Login

स्वप्नभूल.. भाग १६

स्वप्नभूल.. कथा एका रहस्याची..
स्वप्नभूल - भाग १६
© शिवप्रिया


“हॅलो, बोल गार्गी.. इथल्या इथे ऑफिसमध्ये काय मोबाईलवर कॉल करतेस? इंटरकॉमवर करायचा नं.. वेडी आहेस का?”

“दोनदा तुझ्या इंटरकॉमवरच कॉल केला होता; पण सारखा बिझी लागतोय म्हणून मग डायरेक्ट मोबाईलवरच केला.”

युवराजचं लक्ष टेबलवरच्या फोनकडे गेलं. फोनचा रिसिव्हर नीट ठेवला नव्हता त्यामुळे फोन बिझी येत होता. त्याने पटकन फोनचा रिसिव्हर नीट ठेवला. मोबाईलवरचा कॉल कट करून गार्गीला इंटरकॉमवरून कॉल केला आणि तिच्याशी बोलायला सुरुवात केली.

“हं बोल.. काय काम आहे? पटकन बोल मी कामात आहे..”

टेबलवरची फाईल उलगडत युवराज म्हणाला.

“एवढी काय घाई असते रे तुला? माझ्याशी बोलायला तुला अजिबात वेळ नसतो; पण ऑफिसमध्ये इतर मुलींशी बोलताना मात्र अजिबात थकत नाहीस. कमाल आहे तुझी!”

गार्गी किंचित चिडून म्हणाली.

“तू, तुझं काम काय आहे ते बोल.. टाईमपास करायला फोन केला असशील तर मी फोन ठेवतो. मला फालतू गप्पा मारायला वेळ नाहीये. समजलं?”

“हो समजलं.. तसंही मला तुझ्याशी बोलायची काही हौस नाहीये. सरांनी तुला बोलावलंय. ते त्यांच्या केबिनमध्ये आहेत. मी तिथे होते म्हणून त्यांनी मला तुला बोलवायला सांगितलं. त्यात काय इतकं चिडण्यासारखं?”

“ओके ठीक आहे.. मी बोलतो त्यांच्याशी..”

असं म्हणून त्याने रिसिव्हर फोनवर जोरात आदळला. पलीकडे कानाला लावलेला फोनचा रिसिव्हर खाली ठेवत आश्चर्याने पुटपुटली,

“कसला खडूस आहे हा! डायरेक्ट फोन आपटला?”

युवराज तडक सरांच्या केबिनमध्ये गेला. केबिनच्या दारावर टकटक केली.

“मे आय कम ईन सर?”

“अरे ये.. ये युवराज..”

युवराज आत येताच सरांनी त्याला खुणेनेच समोरच्या खुर्चीत बसायला सांगितलं आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली.

“युवराज, मी तुला ‘बोरीवलीतल्या एका बेकायदेशीर डान्सबार स्टिंग ऑपेशनवर अपॉइंट करतोय. असं समजलंय की, बोरीवलीत काही ठिकाणी बेकायदेशीर डान्स बार अजूनही सुरू आहेत. तसे पुरावे गोळा कर. एक धमाकेदार बातमी तयार होईल. तुझ्या मदतीला नंदिनीला घे. समजलं? लाग कामाला..”

“हो सर.. लगेच कामाला सुरुवात करतो..”

असं म्हणत युवराज जागेवरून उठला आणि केबिनच्या बाहेर आला.

“नंदिनीला कॉल करावा का? ती आधीच तिच्या प्रॉब्लेममध्ये आहे. अजून हा कामाचा त्रास.. काय करावं? पण सरांचा निरोप तिला सांगायला तर हवा.”

युवराजने थोडा विचार करून नंदिनीला कॉल केला. नंदिनीच्या मोबाईल स्क्रीनवर युवराजचं नाव झळकलं. तिने पटकन कॉल घेतला.

“हॅलो युवी.. ”

“हाय नंदू, कशी आहेस तू? आज ऑफिसलाही आली नाहीस. काय झालं? तब्येत तर ठीक आहे नां?”

