Login

स्वप्नभूल.. भाग २०

स्वप्नभूल.. कथा एका रहस्याची..
स्वप्नभूल - भाग २०
© शिवप्रिया


त्याने नंदिनीकडे पाहिलं. ती कारच्या काचेतून बाहेर पाहत होती. गालावर येणारी तिची ती केसांची अवखळ बट तिच्या चेहऱ्यावर येऊन तिला उगाच त्रास देत होती. तिने अलगद केसांची बट कानामागे सारली. गुलाबी ओठांच्या पाकळ्या किती गोड दिसत होत्या. काजळ भरल्या काळ्याभोर डोळ्यांची ती मृगनयनी एखाद्या सोनपरी सारखी त्याला भासत होती. बोलताना मधेंच हसताना डोकावणाऱ्या पांढऱ्या शुभ्र दंतपंक्ती खूपच मोहक वाटत होत्या.

“किती गोड दिसते यार! आता मला शांत बसून चालणार नाही. लवकरच तिला माझ्या मनातल्या भावना कळायलाच हव्यात. माझं प्रेम तिला समजायलाच हवं. इतक्या लाघवी मुलीच्या प्रेमात कोण पडणार नाही! तिच्या मनातला कॉम्प्लेक्स घालवायचा असेल तर ती किती सुंदर आहे ही गोष्ट तिला कळायलाच हवी. मी तिच्या प्रेमात पडलोय हे तिला समजायलाच हवं. तिचा होकार असो किंवा नकार माहित नाही; पण मी लवकरच तिला माझ्या मनातल्या भावना सांगणारच.. पुढे जे होईल ते होईल..”

खरंतर युवराजच्या मनानं याआधीच कौल दिला होता आणि आज त्याने त्याच्या मनातलं प्रेम तिच्याजवळ व्यक्त करण्याचं ठरवलं होतं.

“युवी, आज ना फार हलकं वाटतंय बघ.. मनावर कुठलं तर ओझं ठेवलं होतं असं वाटत होतं; पण आता थोडं बरं वाटतंय.”

“चांगली गोष्ट आहे. अजून एक दोन सेशन नंतर तुला अजून बरं वाटेल बघ.”

नंदिनीच्या बोलण्यावर युवराज तिच्याकडे पाहत म्हणाला.

“ती भयानक स्वप्नं पडणं बंद होऊ देत बघ.. अजून काही नको मला..”

“होईल.. सगळं ठीक होईल नंदू.. आपण डॉक्टर नीरजाची मदत त्यासाठीच घेतोय. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना?”

“हे काय विचारणं झालं का युवी? हो आहे रे.. माझा तुझ्यावर स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे.”

तिने हसून त्याच्याकडे पाहिलं. गाडी एका कॅफेसमोर येऊन थांबली.

“चल कॉफी घेऊयात? मला तुझ्याशी थोडं बोलायचंय..”

युवराजच्या बोलण्यावर तिने मनगटावरच्या घड्याळात पाहिलं. संध्याकाळचे चार वाजत आले होते. कॉफीची वेळ झालीच होती. त्यामुळे तिनेही फार हरकत न घेता होकारार्थी मान डोलावली. त्याने गाडी कॅफेच्या पार्किंगमध्ये पार्क केली आणि ते दोघे आत गेले. कोपऱ्यातल्या एका टेबलवर जाऊन बसले.

“कॉफीच्या व्यतिरिक्त काय ऑर्डर करू? तुच सांग..”

मेन्यूकार्ड पुढे सरकवत नंदिनीला प्रश्न केला.

“माझ्यासाठी फक्त कॉफीच सांग. मला दुसरं काही नकोय.”

युवराजने वेटरला आवाज दिला.

“एक गार्लिक सॅन्डविच आणि दोन कॉफी..”

वेटर ऑर्डर घेऊन तिथून निघून गेला आणि थोड्याच वेळात कॉफी आणि सँडविच घेऊन टेबलवर ठेऊन निघून गेला. सॅन्डविच डिश तिच्या पुढे सरकत युवराज म्हणाला,

“नंदू घे ना..”

