Login

त...ताकभाताचा भाग १

Family Drama
त...ताकभाताचा भाग १


©® सौ.हेमा पाटील.


"अवनी, जमले का तुला चूल पेटवायला? की येऊ परत आत?" मोहनने विचारले . नवीनच लग्न झालेली अवनी कधीच खेड्यात राहिली नव्हती. त्यामुळे तिला या गोष्टी जमत नव्हत्या.

"नाही पेटली दादा लाकडे. नुसतीच धुपतायत. येता का जरा आत?" अवनी म्हणाली.

हे ऐकून पाणी तापवण्यासाठी बंबात लाकडाच्या ढपल्या टाकत असलेला मोहन परत आत गेला. अवनी चुलीजवळ फुंकणी घेऊन फुंकत बसली होती. घरात सगळा धूर झाला होता.

"अगं, असं फुंकत बसून जाळ होणार नाही. सर बाजूला." मोहन म्हणाला. तेवढ्यात ज्योती आतून आली.

"अगं बया. आता चूल पण तुम्हीच पेटवून देणार का काय रोज? माझी बरी एवढी सेवा केली नाही कधी." आपल्या नवऱ्याला चूल पेटवायला अवनीला मदत करताना पाहून तिला खूप राग आला होता.

मोहन म्हणाला,

"मग तू ये की तिच्या मदतीला. ती शहरात राहिलीय. त्यामुळे तिला जमत नाही."

"आईच्या पोटातून फक्त अभिमन्यूच शिकून आला होता. बाकीचे सगळे इथंच शिकतात. तशीच ती पण शिकेल की. आता मी लग्न झाले तेव्हा किती खेडवळ होते, तुमच्यासोबत शहरात आल्यावर शिकलेच की शुध्द भाषा. तशीच ही पण शिकेल गावरहाटी." ज्योती म्हणाली. आपल्या नवऱ्याने जाऊबाईला मदत करू नये असे तिला वाटत होते.

सगळ्यांनी तिला बडबड केली, चार शब्द तिला ऐकून घ्यावे लागले तर ज्योतीला हवेच होते. त्यामुळे ती आपल्या नवऱ्यावर नाराज होती.
मोहन आपल्या धाकट्या बहिणीसारखे मानून अवनीला एकेक गोष्ट शिकवत होता, जेणेकरून वाड्यातील बायकांनी आपल्या धाकट्या भावाच्या बायकोला नावे ठेवू नयेत.

'जावा जावा उण्याच्या वाटेकरी म्हणतात ते काही खोटं नाही.' ज्योतीचे वागणे पाहून मोहनच्या मनात विचार आला.' ही जर मनात आकस ठेवून अवनीशी वागली, तर अवनी तरी हिच्याशी प्रेमाने वागेल का? फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इंप्रेशन. नाते जोडण्यासाठी थोडेफार सहन करावे लागते. हिला सांगणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी ओतण्यासारखे आहे.' असा विचार त्याच्या मनात आला.

ज्योतीमध्ये मात्र काडीचाही फरक पडला नव्हता. ती सरळ फणकाऱ्याने आत निघून गेली. मोहनची काकी आत डोकावून पाहत म्हणाली,

काय रं पोरा, चुलीपाशी काय करतुयास? भाकरी थापतुयास का काय?" हे ऐकून मोहन तिथून चटकन उठला व म्हणाला,

"ये की आत काकी. बाहेरनंच काय बोलतीयास? अगं, हिला जरा चूल पेटवायची कशी ते सांगत होतो."

"मुलगी मोठी माडावानी वाडलीया, अन् तिला चूल पेटवाय यीना? उंडगीच दिसतीया. पोरगी पसंद कराय कोन गेलं हुतं?" काकीनं आपली अक्कल पाजळली. ते ऐकून अवनी गोरीमोरी झाली.

"काके, तसं काय नाय गं. ती शहरात वाढलीय ना, म्हणून तिला येत न्हाय चूल पेटवायला. गॅसवर स्वैपाक करायची तिला सवय आहे."

"गॅसवर तरी कराया येतो ना सैपाक?" साशंक होऊन काकीने विचारले.

"हो तर, आम्ही गेलो तेव्हा हिनेच पुरणपोळी बनवली होती की." मोहन उत्तरला.

" मंग ठीक हाय बाबा." असे म्हणत काकीने बाहेरचा रस्ता धरला.

क्रमशः

काकीने बाहेर जाऊन काय धुमशान केले ते पुढच्या भागात वाचा.