स्वप्नभूल.. भाग १९

स्वप्नभूल.. कथा एका रहस्याची,.
स्वप्नभूल - भाग १९
© शिवप्रिया


नीरजा स्वतःला नंदिनीच्या दुःखाशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत होती. तिने पुन्हा नंदिनीला विचारलं,

“हं.. बरं नंदिनी, आता तू वीस वर्षाची आहेस. आता तू कुठे आहेस? काय करतेयस?”

“मी माझ्या कॉलेजमध्ये आहे. आज शेवटच्या वर्षाच्या परीक्षेच्या निकालाचा दिवस..”

नंदिनीच्या उत्तरावर नीरजाने पुन्हा प्रश्न केला.

“अच्छा? कसं आहे तुझं कॉलेज? प्रोफेसर्स? तुझे मित्रमैत्रिणी?”

“कॉलेज छान आहे. सगळे प्रोफेसर्सही छान शिकवतात. मला जास्त फ्रेंड्स नाहीत. युवीच माझा एकमेव फ्रेंड आहे. युवी सोडून कोणीही माझ्याशी बोलायला येत नाही आणि मीही कोणाशी बोलायला जात नाही. मी गावंढळ दिसते. मी दिसायला सुंदर नाही. कॉलेजमधल्या मुलांना सुंदर, मॉडर्न, फॅशनेबल मुलींशी मैत्री करायला आवडतं. माझ्यासारख्या सर्वसाधारण मुलींकडे कोण कशाला पाहिलं पाहील? ही अशी गव्हाळ रंगाची, लाजरी बुजरी, केसांना चपचपीत तेल लावून घट्ट वेणी घातलेली, डोळ्यावर चष्मा असलेली मुलगी आजकालच्या मुलांना कशी आवडेल? त्यांना जेंव्हा नोट्स पूर्ण करायच्या असतात ना तेंव्हा त्यांना फक्त माझ्या नोट्स पाहिजेत म्हणून ते माझ्याशी बोलायला येतात. नाहीतर कोणी माझ्याकडे पाहत नाही. कोणाला मी आवडत नाही. स्वाती, माझी रूममेट.. ती सोडली तर माझी कोणी जवळची मैत्रीण नाही.”

नंदिनीच्या चेहऱ्यावर उदासीच्या छटा दिसू लागली.

“अच्छा.. नंदिनी अजून काय दिसतंय तुला?”

“कॉलेज कॅम्पस.. मुलाखती सुरू आहेत. कॉलेजमध्ये पत्रकारितेसाठी नोकरी घेऊन मोठमोठ्या जाहिरात कंपन्या, न्यूज चॅनलवाले प्लेसमेंटसाठी आल्या आहेत. माझी पण मुलाखत झालीय; पण माझं सिलेक्शन होणार नाही, खात्री आहे मला.”

“का? असं का वाटतं तुला?”

“कारण तेही चेहरे बघून अपॉइंटमेंट करत असतील ना? आणि माझा चेहरा त्यांना आवडणार नाही.”

“हम्म.. मग पुढे काय झालं?”

“मी म्हटलं ना? सगळे चेहरे बघून कामं करतात. दिसणं खूप महत्वाचं. माझी निवड झाली नाही.”

नंदिनी अस्वस्थ झाली. बंद पापण्यातूनही अश्रू वाहत होते. डॉक्टर नीरजा तिचं बोलणं नोटपॅडवर लिहून ठेवत होती. तिने दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली.

“नंदिनी, आता आपल्याला पुन्हा वर्तमानात यायचं आहे हं.. आता वीस वर्षाची आहेस.. दोन महिन्यापूर्वी.. आता आठ दिवसापूर्वी.. आणि आता माझ्या समोर आहेस. नंदिनी, आता तू शांतपणे हळुहळू तुझे डोळे उघडशील. शांत.. एकदम सावकाश.."

डॉक्टर नीरजा नंदिनीला पुन्हा पूर्वपदावर आणत होती. हळूहळू नंदिनी झोपेतून जागी होऊ लागली. तिने सावकाश डोळे उघडले आणि आजूबाजूला पाहिलं. समोर तिला डॉक्टर नीरजा उभी असलेली दिसली. खूप गाढ झोपेतून जागी झाल्यासारखी ताजीतवानी वाटत होती. तिला एकदम हलकं वाटत होतं. मनावरचा ताण हळूहळू ओसरू लागला होता. नीरजाने हलकेच तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली,

“रिलॅक्स नंदिनी.. आता कसं वाटतंय? ठीक आहेस ना?”

“हो डॉक्टर नीरजा.. खूप हलकं वाटतंय. शांत झोप झाल्यासारखं वाटतंय.”

नंदिनीने हसून उत्तर दिलं.

“ओके.. आता तू थोडं बाहेर बसतेस? मला थोडं युवराजशी बोलायचं आहे. त्याला आतमध्ये पाठवून देशील?”

“काय बोलायचंय? नीरजा, तू मला सांगू शकतेस. काहीही असेल तरी मी ऐकू शकते. त्यामुळे तू निर्धास्तपणे मला सांगू शकतेस. काय झालंय मला? एनीथिंग सिरीयस?”

“नो.. नो.. नॉट ऍटऑल. अगं, काही सिरीयस नाही. आणि एक लक्षात ठेव, तुला काहीही झालेलं नाहीये. फक्त तुझ्या मनाचा गुंता सोडवायचा आहे. आणि ते काम मी करेन. आता तू मला जे काही सांगितलंस त्यावर मला अभ्यास करावा लागेल आणि मगच आपल्याला ट्रीटमेंटला सुरुवात करावी लागेल. हो की नाही?”

डॉक्टर नीरजाच्या बोलण्यावर नंदिनीने मान डोलावली.

“पण मी काय सांगितलं तुला?”

तिने गोंधळून विचारलं. तिला काहीच आठवत नव्हतं.

“ते मी तुला नक्की सांगेन. आधी युवराजशी बोलून घेते आणि मग तुला सांगते. चालेल?”

नंदिनीने मान डोलावली. ती बाहेर जाण्यासाठी उठून उभी राहिली. तिने गोंधळून विचारलं,

“पण मी काय सांगितलं तुला? मी शुद्धीत नव्हते का? आणि मला पडणारी ती भयंकर स्वप्नं बंद होतील ना?”

“हो, हो.. शंभर टक्के.. तुला ती वाईट स्वप्नं पडणं नक्की बंद होईल. मी आहे ना?”

तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आणि ती त्या खोलीच्या बाहेर आली. युवराज बाहेरच बसला होता.

“युवी नीरजा तुला बोलवतेय.. तिला तुझ्याशी काही बोलायचंय. मी बसते इथे.”

“हो, मी आलोच.. मग सोबतच जाऊ..”

युवराज जागेवरून उठत तिच्याकडे पाहत म्हणाला. तिने होकार दर्शवला. तसा युवराज आत निघून गेला. नीरजा युवराजचीच वाट पाहत होती. तो आत येताच तिने त्याला बसायला सांगितलं.

“युवराज, मला तुझ्याशी नंदिनीच्या प्रकृतीविषयी बोलायचं आहे. त्याआधी मला तुला काही दाखवायचंय.”

असं म्हणत तिने युवराजला नंदिनीचं रेकॉर्डिंग दाखवलं. संपूर्ण रेकॉर्डिंग पाहिल्यानंतर नंदिनीचं बोलणं ऐकून तो अवाक झाला. तिच्या स्वतःबद्दलच्या भावना ऐकून त्याला काय बोलावं तेच समजेना. तिने युवराजकडे पाहत बोलायला सुरुवात केली.

“युवराज, तुझ्या लक्षात आलंच असेल की, नंदिनी कोणत्या भावनिक ट्रॉमातून जातेय. स्वतःविषयी किती नकारात्मकता भरलीय तिच्या मनात!”

