Login

तमाच्या तळाशी दिवे पेटलेले भाग 13

गोष्टीचे सगळे कोन आता एका ठिकाणी येऊन रहस्य उलगडायला सुरुवात.

तमाच्या तळाशी दिवे पेटलेले भाग 13


मागील भागात आपण पाहिले पूर्वा ब्लॅक रॅबीटपर्यंत पोहोचायच्या अगदी जवळ पोहोचली आहे. मयंक गायब झाला होता. तिकडे समीर आणि प्रियांक यांचे फोटो काढणारा समीरला सापडला. कोणीतरी सत्येनला गाडीत घेऊन जात असलेले पाहून रागिणी त्याचा पाठलाग सुरू करते. आता पाहूया पुढे.


सूरजने टायरच्या खुणांच्या पाठवलेल्या फोटोवरून गाडी मॉडेलच्या तीन शक्यता निघत होत्या. त्यानुसार ट्रॅफिक पोलिसांच्या फुटेजमध्ये गेले चार तास सूरज आणि कदम तपासणी करत होते. तेवढ्यात सूरजला एक कार दिसली.

"कदम ही कार सिग्नलवर कुठे थांबते तिथे व्हिडिओ स्टॉप करा."
सुरजचे डोळे आनंदाने चमकले.
गाडीचा फोटो झूम केला आणि त्याने लगेच गाडी कोणाच्या नावावर आहे हे शोधायला सुरुवात केली.

"साहेब, समीर देशमुख साहेबांच्या एका कार्यकर्त्याच्या नावावर आहे."
गाडी मालकाचे नाव पाहून कदम म्हणाले.

"गाडी रजिस्टर असलेल्या पत्त्यावर जायची तयारी करा कदम." सूरज पटकन तयार झाला.


पुर्वाने तीनही मुलींना सोडून दिले आणि बाहेर पडली.

"किंजल,तुला चार नंबर पाठवले आहेत. ते कोणाच्या नावावर आहेत बघ."
पूर्वा कॅबमध्ये बसताना सूचना देत होती. पूर्वा एका अरुंद गल्लीच्या तोंडाशी उतरली. तितक्यात किंजलचा फोन आला.
"पूर्वाबेन,ये तो भूलभुलैया छे."
चार जणांची नावे तिने सांगितली.

"किंजल,ह्या चारही माणसांची सगळी हिस्ट्री मला हवीय." पुर्वाने तिला समजावले आणि फोन कट केला.



समीर तातडीने बाहेर पडला. फोटोग्राफरला एका ठिकाणी पकडुन ठेवले होते.

"ज्याने काम दिले त्याचे नाव सांग फक्त. तुला जाऊ देऊ."

समीर अतिशय थंड आवाजात बोलला.

"मला फक्त एक फोन आलेला. तीन लाख रुपये मिळणार म्हणून तयार झालो साहेब."
तो हातापाया पडू लागला.

तेवढ्यात त्याच्या फोनवर नाव आले ब्लॅक रॅबीट.

"फोन उचल आणि प्रत्यक्ष भेटून व्हिडिओ देईल असे सांग."
समीरने डोक्याला गन लावत फोटोग्राफरला समजावले.

त्याप्रमाणे त्याने लोकेशन दिले. रात्रीचे बारा वाजले होते. तरीही व्हिडीओ आजच आणून दे. असा पलीकडून आदेश आला. समीर त्याला घेऊन निघाला.


मयंक शुद्धीवर आला. समोर दोन लहान मुलांना बांधलेले होते. आपल्याला कोणी पळवले हे समजायला त्याला वेळ लागला नाही. तेवढ्यात शेजारच्या खोलीतून लहान मुले बोलायचा आवाज आला.

मयूर आणि स्नेहा घाबरले होते. परवा रात्री त्या मुलाचा आवाज ऐकून. मयंक तरीही शांत होता. त्याने मागच्या खिशात नेहमी असलेला चाकू काढला आणि दोरी कापायला सुरुवात केली.


सूरज आणि कदम बाहेर पडले. वाटेत हल्ल्यातून वाचलेल्या मुलाला भेटायला सूरज थांबला. त्या मुलाने सांगितलेले वर्णन ऐकून त्याप्रमाणे स्केच तयार झाले होते.

"कदम,हे स्केच सगळीकडे पाठवा. आता गुन्हेगार फार लांब नाही."
सूरजने सूचना दिली.

दोघेही गाडी ज्या पत्त्यावर नोंदली होती तिकडे पोहोचले. तिथे कोणीच सापडले नाही.

"कदम,आता फक्त समीर देशमुख आपल्याला उत्तरे देऊ शकतात."
सूरज म्हणाला.

"साहेब,त्यासाठी वॉरंट लागल. त्याशिवाय नाही जाता यायचं." कदम निराश झाले.

"कदम आजकाल इंटरनेट आहे. समीर देशमुखचा फोन ट्रॅक करू."
सूरजने उत्तर दिले. अगदी दहा मिनिटात हॅकरने सुरजचे काम केले होते. आता त्याला फक्त समीरचा पाठलाग करायचा होता.



अंगद वेगाने गाडी चालवत होता. सत्येनला घेऊन तो एका बंगल्यात गेला. त्याने सत्येनला खुर्चीवर बांधले. आता सत्येन जिवंत राहणे धोक्याचे होते. त्याने ब्लॅक रॅबीट नावाने सेव्ह असलेला नंबर डायल केला.

"मला एकाने ओळखले आहे. त्याला संपवावे लागेल."
अंगदने उत्तर दिले.

"पण पोलिसांना जपून आणि पुरावा सोडू नकोस कोणताही."
पलीकडून उत्तर देऊन फोन कट झाला.

सत्येनचे हात आणि पाय करकचून बांधल्यावर अंगदला भुकेची जाणीव झाली. तो सत्येनच्या तोंडावर चिकटपट्टी लावून बाहेर पडला.


समीर आणि त्याची माणसे सांगितलेल्या ठिकाणी वेगाने निघाली. पाठोपाठ पोलिसांची गाडी होती. निर्मनुष्य रस्त्यावर गाड्या वेगाने धावत होत्या. अचानक एक मोठा टेम्पो आडवा आला आणि समीरच्या मागे असणारी त्याच्या माणसांची गाडी थांबली.

त्यापाठोपाठ सूरज आणि कदम काही अंतर ठेवून थांबले.

"अबे शाने,चल टेम्पो काढ लवकर नाहीतर इथच ठोकतो तुला." समीरची माणसे चिडली होती.
"साहेब, वय झालं आता. गेर चुकला आन गाडी बंद पडली. आता काढतो गाडी."
ड्रायव्हरने जवळपास दहा मिनिट लावले.

टेम्पो बाजूला होताच समीरची माणसे वेगाने निघाली. चार पाच किलोमीटरवर समीरची गाडी एका ठिकाणी बाजूला पडली होती. समीर गाडीत नव्हता आणि त्याच्या सेक्रेटरीला गोळी लागली होती.


"मुन्नी,चल आत जाऊ."
रागिणी तिला म्हणाली.
"नको,मला भ्या वाटत."
मुन्नी घाबरली होती.

तरीही दोघी घाबरत बंगल्याजवळ गेल्या. दरवाजा बंद होता. मागच्या बाजूला एक खिडकी दिसली.
" मी खिडकीच्या झडपतून आत जाते. मंग खिडकी उघडते."
मुन्नी म्हणाली.
त्याप्रमाणे मुन्नीने आत जाऊन खिडकी उघडली. रागिणी आणि मुन्नी आत शिरल्या.

"चल,आधी सत्येनला शोधू."
रागिणी हळू आवाजात म्हणाली.

समोरच्या खुर्चीत सत्येनला बांधले होते. रागिणी आणि मुन्नी धावत त्याच्याजवळ गेल्या. रागिणी त्याचे हात सोडवू लागली इतक्यात अंगदने मुन्नीला पकडले. तिच्या गळ्यावर चाकू ठेऊन तो ओरडला.

"जास्त शहाणपणा दाखवलास तर ह्या मुलीला मारून टाकेल."

त्याबरोबर रागिणी बाजूला झाली. त्याने रागिणी आणि मुन्नी दोघींच्या तोंडावर पट्टी बांधली आणि त्यांना एका खोलीत ढकलले.


समोर मयूर आणि स्नेहाला पाहून मुन्नी धावत जाऊन त्यांना बिलगली.

समीरने डोळे उघडले तेव्हा त्याला विवस्त्र एका खुर्चीत बांधले होते. त्याशेजारी आणखी एक तरुण होता. त्यालाही बांधलेले होते.

अशोकला रागिणीचा मॅसेज मिळताच तो निघाला होता. त्याने पुर्वाला देखील तसे कळवले होते. एका ठिकाणी रागिणीची गाडी होती. पण रागिणी आणि मुन्नी कुठेच दिसत नव्हत्या.

अशोक,सचिन,मनोज,प्रियांका आणि दिव्या सगळीकडे शोधत होते. रागिणीच्या जीवाचे काही बरे वाईट झाले नसेल ना? अशोकच्या मनात नकळत शंका आली.


कोण असेल ब्लॅक रॅबीट? अंगद हाच खरा सूत्रधार असेल का? समीर, सत्येन वाचतील का?

वाचत रहा.
तमाच्या तळाशी दिवे पेटलेले.
©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all