तर मग आता पुढे काय....? भाग १

Tar Mag Ata Pudhe Kay
तर मग आता पुढं काय (भाग १)


सारिका एकटीच एका रस्त्यावरून चालत निघाली. रात्रीची वेळ रातकिड्यांचा आवाज. जमेल तितकं भराभर चालत निघाली. दूर दिसणारे दिवे गाठायचा प्रयत्न चालू होता सारीकाचा. मनात भिती वाटत होती. निर्मनुष्य रस्ता फक्त सारीकाच्या चप्पलचा आवाज. इतक्यात अचानक भरीला भर पावसाची भुरभुर सुरू झाली. खरंतर तिच्या मनात खूपच भिती होती. रामाच नाव घेत होती. चालून चालून पाय दुखायला लागले पण जाणं जरूरी इतकं होतं की तिला चाललायच होते. कधी एकदा पोहचतो असे वाटत होते.

तिला मागून कोणी येत आहे असे वाटले. मागे वळून पाहिले तर एक सावली दिसली तर तिचीच सावली आहे असे म्हणत मनाला कसंबसं शांत करण्याचा प्रयत्न केला. इतक्यात वीज चमकली आणि जोरात कडकडाट झाला. भीतीने तिला घाम फुटला हाताची मूठ बंद केली त्यात तिच्याच ओढणीचा कोपरा पकडून दाबला. ती जागीच थांबली. विजेच्या कडकडाटाने आसमंत दुमदुमून टाकला. पाऊस जोर धरू लागला.

सारीका आता धावतच निघाली ओढणीचे भान नाही. जीव मुठीत धरून पळत सुटली. अचानक पाय सरकून पडलीही परत कशीबशी सावरत उठली. रडूच कोसळले पणं इतक्या शांत ठिकाणी रडले आणि आवाज ऐकून कोणी आलें तर ?, या भितीने कसंबसं तोंड दाबून रडणं थांबवले.

पहिले तर पडल्याने चप्पल तुटली. आता काय करावे. चपला हातात घेऊन पळायचे ठरले. ओढणी बांधून घेतली चपला हातात घेऊन पळायला लागली होती. वळणं, चढ पार केले. लांबचे दिवे गाठून मागे गेले. कधी एकदा पोहचते असे वाटत होते. दोन वळणं पार केली. कधीच एकटीने काही करायला भिती वाटणारी आज इतका रस्ता एकटीने पार केला होता. परीस्थिती माणसाला सगळे शिकवते. एवढं एकटीने चालली तिलाच तिच्या बद्दल खूप आश्चर्य वाटले. रामाचे आभार मानले. अजून खूप चालायचे होते.

सारिका घामाघूम झाली, पावसाने भिजली सगळे एकच झाले होते. चालून दम भरला होता. तहानेने व्याकूळ झाली होती. आता चालवत नव्हते. काय करावे चालण्यासाठी जीव एकवटून निघाली. शरीरयष्टी तशी मध्यम फार जाड नाही फार बारीक नाही. ऊंच, गोरी गोमटी, केस चालून विखूरलेले लांब सडक मोकळे सोडलेले कसलीही शुद्ध तिला नव्हती. फक्त पोहचायचे होते. पाऊस, विजेचा लखलखाट, ढगांचा कडकडाट, अश्या अंधारात चालतं इतक्या लांब येण्याचं दिव्य तिनें पार केले होते. कुणीही विश्वास ठेवणार नाही. पण सारीका आज धाडसी आहे हे सिद्ध केले होते. आता वेळेला उभी राहिली होती.

करता करता अचानक त्या जून्या मोठ्या वाड्याच्या बाहेर येऊन ऊभी राहीली. अंगणात कुत्रे भुंकू लागले. तशी धावतच वाड्याच्या मोठ्या दरवाजातून आत शिरली. बऱ्याच दिवसांपासून कोणीही रहात नसल्याने जाळे जळमटं झाले होते. वाड्याच्या दरवाजाचा तो करर् आवाज. आत काळोख, पण वाडा ओळखीचा असल्याने सारीका तशीच आत निघाली. इतक्यात तिला मागून कोणी धरलं आहे असे समजले मागे वळून पाहिले तर ओढणी मागे अडकली होती. ती काही केल्या निघेना शेवटी थोडी फाटली.

तशीच आत निघाली देव घराकडे जात असताना एक मांजर अचानक निघाली. सारीका घाबरून गेली होती. देव घरात जाणार मध्ये तर एका खांबाला धडकली. कपाळावर लागले जोरात.
तोंडात वेदनेनेआपसूकच शब्द आला "आई गंss "

वाऱ्याच्या झुळूकेने एक खिडकी जोरात आदळत होती. त्या आवाजाने धस्स झाले छातीत, धावतच जाऊन खिडकी बंद केली.. देव घराकडे निघाली चाचपडत कशीबशी पोहोचली. वाडा, देवघरं दोन्ही मोठं होते. देव घराच्या कोनाड्यात कुठे काडीपेटी आहे का हातानेच चाचपडत होती. हाताला लागताच काडी ओढून पेटते का पाहू लागली. काडी खूपदा ओढून शेवटी कशीबशी पेटली

. हा भुताचा वाडा असल्याने कोणी येणार नाही असे स्वतः ला समजावत होती. रामाची मूर्ती दिसली सीतेची, लक्ष्मणाची मुर्ती, हनुमानाची मूर्ती, पाहून एक बळ येत स्वतः ला सावरले.

भूत आहे ती आपलीच आई आपल्याला काही करणार नाही आपणच तिचे अतिशय आवडीचे लाडकं बाळं म्हणून जरा शांत होतं होती. आलीच तर आपलीच आई भेटेल आणि भेटावी अशी इच्छा होती सारीकाची मनातील सुप्त इच्छा उसळून बाहेर येत होती. सारीकाने आईची फोटो फ्रेम खुंटीवर टांगून ठेवलेली शोधून काढली. मोठी फ्रेम खुंटीवरून हळूहळू काढून घेतली. आता रामा जवळचा अंगारा घेतला तो कशात घ्यावा शोध केला एका कागदात पुडी केली. आता फ्रेम खुंटीवरून काढलेली आपल्या आईची म्हणून छातीशी घट्ट धरली.

आता निघावे, पायऱ्या उतरत दारा पर्यंत आली थबकली मागे आई कुठे दिसते का पाहू लागली. आई विना पोरं आपल्या आईला आतूर नजरेने काळोखात शोधत होती. आपला वाडा न्याहाळत होती. इतके वर्ष याच वाड्यात राहिलो बालपण गेले तो पाहिला. आता निघाली तर वाड्याचे दार उघडेना. काही केल उघडेना. जोरात ओढू लागली..


क्रमशः


सौ. भाग्यश्री चाटी सांबरे
©®

🎭 Series Post

View all