स्वप्नभूल - भाग ९
© शिवप्रिया
नंदिनी व्याकुळ होत म्हणाली. क्षणभर शांतता पसरली. पलीकडून काहीच आवाज येत नव्हता.
“आबा, आहात ना? माझा आवाज येतोय ना? आबा, बोला ना प्लिज..”
सयाजीराव काहीच बोलत नाही म्हटल्यावर नंदिनीने घाबरून विचारलं.
“हं.. ऐकतोय तुमचं.. अजून एक वरीस म्हंता. पर तुमच्या आईसाहेब?”
सयाजीराव सुमित्राबाईंकडे पाहत म्हणाले.
“प्लिज आबा, एवढ्या वेळेस तुम्ही आईसाहेबांना समजावून सांगा.. पुन्हा मी तुम्हाला काहीच मागणार नाही. ज्यासाठी मी पत्रकार होण्याचा निर्णय घेतला, हे क्षेत्र निवडलं ते काम मला करू द्या. माझ्या पत्रकारितेतून कितीतरी पीडित महिलांचे प्रश्न सर्वांसमोर येतील. माझ्या लेखणी त्यांचा आवाज बनेल. प्लिज आबा..”
नंदिनी खूप मनापासून आर्जवे करत होती. तिच्या बोलण्यातून तिला समाजासाठी, पीडित स्त्रियांसाठी काहीतरी करण्याची तळमळ स्पष्टपणे जाणवत होती. अखेर सयाजीरावांना नंदिनीचं म्हणणं पटलं आणि त्यांनी तिला अजून एक वर्ष पुण्यात राहण्याची परवानगी दिली.
“ठीक आहे.. होऊन जाऊ द्या तुमच्याबी मनासारखं. पर फकस्त एक वरीस.. पुन्हा मग तुमास्नी लगीन करून तुमच्या घरी जावं लागलं. लगीन झाल्यावर तुमच्या धन्यास्नी जर तुमचं काम मंजूर आसल आन त्यांनी तुमास्नी परवानगी दिली तर तुमी पुढंबी तुमचं काम करू शकता. आमची कायबी हरकत नाय.. ऱ्हा तुमी आन सवताची काळजी घ्या. तुमची मैतरीन त्रिशा हाय नव्हं? त्यास्नी धरून ऱ्हावा. आमास्नी फोन करत ऱ्हावा. खुशाली कळवत ऱ्हावा. काय बी लागलं तर बिन्दास्त सांगा. कळतंय नव्हं?”
सयाजीरावांनी नंदिनीला अजून एक वर्ष पुण्यात राहण्याची परवानगी दिली. नंदिनीला खूप आनंद झाला.
“थँक्यू आबा.. थँक्यू सो मच. तुम्हाला कल्पना नाही आबा, तुम्ही मला इथे राहण्याची परवानगी देऊन मला किती मोठा आनंद दिलाय ते.. मला कळत नाहीये तुमचे आभार कसे मानू! आबा, तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही फक्त कामासाठी थांबलोय. काम पूर्ण झालं की आम्ही लगेच परत कोल्हापूरला येऊ.. पुन्हा एकदा थँक्यू..”
नंदिनी आनंदाने म्हणाली. त्यानंतर थोडा वेळ बोलून तिने कॉल कट केला आणि ही आनंदाची बातमी युवराजला सांगण्यासाठी त्याला कॉल केला. समोरून हॅलो म्हणताच नंदिनीने बोलायला सुरुवात केली.
“युवी, आज मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू! अरे, आबांनी मला अजून एक वर्ष राहण्याची परवानगी दिलीय.”
“अरे व्वा नंदू! मस्तच.. ही तर खरंच खूप आनंदाची बातमी आहे. आबांनी तुला अजून एक वर्ष राहण्याची परवानगी दिली. आता तुला निदान एक वर्षतरी तुझ्या भवितव्याचा, करियरचा विचार करता येईल. तुला नोकरी करता येईल. एक नवा अनुभव घेता येईल. नाहीतर मला वाटलं होतं की, आता काय कॉलेज संपलं मग तू तुझ्या घरी जाशील. परत आपली भेट कधी होईल? बोलणं तरी होईल का? पण तू आता इथेच असणार आहेस म्हटल्यावर जीवाला थोडी शांतता मिळाली.”
“म्हणजे?”
“काही नाही सोड..”
युवराज हसून म्हणाला.
“आता मला माझं काम करता येईल. युवी, एवढी एकच संधी माझ्या हातात आहे आणि त्या संधीचं मला सोनं करायचंय बघ. तू माझ्या सोबत आहेस ना? हे एक वर्ष मला माझ्या मनासारखं जगायचंय. जे जे मी माझ्या करियरच्या दृष्टीने करायचं ठरवलं होतं, ते सगळं करायचंय. पुढे आयुष्यात काय होईल माहित नाही पण आता मला मनसोक्त जगायचंय.. भविष्याची फार भीती वाटते बघ.. भूतकाळाचं सावट सोबत घेऊन वर्तमानात जगताना भविष्यात काय वाढून ठेवलंय देव जाणे!”
नंदिनीच्या चेहऱ्यावर चिंतेची काजळी पसरली. सयाजीरावांच्या परवानगीने नंदिनी अजून एक वर्ष पुण्यात राहणार होती. युवराजने तिला त्याच्याच दैनिक नवप्रभा या वर्तमानपत्राच्या कार्यालयात वरिष्ठांशी बोलून असिस्टंट म्हणून रुजू केलं. सुरुवातीला नंदिनी बुजलेली असायची; पण कालांतराने ती सर्वांत मिसळू लागली. दैनिक नवप्रभाच्या वर्तमानपत्रात स्तंभलेखन करू लागली. आता तिला तिच्या कामात रस वाटू लागला. नंदिनीने स्वतःला पत्रकारितेच्या कार्यात झोकून दिलं. हळूहळू तिच्या कामात तिचा आत्मविश्वास झळकू लागला. वरिष्ठांनीही तिच्या कामाची दखल घेतली आणि तिला बेस्ट एम्प्लॉयीचा पुरस्कार देऊन तिचं कौतुक केलं. त्यानंतर तर नंदिनी अजूनच जीव ओतून काम करू लागली.
सगळं काही सुरळीत चालू असताना आता नंदिनीला एका वेगळ्याच संकटानी घेरलं होतं. ती प्रचंड घाबरून युवराजला सगळं सांगत होती. तिचा भेदरलेला चेहरा पाहून सारा घटनाक्रम एखाद्या चित्रफितीसारखा डोळ्यासमोरून तरळून गेला.
“आजही नंदुच्या चेहऱ्यावर तसंच भीतीचं सावट पसरलंय. डोळ्यातलं पाणी भीती, दुःख, चीड,राग सगळ्याच भावना व्यक्त करताहेत.. तिला नक्कीच खूप त्रास होतोय. आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल.”
“आजही नंदुच्या चेहऱ्यावर तसंच भीतीचं सावट पसरलंय. डोळ्यातलं पाणी भीती, दुःख, चीड,राग सगळ्याच भावना व्यक्त करताहेत.. तिला नक्कीच खूप त्रास होतोय. आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल.”
एकीकडे युवराजच्या मनात स्वतःशीच संवाद सुरू होता आणि दुसरीकडे मात्र तिच्याकडे पाहत तो शांतपणे तिचं बोलणं ऐकत होता; तिच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत होता. नंदिनीचं सर्व बोलणं ऐकून घेतल्यानंतर युवराजने बोलायला सुरुवात केली.
