Login

तामस भाग 3 अंतिम

चकवा भेदून अंधार संपला.

तामस भाग 3 अंतिम

मागील भागात आपण पाहिले की सतीश एक प्रॉपर्टी पाहायला कोकणात जातो आणि गायब होतो.
राजेश आणि रोझी त्याला वाचवायला तिथे जाऊन पोहोचतात आणि एका घरात प्रवेश करतात. आता पाहूया पुढे.


घरात बायकांची,मुलांची कुजबुज,बडबड ऐकू येत होती परंतु दिसत कोणीच नव्हते. राजेश सावध झाला. हे एक मायाजाल असल्याचे त्याने ओळखले. राजेश पुढे पाऊल टाकणार तितक्यात समोरून एक बाई आली.

" कोणाला भेटायचं आहे तुम्हाला? खोताना ?" तिने विचारले.

राजेशने फक्त होकारार्थी मान हलवली. त्या स्त्रीने इशारा करताच तिघेही तिच्या मागोमाग निघाले.माडीवर जाताना दोन खोल्या बंद दिसत होत्या. कोपऱ्यातील खोलीकडे बोट दाखवत ती स्त्री मागे वळली.

आता आपण धोक्यात असल्याची जाणीव ह्या तिघांना झाली होती. तरीही सतीश आणि त्याचा ड्रायव्हर यांचे काय झाले हे शोधायला त्या खोलीत जाणे हाच एकमेव पर्याय होता.


जसजशी ती खोली जवळ येऊ लागली अवती भवती नकारात्मक ऊर्जा जाणवू लागली. खोली बाहेर राजेश थांबला. कालभैरव अष्टक खोलीच्या दारावर कोरलेले होते.

"रोझी थांब,आपण हा दरवाजा उघडावा म्हणून रचलेला डाव आहे हा."

राजेशने सकाळी बरोबर घेतलेला प्राचीन ग्रंथ उघडला. त्यातून सगळे स्पष्ट झाले होते. राजेशला आपल्या हातावर उलटलेल्या चिन्हाचा अर्थ उलगडला होता.

तो रोझीला म्हणाला," काहीही झाले तरी माझ्या हातावर चिन्ह असताना माझ्या जवळ येऊ नकोस.

राजेश असे म्हणत असताना त्याच्या हातावर ते चिन्ह उमटले आणि तो आपोआप त्या खोलीकडे खेचला जाऊ लागला. रोझी सावध होती. तिने सुरक्षा बंधन फेकले आणि राजेश जागेवर स्थिर झाला.

" मला बाहेर काढ. तूझ्या सगळ्या इच्छा मी पुऱ्या करेल." आतून आवाज आला.

" कोण आहेस तू? आतापर्यंत पकडलेले लोक कुठेय?" राजेशने उलट प्रश्न विचारला.

तेवढ्यात त्यांना आत घेऊन येणारी बाई परत आली होती. आता तिचा चेहरा वेगळाच होता. तिने आपले सुळे बाहेर काढले आणि पुढे येऊ लागली. रोझी सावध होती. तिने पिस्तूल काढले आणि चांदीच्या गोळीने मस्तक उडवले आणि त्या शरीराने पेट घेतला.


त्याबरोबर चारही बाजूंनी पिशाच्च चालून येऊ लागली. रोझी आणि आकाश दोघांनी आपली शस्त्रे काढली आणि लढाई सुरू झाली.


" माझ्या लोकांना मारणे थांबव." एक आवाज राजेशच्या कानात कुजबुजला.


रोझी तिथे नसल्याने सुरक्षा बंधन संपले आणि काही कळायच्या आत राजेश ओढला गेला. त्याचा हात लागताच दार उघडले.


समोरच तो बसलेला होता. संपूर्ण सुकलेला देह,शुष्क ओठ आणि कोरडी त्वचा. केवळ लाल डोळे त्याचे अस्तित्व दाखवत होते.