“नको अरे.. मला भूक नाहीये..”

कॉफीचा एक घोट घेत ती म्हणाली.

“आता बोलावं का हिला? हीच योग्य वेळ आहे. आजवर मी तिला कधी सांगू शकलो नाही; पण आता सांगायला हवं.”

“तो स्वतःशीच पुटपुटला.

“नंदू,एक गोष्ट सांगू?”

युवराजने नंदिनीकडे एक कटाक्ष टाकत तिला विचारलं. तिने होकारार्थी मान डोलावली.

“तू खूप सुंदर दिसतेस.”

त्याचं वाक्य पूर्ण होतं न होतं तोच नंदिनी मोठ्याने खो खो हसू लागली. कसंबसं आपलं हसू आवरत ती म्हणाली.

“काहीही युवी! हे काय नवीन आता? चेष्टा करायला सकाळपासून कोणी भेटलं नाही का तुला?”

ती पुन्हा तोंडावर हात ठेवून हसू लागली.

“अगं, खरंच नंदू.. मी मस्करी करत नाहीये. तू खरंच खूप सुंदर आहेस..”

त्याच्या बोलण्यावर ती शांत झाली. युवराज तिच्याकडे पाहून बोलत होता.

“तू इतकी गोड आहेस ना नंदू, इतकी गोड मुलगी मी याआधी कधीच पाहिली नाही. तुझं वागणं, बोलणं सर्वांनाच प्रभावित करतं. तुझ्या मनातलं इतरांविषयी असलेली कणव पाहून मला तुझं फार कौतुक वाटतं बघ..”

त्याच्या बोलण्याने तिला चेहऱ्यावर हसू उमललं होतं. लाजेची लाली पसरली.

“नंदू, मी जेंव्हा तुला कॉलेजमध्ये पहिल्यांदा पाहिलं होतं ना.. पाहतच राहिलो होतो. साध्या पंजाबी ड्रेसमध्येही तुझं रूप किती खुलून दिसत होतं! रोज सकाळी कॉलेजला आल्यावर माझी नजर तुला शोधत असायची. मी तुझी वाट पाहायचो. तुला आठवतोय, तो राजा.. रॅगिंग.. तेंव्हाही त्या घाबरलेल्या, गोंधळलेला अवस्थेतही कसली गोड दिसत होतीस तू!”

राजाचं नाव ऐकताच ती शहारली. रॅगिंग शब्द ऐकून ती थरथरली. हातातला कॉफीचा कप निसटतोय की काय असं तिला वाटलं. तिचे डोळे पाण्याने डबडबले. सारं चित्र डोळ्यासमोर तरळू लागलं. तिने डोळ्यातलं आणि आवरण्याचा खूप प्रयत्न केला पण अखेर आसवांनी घात केलाच.

“कधी कधी आपल्या भूतकाळाची सावली आपला सारा वर्तमान झाकाळून टाकते.”

तिच्या तोंडातून आपसूक शब्द बाहेर पडले.

“म्हणजे?”

त्याने प्रश्न केला.

“काही नाही सोड.. तू काय म्हणत होतास?”

नंदिनीने विषय बदलला.

“नंदू, विषय बदलू नकोस.. भूतकाळ कितीही वाईट असला तरी तुझ्या वर्तमानात आणि भविष्यातही मीच असणार आहे. भूतकाळाच्या सावलीने तुझा वर्तमान मी कधीच झाकोळू देणार नाही.”

तो निक्षुन म्हणाला.

“बरं सॉरी.. चुकलं माझं.. आता तरी सांगशील काय बोलणार होतास ते?”

तिच्या वाक्यावर तो खळखळून हसला.

“आज मला तुझ्यासमोर एक गोष्ट कबूल करायची आहे.. म्हणजे खरंतर खूप आधीच सांगणार होतो पण माझा धीरच झाला नाही. आज तुला सगळं सांगणार आहे..”

कपाळावरचा घाम पुसत त्याने बोलायला सुरुवात केली.

“नंदू, तू मला खूप आवडतेस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू नंदू.. लव्ह यू सो मच यार ..”

एका दमात त्याने बोलून टाकलं. टेबलवरच्या ग्लासमधलं पाणी गटागट पिऊन संपवून टाकलं. नंदिनी अवाक होऊन त्याच्याकडे पाहतच राहिली. काय बोलावं तिला समजेना. क्षणभर थांबून स्वतःला सावरत तिने बोलायला सुरुवात केली.

“युवी, हे काय बोलतोयस तू? तुला याआधीही सांगितलं होतं, मी असं काही करणार नाही. आमच्या आबांनी मोठ्या विश्वासानी मला शहरात शिकायला पाठवलं. असं प्रेम प्रकरण करण्यासाठी नाही. प्लिज तू हे सगळं डोक्यातून काढून टाक. आपल्यात जी छान मैत्री आहे ती तशीच राहू देत. उगीच तू काहीही नातं जोडायला जाऊ नकोस प्लिज..”

“हे बघ नंदू, मला तुझ्या उत्तराची मुळीच घाई नाही. तू नीट विचार करून उत्तर दे. सी नंदू, मला तुझ्याशी तू म्हणतेस तसं प्रेमप्रकरण करायचं नाहीये. मला तुला माझी आयुष्याची जोडीदारीण बनवायचं आहे. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. आयुष्यभर तुझ्यासोबत राहायचं आहे. मी कॉलेजच्या तुझ्या पहिल्या दिवसापासून तुझ्यावर प्रेम करतोय आणि आता तुझ्याशी लग्न करायचं आहे. मी माझ्या आईबाबांना सांगून तुझ्या घरी येऊन तुला लग्नासाठी रीतसर मागणी घालणारच आहे; पण त्याआधी मला तुझं मत जास्त महत्वाचं आहे.. तुला माझ्याबद्दल प्रेम वाटणं जास्त गरजेचं आहे. तुझ्या मनाविरुद्ध मला काहीही करायचं नाही. तू तुझं उत्तर देण्याची अजिबात घाई करू नकोस. आणि जरी तुझं उत्तर नाही असेल तरी काही हरकत नाही. आपल्या मैत्रीत तसुभरही बदल होणार नाही. मी कायम मित्र बनून तुझ्यासोबत असेन. त्याबद्दल तू मनात मुळीच शंका बाळगू नकोस. वुई आर बेस्ट फ्रेंड्स फॉरेव्हर.. समजलं?”

युवराजचं बोलणं ऐकून नंदिनीला खूप आश्चर्य वाटत होतं. आज वेगळ्याच युवराजशी तिची ओळख होत होती. युवराजलाही खूप हलकं वाटत होतं.

“काय पाहतेय मी हे? आज युवराजने मला प्रपोज केलं? कमाल आहे! काय दिसलं त्याला माझ्यात? एका खेडूत मुलीत? कॉलेजमध्ये असताना इतक्या सूंदर सुंदर मुली त्याच्या एका नजरेसाठी तरसत होत्या. त्यांना सोडून गार्गी म्हणते तसं माझ्यासारख्या बहनजी टाईप मुलीमध्ये त्याला इतका इंटरेस्ट का? तो मला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तरी नाहीये ना? मला फसवत तर नाहीये ना? मी असा कसा त्याच्यावर विश्वास ठेवू?”

नंदिनीने युवराजकडे पाहिलं. तो शांतपणे कॉफीचा आस्वाद घेत होता. वाऱ्याने त्याचे सिल्की केस भुरभूरत होते. धारदार नाक, ओठांवर मिशीची महिरप त्याच्या रुबाबात भर टाकत होती. इतके दिवस एक मित्र म्हणून वावरणारा तिचा युवी आज वेगळ्याच भूमिकेत शिरू पाहत होता. कॉलेजमध्ये असताना त्याने कधीच त्याचं मन इतरांसमोर व्यक्त केलं नव्हतं. कॉलेज संपल्यावर, नोकरी लागल्यावर नीट सेटल झाल्यावर त्याने तिला प्रपोज केलं होतं. युवराजचं हे वेगळं रूप तिलाही मनापासून आवडलं होतं.

पुढे काय होईल? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©शिवप्रिया


0

🎭 Series Post

View all