Login

चहा आणि बरंच काही भाग २७

Story of love in friendship

   आपण मागील भागात बघितलं, विद्या आणि वैभवचे संगीत छान पार पडते. मेघना व आदित्य एका गाण्यावर अप्रतिम डान्स करतात तर मनोज व जुलियाही एकत्र डान्स करतात. संगीतचा शेवट हम साथ साथ है या गाण्यावर सर्व जण मिळून डान्स करतात.

    रात्री संगीत संपता संपता खूप उशीर झाल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी कोणीच लवकर उठायला तयार नव्हते. दुसऱ्या दिवशी हळदीचा कार्यक्रम संध्याकाळी होणार असतो. सर्वांचीच सकाळ उशिरा झाल्याने सर्वांचीच आवरायची घाई गडबड सुरू असते. मेघना नेटकीच झोपेतून उठलेली असते, तिला शिवानीचा फोन येतो.

मेघना--- ( झोपेतच असल्याप्रमाणे मेघनाचा आवाज असतो) हॅलो शिवानी बोल, एवढ्या सकाळी फोन का केलास?

शिवानी--- मेघना तु अजून झोपली आहेस का? अग घड्याळ बघितलेस का? अकरा वाजले आहेत.

मेघना--- तु आईप्रमाणे बोलत काय बसलीस, फोन का केला होतास?

शिवानी--- काल मी जुलियासोबत हॉटेलवर राहिले होते. तिला सकाळपासून कोरड्या उलट्या होत आहेत आणि अंगात अशक्तपणा ही आहे.

मेघना--- मग मी काय करू?

शिवानी--- मेघना झोपेतून जागी हो आणि मनोज दादाला घेऊन लवकर हॉटेलवर ये, तसा मी डॉक्टरांना कॉल केलेला आहे तेही थोड्या वेळात इथे पोहोचतील.

मेघना--- हो आम्ही लगेच पोहोचतो.

    मेघना मनोजला जुलियाची तब्येत बिघडल्याचे सांगते, मनोजने ऐकल्यावर तो लगेच पॅनिक होतो. मनोज व मेघना पटपट आवरून घरातून बाहेर पडतात. मेघना आईला सांगते की मनोज दादाला थोडी शॉपिंग करायची आहे, आम्ही थोड्याच वेळात मार्केटमध्ये जाऊन येतो. मनोज आणि मेघना हॉटेलवर पोहोचेपर्यंत डॉक्टर तिथे आलेले असतात. 

मनोज---( खूप पॅनिक होऊन बोलत असतो) शिवानी जुलिया कुठे आहे? कशी आहे? तिला अचानक काय झालंय?

शिवानी--- दादा शांत हो थोडा, आत्ताच डॉक्टर आले आहेत, ते तिची तपासणी करत आहेत. जुलियाला सकाळपासून कोरड्या उलट्या होत आहेत आणि अशक्तपणा ही जाणवत आहे. कदाचित तिला भारतातील हवामान मानवले नसेल म्हणून त्रास होत असेल.

   मनोज खूप चिंतेत असतो, तो डॉक्टर बाहेर येण्याची वाट बघत असतो. थोड्याच वेळात डॉक्टर रूमच्या बाहेर येऊन शिवानीला व मेघनाला आतमध्ये बोलावतात, मनोजला बाहेरच थांबायला सांगतात.

डॉक्टर--- शिवानी ही मुलगी कोण आहे?

शिवानी--- काका ही माझी मैत्रीण आहे, जुलियाला काय झालं आहे?

डॉक्टर--- आपल्याला काही टेस्ट कराव्या लागतील मगच कन्फर्म न्युज कळेल, पण माझ्या आजवरच्या अनुभवावरून मला अस वाटतंय की she is pregnant.

मेघना--- what? 

डॉक्टर--- शिवानी मी काही टेस्टची नावे लिहून देतो, त्या त्वरित करून घ्या म्हणजे आपल्याला पुढील ट्रिटमेंट चालू करता येईल. पेशंटला अशक्तपणा खूप आलेला आहे.