" कोण आहेस तू? काय हवेय तुला?" राजेशने विचारले.

" मला मुक्त कर इथून. बदल्यात तू अमर होशील." त्याने सांगितले.

" अमर? असा? दुसऱ्याचे रक्त पिऊन जगणारा?" राजेश हसला.

" तुझे रक्त पिल्यावर भैरवाने घातलेले बंधन तुटेल आणि मग मला दर महिन्याला एक बळी कोणी आणून द्यावा लागणार नाही. मी स्वतः तो शोधू शकेल."

तो बोलत असतानाच राजेशला चारही बाजूंनी घेरले होते. त्याची सगळी शस्त्रे काढून घेतली गेली होती. मनगटावर उमटलेले ते चिन्ह त्याला हलू देत नव्हते.


" जेव्हा तू त्या माणसाला वाचवत होतास तेव्हा माझा काही अंश तुझ्यात गेला आहे. तामस म्हणतात मला."
तो मोठ्याने ओरडला.


पिशाच्च राजेशला त्याच्या जवळ घेऊन जात होती. त्याने राजेशचा हात पकडला.

" गरम उष्ण रक्त." तो क्रूर हसला.


राजेशच्या मानेजवळ त्याने आपले ओठ नेले. त्याचे सुळे मानेवर टेकणार इतक्यात मोठ्याने कालभैरव अष्टक म्हणत रोझी आत आली. तिने राजेशला पकडणारे पिशाच्च मारायला सुरुवात केली. भैरव अष्टक सुरू होताच राजेश शुद्धीवर आला.


तामसने पुन्हा राजेशला पकडले. परंतु ह्यावेळी राजेश शुद्धीत होता. त्याने उडी मारली. बाहेर त्याची पिशाच्च रिंगणात जळत होती. तामस पिसाळला. त्याने आपल्या काळया शक्तींना आवाहन केले. सगळीकडे अंधार पसरला. कोणालाही काहीच दिसत नव्हते. तामसने रोझीला पकडले.


" आता हीचे रक्त पिऊन मग तुला संपवतो." तो मोठ्याने ओरडला.


त्याचवेळी आकाश आत आला. त्याने टॉर्चचा प्रकाश केला. तामस रोझीला पकडुन उभा होता. आकाशने गोळी झाडली. तामसच्या कपाळातून गोळी आरपार गेली आणि तो परत पूर्ववत झाला.


आकाशवर मागून चार पिशाच्च धावून आली. आकाश पडकला गेला. राजेशने आपल्या हातावर असलेले चिन्ह एकदा पाहिले आणि डोळे मिटले. तामसने रोझीच्या मानेवर असणारे केस बाजूला केले.


तिच्या शिरेतून वाहणारे उष्ण रक्त त्याला आनंदी करत होते. त्याने आपले सुळे बाहेर काढले. डोळे बंद केले आणि सुळे मानेवर टेकवले. सप ssssss असा आवाज झाला आणि रोझी शुद्धीत आली.


तामस खाली कोसळला होता. राजेशच्या हातात तलवार होती. तामसचा देह जळू लागताच त्या घरात असलेली पिशाच्च जळू लागली.


"रोझी,शेजारच्या खोलीत जाऊन सतीश आणि त्यांच्या ड्रायव्हरला बाहेर काढ."
राजेशने सांगताच रोझी जाऊन त्यांना घेऊन आली.


" आपण इथे कुठे आलो? आपल्याला आता घरी असायला हवे." सतीश गोंधळला.

" सतीश सर तुम्हाला चकवा लागला होता. चला आता बाहेर." राजेश पाठोपाठ सगळे खाली आले.

सगळेजण बाहेर आले आणि राजेशने पवित्र उदी फुंकली आणि ते संपूर्ण घर पेटले. आता कोणालाही परत चकवा लागणार नव्हता.


टीप: सदर कथा केवळ मनोरंजन ह्याच हेतूने लिहिली असून त्याच हेतूने वाचावी.
©® प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all