Login

टाळी एका हाताने वाजत नाही.... भाग दोन

कीर्तीच्या रागच कारण समजत
मागील भागात आपण पाहिलं कि, कुणालच्या आईला सांभाळण्यावरून कीर्ती आणि कुणालमध्ये वाद होतो. आता पाहूया पुढे,


कीर्ती दार आपटून आपल्या खोलीत आली. दार लावून तिने पलंगावर स्वतःला झोकून दिल.ती रडत होती पण ते रडणे म्हणजे तिची काही वर्षांची साठलेली वेदना बाहेर पडणं होतं.

कुणालसोबत झालेल्या वादानंतर तिच्या डोळ्यासमोर एक-एक प्रसंग फिरू लागला.
लग्न झालं तेव्हापासून सासूबाई आशाबाई तिच्या प्रत्येक गोष्टीमध्ये चुकी शोधून काढायच्या. तिने केलेली कोणतीही गोष्ट त्यांना कधीच आवडली नाही. मग ते कपडे धुणे असो कि भांडी घासणे असो. शरीराने ती पूर्ण थकून जायची, आणि टोमणे मारून त्या मानसिकरित्या तिचं खच्चीकरण करत होत्या.

अगदी गरोदरपणात देखील ती अवघडलेल्या अवस्थेतही घरकाम करत होती. त्यावेळेस डॉक्टरने स्पष्ट सांगितलं होतं...

“जड वस्तू उचलू नका, ताण घेऊ नकोस.. "

पण आशाबाईने तेव्हा गुडघेदुखी पकडून एकही कामाला हात लावला नाही. उलट टोमणेच मारले,

“आमच्या काळात आम्ही नऊ महिने पोर सांभाळून शेती केली. आता यांना जरा काही झालं की डॉक्टर!”

कीर्ती हसून दुर्लक्ष करायची किंवा तिच्याकडे दुसरा पर्याय देखील नव्हता. तेव्हाही तिच्या सासूने दिवाळी तोंडावर आले म्हणून सगळीकडे घरातली भांडी तिच्याकडून घासून घेतली. शेवटी व्हायचं तेच झालं कीर्तीने सासूच्या अश्या स्वभावामुळे आपलं बाळ गमावलं. तेव्हाच खरं तर त्या तिच्या नजरेतून उतरल्या होत्या.


दुसऱ्या बाळाच्या वेळेस मात्र तिने हट्टाने एक मदतनीस ठेवली. त्यालाही तिच्या सासूचा विरोध होताच. पण मागच्या वेळेस सारख होऊ नये म्हणून कुणालने त्याच्या आईच ऐकलं नाही....डिलिव्हरीच्या वेळेस देखील ऑपेरेशन थिएटरच्या बाहेर कुणाल एकटा धावत-पळत व्यवस्था करत होता.आणि सासूबाई शेजारीपाजारी
लोकांना म्हणत होत्या,

“आजकालच्या पोरींना नॉर्मल बाळंतपण झेपतच नाही.
आमच्या काळात कुणाचा सीझर झाल्याचं ऐकलं नाही मी... "

काही वेळाने कीर्तीने एका गोड मुलीला जन्म दिला, त्यावर देखील नातू दिला नाही म्हणून त्या तोंड फुगवून बसल्या होत्या.

कुणाल जेव्हा कामावर जायचा, कीर्ती त्या तीव्र वेदनेत एकटी बाळाला सांभाळत होती.टाके पडलेल्या पोटाची वेदना, बाळाच्या दुधाचा त्रास, झोप नाही, दमझाक व्हायची तिची.
आणि वर सासूचे रोजचे वाक्य,

“किती आळशी झालीयेस. जरा म्हणून पाण्यात हात घालायला नको.... "

शेवटी कीर्तीने ऐकून-ऐकून पंधरा दिवसातचसीझर असूनही थंड पाण्यात हात घातला, भांडी घासली, कपडे धुतले…जेवण बनवलं....कारण कुणी करायला नव्हतं आणि सासूला तिच्या वेदना दिसत नव्हत्या. सासूने तिला कसलाच आधार दिला नाही. दोन्ही बाळंतपणे तिने त्रासातच काढली. त्या सर्वामुळे आज, चाळीशीला पोहोचण्याआधीच तिची कंबर सतत दुखते, पाठ दुखते, हातात बळ राहत नाही. हे सगळं आठवून तिला आता तिच्या सासूचं करायची इच्छा होत नव्हती. तिचं मन तुटत होतं स्वतःसाठी नाही,कुणालच्या न समजणाऱ्या गोष्टींसाठी....

ती हळू आवाजात स्वतःशी पुटपुटली,
“कुणीच कधीच जाणणार नाही…ही वेदना, ते तडजोडीचे वर्ष, हे बाळंतपणातलं एकटेपण…नवीन असताना दिलेल्या वेदना कधीच नाही.”

तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते....


कीर्ती तिच्या जागी बरोबर आहे का???