टपरीचे गुपित.
भाग ५(अंतिम भाग.)
भाग ५(अंतिम भाग.)
त्या माणसाच्या मागावर ते तिघे जाऊ लागले. मुसळधार कोसळणार्या पावसाचा जोर काही कमी होण्याचे नाव घेत नव्हता. दुसरीकडे विकास आणि सीमाला तशीच एक छत्री हातात घेतलेल्या मुलीची आकृती अंधारात दिसु लागली. ते तिला बघून तिच्या मागे झपाझप पावले टाकू लागले.
अचानकच निखिलचा आवाज पूर्णपणे बंद झाला आणि दुसऱ्याच कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येऊ लागला. ते सगळेजण त्या आवाजाचा शोध घेऊ लागले. त्यांना तो आवाज समोरच्या झाडाच्या मागून येत असल्याचे समजले.
"कोण आहे तिकडे? निखिल तू आहेस का?" विकासचा प्रश्न ऐकून तो आवाज अचानक बंद झाला आणि झाडाच्या मागून निखिलच शरीर त्यांना जमिनीवर कोसळताना दिसले.
ते बघून सगळे त्याच्याकडे धावत गेले. तोच त्यांना जोरात घोगऱ्या आवाजात कोणाचे तरी बोलणे ऐकू आले.
"थांबाऽऽ"
तो आवाज ऐकून सगळे भीतीने जागीच थांबले; पण रोहित तोपर्यंत तिथे पोहोचला. त्याने निखिलला हात लावायच्या अगोदरच त्याला एका अनामिक शक्तीने वर उचलून खाली आपटले ज्याने तो बेशुध्द होऊन निखिलच्या बाजूला पडला.
“अजून कोणी पुढे येण्याचा प्रयत्न केलात तर त्याची देखील हीच दशा होईल.” इतकं बोलून ती आकृती जोरजोरात हसू लागली
आवाज ऐकून बाकी सगळे भीतीने थरथरू लागले. दोन्ही मुली जोरजोरात रडू लागल्या.
"कोण आहेस तू? काय हवंय तुला? का छळतेस आम्हाला?" सचिनने थोडी हिंमत करून त्या आकृतीला विचारले.
"मी सखी, मी ह्या माझ्या बाबांसोबत हायवे जवळच्या त्या टपरीवर खूप वर्षांपासून चहा विकत होतो.” सचिनच्या त्या प्रश्नांवर ती आकृती थोडा वेळ शांत राहून मग दुःखी आवाजात हळूहळू रडत बोलू लागली.
“हायवेला लागून आमची टपरी असल्याने अनेक वाटसरू आमच्या इथे चहा प्यायला थांबायचे. काही वर्षांपूर्वी अश्याच एका मुसळधार पावसाळी संध्याकाळी दोन बाईक स्वार आमच्या टपरीवर आले. बाहेर बऱ्यापैकी अंधार होता. त्या दोघांशिवाय तिथे अजून कोणी नव्हते. ते दोघे दारू पिऊन बेधुंद अवस्थेत होते. माझे बाबा टपरीच्या मागे काम करत होते. त्या दोघांनी माझ्या कडे चहा मागितला. मी त्यांना चहा नेऊन दिला तोच त्यातील एकाने चहाचा ग्लास जमिनीवर फेकून अचानक माझा हात घट्ट पकडला. मी जोरात ओरडले. हात सोडवून घेण्यासाठी प्रयत्न करू लागले होते.
माझा आवाज ऐकून बाबा समोर आले. त्यांनी त्यांना थांबवायचा प्रयत्न केला पण त्यातील दुसऱ्याने त्यांना मागे धक्का दिला ज्यामुळे त्यांचं टपरीच्या खांबावर डोकं आपटल. त्याच संधीचा फायदा घेत ते दोघे मला जबरदस्ती बाईकवर बसवून आत जंगलात घेऊन आले. बाबा उठून जिवाच्या आकांताने बाईकच्या मागून पळत आले. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. त्यांच्या डोळ्यांसमोर समोर त्यांच्या मुलीवर शारीरिक अत्याचार सुरू होता..." त्या आत्म्याची कर्मकहाणी ऐकून सगळ्यांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले.
"त्यांना थांबवायचा बाबांनी खूप प्रयत्न केला पण माझ्या बाबांना त्या नराधमांनी डोक्यात दगड घालून माझ्या डोळ्यांसमोर मारून टाकले आणि मला ते सगळं असह्य झाले आणि मी देखील तिथेच माझा प्राण सोडला.”सखी पुढे सांगू लागली.
माझा आणि बाबांचा जीव गेलेला बघून ते दोघे घाबरले. त्यांनी लगेचच दोन खड्डे खोदले आणि आम्हाला दोघांना ह्याच जागी गाडून टाकले पण आम्ही त्यांना सोडणार नाही आज आमचा बदला पूर्ण होणार". इतकं बोलून ते दोघे जोरजोरात हसू लागले.
काही वेळाने निखिल आणि रोहितला शुध्द आली. त्यांनी दोघांनी हळूहळू डोळे उघडले तोच त्यांना कळले की ते हायवेच्या मधोमध उभे होते आणि समोर रस्त्याच्या कडेला त्यांना ती टपरी आणि त्या टपरीवर सखी आणि तिचे बाबा त्यांच्याकडे बघत स्मित करताना दिसले. त्यांना काही समजण्याच्या आत त्यांच्या डोळ्यांची पापणी लवता न लवता एक ट्रक भरधाव वेगाने आला आणि दोघांना उडवून तिथून निघून गेला.
आत जंगलात त्या दोन्ही आकृती, निखिल आणि रोहित तिथून सगळ्यांच्या नजरे समोरून गायब झालेले बघून सगळेजण धावतच त्या वाड्याच्या जवळ आले. तिथे पोहोचल्यावर सगळ्यांना वेगळाच धक्का बसला. तिथे आता वाडा नसून त्या जागी त्यांचं सामान जमिनीवर त्यांना उघड्यावर पडलेले दिसले. आपल्या गाडीत सामान ठेऊन ते सारेजण हायवेवरील टपरीजवळ गेले.
तेव्हा त्यांना ती टपरी ओसाड पडलेली दिसली जणू ती वर्षानुवर्षे बंदच आहे. टपरीच्या बाजूला नजर टाकताच त्यांना निखिल आणि रोहितचे मृत्युमुखी पडलेले देह दिसले. दोघांचे मृतदेह पाहून सगळ्यांनी आक्रोश केला. शांत झाल्यावर एकमेकांना धीर देत चौघांनी एकमेकांकडे प्रश्नार्थक पाहिले आणि त्यांना सखीचे वाक्य आठवले..
"..पण आम्ही त्यांना सोडणार नाही. आज आमचा बदला पूर्ण होणार."
समाप्त.
©®चेतन सुरेश सकपाळ
©®चेतन सुरेश सकपाळ
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा