Login

ते छोटं खोटं

तीन मित्रांत झालेलं छोटंसं खोटं मोठा गैरसमज निर्माण करतं, ज्यामुळे त्यांची मैत्री तुटण्याच्या उंबरठ्यावर येते. शेवटी सत्य समजल्यावर ते जाणतात की विश्वासापेक्षा मोठं काही नसतं.
ते छोटं खोटं


कॉलेजचा पहिला दिवस होता तेव्हा आरव, सिया आणि प्रियांका हे तिघं जणू काही जन्मापासूनचे मित्र असल्यासारखे कनेक्ट झाले. पहिल्याच दिवशी एकत्र बसणं, ग्रुप प्रोजेक्ट, कॅन्टीनमधले सँडविच, हळूहळू तो तिघांचा ग्रुप संपूर्ण कॉलेजमध्ये "तीन मित्र" म्हणून ओळखला जाऊ लागला.

तीन वर्षांचं कॉलेज आयुष्य एकदम रम्य चाललं होतं.
सगळं सुरळीत होतं… जोपर्यंत एका छोट्याशा खोट्याने तिघांची मजबूत मैत्री हादरली नव्हती.

आरव हा ग्रुपचा प्लॅनर होता, प्रवासाचे प्लॅन्स, बर्थडे सरप्राईज, असाइनमेंटची वाटणी, सगळं तो सांभाळायचा. सिया खूप चटकन हसणारी, इमोशनल, पण मनानी सोन्यासारखी. ती तिघांना एकत्र ठेवणारी दोरी होती. प्रियांका थोडी शांत, पार्टी-लव्हर, आणि सरळ बोलणारी. तिच्या खर्‍या बोलण्याने कधी कधी लोक दुखावले जायचे, पण मन मात्र स्वच्छ. तिघांचं नातं म्हणजे जणू एकमेकांशिवाय अर्धवट.

एकदा असं झालं की प्रियांकाने आरवला एक छोटासा मेसेज पाठवला, “आज संध्याकाळी भेटू एक महत्वाचं सांगायचं आहे.”
आरवने लगेच रिप्लाय केला नाही. त्याचा फोन सायलेंटवर होता आणि तो घरात धावपळीत होता.
सिया मात्र त्या वेळी कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये होती.
तिने चुकून प्रियांकाच्या मोबाईल स्क्रिनवर हा मेसेज पाहिला. तिच्या मनात शंका आली. गेल्या काही दिवसांपासून प्रियांका आणि आरव एकत्रित दिसत होते, काहीतरी बोलत होते. सिया विचार करायला लागली,
“दोघं माझ्यापासून काहीतरी लपवतायत का? माझ्याबद्दल? की… एकमेकांबद्दल?” तिचं मन हेलावलं.

संध्याकाळी आरवने प्रियांकाला मेसेज पाहून भेटायला बोलवलं. दोघं कॅफेत भेटले. हे बघून सियाच्या मनात ठिणगी पेटली.
दूरून ती बघत राहिली, हसत बोलणारे आरव आणि प्रियांका तिच्या नजरेत दोषी ठरू लागले.

कॅफेत प्रियांकाने आरवला एक फाईल दिली.
“ही सियासाठी आहे,” ती म्हणाली.
आरव चकित झाला. “इतकी मोठी फाईल? काय आहे यात?”
प्रियांका हसली, “सियाचा वाढदिवस येतोय. तिच्यासाठी एक मोठी स्क्रॅपबुक, सरप्राईज व्हिडिओ, आणि तिचे जुन्या फोटोंचे कोलाज मी बनवले आहेत. पण हे सगळं तुलाच तिच्या वाढदिवशी द्यायचं आहे.”
आरव आनंदून गेला. “वा! सिया खूप खुश होईल.”
दोघं बसून सियाच्या गिफ्टबद्दल प्लॅन करत राहिले.
पण कॅफेबाहेर उभ्या सियाला ते दिसत नव्हतं,
तिला दिसत होतं फक्त, दोघं गुपचूप भेटतायत, काहीतरी लपवत बोलतायत आणि तिला विसरल्यासारखे.
तिच्या मनातलं प्रेम शंकेनं कुरतडायला सुरुवात झाली.

दुसऱ्या दिवशी सियाने आरवशी बोलणं बंद केलं.
आरवने विचारलं तर ती “व्यस्त आहे” म्हणत टाळायची.
तो चिंतेत पडला.‌ प्रियांकाला सांगितलं तर ती म्हणाली,
“ठीक होईल. वाढदिवशी सगळं स्पष्ट होईल.”
पण तेवढ्यात प्रियांकाने एक छोटी चूक केली,
सिया विचारत होती, “काल कुठे गेली होतीस?”
त्यावर प्रियांकाने खरं सांगण्याऐवजी उगीच खोटं बोलली,
“मी तर घरी होते.”
ही एकच ओळ पुढे भयंकर पुरावा ठरली. सियाला खात्री पटली, “ही दोघं काहीतरी माझ्यापासून लपवतायत.”
तिघांतून अंतर निर्माण झालं. आरवला कारण कळत नव्हतं. प्रियांकाला वाटत होतं सगळं ठीक आहे.
पण सिया मात्र तुटत चालली होती.

सियाचा वाढदिवस आला. आरव आणि प्रियांकाने कॉलेजच्या टेरेसवर तिला सरप्राईजसाठी बोलवलं.
टेरेस लाईट्स बंद, सगळे मित्र, एक मोठा केक आणि मध्ये तिचं स्क्रॅपबुक.
लाइट्स ऑन झाले आणि सगळे ओरडले,
“हॅप्पी बर्थडे सिया!”
सिया थोडी हसली, पण तिला तो आनंद आतून जाणवत नव्हता. तेवढ्यात आरवने तिच्या हातात प्रियांकाने बनवलेलं स्क्रॅपबुक दिलं. “हे बघ… प्रियांकाने बनवलंय. तुझ्यासाठी.”
सियाने प्रियांकाकडे पाहिलं आणि तिचं मन तुटून गळून पडलं. तिच्या डोळ्यांत अश्रू येऊ लागले.

“तू… तू मला का खोटं बोललीस प्रियांका? तू काल घरीच होतीस असं म्हणालीस पण तू आरवसोबत कॅफेत होतीस!”
सगळे शांत झाले, आरव थक्क झाला.

प्रियांका हादरली. तिला आठवलं, तिनं सांगितलेलं ते छोटं खोटं.
“सिया… मी खोटं बोलले कारण मी सरप्राईज लपवत होते. तुझ्यासाठी. तुझं गिफ्ट… तुझं स्क्रॅपबुक… हे सगळं मी तुझ्यासाठी करत होते!”
सियाच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले.
“पण मी पाहिलं होतं,तुम्ही दोघं कॅफेत… मी… मी वेगळंच समजले.” आरव पुढे आला.

“सिया, तू आमच्यावर इतका कमी विश्वास ठेवला? मित्रांमध्ये छोट्या शंकेनं इतकं मोठं अंतर कसं काय आलं?”
सियाने दोघांच्या डोळ्यात पाहिलं, तिथे फक्त मैत्री होती.
न कोणती गुप्तता, न कोणतं धोका, फक्त प्रेम.
तिला तिची चूक जाणवली. एक छोटं खोटं आणि तिने उगाच मोठा गैरसमज वाढवला.
ती दोघांकडे वळून म्हणाली, “माफ करा… मी त्या खोट्याला इतकं मोठं रूप दिलं. मला तुमच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता.”
प्रियांकाने तिचा हात धरला. “कधी कधी खोटं बोलणं चूक नसतं… पण गैरसमज निर्माण करणं नक्कीच चूक असतं
आणि तुला दुखवायचा विचार कधीच नव्हता.”

तिघं मिठीत आली, हवा पुन्हा हलकी झाली.मैत्रीचा सुगंध परत परतला.
त्या दिवसानंतर तिघांनी एक नियम तयार केला,
“आपल्या ग्रुपमध्ये खोटं नसेल आणि गैरसमज असेल तर लगेच बोलून संपवायचा.”
त्या एका छोट्या खोट्यानं त्यांना मोठा धडा शिकवला,
विश्वास किती नाजूक असतो आणि शंका किती वेगानं नातं फोडते आणि खरं बोलणं किती महत्वाचं असतं.
मैत्री पुन्हा जुनी झाली, नाती पुन्हा मजबूत.
ते तिघं पुन्हा तिघंच, एकमेकांशी न तोडता येणारं नातं.