Login

टपरीचे गुपित

Mystry Of Tea Stall Near Highway.
भाग १

"अरे विकास, चल लवकर. आपल्याला किती उशीर झाला आहे? त्यांच्या आधी निघून पुढे पोहोचायचं आहे." सचिन विकासच्या बिल्डिंगखाली येऊन बाईकवर बसून जोरजोरात गाडीचा हॉर्न वाजवत त्याच्यासोबत फोनवर बोलत होता.


"अरे, आलोच रे. समोर बघ आणि काही काळजी करू नकोस. आपण त्यांच्याआधीच पोहोचू. आपण बाईकने जाणार आहोत मित्रा विसरू नकोस. ते लोक गाडीने येत आहेत आणि बाईक मी चालवणार आहे हे तू विसरतो आहेस बहुतेक." सचिनचे बोलणे ऐकून विकास फोनवर बोलत हसत त्याच्यासमोर आला.


दोघे एकमेकांसमोर येताच फोन कट करत एकमेकांना कडकडून मिठी मारली. सचिनने विकासला बाईक चालवायला दिली आणि तो स्वतः त्याच्या मागे बसला. दोघे बाईकवर बसल्यावर विकासने बाकीच्यांबद्दल सचिनला विचारले. त्यावर ते सगळे थोड्या वेळाने निघणार असल्याचे सचिनने त्याला सांगितले. मग त्या दोघांनी प्रवासाला सुरुवात केली.


संध्याकाळचे पाच वाजत आले होते. पावसाळ्याचे दिवस जरी असले तरी हे दोघे निघताना पावसाने काहीसा आराम घेतलेला होता. तरी ते संपूर्ण तयारी करून निघाले होते कारण प्रवास लांबचा होता. बाकीचे चौघेजण गाडीने मागून येणार होते. सगळ्यांनी एकत्र हॉटेलवरच भेटायचे असे त्यांचे ठरले होते.


विकास, सचिन आणि त्यांचा बाकीचा ग्रुप म्हणजेच निखिल, रोहित आणि सीमा हे सगळे बऱ्याच वर्षानंतर आज एकत्र फिरायला जात होते. ते सगळे कॉलेजपासून एकत्र होते. निशा कॉलेजनंतर रोहितमुळे त्यांच्यामध्ये सामील झाली होती. त्यात विकास आणि सचिन एकमेकांचे कॉलेजपासून जिगरी दोस्त होते. त्यांचं एकमेकांशिवाय पान हालत नसे.


निखिल आणि रोहित हे पैसेवाल्या बापाची पोरं होती. निखिलचे वडील राजकारणात तर रोहितचे वडील उद्योजक होते. सीमा आणि निशाचे पण काहीसे तसेच होते.


निखिल कॉलेजमध्ये असल्यापासून सीमावर प्रेम करत होता. तिचेही त्याच्यावर प्रेम होते आणि आता त्यांचे लग्न देखील ठरले होते. सोबतच रोहित आणि निशा एकमेकांना कॉलेजनंतर भेटले होते. त्यांचे देखील एकमेकांवर जीवापाड प्रेम होते आणि त्यांचा साखरपुडा झाला होता.


त्यांच्या ग्रुपमध्ये विकास आणि सचिन ह्या सगळ्यांपासून इतकी वर्ष लांबच होते. ते दोघे कॉलेज संपल्यावर नोकरी करत आयुष्य एन्जॉय करत होते. ते दोघे स्वभावाने अगदी बिनधास्त होते.


ते सगळे खूप वर्षांनी रोहित आणि निशाच्या साखरपुड्यला एकत्र भेटले होते. कॉलेज संपल्यावर पुन्हा ते एकत्र असे कधी भेटलेच नव्हते. विकास आणि सचिन किंवा रोहित आणि निखिल त्यांची भेट होत होती पण सगळ्यांचे एकत्र भेटणे पूर्णपणे बंदच झाले होते.


रोहितच्या साखरपुड्याला भेटल्यावर कॉलेजमध्ये असतानाच्या त्यांच्या सगळ्या आठवणी, दंगा, मस्ती त्यांना आठवू लागल्या. कॉलेजमध्ये असताना त्यांनी एकत्र खूप दंगा-मस्ती केली होती. खूप फिरले होते; पण आता सगळे कामधंद्यात गुंतल्यामुळे त्यांना ते शक्य नव्हते.


बोलता बोलता त्यांचं एकत्र कुठे तरी बाहेर फिरायला जाण्याचे सगळ्यांनी एकमताने ठरवले. त्यांनी निघायचा दिवस आणि जागा ठरवली. हायवेजवळच चार ते पाच दिवसासाठी एक हॉटेल बघायचे ठरवले आणि तिथूनच मग रोज नवनवीन ठिकाणी फिरायला जाण्याचे त्यांनी ठरवले. हॉटेलमध्ये राहण्याची सोय विकास स्वतः बघणार असल्याने त्याची काळजी आता कोणालाच नव्हती. सगळ्यांना पिकनिकचे वेध तर लागलेच होते पण जास्त वेध लागले होते एकत्र भेटण्याचे. प्रत्येकाने पिकनिकचे मनातल्या मनात मनसुबे रचले होते.


शेवटी बघता बघता भेटायचा दिवस उजाडला. विकास आणि सचिनला पावसातून बाईक रायडिंग करायची असल्यामुळे त्यांनी इतरांना सांगितले की, बाईकने ते दोघे पुढे जातील आणि हॉटेलची सोय बघून ठेवतील. त्यामुळे बाकीचे चारजण तासाभराने निखिलच्या गाडीतून निघाले.


निखिलने गाडी चालवायला घेतली. विकास आणि सचिन बाईकवरून पावसाची मज्जा घेत रस्ता कापत होते. तरी ठरल्या ठिकाणावर पोहोचायला त्यांना नऊ वाजणार होते.


"अरे यार विकास, खूप उत्सुकता लागून राहिली आहे यार. कधी एकदा सगळ्यांना भेटतो आणि कॉलेजचे जीवन पुन्हा जगतो असे झाले आहे. तू जातीने खाण्यापिण्याची सोय करणार आहेस तर आम्हाला कोणालाच कसले टेन्शन नाही कारण तू सोय करणार ती बेस्टच करणार." सचिन विकासला म्हणाला.


"हो यार, मला पण आपल्या ग्रुपला भेटायची उत्सुकता लागली आहे. तुला तर माहिती आहे मला सगळी व्यवस्था अगदी चोख लागते म्हणून मी सगळं आवडीने करतो. अरे तुला एक सांगायचं राहिलं, माझी आई माझ्यासाठी मुली बघते आहे. माझ्या लग्नासाठी हात धुवून मागे लागली आहे. बहुतेक पुढच्या महिन्यात मी यवतमाळला मुलगी पाहायला जाणार आहे." विकास म्हणाला.


"आयला भारी रे! कसली मस्त बातमी दिलीस. चलो और एक पार्टी लागू." सचिन खुशीत म्हणाला.


"अरे थांब थांब, ती बघ चहाची टपरी. मस्त चहा घेऊ आणि आपली नळकांडी फुंकू." सचिन म्हणाला. विकासने हसत हसत बाईक टपरी शेजारी उभी केली.


ते दोघे मध्ये मध्ये कुठे चहाची टपरी दिसताच बाईक थांबवून चहा सिगारेट घेण्यासाठी थांबत होते. त्याची सवय त्या दोघांना कॉलेजपासूनच होती. दोघांच्या सवयी सारख्या असल्याने म्हणूनच बहुतेक त्यांची मैत्री आणखीनच घट्ट झालेली होती. निसर्गाचा, पावसाचा आणि प्रवासाचा आनंद घेत ते दोघे ठरलेल्या हॉटेलजवळ पोहोचले.


त्यांनी बुक केलेले हॉटेल हायवेच्या बाजूलाच होते. ते हॉटेलच्या आवारात गाडी थांबवून हॉटेलमध्ये जाऊ लागले. हॉटेलमध्ये जाताना हॉटेलबाहेर दोघांना रुग्णवाहिका आणि बरीच माणसे दिसली.


'शीट यार ! इतक्या वर्षांनी आम्ही सगळे एकत्र भेटणार आहोत. अजून आमच्या पिकनिकची सुरुवात देखील झाली नाही आणि हे काय भलतंच?’ त्या दोघांच्या मनात आले.


खरेतर त्यांच्या मनात काहीशी भीतीची पाल चुकचुकली होती, परंतु तिकडे दुर्लक्ष करून ते दोघे आत हॉटेलच्या आत शिरले.
कसली भीती त्यांच्या मनात दाटून आली होती? वाचा पुढील भागात.
:
क्रमशः
©®चेतन सुरेश सकपाळ.

🎭 Series Post

View all