“हो रे युवी, थोडं डोकं दुखत होतं. पण आता ठीक आहे.”

नंदिनीने उत्तर दिलं.

“औषधं घेतलीस ना?”

“हो.. पण तू कॉल कशासाठी केला होतास? ऑफिसमध्ये सगळं ठीक आहे नां?”

“हो.. सगळं ठीक आहे. सरांनी आपल्याला एक नवीन प्रोजेक्टचं काम दिलंय. त्या संदर्भातच बोलायचं होतं. घरी आहेस नां?”

“हो.. मी घरीच आहे.”

“मग मी घरीच येतो. घरी आल्यावर निवांत बोलू.”

“हो.. चालेल ये.. मलाही तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं होतं. फोनवर नीट सांगता येणार नाही. ये लवकर..”

नंदिनीने इतकं बोलून कॉल कट केला. युवराजने हातातलं काम पटकन उरकलं आणि तो नंदिनीच्या घरी जाण्यासाठी निघाला. मनातल्या विचारांना थोपवत त्याने गाडी स्टार्ट केली. नंदिनीला संमोहन प्रक्रियेसाठी कसं तयार करायचं याचाच विचार त्याच्या मनात घोळत होता. थोड्याच वेळात युवराज नंदिनीच्या घरी पोहचला. दारावरची बेल वाजताच नंदिनीने पटकन दार उघडलं. हसून त्याच्याकडे पाहत म्हणाली,

“ये युवी.. आत ये..”

पायातले शूज बाहेर काढून ठेवत तो आत आला. नंदिनीने त्याच्यासाठी प्यायला पाणी आणलं आणि त्याला विचारलं,

“कॉफी करतेय आपल्यासाठी.. चालेल नं? की चहा बनवू?”

“काहीही चालेल..”

युवराजच्या वाक्यावर तिने मान डोलावली आणि ती कॉफी बनवण्यासाठी किचनच्या दिशेने वळणार इतक्यात पुन्हा दारावरची बेल वाजली.

“बहुतेक, त्रिशा आली असेल.. थांब मी बघते..”

असं म्हणत ती दार उघडण्यासाठी दाराच्या दिशेने वळली. तिने दार उघडलं समोर त्रिशा उभी होती.

“या मॅडम.. आज दिवस कुणीकडे मावळला म्हणायचा, इतक्या लवकर घरी उगवलात?”

नंदिनी त्रिशाकडे पाहत हसून म्हणाली.

“आले अगं.. म्हटलं रोजच काय उशिरा जायचं? कधीतरी आपल्या बेस्टीलाही वेळ देऊया..”

त्रिशा घरात शिरत हसून म्हणाली. आत येताच तिचं लक्ष युवराजकडे गेलं.

“अरे, युवी तू? माझ्या असं अचानक येण्याने तुम्हाला डिस्टर्ब तर नाही झालं नां? माझ्या बेस्टीसाठी वेळ काढून आलास.. मी खूप खूप आभारी आहे.. तुझे हे उपकार…”

त्रिशा युवराजकडे पाहून दोन्ही हात जोडत मिश्किलपणे म्हणाली.

“पुरे, पुरे.. नौटंकी कुठली!”

तिच्या नाटकी हावभावाकडे पाहून तिचं बोलणं मध्येच तोडत युवराज हसून म्हणाला.

“थांब.. मी आलेच हं.. फ्रेश होऊन येते.. मस्त गप्पा मारू.. जाऊ नकोस हं..”

“हो ये.. मी आहे.”

त्रिशा फ्रेश होण्यासाठी आत गेली. नंदिनीही कॉफी बनवण्यासाठी किचनमध्ये आली. थोड्याच वेळात त्रिशा फ्रेश होऊन बाहेर आली. नंदिनीने तिघांसाठी कॉफी बनवली आणि कॉफी आणि बिस्किटांचा ट्रे घेऊन बाहेर आली. नंदिनीने टीपॉयवर ट्रे ठेवला आणि सर्वांना कॉफी दिली. कॉफीचा एक घोट पोटात गेला तशी त्रिशा खूष होऊन म्हणाली,

“व्वा, एकदम सॉलिड! नंदूने बनवलेल्या कॉफीचा एक घोट घेतला नां की सारा शिण निघून जातो बघ.. हो की नाही युवी?”

