तमाच्या तळाशी दिवे पेटलेले भाग 3
मागील भागात आपण पाहिले की मयूर आणि स्नेहा एका ठिकाणी बंदिस्त आहेत. त्यांना एक मुन्नी नावाची मुलगी खाऊ घालायला येते. चिंटू उर्फ श्लोक आणि सुपर्णा यांच्या मदतीने गुन्हेगाराचे स्केच बनवायचा निर्णय पूर्वा घेते. आता पाहूया पुढे.
पूर्वा रात्रभर विचार करत होती. इतक्या लहान मुलांना असे निर्दयी पद्धतीने कोण मारत असेल? ह्याच मारेकऱ्याने मयूर आणि स्नेहाला पळवले असेल तर? काहीही करून मयूर आणि स्नेहाला शोधायला हवे. सकाळी स्केच आर्टिस्ट पाठवून काय मिळते ते पहावे लागेल. विचारांच्या तंद्रीत झोप लागून गेली.
सकाळी दिव्याच्या प्रार्थनेच्या आवाजाने पूर्वा जागी झाली.
"मनोज,आजच्या शो मध्ये हा विषय नक्की घे. गेल्या दोन महिन्यात सहा मुले मारली गेली." सचिन त्याला सांगत होता.
"अशोक, कालही दोन मुलांचे अपहरण झाले. त्यांनाही त्याच माणसाने पळवले असेल का?" प्रियाने विचारले.
सगळ्यांच्या नजरा पूर्वाकडे वळल्या.
"काय? तुम्हाला काहीही माहिती मिळणार नाही. पोलीस काम करत आहेत. तुम्ही कशाला विचार करत बसता." पूर्वा नाक उडवत अंघोळीला गेली.
रागिणी सकाळी कॉफी घेत असताना दोन मुलांचे अपहरण झाल्याची बातमी समजली. त्यासरशी तिला प्रचंड अस्वस्थ वाटू लागले. रेड लाईट एरियातील त्या पळवून आणि फसवून आणलेल्या मुली आठवून नकळत एक चुकार अश्रू गालावर ओघळला.
तिच्या स्वतः च्या आईने किती सोसले होते. बिल्लाकडे व्हिडिओ नसते तर रागिणी आज नवे आयुष्य जगायला पुढे निघून गेली असती. तेवढ्यात सेक्रेटरी आले आणि रागिणीने स्वतः ला सावरले.
"मॅडम,आज एक मुलाखत आहे. ह्यावेळी शनाया येऊ शकणार नाही. कोणीतरी अशोक म्हणून मुलगा आहे." सेक्रेटरी माहिती पुरवत होता.
"अशोक ऐक,शनाया पुढील आठवडाभर परदेशी असेल. तर आज तुला रागिणीची मुलाखत आणि फोटो दोन्ही घ्यायचे आहेत." पुढचे काहीही न ऐकता फोन कट झाला.
अशोकची चिडचिड सुरू झाली.
"अशोक काय झाले?" दिव्या चहाचा कप हातात देत म्हणाली.
"अरे,इकडे मुंबईत काय सुरू आहे. आणि ह्यांना मुलाखती हव्यात. आता ह्या रागिणीची मुलाखत म्हणजे." अशोक बडबडत होता.
"काय? रागिणी! अरे सध्या तिच्याच मालिकेत माझे ड्रेस आहेत. खूप मेहनती मुलगी आहे."प्रियांका उत्साहाने माहिती पुरवू लागली.
ह्या सगळ्या गडबडीत पूर्वा तयार होऊन निघाली.
"पूर्वा,मला सोड जाताना." प्रियांका म्हणाली.
"सचिन,तुझे काय? आज घरीच का?" दिव्या हसली.
"स्पर्धा जवळ आल्यात. मला आता जास्त वेळ काम करावे लागेल." सचिनने तिच्या डोक्यात टपली मारली.
"मॉम,मॉम मला इकडे नाही राहायचे. मला खूप भिती वाटते." स्नेहा रडू लागली.
"स्नेहा,डोन्ट क्राय. आपल्याला आता ब्रेव बनावे लागेल." मयूर तिला समजावत होता.
तेवढ्यात बाहेर आवाज झाला. दोघेही गप्प झाले. मुन्नी आणि तिची आई आली होती.
"चल, खाले बेटा. कोपऱ्यावर पोळी मिळते. तिकडून आणले आहे." मुन्नीची आई म्हणाली.
"आंटी,आम्हाला घरी जाऊ द्या."स्नेहा रडू लागली.
"बेटा,अभी खाना खा. मग आपण जावू." मुन्नीची आई तिला समजावू लागली.
बाहेर बूट वाजले. दोन उग्र चेहऱ्याची माणसे आत आली.
"वा! क्या कडक माल है| भरपूर पैसा मिळेल." एकजण हसला.
"इनको बस पार्सल करना है|" दुसरा हसला.
तेवढ्यात फोन वाजला.
"हरामखोर,कुणाला घेऊन आले. तुम्हाला मी सी.एम. आणि देशमुखच्या पोराला पळवायला सांगितले होते." पलीकडून शिव्या ऐकू येत होत्या.
"मालिक,आता ह्यांचे काय करू? " इकडून एकजण विचारू लागला.
"बेच दो!"पलीकडून ऑर्डर आली.
"चल आता ह्यांना गिऱ्हाईक शोधू." असे म्हणून त्याने मुन्नीकडे पाहिले.
"वेसे कमल,तेरी पोरगी पण चिकनी हाय." मुन्नी आणि तिच्या आईच्या अंगावर काटा आला.
आलेले दोघे गुंड निघून गेले.
"अम्मी,ह्यांना वाचव." मुन्नी आईला बिलगून रडू लागली.
"कुठेय त्या इन्स्पेक्टर? मला आत जाऊ द्या." पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ चालु होता.
मीडिया बाईट घ्यायला आसुसला होता. स्थानिक इन्स्पेक्टर साळुंके क्राईम ब्रांच ऑफिसरची वाट पाहत सर्वांना समजावत होता. तितक्यात एक गाडी थांबली.
इन्स्पेक्टर पूर्वा वेगाने बाहेर पडली. तेवढ्यात मिस नलिनीने तिला गाठले.
"सुपरकॉप पूर्वा,ही दोन मुलेसुद्धा सिरीयल किलरची शिकार आहेत की आणखी काही?" कॅमेरा समोर होता.
"कदम,ह्यांना बाहेर काढा. सगळा परिसर रिकामा करा. वाटल्यास एक्स्ट्रा फोर्स मागवा." पूर्वा सरळ आत गेली.
"साळुंके,काय गोंधळ आहे हा?" पूर्वाचा कडक स्वर ऐकून साळुंके चपापला.
"मॅडम त्या दोन मुलांचे आई वडील आणि नातेवाईक जमले आहेत बाहेर. स्थानिक नेते,आमदार बरीच मंडळी आहेत." साळुंके माहिती पुरवत म्हणाला.
"ठीक आहे. फक्त पालकांना आत सोडा."पूर्वा चेहऱ्यावरील एकही रेषा न हलवता बोलली.
तेवढ्यात साळुंकेचा फोन वाजला.
"मॅडम,लोकप्रतिनिधी सुद्धा बोलवावे लागतील. वरून फोन आहे."साळुंके चाचरला.
"ठीक!फक्त एक आमदार,एक नगरसेवक बस." पूर्वा परत फाईल पाहू लागली.
"काय करतायेत मुंबई पोलीस? आता ह्यांच्या जागी देशमुखचा पोरगा किंवा सी.एम.ची पोरगी असती तर?" तार सप्तकात ओरडत आमदार शिंदे आत शिरले.
"तुमच्या मागे आता हा कमांडो काढला ना तर तुमची डेडबॉडी जाईल घरी." पूर्वा फाईल पहातच बोलली.
"बाई,नीट बोलायच." नगरसेवक गुरगुरला आणि पुढच्या क्षणी त्याच्या डोळ्यांसमोर काजवे चमकले.
"इन्स्पेक्टर पूर्वा! नाव नीट लक्षात ठेवायचे."पूर्वा मुलांच्या पालकांकडे वळली.
"ताई,ह्या शहरातील प्रत्येक मूल हे तितकेच महत्वाचे आहे..तुमच्या मुलांना काहीही होणार नाही."
नातेवाईक आणि पालकांना समजावून पूर्वा बाहेर पडली. तोवर तिच्या मोबाईलवर स्केच आले होते.
अशोक आणि त्याचा असिस्टंट ताजच्या लॉबीत पोहोचले. रागिणी फक्त अर्धा तास भेटणार होती. रागिणीची गाडी लॉबीत पोहोचली.
"ड्रायव्हर,गाडी परत फिरवा. लोकेशन सेट करा." रागिणी शांतपणे म्हणाली.
"फिरोज,कम ऑन फॉलो हर. ती इथून परत फिरली. समथिंग इज फिशी." अशोक ओरडला. अशोक आणि फिरोज दोघे रागिणीचा पाठलाग करू लागले.
स्नेहा आणि मयुरचे काय होईल? स्केचवरून पूर्वा गुन्हेगार शोधेल का? रागिणी नक्की कुठे चालली आहे?
वाचत रहा.
तमाच्या तळाशी दिवे पेटलेले.
©®प्रशांत कुंजीर.
तमाच्या तळाशी दिवे पेटलेले.
©®प्रशांत कुंजीर.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा