Login

टाळी एका हाताने वाजत नाही भाग एक

कीर्तीच्या रागाचा उद्रेक होतो
"मी तुझ्या आईला बघणार नाही… हे तुला शेवटचं सांगते हा …”

हातातला टीव्हीचा रिमोट जोरात तिने सोफ्यावर आपटला.पण हे बोलताना तिचा आवाज थरथरत होता पण रागाने नाही, तर सहनशक्ती संपल्याच्या वेदनेने.
तिने संतापाने कुणालकडे पाहिलं आणि खोलीतून निघून जायला वळली.

तिला जाताना बघून तिचा नवरा कुणाल उठतच म्हणाला,

“कीर्ती! असं कोण बोलतं? कमीतकमी आदर तरी ठेवावा!”

ते ऐकून कीर्ती थांबली.
मागे वळून रडवेल्या आवाजात ओरडली,

“मी किती आदर केला त्यांचा … किती वर्षं…
तुला कल्पना तरी आहे का?”

पण कुणाल त्रासलेला होता आधीच. तो सुद्धा रागात त्या शब्दांच्या मागचं सत्य न पाहता म्हणाला,

“अगं आई आता काय वाईट बोलते का?
मग एवढं मनाला का लावून घेतेस?
झालं गेलं सोडून दे...
आपण नाही तर कोण बघणार तिला?"

ते ऐकून तर अजूनच कीर्तीचा स्फोट झाला.
तिच्या आतल्या सगळ्या दाबलेल्या वेदना एकदम बाहेर आल्या,

“तुला वाटतं मला तुझ्या आईला बघायला आवडत नाही?
तू घराबाहेर असतोस तेव्हा त्यांच्या प्रत्येक शब्दात असणारा टोमणा, तिरस्कार फक्त मलाच सहन करावा लागला! तू रोज सुखानं ऑफिसला जात होतास आणि मी? मी या घरात रोज स्वतःला अड्जस्ट करून जगत होते. आणि तुला एवढंच दिसतं की मी त्यांना बघत नाही!
पण त्या मागचं कारण कधी समजून घेतलंस का???”

कुणाल थोडा वरमला.
त्याला कीर्तीच्या आवाजातला त्रास त्याला जाणवला, पण तो अजूनही तो मागे हाटायला तयार नव्हता.

तो पण मनात येईल ते पटकन म्हणाला,

“तू नेहमी स्वतःलाच बरोबर समजतेस!”

ते ऐकून कीर्तीचे डोळे भरले.
पण यावेळी तिच्या अश्रूंना तिने थांबवले, अजून किती सहन करणार असा विचार करून तिने दाराकडे वळत हळू पण ठाम आवाजात म्हटलं,

"आणि तू? कधी माझ्या बाजूने उभा राहिलास?
कधी माझं मन जाणून घेतलंस? एका हाताने टाळी वाजत नाही, कुणाल.मी कितीही प्रयत्न केले…
माझं मन मॉडेल, मा वागणं बदललं, हजार वेळा स्वतःच्या इच्छा दाबल्या.. पण तरीही त्या खुश झाल्या नाहीत.. उलट अजूनच चुका काढत राहिल्या."


त्यावर कुणाल काही बोलूच शकला नाही.त्याच्याजवळ शब्द नव्हते
कारण पहिल्यांदाच कीर्तीने आपलं मन एवढ्या मोकळेपणाने त्याच्यासमोर ठेवलं होतं.

कीर्ती दार आपटून बाहेर निघून गेली. पण तिच्या मागे त्या दाराचा आवाज एवढा जड वाटत होता की जणू वर्षानुवर्षे न बोलेलं, न समजलेलं सगळं त्यात बंद झालं होतं.

कुणाल तसाच उभा राहिला... त्या बंद झालेल्या दरवाज्याकडे आणि रिमोट पडलेल्या जागेकडे बघत,
त्याच्या डोक्यात आता एकच प्रश्न होता..

“काय खरंच? चूक एकटीच तिचीच आहे का…?”


कीर्तीच्या अश्या वागण्यामागच कारण काय असेल?
कुणाल काय करेल???