स्वप्नभूल - भाग ८
© शिवप्रिया
© शिवप्रिया
“चल रे.. काहीही काय सांगतोस तिला! उगीच तिला घाबरवून सोडू नकोस.. आधीच राजाने तिला घाबरवलंय, तू नको त्यात भर टाकू..”
शाल्मली त्याला मधेच अडवत हसून म्हणाली.
“चल नंदिनी, तुला आम्ही तुझ्या क्लारूमपर्यंत सोडतो.”
शेखर नंदिनीकडे पाहून म्हणाला आणि ते सर्वजण वर्गाच्या दिशेने जाऊ लागली.
ही नंदिनी आणि युवराजची पहिली भेट.. पहिल्याच भेटीत ती त्याला फार आवडली होती. गोड हसरी सकाळ जशी.. सुखाची श्रावणसर जशी.. हळूहळू नंदिनी पुण्यातल्या शहरी वातावरणात रूळली. हळूहळू तिची कॉलेजमधल्या इतर मुलांशी ओळख झाली. युवराज, शाल्मली आणि शेखर हे तर अगदी जिवाभावाचे मित्र झाले. त्यांच्याशिवाय तिचं पानच हलेनासं झालं. एका नवीन विश्वात वावरताना युवराज सावलीसारखा तिच्यासोबत होता. तिचं सुरक्षाकवच बनून कायम तिचं रक्षण करायचा. तिच्या अभ्यासात तिची मदत करत होता. नंदिनीची काळजी घेता घेता तो कधी तिच्या प्रेमात पडला हे त्यालाच समजलं नाही. युवराजच्या मनात नंदिनीने नकळतपणे आपली खास जागा केली. तिचं गोड दिसणं, मधाळ हसणं, लाघवी बोलणं, सर्वांची काळजी घेणं त्याला फार आवडू लागलं. युवराज नंदिनीच्या प्रेमात पडला होता; पण त्याने कधीच तिला बोलून दाखवलं नव्हतं. शेखरला मात्र युवराजची मनाची होणारी तडफड समजत होती. एक दिवस शेखरने युवराजला विचारलं,
“युवी, तुला नंदिनी आवडते ना?”
युवराजने लाजून मान खाली घातली. त्याच्या चेहऱ्यावर किंचित हसू उमटलं.
“अरे, मग ते तिला बोलून का दाखवत नाहीस? तुझ्या मनातलं प्रेम मनातच राहिलं तर काय उपयोग? तिला तुझ्या भावना कधीच कळणार नाही. हवंतर तुझी काही हरकत नसेल तर मी तिच्याशी बोलतो.”
शेखर युवराजच्या काळजीने म्हणाला.
“नाही.. नको यार.. ती मला तिचा खूप जवळचा मित्र समजतेय इतकंच पुरेसं आहे. मी तिला प्रपोज केलं तर उगीच ती दुखावली जाईल. आता आहे ती मैत्रीही तोडून टाकेल. मग काय करायचं? त्यापेक्षा आहे ते ठीक आहे.”
युवराजने हसून उत्तर दिलं.
“अरे, पण कशावरून असंच होईल? कदाचित तिलाही तुझ्याविषयी प्रेम वाटत असेल. विचारायला काय हरकत आहे. बोलल्याशिवाय तुझ्या मनातली भावना तिला कशी कळेल? आणि मला सांग, ती दुखावली जाईल असं का वाटतं तुला?”
शेखरच्या प्रश्नावर युवराज दीर्घ श्वास घेत म्हणाला,
“कारण नंदिनी एक दिवस मला म्हणाली होती.”
“काय?”
शेखरच्या प्रश्नावर युवराज भूतकाळात गेला. त्याला नंदिनीचं बोलणं आठवू लागलं. एकदा युवराजने सहजच नंदिनीला विचारलं,
“नंदू, एक गोष्ट विचारू?”
तिने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं.
“तुला कधी कोणी आवडलंय? मीन्स बॉयफ्रेंड वगैरे?”
युवराजचं वाक्य पूर्ण होण्याआधीच नंदिनी खो खो हसू लागली.
“अरे बाबा, मी कोल्हापुराहून आलेय. माझे बाबा सयाजीराव कोंडे देशमुख, स्वतःपेक्षा स्वतःच्या इभ्रतीला जास्त जपतात. तुमच्या पुणे मुंबईतल्या शहरी वातावरणासारखं नसतं बाबा आमच्याकडे. गावाकडच्या मुली आम्ही, असले चोचले करायला परवानगी नसते आणि माझे बंधुराज, समरजीतला अजून तू पाहिलं नाहीस, त्यांना जर आमच्याबद्दल असलं काही समजलं तर जीव घेतील ते माझा.. ”
“म्हणजे भावाला घाबरतेस म्हणून बॉयफ्रेंड नाहीये का?
नंदिनीच्या बोलण्यावर युवराजने मिश्किलपणे प्रश्न केला.
“अगदीच तसं नाहीये; पण मी कोल्हापूरहून इथे पुण्यात आले. माझ्या घरचं वातावरण थोडं जुन्या विचारांचं आहे. आमच्याकडे मुलींसाठी काही वेगळे नियम आहेत. आणि माझीही काही तत्वे आहेत. मी ते नियम मोडणार नाही. माझ्या तत्वांना मी मुरड घालणार नाही. माझा पुण्यात राहण्याचा उद्धेश खूप स्पष्ट आहे. मी फक्त शिकण्यासाठी, माझं करियर करण्यासाठी इथे राहतेय. आणि युवी, माझ्या आबांनी मला मोठया विश्वासाने एकटीला इथे पुण्यात पाठवलंय, त्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाहीये. मी असं कोणतंही काम करणार नाही. सो हे बॉयफ्रेंड, प्रेम वगैरे आपल्या हिशोबात बसत नाही. त्यापासून लांब राहिलेलंच बरं..”
युवराजला तो प्रसंग जशाचा तसा डोळ्यासमोर उभा राहिला. शेखरला जेंव्हा त्याने याविषयी सांगितलं तेंव्हा त्याचा स्वर जड झाला होता. डोळे ओले झाले होते. त्यानंतर मात्र शेखरने पुन्हा कधी युवराजसमोर हा विषय काढला नव्हता. सर्वजण आपापल्या अभ्यासाला लागले होते. नंदिनीनेही संपूर्ण लक्ष तिच्या अभ्यासावर केंद्रित केलं होतं. नंदिनी मन लावून अभ्यास करत होती आणि पुढच्या वर्गात जात होती. अधूनमधून सयाजीराव आणि सुमित्राबाई भेटायला येत असत. तिची ख्वालीखुशाली कॉलवरून विचारत असत. समरजीत वरचेवर तिला सूचना देत असे. सारं सुरळीत चाललं होतं. कधी कधी राजा आणि त्याची टोळी तिला त्रास देण्याचा प्रयत्न करायची; पण प्रत्येकवेळी युवराज तिच्या मदतीला धावून यायचा. नंदिनीला त्याचा खूप आधार वाटायचा; पण नंदिनी राजाला प्रचंड घाबरायची. तिला राजाला इतकं घाबरलेलं पाहून युवराज तिला चिडवायचा.
“नंदू, अगं तू जर्नलिझमचा कोर्स करतेय. एक दोन वर्षात पत्रकार म्हणून कामही पाहशील. मग त्या राजाला इतकी काय घाबरते? कॉलेजमधल्या एका साध्या गुंडाला घाबरलीस तर पुढे मोठमोठ्या गुंडाशी कशी दोन हात करशील की, अशीच भित्री भागुबाईसारखी माझ्या मागे लपत राहशील? मी तुझ्यासोबत असेनच गं; पण कधी नसलो तर काय करशील? तुला स्ट्रॉंग व्हावं लागेल नंदू.. तुझा हा बुजरेपणा जायला हवा.”
“हो जाईल रे.. एकदा का पाण्यात पडलं की, आपोआप पोहता येतं. तसंच मीही शिकेन ना.. आणि तू का नसशील? तू कायम माझ्यासोबत असणार आहे. तू कधीच मला सोडून जाणार नाही. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. समजलं?”
नंदिनी युवराजला हसून उत्तर द्यायची. तिच्या उत्तराने युवराज सुखावला जायचा. तिचं असं लाघवी बोलणं फार आवडायचं. युवराज फार कमी वेळात नंदिनीचा जिवलग मित्र झाला.
बघता बघता कॉलेजची दोन वर्षे कधी निघून गेली नंदिनीला समजलंच नाही. युवराज आता बीजीच्या शेवटच्या वर्षाला होता. शेवटचं वर्ष होतं. कॅम्पसकडून मोठमोठ्या प्रेस, न्यूज चॅनल्स योग्य मुलांना नोकरी मुलाखती घेण्यासाठी येत होत्या. चांगल्या भावी रिपोर्टर्सची निवड करत होत्या. युवराजही मुलाखत देत होता. ‘दैनिक नवप्रभा’ वृत्तपत्राने युवराजची निवड केली. कला आणि क्रीडा या दोन क्षेत्रात तो त्याच्या पत्रकारितेच्या गुणांची चुणूक दाखवणार होता. पुढे नंदिनीही चांगल्या गुणांनी पदवीधर झाली. नंदिनीला प्रचंड आनंद झाला होता. पत्रकार होण्याचं तिचं स्वप्न पूर्ण झालं होतं. पदवीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर तिने आनंदाने घरी फोन केला आणि तिच्या शेवटच्या पदवीची परीक्षा उत्तीर्ण होण्याची बातमी सयाजीरावांना दिली.
“हॅलो, आबा मी पदवीची परीक्षा पास झाले. आबा मी आता पत्रकार होऊ शकते. माझं स्वप्न पूर्ण झालं आबा..”
लेकीचं स्वप्न पूर्ण झालेलं पाहून सयाजीरावांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते.
“अभिनंदन पोरी.. आमास्नी लई आनंद झालाय. एकदम झ्याक झालं बगा.. आवं सरकार, पोर तुमची पास झाली.. गोडधोड करा.. समरजीत.. ओ समरजीत.. ”
सयाजीरावांचा आनंद ओसंडून वाहत होता की, त्यांना फोन सुरू असल्याचं भानच राहिलं नाही. इतक्यात सुमित्राबाई आत येत म्हणाल्या,
“अरे व्वा! ह्ये भारी झालं. पोरीला तिला हवं तसं शिकाय मिळालं. आता ये म्हणावं.. लगीन कराय पायजेल ना अवंदा! बोलवून घ्या तिला..”
फोन सुरू असल्याने नंदिनीला सुमित्राबाईंचं बोलणं ऐकू आलं. ती उदास झाली. तरी स्वतःला सावरत ती आबांना म्हणाली,
“आबा, ओ आबा.. फोन चालू आहे. माझं ऐकून तर घ्या.. ”
“अरे खरंच की.. बोला.. बोला.. ”
सयाजीराव हसून म्हणाले.
“आबा, तुम्ही माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्यात. माझ्यावर विश्वास ठेवून मला घरापासून दूर शिकायला पाठवलंत. मी शिकले. पदवीधर झाले. सगळं मनासारखं होतंय. मला खरंच आनंद आणि अभिमान वाटतोय की, हे सगळं फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच घडू शकलं. आबा, माझी अजून एक इच्छा पूर्ण करू शकाल? प्लिज फक्त एकदा..”
नंदिनी काकुळतीला येऊन म्हणाली.
“बोला.. अजून काय पायजे तुमास्नी? आमच्या पोरीला आमी काय बी कमी पडू द्यायचो नाय. बोला तुम्ही..”
आबांनी तिला विचारलं.
“आबा, मला अजून एक वर्ष इथे पुण्यात राहायचंय. मला पत्रकार म्हणून काम करायचंय. प्लिज आबा, तुम्ही आईसाहेबांना समजवून सांगा ना.. एक वर्षानी मी घरी आल्यावर तुम्ही सांगाल त्या मुलाशी लग्न करेन. फक्त एक वर्ष मला मनासारखं जगू द्या आबा प्लिज..”
पुढे काय होईल? आबासाहेब नंदिनीला परवानगी देतील? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©शिवप्रिया
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा