Login

तरतूद (लघुकथा)

आपल्या जोडीदाराने आपल्या भविष्यासाठी केलेली तरतूद भावनेच्या आहारी जाऊन कधीच कुणाच्या नावे करू नये. लाचारीने जगण्यापेक्षा किंवा इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वाभिमानाने जगणे कधीही चांगले..
#लघुकथालेखनस्पर्धा

लेखन - अपर्णा परदेशी

शीर्षक - तरतूद (लघुकथा)

दमयंती अगदी शांतपणे आरामखुर्चीवर बसली होती. तिथे बसल्याने तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता. त्या खुर्चीच्या हातांवर हात फिरवताना तिला तिच्या दिवंगत नवऱ्याचा स्पर्श जाणवला.

"आई, मग काय ठरले तुझे? सह्या देणार आहेस की नाही?"

आपल्या मुलाचे चिरागचे बोलणे ऐकून दमयंतीला मनोमन वाईट वाटले. पण तिने ते चेहऱ्यावर भासू दिले नाही.

"हे बघ चिराग, मी एक निर्णय घेतला आहे."

"कोणता? सर्व संपत्ती माझ्या नावावर करण्याचा का? बघ, तू उगाचच वेळ वाया घालवत होतीस. शेवटी तयार झालीच ना." चिराग चेहऱ्यावरील आनंद लपवत घाईघाईने म्हणाला.

"नाही. दुसरीकडे राहायची व्यवस्था कर." तिने दीर्घ श्वास घेत म्हटले.

हे ऐकल्यावर त्याचा चेहरा खाडकन उतरला.

"तू कुठेच जायचे नाही. लोक आम्हाला नावे ठेवतील. वडिलांच्या पश्चात आईला घराबाहेर काढले म्हणून आमच्यावर तोंडसुख घेतील." अर्धवट समजून चिराग तावातावाने म्हणाला.

"मी कशाला कुठे जाऊ? हे घर माझे आहे. तुम्ही तुमची सोय दुसरीकडे करा."  आता तिने जरा वरच्या पट्टीत सुनावले.

"काय?" चिराग आणि त्याची बायको शर्वरी दोघं जवळ जवळ किंचाळलेच.

"अरे, तुम्हाला दोघांना हे चार खोल्यांचं घर पुरत नाहीये ना, म्हणून सांगतेय." पुन्हा संयम राखत दमयंती म्हणाली.

"त्यासाठीच तर घर विकायला सांगतोय ना आई. त्या मिळालेल्या पैशातून आणि तुझ्या नावे पप्पांनी ठेवलेल्या रकमेतून आपल्याला याहून मोठे घर विकत घेता येईल. इतकी साधी गोष्ट तुला कळत कशी नाहीये." चिराग आवाज चढवत म्हणाला.

"मला त्याची गरज नाही वाटत. हे घर आम्ही स्वकष्टाने काडी काडी जमा करून उभे केले आहे. तुझ्या पप्पांच्या असंख्य आठवणी ह्या घरात दडल्या आहेत. त्यांनी त्यांचा शेवटचा प्रवास इथेच थांबवला. मलाही माझा शेवटचा श्वास इथेच घ्यायचा आहे. तुला इथे राहायचे नसेल तर तू इथून जाऊ शकतोस. यापुढे मला माझ्या घरात शांतता हवी आहे. तुझी रोजची कटकट मला वयोमानानुसार झेपत नाही आता." दमयंतीने त्याला स्पष्ट शब्दात सांगितले.

"म्हणजे ? तू आम्हाला ह्या घरातून हाकलून देत आहेस. काही कळतंय का तुला? आपल्या एकुलत्या एक मुलाशी कोणती आई अशी वागते?" चिराग जरा डाफरलाच.

"ही वेळ तुच आणली माझ्यावर. तुझे वडील जाण्यापूर्वी माझी सर्व सोय करून गेले आहेत. जेणेकरून मी कुणावर अवलंबून राहू नये. तू आताच असा वागतोय तर मग नंतर मी तुझ्याकडे आश्रितासारखी का राहू? त्यापेक्षा मी माझ्याच घरात सन्मानाने राहते ना. मला तुझी गरज नाही." त्यांनी त्याला निक्षून सांगितले.

"आई उगाचच काहीतरी बडबड करू नको. पप्पा गेल्यापासून मीच तुझा सांभाळ करतोय. तुझ्या खाण्यापिण्यापासुन तर तुझे वयोमानानुसार उद्भवणारे आजारपणं सर्वकाही मीच बघतोय. तुझ्या औषधपाण्याचा खर्च किती आहे ते माहित तरी आहे का तुला?" चिराग तणतणत बोलला.

"ते तर माझ्या पेन्शनमध्येच भागते. पण तू म्हणतोय तर झाला असेल तुझा खर्च. मग किती झाले एकूण? आपण आज सर्व हिशोब चुकता करुन टाकू. तुझे पप्पा गेल्यापासून तर आतापर्यंतचा माझ्यावर तू केलेला सर्व खर्च सांग. मी तु जन्मल्यापासून तर कमवायला लागल्यापर्यंतचा सर्व हिशोब देते. बाकी तुला मी माझ्या पोटात वाढवले ते नऊ महिने आणि तेव्हा झालेला मानसिक व शारीरिक त्रास त्याचा हिशोब राहु दे. ती तुला माझ्याकडून सूट समज." दमयंती त्याच्या नजरेला नजर देत म्हणाली.

"माझ्यासाठी तू जे काही केले ते तुझे कर्तव्य होते. उपकार नाही केले तू माझ्यावर." चिराग रागात चरफडत बोलला.

"बाळा, कुणी कुणावर उपकार केलेले नाहीये. ना मी तुला जन्म देऊन. ना तू माझा सांभाळ करून. आईवडील मुलांसाठी करतात ते कर्तव्य आणि ते म्हातारे झाल्यावर मुले त्यांचा सांभाळ करतात ते उपकार म्हटले जाते का? असं असेल तर मग मी तुमच्यावर उपकार केलेत असे समज. कारण मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला माझ्या घरात आसरा दिला आहे. मी एका कोपऱ्यात पडून राहते तरी तुम्हाला सहन होत नाही. पण गेली कित्येक वर्षे मी तुम्हाला तुमच्या मुलांसमवेत सहन करतेय."

"आई आणि मुलामध्ये व्यवहार असतो का आई?" शर्वरी थोड्या नरमाईने मध्यस्थी करत म्हणाली.

"हे तू तुझ्या नवऱ्याला का नाही सांगत. गेल्या कित्येक महिन्यांपासून त्याने सगळी संपत्ती माझ्या नावावर कर म्हणून तगादा लावला आहे. ह्या घरात तुझे सासरे आणि मी मिळून कित्येक पावसाळे काढले आहेत. मी जिवंत असेपर्यंत हे घर मी अजिबात विकू देणार नाही."

"आई, तुला माझी प्रगती होऊ द्यायची नाहीये. तुझ्या पश्चात सर्व माझेच तर होणार आहे. मग कशाला उगाच आडकाठी घालते आहेस." चिराग तिरमिरीत म्हणाला.

"माझ्या पश्चात ना? पण आता मी हयातीत आहे. तुझी प्रगती तू तुझ्या हिमतीवर आणि मेहनतीवर कर. तुझ्यात जोर नाहीये का? माझ्या भविष्यासाठी केलेली तरतूद मी तुला का सोपवू?" त्यांनी आवाज चढवला.

"आई, आम्ही तुझे कुणीच लागत नाही का? तुझी जबाबदारी मी कधी झिडकारली तरी आहे का?  पप्पा गेल्यापासून मी अगदी मनापासून तुझी काळजी घेत आलो आहे. माझ्या मताप्रमाणे मी कुठेच कमी पडलो नाही."

"चल, तुझा हा ही गैरसमज आज दूर करून देते. ते गेल्यापासून तू माझ्या बाबतीत खूप काटकसर करायला लागला आहेस. मला पचणार नाही म्हणून माझ्या जेवणात तू बदल केले. मी धडपडून कुठे पडू नये, माझे आजारपण तुला काढायला लागू नये म्हणून माझ्या राहणीमानात तू बदल केले. मी घर विकायला नकार दर्शवला, म्हणून तू माझ्यावर जमेल तितका दबाव आणला. हे सर्व मी निमूटपणे सहन केले. पण घर विकण्यासाठी तू खूप जबरदस्ती करायला लागल्यावर मात्र मी सतर्क झाली. आता माझा निर्णय पक्का झाला आहे. तुम्ही गेल्यानंतर मी एखादा भाडेकरू ठेवेल. मला त्यांची सोबत होईल व भाडेही मिळेल. शिवाय माझ्याच घरात मला कुणाचा धाक राहणार नाही."

आई इतकं स्पष्ट बोलेल असे चिरागला कधीच वाटले नव्हते. पप्पा गेल्यापासून ती शांतच झाली होती.  त्याला वाटले की आता आपल्याला अडवणारे कुणी नाही. परंतु त्याचा सर्व फासा उलटा पडला होता.

चिरागच्या डोळ्यांसमोर भविष्यातल्या आर्थिक संकटाचा डोंगर उभा राहिला. आईने तडकाफडकी बाहेर काढून दिल्यावर आपले खूप हाल होतील. एकट्याच्या पगारावर भागणार नाही. आई आता भावनेच्या आहारी जाऊन कुठलाच निर्णय घेणार नाही हे चिरागला चांगलेच कळून चुकले होते. त्याला नमते घेण्याशिवाय पर्यायच उरला नव्हता.

तो हतबल आणि निराश होऊन मटकन आईच्या पायाजवळ बसला.

"आई मी चुकलो. मला माफ कर."

असे म्हणून तो दमयंतीची मनधरणी करू लागला.

"चिराग सध्या तुला मी मोठ्या मनाने माफ करत आहे, परंतु यापुढे जरा जपूनच वाग. सारखं सारखं माफ करायला मला जमणार नाही. मला माझ्या हक्काच्या घरात स्वाभिमानाने जगू दे. माझे थोडेच दिवस उरले आहेत. ते मला लाचारीत नाही काढायचे. तू तुझ्या जागी कितीही योग्य असला तरी मी ही माझ्या जागी योग्यच आहे. त्यामुळे मला हलक्यात घेण्याची चूक पुन्हा करू नको."

त्याला सक्त ताकीद देऊन ती माऊली तिच्या खोलीत निघून गेली.

समाप्त.

(माझ्या कानावर पडलेल्या घटनेचे शब्दांकन केलेले आहे. आपल्याला ही कथा आवडल्यास कमेंट्स द्वारे नक्की कळवा. धन्यवाद.)