Login

स्वयंसिद्धा - सौ.वनिता शिंदे किर्दकुडे

Story Of Hardworking Girl
एक वाचक म्हणून आणि कालांतराने लेखक म्हणून जेव्हा मी ईराशी जोडले गेले तेव्हा सौ. वनिता शिंदे किर्दकुडे हे नाव विजेत्या लेखकांच्या यादीत बऱ्याचदा दिसायचे त्यामुळे तिच्याबद्दलचे कुतूहल वाढले. तोपर्यंत तिचे लिखाण मी अजिबात वाचले नव्हते. हिची कथा विजेती का ठरली असेल या कुतूहलापोटी मी तिच्या कथा वाचू लागले. व्याकरण आणि शुद्धलेखनात परफेक्ट असणारी ही लेखिका उत्तम कवियत्री सुद्धा आहे हे तिचे प्रोफाईल चेक केल्यानंतर समजले.

काही महिन्यानंतर नवीन काहीतरी शिकायला मिळेल या उद्देशाने मी ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२३ मध्ये भाग घेतला तेव्हा योगायोगाने आम्ही दोघी एकाच संघात म्हणजे टीम संगीता ग्रुप १ मध्ये आलो. तसं बघायला गेलो तर सगळ्याच एकमेकांना अनोळखी. पण कॅप्टन संगीताताईंनी सगळ्यांना आपलेसे करत छान बोलते केले. हळूहळू ग्रूपवर गप्पा होवू लागल्या आणि ही सखी मला नव्याने उमगू लागली. मैत्रीचा एक अबोल संबंध सेतू आमच्यात तयार होवू लागला.

ग्रुपचा इंट्रोडक्शन व्हिडिओ असो की पोस्टर बनवणे, जलद कथा असो की चारोळी ही सगळ्यात पुढे. अगदी दहा भागांची दीर्घकथा लिहायला सुद्धा. फेरी सुरू व्हायचा अवकाश ही लिहून मोकळी. ओढ बहीण भावाची या तिने लिहिलेल्या चॅट संवादाने जवळजवळ दीड लाख व्ह्यूज मिळवले. २ हजार लाईक आणि कमेंटचा तर नुसता वर्षाव झाला. प्रत्येक फेरीत तिने आपल्या लेखणीची चमक दाखवली.

तशा आमच्या ग्रुप मध्ये कॅप्टन संगीतासकट शिल्पा, मुक्ता, प्रियांका, श्रद्धा, स्नेहा, प्रणाली, खुशी, वनिता सगळयाच मातब्बर. अगदी एक से बढकर एक. मीच त्यांच्यात येऊन पडलेलं कच्च लिंबू. मला सांभाळून घेतल्याबद्दल खूप आभार मैत्रिणींनो.

पुढे एक दिवस मी वनिताचा बुलेट चालवत रील करतानाचा व्हिडिओ पहिला तेव्हा लक्षात आलं ही गाव की गोरी दिसते तशी नाहीये ही छोरी तर भलतीच डॅशिंग आहे. बुलेट चालवणे हा गंमतीचा भाग पण खर तर वनिताच्या खडतर आयुष्याचा बराचसा प्रवास, पायी अथवा सायकलवरूनच झाला. लहानपणी अगदी अनवाणी सुद्धा. पण तिने कशाचा बाऊ केला नाही.

खरं तर वनिताला शिक्षिका व्हायचं होत पण काही कारणांनी ही इच्छा अपूर्ण राहिली तरी निराश न होता तिने तिची वाटचाल चालू ठेवली. परिस्थितीवर मात करत ही स्वयंसिद्धा इथवर पोहोचली आहे.

घरसंसार सांभाळत ही सखी शिवणकाम करते, कथा लिहिते, कविता करते एवढेच काय आपली चित्रकलेची आवड जोपासते, लहान मुलांच्या ट्युशन्स घेते. वेळ नाही, वेळ नाही म्हणणाऱ्यांसाठी वनिता एक उत्तम उदाहरण आहे. आवड असली की सवड आपोआपच मिळते हे वनिता तिच्या जिद्दी, मेहनती स्वभावाने दाखवून देते. मला तिचा स्पष्टव्यक्ता स्वभाव जास्त आवडला. 'स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद' ही तिची विचारसरणी माझे प्रेरणास्थान बनली. वनिता तुझ्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. त्यासाठी हक्काने त्रास देणार मी तुला.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्ताने एक नाही दोन नाही तब्बल नऊ मैत्रिणी मिळाल्या. संबंध सेतू खरोखरच बहरला. त्याबद्दल ईरा व्यासपीठाचे मनःपूर्वक धन्यवाद.

वनिता तुझी सगळी सकल मनोरथ पूर्ण होऊ दे, तुझ्या हातून अशीच साहित्यसेवा घडू दे. आपल्यातील मैत्रीचा संबंध सेतू केवळ चॅम्पियन ट्रॉफी पुरता मर्यादित न रहाता उत्तरोत्तर बहरत जावा ही सदिच्छा तसेच तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. खूप प्रेम.
--------------------------