“नीरजा.. मी नेहमी तिच्यासोबत असतो; पण मला कधीच वाटलं नाही की, ती असा विचार करत असेल.. स्वतःला ती इतकं कमी लेखत असेल. इतकी हुशार मुलगी आणि स्वतःबद्दल इतका न्यूनगंड मनात?”

तिच्या बोलण्यावर युवराज आश्चर्य व्यक्त करत म्हणाला.

“म्हणूनच आपल्याला तिच्यासाठी तिच्या मनातल्या न्यूनगंडतेवर काम करायचं आहे. तो तिच्या मनातला कॉम्प्लेक्स दूर करायचा आहे. युवराज, तू ऐकलंस ना? तिला वाटतंय, ती सुंदर नाहीये आणि त्यामुळे सर्वजण तिचा फक्त कामापुरता उपयोग करून घेतात आणि नंतर तिला सोडून देतात. आणि हे विचार तिच्या मनात खोलवर रुजलेत. त्यामुळेच कदाचित तिला त्या रेडलाईट एरियाची स्वप्नं पडत असतील. तिथल्या बायकांनाही तसंच कामापुरतं वापरून सोडून दिलं जातं. नंतर त्यांच्याकडे कोणी ढुंकूनही पाहत नाहीत म्हणून ती स्वप्नं तिचा पाठलाग करत असतील. ही भावना कमी झाली की आपोआप ती स्वप्न पडणं बंद होतील.”

नीरजा युवराजकडे पाहून म्हणाली.

“हं.. बरोबर आहे तुझं नीरजा.. तिच्या मनातला कॉमलेक्स दूर झाल्याशिवाय आणि स्वतःबद्दलचा आत्मविश्वास जागा झाल्याशिवाय नंदिनीला बरं वाटणार नाही. ती स्वप्नं पडणं थांबणार नाही.”

युवराजने नीरजाच्या बोलण्याला दुजोरा दिला.

“युवराज, त्यासाठी मला तुझी मदत लागेल. तुच तिच्या मनातला न्यूनगंड नाहीसा करू शकतो. त्यासाठी आपल्याला अजून काही सेशन घ्यावे लागतील. आपण असं करूया..”

नीरजा युवराजला काही सूचना देत होती. पुढे काय करायचं ते सांगत होती. युवराजही शांतपणे तिचं बोलणं ऐकत होता. थोडा वेळ तिच्याशी चर्चा करून त्याने नीरजाचा निरोप घेतला. तो केबिनच्या बाहेर आला. नंदिनी बाहेर त्याची वाट पाहत बसली होती. त्याला समोर पाहताच उठून उभी राहिली आणि त्याच्या जवळ येत तिने युवराजला विचारलं,

“युवी, काय झालं? काय म्हणाली नीरजा? टेन्शन घेण्यासारखं काही नाही ना?”

“काही नाही गं.. पुढच्या ट्रीटमेंटबद्दल बोलत होती. अजून काही सेशन आपल्याला करावे लागतील असं म्हणत होती. चल, आपण निघूया का? वाटेत तुला सांगतो सगळं..”

त्याने नंदिनीला उत्तर दिलं. नंदिनी आणि युवराज तिथून बाहेर पडले. दोघे कारमध्ये येऊन बसले. युवराजने गाडी स्टार्ट केली. गाडी तिच्या वेगाने घराच्या रस्त्यावर तिच्या वेगाने धावू लागली. युवराजच्या मनात नंदिनीचाच विचार घोळत होता.

“असा कसा विचार करू शकतेस तू नंदिनी? ज्या दिवशी मी तुला पहिल्यांदा कॉलेजमध्ये पाहिलं ना, त्याच दिवशी तू मला आवडली होतीस. तुला असं कसं वाटलं तू छान नाहीयेस.. तू खूप सुंदर आहेस गं.. कारण तुझं मन निर्मळ आहे. खूप खूप आवडतेस तू मला..”

युवराज स्वतःशीच पुटपुटला.

पुढे काय होईल? युवराज नंदिनीसमोर त्याचं प्रेम व्यक्त करू शकेल? नंदिनीचं काय उत्तर असेल? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©शिवप्रिया

🎭 Series Post

View all