Login

तामस भाग 2

अंधाराच्या पोटात लपलेले एक भयाण रहस्य.
तामस भाग 2

मागील भागात आपण पाहिले सतीश पाटील नावाचे गृहस्थ गायब होतात. त्यांचा ड्रायव्हर अत्यंत भयंकर अवस्थेत परत येतो. राजेश प्रधान त्याला वाचवतात. सतीश अजूनही जिवंत असल्याची राजीवला जाणीव होते. आता पाहूया पुढे.


" आकाश हा प्रकार सामान्य नाही. यामागे अमानवी शक्ती आहे." राजीवने उत्तर दिले.

"त्याचा अंदाज ड्रायव्हरची नजर बघूनच मला आला होता. त्यामुळेच तुला बोलावले." आकाशने स्पष्ट कबुली दिली.


" आकाश का कोण जाणे ते सतीश पाटील जिवंत आहेत असे मला वाटते." राजेश म्हणाला.

" सर पण ड्रायव्हरची अवस्था बघता ही शक्ती सामान्य नाही." रोझीने आपले मत दिले.


" सगळ्यात आधी सतीश पाटील बद्दल सगळी महिती घ्यावी लागेल." राजेशने सांगितले.

त्याप्रमाणे इन्स्पेक्टर आकाश,रोझी आणि स्वतः राजेश निघाले. सुनंदा अजूनही धक्क्यात होती. तिने आपल्या सासू सासरे आणि मुलांना बोलावून घेतले. आपला कर्तबगार मुलगा एकाएकी गायब झाला हेच त्यांना स्वीकारता येत नव्हते.


राजेशने सतिशच्या बंगल्यात पाऊल ठेवताच एक नकारात्मक ऊर्जा जाणवली. त्या शक्तीने अजूनही पिच्छा सोडला नव्हता तर.


राजेशला पाहताच सतीशची मुलगी म्हणाली," राजेश सर माझ्या बाबांना वाचवा प्लीज."

" मी माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न करेन. मला सांगा सतीश कुठे गेले होते आणि इतक्या रात्री का परत येत होते?" राजेशने विचारले.


" सांगते,आमचा रियल इस्टेटचा मोठा बिझनेस आहे. त्यामुळे सतत प्रॉपर्टी खरेदीसाठी ह्यांना प्रवास करावा लागतो. परवा अशाच एका डील साठी ते रत्नागिरी येथील एका गावात गेले होते. तिकडे मोठा हील स्टेशनवर फॉर्म हाऊस प्रोजेक्ट करायचा होता." सुनंदाने सगळे सांगितले.



रोझीने तिथला पत्ता घेऊन घेतला.

" सर बाबा सापडतील ना?" सतिशच्या मुलीने पुन्हा विचारले.


" आपल्या हाती फक्त प्रयत्न करणे एवढेच आहे." राजेशने उत्तर दिले.

" रोझी उद्या आपण निघतोय. दिवसभर सगळे आटोपून राजेश घरी आला. त्याने देवघरात प्रवेश केला आणि अचानक त्याला मनगटावर भाजल्यासारखे वाटले. तरीही राजेश त्याकडे दुर्लक्ष करून आत गेला. त्याने देवघरातील भस्म कपाळावर लावताच दाह थांबला.


राजेशने सकाळी आपल्या मनगटावर उमटलेले चिन्ह आठवले. त्याने चिन्हांची माहिती असलेला प्राचीन ग्रंथ शोधला आणि उद्या सोबत घ्यायच्या बॅगेत ठेवला. त्यानंतर राजेशने ध्यान लावले. जेवढी शक्य होईल तेवढी सकारात्मक ऊर्जा मिळवायला त्याने ध्यान सुरू केले. ध्यानातून बाहेर आल्यावर राजेश एकदम फिट आणि शांत झाला.


दुसऱ्या दिवशी सकाळी सतिशच्या ड्रायव्हरला घेऊन आकाश हजर झाला.


" सर ह्या इन्स्पेक्टर साहेबांना कशाला घेता. त्यांना कोण वाचवेल?" रोझी हसली.


" रोझी पोलीस बरोबर असतील तर अनेक कामे सहज होतात. असू देत त्याला सोबत." राजेश गाडी सुरू करत सूचना देत होता.


पहाटेच निघाल्याने सूर्य उगवायला गाडीने कोकणात प्रवेश केला. ड्रायव्हर रस्ता सांगत होता त्याप्रमाणे राजेश गाडी चालवत होता. रत्नागिरी शहर सोडून गाडी आत शिरली. जवळपास तीन चार तासांच्या प्रवासानंतर ड्रायव्हर एका ठिकाणी ब्लँक झाला. त्याला रस्ता आठवेना.


" साहेब मला रस्ता आठवत नाहीय. फक्त ही दोन नारळाची झाड आठवत आहेत." ड्रायव्हरने उत्तर दिले.

तेवढ्यात एक महिला तिथून जाताना दिसली.

" ओ ताई, झोटिंगवाडी कुठे आहे?" रोझीने विचारले.

" तुका कित्याक जायचं ग थयसर?" ती महिला मोठे डोळे करत ओरडली.


" आमचं एक काम आहे. सांगता का पत्ता?" रोझी पुन्हा अदबीने म्हणाली.

" तुका मरायचं आसंल तर मंग काय करणार." असे म्हणून त्या महिलेने पत्ता सांगितला.


जंगलातून आठ दहा किलोमीटर गेल्यावर झोटिंगवाडी अशी एक जीर्ण पाटी आणि मैलाचा दगड दिसला. गाडी आत वळली आणि ड्रायव्हर स्तब्ध झाला.

" तू मोठी चूक केली इथे येऊन." त्याच्या तोंडातून तो भयंकर आवाज ऐकून क्षणभर राजेश देखील दचकला.


परंतु त्याने पवित्र जल शिंपडले आणि आकाशला गाडी थांबवू नकोस अशी खूण केली. चाळीस पन्नास घरांची टिपीकल कोकणातील वाडी आणि त्यामागे लांबूनही दिसणारे एक दुमजली माडीचे भव्य घर.


तिकडे पाहताच ड्रायव्हर हातपाय झाडू लागला. गाडी त्या घराच्या दिशेने निघाली. घर कित्येक वर्षे बंद असणार हे लांबूनही कळत होते. फाटकाबाहेर गाडी थांबली. सगळेजण खाली उतरले. ड्रायव्हर कधीचाच ते फाटक ओलांडून आत गेला होता.


राजेशने इशारा करताच आकाशने घराच्या भोवती रिंगण आखायला सुरुवात केली. दुसऱ्या बाजूने राजेश स्वतः रिंगण आखत होता. जवळपास तासाभराने रिंगण आखून पूर्ण झाले. तोपर्यंत सूर्य मावळला होता. काजवे चमकत होते आणि रातकिडे,पाखरे यांचे आवाज वातावरण आणखी गूढ बनवत होते.


" रोझी,आकाश हे रक्षासुत्र गळ्यात घाला. काहीही झाले तरी ते गळ्यातून काढायचे नाही."

त्या दोघांना सूचना देऊन राजेशने आत प्रवेश केला आणि अचानक त्या दुमजली घरात दिव्यांचा प्रकाश दिसू लागला. लगबग ऐकू येऊ लागली. क्षणापूर्वी ओसाड भासणारे ते घर जिवंत भासू लागले.


रोझी,आकाश आणि राजेश मुख्य दरवाजात गेले. हात लावायच्या आतच दरवाजा उघडला आणि ह्या तिघांनी आत प्रवेश करताच दरवाजा बंद झाला.


ह्या घराशी सतीश गायब होण्याचा काय संबंध असेल?
राजेश,रोझी आणि आकाश वाचतील?

घरात कोण असेल?
वाचत रहा.
चकवा.
©® प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all