युवराजने होकारार्थी मान डोलावली. ती पुढे काही बोलणार इतक्यात नंदिनी तिला अडवत म्हणाली,

“बरं आता कामाचं बोलूया?”

त्रिशा ओठांवर बोट ठेवत शांत बसली. कॉफीचा कप ओठांना लावत नंदिनीने विचारलं,

“हं बोल युवी.. काय झालं आज ऑफिसमध्ये? कोणत्या प्रोजेक्टबद्दल बोलत होतास?”

“हो सांगतो.. पण त्याआधी मला सांग तू डॉक्टर नीरजाकडे गेली होतीस?”

“हो.. गेले होते. आजची अपॉइंटमेंट होती. का रे काय झालं?”

“हं.. त्याच संदर्भात तुझ्याशी बोलायला आलोय.”

“हो, बोल नां.. आणि तुला कसं माहित मी नीरजाकडे गेले होते ते?”

नंदिनीने आश्चर्याने विचारलं.

“तिचा मला कॉल आला होता. नंदू, मला सांग तुला त्या स्वप्नांपासून सुटका हवीय?”

“हा काय प्रश्न आहे का युवी? अफकोर्स हवीय.. किती त्रास होतो तिला! किती घाबरते ती! मी पाहिलंय नां..”

त्रिशा पटकन म्हणाली.

“बरोबर बोलतेय ती.. अरे युवी, तुला माहित आहे नां? किती भीती वाटते मला त्या स्वप्नांची! त्या स्वप्नांचा विचार करून माझं डोकं फुटायची वेळ आलीय. आणि तू मला विचारतोयस सुटका हवीय की नाही? कमाल आहे..”

युवराजच्या प्रश्नाने नंदिनी दुखावली गेली होती. नाराजीचा स्वर तिच्या बोलण्यात उमटला.

“पण तू तसा प्रयत्न करताना दिसत नाहीस..”

“का? मी काय केलं? आणि काय प्रयत्न करू मी? तुझ्या सांगण्याप्रमाणे तर त्या डॉक्टर नीरजालाही भेटले. तरी तू मलाच बोलतोयस की, मी प्रयत्न करत नाही?”

नंदिनी त्याच्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाली.

“मग तिच्यापासून काय लपवतेयस तू? तिने तुला विचारण्याचा खूप प्रयत्न केला; पण तू काहीच बोलली नाहीस. मनातल्या गोष्टी तिला सांगितल्याच नाहीस. नंदू, आपल्याला त्या स्वप्नांच्या मुळाशी जायचंय. त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. त्याशिवाय तुला समाधान मिळणार नाही. मी मघाशीच तिच्याशी बोलून घेतलंय. नंदू, आता एक महत्वाची गोष्ट ऐक, डॉक्टर नीरजा तुझ्यावर संमोहनची उपचार पद्धतीचा वापर करणार आहेत. त्यामुळे काय होईल की, तुझ्या सुप्त मनातल्या काही भावना बाहेर पडतील. कदाचित त्याच आपल्याला तुझ्या स्वप्नांच्या दिशेने घेऊन जातील. तुझ्या स्वप्नांचं मूळ तिथेच असू शकेल. नंदू, आपल्याला प्रयत्न करायला काय हरकत आहे? नीरजा आपल्यासाठीच करतेय नां? मला खात्री आहे, तिच्या ट्रीटमेंटचा आपल्याला फायदा जरी नाही झाला तरी नुकसान काहीच होणार नाही. मला वाटतं, आपण संमोहनच्या उपचार पद्धतीला परमिशन दयायला हवी.”

असं म्हणत त्याने त्रिशा आणि नंदिनीकडे पाहिलं. नंदिनी विचार करू लागली.


पुढे काय होईल? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©शिवप्रिया

0

🎭 Series Post

View all