“हे बघ नंदू, एकंदरीत तुझं सारं ऐकून घेतल्यावर मला असं वाटतंय की, सर्वांत आधी ही स्वप्नं तुला का पडताहेत या गोष्टीचा मागोवा आपण घेतला पाहिजे. त्या स्वप्नांचा अर्थ शोधणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला काही काळासाठी का असेना; पण एखाद्या मानसोपचारतज्ञाची मदत घेणं गरजेचं आहे. का कोणास ठाऊक! पण मला असं वाटतंय की, काहीतरी असं आहे ज्याचा अर्थ आपल्याला लागत नाही. कदाचित तुझ्या सुप्त मनात दडून राहिलेल्या काही गोष्टीं, काही आठवणी.. माहित नाही काय आहे; पण नक्कीच काहीतरी आहे आणि ते शोधण्यात एक मानसोपचारतज्ञच आपल्याला मदत करू शकेल. माझ्या ओळखीचे एक मानसोपचारतज्ञ आहेत. मी आधीच त्यांच्याशी बोलून घेतलं आहे. त्यांचं नाव ‘डॉ. नीरजा सोहनी’ आहे. मी आता साडेबाराची अपॉइंटमेंट घेतलीय..”
“व्हॉट नॉन्सेन्स युवी! तू हे काय बोलतोयस? मला सायकोलॉजिस्टची गरज आहे? वेडी झालीय का मी? काहीही काय!”
नंदिनी काहीशी चिडून म्हणाली.
“अगं असं काय बोलतेस? जे कोणी मानसोपचारतज्ञाची मदत घेतात, ते सगळे वेडे असतात का? एवढी शिकली सवरलेली तू आणि असा विचार करतेस? नंदू, जसं आपल्याला काही शारीरिक व्याधी होतात. शरीराला जखमा होतात, आपण आजारी पडतो तेंव्हा आपण डॉक्टरांची मदत घेतोच ना? त्यावर उपाययोजना करतोच ना? मनाचंही अगदी तसंच असतं. कधीकधी काही जुन्या गोष्टी आपल्या सुप्त मनात घर करून राहतात. काही जखमा, वेदना आपल्याला त्रास देत राहतात. मग मन दुःखीकष्टी होतं. चिडचिड होते. राग येतो. मनलाही आजार होऊ शकतो हे आपण मान्य का करत नाही हेच समजत नाही मला.. नंदू, सायकोलॉजिस्टची गरज पडणं चुकीचं नाहीये. प्रत्येकालाच वयाच्या एका टप्प्यावर मनाच्या डॉक्टरांची गरज पडते. प्रत्येकाला कोणीतरी आपल्याशी बोलण्याची, काउन्सलिंग करण्याची गरज असते. आपल्या मनात दडलेल्या सुप्त भावनांना बाहेर काढणं गरजेचं आहे आणि म्हणूनच त्यासाठी आपल्याला सायकोलॉजिस्टची मदत लागणार आहे. एक काम करू, आज आपण त्यांना भेटू आणि तुला जर योग्य वाटलं तरच पुढे जाऊ.. तुला लवकरात लवकर बरं वाटावं इतकीच माझी इच्छा आहे; पण तुला आवडणार नसेल तर तुझ्या मनाविरुद्ध मला काहीच करायचं नाही.”
युवराज नंदिनीकडे पाहत म्हणाला. त्याच्या बोलण्यावर नंदिनी विचार करू लागली.
“तसं पाहिलं तर युवी सगळंच चुकीचं बोलतोय असं नाही ना! त्या स्वप्नांचा त्रास तर होतोय. त्या गोष्टींचा अर्थ समजायला हवा. सायकोलॉजिस्टच्या मदतीने जर माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार असतील तर काय हरकत आहे? मला जर आराम पडणार असेल तर उपाय करून पाहण्यात काही चुक नाही. एकदा जाऊन बघू.. पटलं तर ती उपचारपद्धती चालू ठेवू नाहीतर बंद करू.. मला बरं वाटण्यासाठी काहीच न करण्यापेक्षा मी थोडा फार प्रयत्न केला तर निदान माझं मला समाधान तरी मिळेल. युवी म्हणतो तर त्याचं ऐकूया एकदा जाऊन पाहूया..”
नंदू, कसला विचार करतेस? जाऊया ना?”
पुढे काय होईल? नंदिनी युवराजसोबत जाईल का? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©शिवप्रिया
©शिवप्रिया
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा