स्वप्नभूल.. भाग १७

स्वप्नभूल.. कथा एका रहस्याची..
स्वप्नभूल - भाग १७
© शिवप्रिया


“खरंच असं असेल का? माझ्या स्वप्नांचा माझ्या भूतकाळाशी काही संबंध असेल? युवी सांगतोय म्हणजे नक्कीच त्यात काहीतरी तथ्य असेलच नां? पण.. संमोहित असताना मी काहीतरी वेगळंच बरळून गेले तर? नीरजा, युवी माझ्याबद्दल काय विचार करतील? ”

मनातल्या असंख्य विचारांनी नंदिनीला दरदरून घाम फुटला.

“नको, नको युवी.. जुन्या जखमांना छेडण्यात काय अर्थ आहे? आपल्याला वेदनाच होणार नां? भूतकाळातल्या गोष्टींचे पडसाद वर्तमानावर होणार असतील तर नकोच. उगीच जगासमोर माझा तमाशा नको. कधी कधी जखमा उघड्या पडू नयेत म्हणून जपावं लागतं रे..”

नंदिनी कळवळून म्हणाली. डोळ्यात पाणी दाटू लागलं.

“कोणते पडसाद उमटणार आहे आणि कसला तमाशा? नंदू, जखम अशीच दाबून ठेवली तर ती चिघळते. त्यात ‘पू’ होतो. दुर्गंधी येते. ती मोकळी करावी लागते. वाहू द्यावी लागते. तरच दुःखाचा निचरा होऊ शकतो. आणि तू कोणाला घाबरतेस? कोण तुझा तमाशा करणार आहे? आणि कोणासमोर? नंदू, मी आहे नां? कायम तुझी ढाल बनून तुझं रक्षण करणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जगाच्या पाठीवर काहीही घडो, कोणी काहीही म्हणो, मी कायम तुझ्यासोबत असणार आहे. मी तुझी साथ कधीच सोडणार नाही.”

युवराज बोलता बोलता मधेच थांबला. त्याचा आवाज एकदम कापरा झाला. त्याच्या प्रत्येक शब्दात नंदिनीबद्दल आत्मीयता, प्रेम झळकत होतं.

“अगदी खरंय युवी, काहीही होऊ दे, मी आणि युवी तुला सोडून कुठेच जाणार नाही. कितीही मोठं संकट येऊ देत; आपण मिळून त्याचा सामना करू. त्या संमोहन प्रोसेसची तू मुळीच भीती बाळगू नकोस. आम्ही आहोत नां?”

त्रिशा उठून उभी राहत तिच्या हातावर हात ठेवत म्हणाली. लगेच युवराजनेही त्रिशाच्या हातावर त्याचा उजवा हात ठेवला. जणू नंदिनीला त्यांच्या हाताच्या भक्कम स्पर्शाने एक नवी ऊर्जा मिळाली होती! ती स्वतःचा हात त्यांच्या हातातून सोडवून घेत म्हणाली,

“त्रिशा, युवी.. ठीक आहे.. तुम्ही म्हणत असाल तर डॉक्टर नीरजाच्या पुढील ट्रीटमेंटसाठी मी तयार आहे..”

“वॉव! दॅट्स ग्रेट! मी आता लगेच तिला कॉल करून कळवतो. आणि यापुढे तू एकटी तिच्याकडे जायचं नाही. मी सदैव तुझ्या सोबत येणार आहे. आणि समजा एखाद्या दिवशी मी कामात असलो, मला तुझ्यासोबत यायला नाही जमलं तर त्यावेळेस त्रिशा तुझ्या सोबत असेल. पण तू एकटं जायचं नाही. समजलं?”

युवराज दटावणीच्या सुरात म्हणाला. नंदिनीने हसून त्या दोघांकडे पाहिलं आणि म्हणाली,

हो, समजलं.. आता तुम्ही काय माझा पिच्छा सोडणार नाही.”

तिच्या वाक्यावर तिघेही खळखळून हसले. एक विषय बाजूला पडला होता. कॉफीचा आस्वाद घेत गप्पा छान रंगात आल्या होत्या. इतक्यात नंदिनीला काहीतरी आठवलं,

“अरे युवी, तू सांगितलं नाहीस ऑफिसमध्ये काय झालं ते? कोणत्या नवीन प्रोजेक्टबद्दल बोलत होतास तू?”

“तू ऑफिसच्या कामाचं टेन्शन घेऊ नकोस.. नवीन प्रोजेक्टबद्दल बोलणं होतच राहील; पण तू तुझ्या तब्येतीची काळजी घे.. नंतर एकत्र काम करायला आपण आहोतच..”

युवराज हसून म्हणाला तशी नंदिनीने मान डोलावली. थोडा वेळ गप्पा मारून उद्या सोबत जाण्याचं आश्वासन देऊन युवराज तिथून आपल्या घरी निघून गेला. तो गेल्यावर त्रिशाने नंदिनीकडे हेतूपुरस्पर पाहिलं आणि मिश्किलपणे म्हणाली,

“गे बाय माजे, किती काळजी घेतो हा तुझी! मी तुला सांगते नंदू, हा नक्कीच तुझ्या प्रेमात आहे.”

“चल गं काहीही काय! तो मित्रत्वाच्या नात्याने सारं करतो. तुला उगीच काहीतरी वेगळं वाटत असतं. डोकं भलतीकडेच पळतं तुझं..”

नंदिनी तिच्याकडे पाहत हसून म्हणाली.

“त्याच्या वागण्याबोलण्यातून स्पष्ट दिसतं अगं! आणि माझी तर पक्की खात्री आहे, तो तुझ्यावर प्रेम करत असणार. बघ तू.. एक दिवस मी जे बोलतेय ते नक्की खरं होणार.”

त्रिशा तिच्याकडे पाहून डोळा मारत हसून म्हणाली.

“सी त्रिशा, या गोष्टी करायला मी पुण्यात आले नाहीये. माझी ध्येय, उद्धीष्ट मला साध्य करायचीत. त्यामुळे प्रेम वगैरे यासाठी माझ्याकडे मुळीच वेळ नाही आणि समज, युवीच्या मनात जरी माझ्याबद्दल प्रेम असलं तरी माझा फोकस वेगळीकडे आहे. मी त्याच्यावर प्रेम करू शकत नाही. माझ्या घरातले जुन्या संस्कारांचे आहेत त्यामुळे त्या अशा प्रेमप्रकरणाना अनुमती कधीचं देणार नाही. समर दादा तर काय सांगू! असं काही त्याच्या कानावर गेलं तर तो माझा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि त्रिशा, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी माझ्या आबांच्या माझ्यावरच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. सो यापुढे हा विषय इथेच बंद.. बोलायला आपल्याला चिक्कार विषय आहेत..त्याबद्दल बोलू..”

नंदिनी निग्रहाने म्हणाली आणि तिचा मुद्दा स्पष्ट केला. मग त्रिशानेही नाईलाजाने विषय बदलला. ती दुसऱ्या विषयावर बोलू लागली.

दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी युवराज कार घेऊन नंदिनीच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये येऊन थांबला आणि त्याने नंदिनीला कॉल केला.

“हाय नंदू, गुडमॉर्निंग.. लवकर खाली ये.. मी पार्किंगमध्ये तुझी वाट पाहतोय.”

“अरे तू? इतक्या सकाळी तू पोहचलासही?”

नंदिनी आश्चर्य व्यक्त करत म्हणाली.

“हो.. लवकर जाऊ म्हणजे रस्तात फार गर्दी नसेल. ट्राफिक लागणार नाही.”

तो गाडी बाजूला घेत म्हणाला. नंदिनी आधीच तयार होऊन बसली होती.

“बरं.. आलेच मी थांब..”

असं म्हणत तिने खांद्याला पर्स अडकवली. त्रिशाचा निरोप घेऊन ती धावतच खाली आली. नंदिनी कारमध्ये बसताच त्याने गाडी स्टार्ट केली. थोड्याच वेळात ते डॉक्टर नीरजाच्या क्लिनिकमध्ये पोहचले. रिस्पशनिस्टने त्या दोघांना आत पाठवलं. केबिनचं दार उघडून ती दोघं आत गेली. गुलाबी रंगाच्या साडीत नीरजा खूपच छान दिसत होती. काळ्या रंगाचा गुलाबी बुट्ट्या असलेला व्हेलवेटचा सिल्वलेस ब्लाऊज तिला खुलून दिसत होता. गळ्यात मोठ्या काळ्या मण्यांची माळ तिच्या रूपात अजूनच भर घालत होती. नीरजाने हसून नंदिनीकडे पाहिलं आणि म्हणाली,

“गुडमॉर्निंग नंदिनी, कशी आहेस?”

“व्हेरी गुडमॉर्निंग नीरजा.. मी ठीक आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे मी तुझ्या पुढच्या उपचारसाठीही तयार आहे. युवीने मला सगळं सांगितलं आहे. मी संमोहन प्रोसेस करायला रेडी झालेय..”

नंदिनीने हसून उत्तर दिलं. तिचं बोलणं ऐकून नीरजा आनंदाने म्हणाली,

“वॉव दॅट्स ग्रेट नंदिनी! तू तयार झालीस. खूप छान.. चल मग आपण तयारीला लागू.. आपल्याला आपल्या मनाला बरं करायचंय ना? मग त्यासाठी आपण एक वेगळी उपचार पद्धती अवलंबणार आहोत. यात आपण आपल्या सुप्त मनाला जागृत करणार आहोत. चल, आपण त्या खोलीत जाऊ..”

नंदिनीने मान डोलावली आणि म्हणाली.

“वॉशरूम?”

“ते काय डाव्या बाजूला वळलीस की समोरच आहे.”

“ओके.. आलेच मी..”


असं म्हणत नंदिनी खुर्चीतून उठून उभी राहिली आणि वॉशरूमच्या दिशेने चालू लागली. ती जाताच डॉक्टर नीरजा युवराजकडे पाहून म्हणाली,

“युवराज, तू इथेच थांब.. आम्ही दुसऱ्या खोलीत जातोय. तू बाहेर बसून आम्हाला पाहू शकतोस. आमचं बोलणंही ऐकू शकतोस. नंदिनीला नेमका कसला त्रास होतोय हे लवकरच कळेल आपल्याला.”

युवराजने मान डोलावली. नंदिनी येताच नीरजा उठून उभी राहिली. तिच्या खुर्चीच्या अगदी पाठीमागे एक दरवाजा होता.मागचं दार उघडून नीरजा नंदिनीला घेऊन आत गेली. युवराजला दारावरच्या काचेतून आत सुरू असलेल्या गोष्टी दिसत होत्या. त्या दोघी एका बंद खोलीत आल्या. सर्व दिवे हळूहळू मंद झाले. संपूर्ण खोलीत अंधार पसरला होता. नंदिनी घाबरलेल्या अवस्थेत नीरजासोबत पुढे चालत होती. तिला एकदम तिच्या स्वप्नातल्या खोलीची आठवण झाली.

“तशीच अंधारलेली बंद कोंदट खोली.. त्या घाणेरड्या, वखवखलेल्या पुरुषी नजरा.. त्यांचा त्या बायकांना होणारा तो ओंगळवाणा घाणेरडा स्पर्श..”

नंदिनी प्रचंड घाबरली होती. तिचे हातपाय थंड पडू लागले.

“नंदिनी, घाबरू नकोस.. ये बैस या आरामखुर्चीत..”

नीरजाने नंदिनीला समोर मांडलेल्या आरामखुर्चीत बसायला सांगितलं आणि दुसरीकडे मोबाईलवर त्यांचं बोलणं रेकॉर्ड करायला सुरुवात केली. नीरजा नंदिनीच्या खुर्चीसमोर बसली.

पुढे काय होईल? नंदिनी बरी होऊ शकेल? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©शिवप्रिया

🎭 Series Post

View all