद्धत आहे. यात आपण मनावरचा ताण कमी करून तुझ्या अंतर्मनाला जागृत करणार आहोत. या सेशनच्या दरम्यान तुला थोडा त्रास होईल. अस्वस्थता जाणवेल, मन एकाग्र होणार नाही पण बिलीव्ह मी.. उपचारांच्या शेवटी तुला खूपच आराम मिळेल. चल आपण सुरुवात करूया. आता तू फक्त मी सांगते तसं करत जा आणि मी जे प्रश्न विचारेन त्या प्रश्नांची उत्तरं देत जा.. आता निवांत पडून रहा, ओके?”
नंदिनी होकारार्थी मान डोलावली. नीरजाने तिच्या पांढऱ्या कोटच्या खिश्यातून संमोहनचक्र बाहेर काढलं. नंदिनी आरामखुर्चीत टेकून बसली. मन अजूनही स्थिर नव्हतं. एका वेगळ्या प्रक्रियेतून ती जात होती. हृदयात धडधड सुरू होती. डॉक्टर नीरजाने शांत सौम्य आवाजात बोलायला सुरुवात केली.
“नंदिनी, शांत पडून रहा.. आपलं अंग सैल सोड आणि मन एकाग्र कर. आता या पेंड्युलमवर लक्ष केंद्रित कर. तुला हळूहळू आराम वाटू लागेल. डोळे बंद होतील. आता तुला तुझ्या आयुष्यातल्या काही गोष्टी आठवतील. त्यावर मी तुला काही प्रश्न विचारेन त्याची उत्तरं देत जा.. बस्स! बाकी काही नाही. तुला यानंतर खूप रिलॅक्स वाटेल. ठीक आहे? रेडी?”
नंदिनीने होकारार्थी मान डोलावली आणि पेंड्युलमवर लक्ष केंद्रित केलं. हळूहळू तिचे डोळे जड होऊ लागले. डोळ्यावर झोप अनावर होऊन डोळे आपोआप झाकले जाऊ लागले. आता तिला आजूबाजूला काहीच जाणवत नव्हतं. फक्त डॉक्टर नीरजाचा आवाज ऐकू येत होता.
“नंदिनी, आता मला जरा आठवून सांग, काल रात्री तू कुठे आहेस? आणि तिथे काय झालं?”
नंदिनीच्या कपाळावर एक हलकीशी आठी पडली. ती हळू आवाजात बोलू लागली.
“मी माझ्या खोलीत झोपलेय. माझ्या शेजारी त्रिशा झोपली आहे. आणि मला पुन्हा स्वप्न पडलं.. तेच भयंकर स्वप्न.. त्या बायका.. तो ओंगळवाणा स्पर्श.. वखवखलेल्या नजरा.. मी तिथून निसटून जाण्याचा प्रयत्न करतेय; पण नाही.. मला शक्य होत नाहीये. मी पुन्हा तिथेच अडकतेय. तो माणूस मला ओढत घेऊन जातोय. आणि ती कपाळावर लाल कुंकवाचा मळवट भरलेली बाई माझ्याकडे पाहून विद्रुप हसतेय. मी तिला सोडण्यासाठी गयावया करतेय पण नाही.. कोणालाच माझी दया येत नाहीये..”
“मग पुढे काय झालं?”
“अचानक मी जोरात किंचाळले. मला जाग आली. माझं स्वप्न तुटलं आणि मी स्वप्नातून बाहेर आले. माझ्या आवाजाने त्रिशाही उठून बसली. तीही खूप घाबरली आहे. तिने मला प्यायला पाणी दिलं. मला कळत नाहीये, ते स्वप्न पुन्हा मला का दिसतं? कोण आहे ती बाई? ती मला कसले संकेत देतेय?”
“ओके.. आपण पाहूया ते.. बरं नंदिनी, आता मला सांग, गेल्या आठवड्यात काय झालं? तू काय करतेय आता?”
डॉक्टर नीरजाने प्रश्न केला तसं पुन्हा तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलू लागले. चेहरा आनंदाने भरून गेला. ओठांवर हसू उमटलं.
“मी माझ्या ऑफिसमध्ये आहे. माझे सर माझ्या कामाबद्दल माझं कौतुक करताहेत. ‘साद घालणारे वृद्धाश्रम’ या माझ्या लेखाला वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आमच्या वर्तमानपत्राचा खप वाढतोय. त्यांनी सर्वांसमोर मला अजून एक नवीन प्रोजेक्टवर काम करायला सांगितलं. सर्वजण खुपच खूष आहेत.”
नंदिनीच्या चेहऱ्यावरचे सूक्ष्म हावभाव टिपत नीरजाने पुढचा प्रश्न केला.
“सर्वजण म्हणजे? कोण कोण आहेत तिथे?”
“म्हणजे युवी, केदार, श्रीकांत, व्यँकी मायरा, नेहा, कौमुदी आणि बरेचजण आहेत. सर्वांना खूप आनंद झालाय. ते सर्वजण माझं कौतुक करताहेत. माझं अभिनंदन करताहेत. पल्लवीने तर आनंदाने मला मिठीच मारली. पण.. पण ती..”
तिच्या कपाळावर किंचितशी आटी उमटली.
“पण काय?”
नीरजाने तिला प्रश्न केला.
“गार्गी.. गार्गी उदास दिसतेय..”
“कोण गार्गी?”
“गार्गी.. माझी सहकारी.. माझ्यासोबत काम करते म्हणजे ती माझी सिनियर आहे. ती खूप सुंदर दिसते. सगळे तिच्या सौन्दर्याचं कौतुक करतात. ऑफिसमधले तरुण अविवाहित मुलंच काय तर विवाहित पुरुष सहकारीही तिच्या मागेपुढे करतात; त्यामुळे तिला तिच्या सौन्दर्याचा खूप अभिमान आहे. आणि का नसावा? आपल्यात जे उत्तम आहे त्याचा अभिमान असायलाच हवा. मला तिचा हा ऍटिट्युड फार आवडतो; पण मी तिला मुळीच आवडत नाही.”
“का? तिला तू का आवडत नाही?”
नीरजाने आश्चर्याने विचारलं.
“माहित नाही.. कदाचित मी गावाकडची आहे ना.. म्हणून मी तिला गांवढळ वाटत असावी. ती माझा सतत अपमान करत असते. मी तिचं निमूटपणे ऐकून घेते. तिला मी कधीच उलटून काही बोलत नाही. ती माझी सिनियर आहे नां? माझ्या आधी ती आमच्या ऑफिसमध्ये गेल्या दोन वर्षांपासून काम करतेय; मग मला तिचं ऐकावंच लागेल नां? मी तिला काही न बोलता माझी नेहमीची कामं करत राहते. सर माझ्या कामाचं कौतुक करतात. युवी सुद्धा..”
नंदिनीच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. नीरजाने पुन्हा विचारलं.
“मग गार्गीला ते आवडत नाही का?”
“माहित नाही.. पण आमचे सर सारखे मला आवाज देतात. सर मला आणि युवीला त्यांच्या प्रत्येक नवीन प्रोजेक्टमध्ये सामील करून घेतात. युवीसुद्धा सारखं नंदू… नंदू.. करत असतो.”
“अच्छा.. मला सांग, युवी कसा आहे?”
“युवी, खूप चांगला आहे. माझा एकदम बेस्ट फ्रेंड.. कॉलेजपासून तो आणि मी एकत्र आहोत. तो नेहमी माझ्यासोबत असतो अगदी माझ्या सावलीसारखा.. मी त्याच्याशी माझ्या मनातलं सगळं सगळं सांगू शकते. काहीही बोलू शकते. माझ्या त्याच्यावर खूप विश्वास आहे. तो मला कायम मदत करत असतो. माझी खूप काळजी घेतो. इतकी की, माझ्या घरच्यांनीही कधी इतकी माया, प्रेम दिलं नाही कधी..”
नंदिनीच्या बंद डोळ्यातूनही पाणी वाहू लागलं.
“तो तुला आवडतो?”
नंदिनी क्षणभर थांबली आणि हळू आवाजात म्हणाली,
“हो.. एक मित्र म्हणून मला तो खूप आवडतो; पण मी त्याला आवडत नसावी आणि का आवडावी? ऑफिसमधल्या बऱ्याच मुलींना तो आवडतो. आमच्या ऑफिसमध्ये इतक्या सुंदर, फॅशनेबल मॉडर्न मुली असताना माझ्यासारखी एक खेड्यातली, लाजरीबुजरी, कायम गोंधळलेल्या अवस्थेत असणारी, सर्वसाधारण दिसणारी मुलगी कोणाला आणि का आवडेल?”
“हं.. बरं.. पण असं का वाटतं तुला? युवराजला तू का आवडत नसावीस? तुला कोणी तसं म्हणालं का? किंवा युवराजच्या बोलण्यात तसं कधी आलंय का?”
“नाही.. कोणी तसं म्हणालं नाही. किंवा युवीच्या वागण्या बोलण्यातूनही मला कधी तसं जाणवलं नाही; पण त्याला आवडण्यासारखं काय आहे माझ्यात?”
नंदिनीच्या चेहऱ्यावर उदासी छटा दिसू लागली. नीरजा विचारात पडली.
“असं का वाटत असेल तिला? नक्कीच तिच्या भूतकाळात काहीतरी घडलं असावं. मला अजून थोडं मागे जावं लागेल.”
नीरजाने हळू आवाजात तिला पुन्हा विचारलं.
“नंदिनी, आता मला सांग गेल्या दोन महिन्यापूर्वी तू काय करतेय? तुझ्यासोबत आता कोण आहे?”
नंदिनीच्या कपाळावर आठ्या पडू लागल्या.
“मी एका ‘सुश्रुषा’ नावाच्या वृद्धाश्रमात आहे. तिथे सगळ्या वृद्ध आजीआजोबांचे केविलवाणे चेहरे पाहून मला खूप वाईट वाटतंय. आम्ही म्हणजे मी आणि युवी तिथे त्यांना भेटायला आलोय. युवी सगळ्यांना भेटवस्तू वाटतोय आणि मी तिथे सर्वांशी खूप छान गप्पा मारतेय. प्रत्येकाची वेगळी कहाणी.. वेगळी व्यथा.. आपल्या पोटी जन्मास आलेली मुलं अशी कशी वागू शकतात? आपल्याच जन्मदात्यांना असं वृद्धाश्रमात कसं सोडून जाऊ शकतात? कोणी इतकं कृतघ्न कसं असू शकतं?”
नंदिनीच्या चेहऱ्यावर संतापाची छटा स्पष्ट दिसत होती. तिच्या हातांच्या मुठी आवळल्या जाऊ लागल्या.
“काय झालं? काय पाहतेयस तू तिथे?”
“देशपांडे आजी रडताहेत. नुकत्याच आश्रमात दाखल झाल्यात त्या.. त्यांचा मुलगा शैलेश खूप स्वार्थी वागला. वडिलांच्या निधनानंतर त्याने गोड बोलून प्रॉपर्टीच्या सर्व कागदपत्रांवर त्यांच्या सह्या घेतल्या आणि सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली. त्यानंतर त्याने त्यांचा पुण्यातला बंगला, सर्व मालमत्ता विकून टाकली. आजीला फसवून इथे वृद्धाश्रमात आणून सोडलंय. आणि तो बाकीची सर्व रक्कम घेऊन अमेरिकेला निघून गेला.”
नंदिनी देशपांडे आजींच्या विचारांनी व्याकुळ झाली. डोळ्यातून आपोआप पाणी वाहू लागलं.
पुढे काय होईल? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©शिवप्रिया
क्रमशः
©शिवप्रिया
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा