Login

तमाच्या तळाशी दिवे पेटलेले भाग 6

ह्या सगळ्यात मुले वाचतील का? खरे गुन्हेगार सापडतील का?

तमाच्या तळाशी दिवे पेटलेले भाग 6

मागील भागात आपण पाहिले रागिणीवर गोळीबार झाला. जखमी बिल्ला पळून गेला आणि त्याला शोधायला खबरे आकाश पाताळ एक करत होते. इकडे मुन्नी स्नेहा आणि मयूर दोघांना घेऊन पळून गेली. समीर नित्या मेहराच्या बंगल्यावर होता. आता पाहूया पुढे.


रागिणी रात्रभर गुंगीत होती. तिच्या सेक्रेटरीने डॉक्टरांना विश्वासात घेऊन घरीच उपचार केले होते. सकाळी गुंगी दूर होऊ लागली आणि रागिणी प्रचंड टेन्शनमध्ये आली. तिने पटकन टी.व्ही. ऑन केला.

कुठेही रागिणी बद्दल काहीही बातमी नव्हती. अशोक खरेतर ही ब्रेकिंग न्यूज देऊन प्रसिद्धी मिळवू शकत होता. रागिणी मनोमन त्याचे आभार मानून आराम करू लागली. सेटवर आपण पुढील दोन दिवस येऊ शकत नसल्याचे तिने कळवले.


इतक्यात शेजारच्या फ्लॅटमधून मंद स्वरात गाणे ऐकू येऊ लागले. प्रचंड वेदना असलेल्या आवाजात कोणीतरी गात होते. सत्येन डोळे चोळत उठला.

"अंगद,यार आज सुट्टी आहे. मला झोपू दे." त्याने त्याच्या फ्लॅटमेट अंगदला आवाज दिला.

अंगद एक शास्त्रज्ञ होता आणि सोबत उत्कृष्ट गायक. अतिशय मितभाषी असलेला अंगद गेली पाच वर्षे सत्येन बरोबर रहात होता. दोघेही आपापल्या कामात मग्न असत. सुट्टीलाच काय ती भेट व्हायची.


बिल्ला एका झोपडपट्टीत शिरला. त्याच्या माणसांनी डॉक्टरला पकडुन आणले. तिथेच टाके शिवले आणि डॉक्टरला परत घेऊन गेले.

"भाई,पुलिस सगळीकडे आहे. इन्स्पेक्टर पूर्वा सब जगह धुंड रही है|"
बिल्ला चिंतेत पडला.

पूर्वा त्याला शोधणार हे त्याला माहीत होते. आता लपायची जागा सुरक्षित शोधावी लागणार होती.


नित्याच्या फार्म हाऊसवर समीर तसाच नग्न पडून होता. काल रात्री केलेले सगळे प्रकार आठवत स्वतः वर चिडला होता. जाग येताच त्याने आवरून जायची तयारी केली. तेवढ्यात नित्याने त्याला मागून मिठी मारली.

"तुला असेच पकडून ठेवणार आहे. कुठे जाऊ देणार नाही."

नित्या त्यांच्या उघड्या अंगावर हात फिरवत म्हणाली.

"नित्या, डिल इज अ डील. मला आता जाऊ दे."
समीर कपडे घालत बोलत होता.

समीर बाहेर पडला आणि नित्या हसली.

"जा! लवकरच तुला सगळ्या बंधनातून मुक्त करणार आहे."

नित्या मोठ्याने क्रूर हसली.

इतक्यात फोन वाजला आणि तिच्या कपाळावर आठ्या उमटल्या.

"तुला हजार वेळा सांगितले इथे फोन करू नकोस."
नित्या रागाने ओरडली.

"ठीक आहे. करते बंदोबस्त." नित्या चिडून बोलली.


सचिन सकाळी चालून येत होता. त्याला दूरवर एक मुलगी बेशुध्द पडलेली दिसली. सचिन पळतच गेला. त्याने पाहिले तिच्या डोक्यावर जखम होती. रक्त सुकले होते. त्याने लगेच तिला उचलले आणि सरळ घरी आला. पूर्वा कामावर जायच्या तयारीत होती. तिला बिल्लाचा ट्रेस लागला होता. त्या गडबडीत सचिन ह्या मुलीला घेऊन आला.

"सचिन,तिला पोलिसात घेऊन जा." पूर्वा म्हणाली.

"नाही,सचिन तिला राहू दे इथे. मग आपण ठरवू." प्रियांका आणि दिव्या दोघींनी उत्तर दिले.

सकाळी सकाळी वाद नको म्हणून पूर्वा बाहेर पडली. मुन्नी शुद्धीवर आली. आपल्यासोबत मयूर आणि स्नेहा नाहीत हे पाहून ती प्रचंड घाबरली. तिला फक्त रात्री भरघाव वेगाने आलेली गाडी आणि खांबावर आपटलेले डोके आठवत होते.


"घे बाळा, सँडविच खा. तुला दुसरे काही देऊ का?"
मयूर आणि स्नेहाला एक पंचविशीत असलेला तरुण विचारत होता.

"अंकल आम्हाला घरी जायचे आहे. प्लीज मम्मीला बोलवा."स्नेहा रडत म्हणाली.

"बेटा,ज्या लोकांनी तुम्हाला पकडले होते ते परत पकडतील. तुम्ही काही दिवस इथेच रहा असे मम्मीने सांगितले आहे."
त्याने हळूच सांगितले.

दोन्ही मुले शांतपणे सँडविच खाऊ लागली. तो एक रिकामा बंगला होता.


"कुठेय ती इन्स्पेक्टर? कधी सापडणार मुले? पोलिस तपास नीट चालू आहे का?"
आमदार शिंदे गोंधळ घालत होता.

पूर्वा शांतपणे गाडीतून उतरली. तिने मयूर आणि स्नेहाच्या आई वडिलांना आत बोलावले.

"हे बघा,असे सारखी प्रसिद्धी मिळाली तर मुलांच्या जीवाला धोका होईल. माझ्यावर विश्वास ठेवा."
पूर्वा त्यांना समजावत होती.

आमदार शिंदेला वाटेला लावून पुर्वाने टीम आत बोलावली. बिल्ला राजेंद्रनगर मध्ये लपल्याची खबर आहे. त्याचा फोन तिकडे ट्रेस झाला आहे. आपल्याला सापळा लावायचा आहे.


शाल्मली गाडीच्या आवाजाने जागी झाली. रात्रभर जागी राहिल्याने नुकताच डोळा लागला होता. समीर आत आला.

"कुठे होतास रात्रभर?" तिने प्रश्न विचारला.

"मीटिंग होती. तुला सांगितले होते." समीरने उत्तर दिले.

"कोणाबरोबर? सांग ना? त्या प्रियांक बरोबर का? काय करता रे रात्रभर नक्की?"
शाल्मली चिडली होती.

"तुला काय समजायचे ते समज."
समीर सरळ झोपायला निघून गेला.


दोघांचा गोंधळ ऐकून जागे झालेल्या श्लोकला घेऊन शाल्मली पोर्चमध्ये आली. समीर झोपायला जाणार इतक्यात एक मॅसेज दिसला आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य परतले.


दिव्याने मुन्नीला छान अंघोळ घातली.तिच्या केसांना तेल लावून केस विंचरून दिले. तेवढ्यात मनोज छान उपमा घेऊन आला.

"तुझं नाव काय ग?"
प्रियांकाने विचारले.
"तुझे आई बाबा कुठे असतात? कुठे राहतेस तू?"
मनोज म्हणाला.

"मुन्नी,मेरा नाम."
असे म्हणून मुन्नी रडायला लागली.

त्यावर अशोक म्हणाला,"मुन्नी,खाऊन घे. तुला वाटेल तेव्हा सांग सगळे."

मुन्नी मात्र स्नेहा आणि मयुरच्या काळजीत होती. ती रडतच उपमा खाऊ लागली.


बिल्ला सकाळी दिलेल्या औषधांच्या गुंगीत होता. इतक्यात आजूबाजूला गडबड झाली. पोलिसांनी घेरल्याचे त्याच्या लक्षात आले. अर्धवट असलेली गुंगी घालवायला त्याने तोंडावर पाणी मारले.

"बिल्ला,आम्ही तुला चारही बाजूंनी घेरले आहे. गुपचुप आमच्या स्वाधीन हो."
पूर्वा दारात उभी होती.

प्रतिसाद येईना तशी तिने दारावर लाथ मारली. त्या चिंचोळ्या दोन मजली खोलीच्या वरच्या जिन्यावरून बिल्ला पळाला होता. पूर्वा आणि तिचे युनिट पाठलाग करू लागले. बिल्लाची माणसे आधीच तयार होती.

बिल्ला गाडीजवळ गेला. गाडीला चारही बाजूंनी पोलिसांनी घेरले. तेवढ्यात जवळ उभ्या असलेल्या एका छोट्या पोराला बिल्लाने पकडले.

"मला जाऊ द्या नाहीतर ह्याला गोळी घालेन." बिल्ला ओरडला.

तेवढ्यात पूर्वा पळत येत असताना थेट गाडीवर आदळली. त्याच गोंधळात बिल्लाने त्या पोराला पुर्वाच्या अंगावर फेकले आणि गाडी सुसाट वेगाने बाहेर पडली. पूर्वा अंग झटकून उभी राहिली. तिचे काम झाले होते.


प्रियांक कोण आहे? मयूर आणि स्नेहा कोणाबरोबर असतील? बिल्ला कुठे आश्रयाला जाईल? मुन्नी सगळे सांगणार का?

वाचत रहा.
तमाच्या तळाशी दिवे पेटलेले.
©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all