Login

एका हाताने टाळी वाजत नाही - भाग -1

Taali
एका हाताने टाळी वाजत नाही.


जलदलेखन स्पर्धा- नोव्हेंबर - 2025


भाग - 1


मंगला एका छोट्या गावातल्या प्रतिष्ठित कुटुंबाची सुशील, पण थोडी कठोर स्वभावाची स्त्री.


तिचा मुलगा — सौरभ, शहरात शिकलेला, नोकरी करणारा, सध्या पुण्यात एका नामांकित कंपनीत मॅनेजर.


पूजा आणि सौरभचं लग्न झालं तेव्हा सगळं सुरेख होतं.


पूजा आणि सौरभ दोघं प्रेमाने, हसत-खेळत जगत होते. मंगलालाही वाटलं, “चांगली सून मिळाली, संस्कारी आणि शांत.”
पण काळाबरोबर लहान-सहान गोष्टी वाढत गेल्या.


“आई, तुम्ही सतत कां रागावता माझ्यावर ? मी काही चुकीचं बोलले नाही…”  पूजा समोर उभी राहून बोलत होती, पण हातात चहाचा कप थरथरत होता.


मंगलाने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला. “मी सांगते ना, मला माझ्या घरात शांतता हवी आहे. रोज रोज वाद, टोमणे, हेच तुझे संस्कार आहेत का?”


त्या आवाजात अधिकार होता आणि थोडा आक्षेपही.
स्वयंपाकघराच्या भिंतीवर घड्याळ टिक-टिक करत होतं, पण त्या टिकाटिकीपेक्षा दोघींच्या नजरेतला ताण अधिक जाणवत होता.


एका दुपारी सौरभ ऑफिसला गेला होता. मंगलाकडे काही पाहुणे आले होते. त्यांनी विचारलं, “मंगला, सून दिसत नाही? तीन वर्ष झाली, अजून मूल नाही का झालं?”


त्या प्रश्नाने मंगला नाराज होऊन म्हणाली, “काय सांगू वहिनी, सगळं देवाच्या हाती आहे.


त्याच क्षणी पूजा स्वयंपाकघरातून आली आणि तिला सगळं ऐकू गेलं.
त्या दिवशी ती रडली, तिला कोणी दोष दिला नव्हता, पण तिच्या मनात अपराधाची भावना आली.



दिवस जात होते, पण घरात हळूहळू वाद वाढत होते.


मंगलाला पूजाच्या प्रत्येक गोष्टीत कमी वाटायची.

“भाजीतं मीठ कमी, पाहुण्यांना वेळेवर पाणी दिलं नाही, देवघर नीट नाही केलं…”
आणि पूजा मनात म्हणायची, “मी कितीही प्रयत्न केले तरी आईंना समाधान नाही.”


एका सकाळी ती चहा घेऊन आली तेव्हा मंगलाने विचारलं, “साखर घातली का दोन चमचे?”
“हो आई.”
“तू साखर कमीच घालतेस, कालही पाहुण्यांना चहा गोड वाटला नाही.”


“आई, कालच्या चहात तुम्हीच साखर घातली होती…”
क्षणभर शांतता, मग रागाचा उद्रेक.
“मग आता माझी चूक? म्हणजे माझं सगळंच चुकतंय, असं म्हणायचं आहे का तुला?” आणि मग नेहमीप्रमाणे दोघींचं भांडण झालं.


त्या दिवशी सौरभ परत आला तेव्हा दोघींचे डोळे लाल झाले होते.


त्याने दोघींना एकत्र बसवून बोलायचा प्रयत्न केला — “आई, पूजा दोघींचीही भावना खरी आहे… पण दोघीही थोडं मागे या.”


पण मंगला म्हणाली, “एका हाताने टाळी वाजते का रे सौरभ? जेव्हा सून समजून घेईल, तेव्हाच घरात शांतता येईल.”


पुजाच्या मनात राग होता, तिला वाटलं, आईंना माझं मन दिसत नाही का? मी काही मुद्दाम त्यांच्याशी वाईट वागत नाही.”


सौरभचं मन दोन्हीकडे तुटत होतं.

तो ऑफिसमधून परतला की, एकीकडे आईचे टोमणे, तर दुसरीकडे पूजाचे अश्रू.

कधी कधी तो न बोलताच आपल्या खोलीत जायचा.

त्या शांततेत पूजाला अपराधी वाटायचं. ती स्वतःला दोष द्यायची — “कदाचित माझ्या बोलण्यात काहीतरी चुकत असेल…”


पण दुसरीकडे मंगलालाही दुःख होतं.
तिला वाटायचं, “मी किती वर्षे या घरासाठी जगले… आणि आता माझ्याच घरात मी परकी झाले.”


त्या दोघींचं प्रेम सौरभवर होतं, पण एकमेकांवर गैरसमजांचं जाळं विणलं गेलं होतं.


( पुढच्या भागात आपण बघणार आहोत- सासू- सु्नांच्या वादामुळे काय परिणाम होतात ते )
0

🎭 Series Post

View all