एवढे बोलून डॉक्टर रूम मधून बाहेर पडतात. डॉक्टर बाहेर गेल्यावर मनोज आतमध्ये येतो.

मनोज--- काय झालंय जुलियाला? डॉक्टर काय म्हणाले?

शिवानी--- दादा डॉक्टरांनी काही टेस्टस करायला लावल्या आहेत. डॉक्टर अस म्हणत होते की जुलिया pregnant असू शकेल आणि तिची pregnancy कन्फर्म करण्यासाठी ह्या टेस्टस करायच्या आहेत.

जुलिया--- टेस्टस करण्याची काही गरज नाहीये. मला माहित आहे की मी pregnant आहे.

मेघना--- जुलिया जर तुला माहीत होते की तु pregnant आहेस मग अशा अवस्थेत एवढा लांबचा प्रवास करायचा कशाला? जुलिया R u married?

जुलिया--- yes मेघना, I'm married.

मेघना--- तुला तुझ्या नवऱ्याने भारतात येऊ कस दिल? आणि तेही एकटीने.

जुलिया--- मेघना मी भारतात माझ्या नवऱ्यासोबतच आली आहे.

मेघना--- कुठे आहे तो?

जुलिया--- तुझ्या बाजूलाच उभा आहे.

मेघनाने बाजूला पाहिले तर तिथे मनोज खाली मान करून उभा होता.आत्ता मेघनाच्या सर्व गोष्टी लक्षात येऊ लागल्या, सर्व घटनांचा हळूहळू क्रम लागू लागला, मेघनाच्या घशाला कोरड पडली, मेघनाने बसण्यासाठी सोप्याचा आधार घेतला.

शिवानी--- मेघना मी निघते, हा तुमच्या घरचा मॅटर आहे, माझे इथे काही काम नाहीये.

मेघना--- शिवानी आत्ता इथे जे काही घडलंय ते कुणाला सांगू नकोस, मी तुला फोन करते.

शिवानी रूम मधून निघून जाते.

मेघना--- दादा काय आहे हे? जुलिया काय म्हणत आहे? आतातरी सविस्तर सर्व सांगशील का? ( मेघनाच्या डोळ्यात पाणी होते)

मनोज--- मेघना जुलिया म्हणते ते खरे आहे, Juliya is my wife. 

मेघना--- दादा तु लग्न कधी केलंस?

मनोज--- मेघना मी अमेरिकेत गेल्यावर जुलिया आणि माझी ओळख झाली, जुलिया आणि मी एकाच कंपनीत जॉब करायचो, आमच्यात हळूहळू मैत्री झाली आणि त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. जुलिया आणि मी जवळजवळ एक वर्ष लिविंग रिलेशनशिप मध्ये राहत होतो त्यानंतर म्हणजे सहा महिन्यांपूर्वी आम्ही लग्न केले.

मेघना--- दादा तुला कळतंय का? तु काय केले आहेस? मला सुरवातीला वाटले होते की जुलिया तुझी गर्लफ्रेंड असेल आणि तु तर डायरेक्ट लग्नच करून आलास. दादा आपल्या बाबांना हे सगळं चालेल का? याचा एकदा तरी विचार केलास का? लग्न करण्याआधी तुला एकदाही आमचा कोणाचाच विचार आला नाही का?

मनोज--- मेघना जुलियावर माझे खूप प्रेम आहे, मी जुलिया शिवाय राहूच शकत नाही. मी जर लग्नाआधी बाबांना किंवा तुम्हाला सांगितले असते तर माझे लग्न जुलियासोबत होऊच शकले नसते.

मेघना--- दादा माझं सोड पण ज्यांनी तुला जन्म दिला आहे त्यांना तुझ्या लग्नाबद्दल सांगावं एवढाही त्यांचा तुझ्यावर अधिकार राहिला नाहीये का? बाबांनी तुझ्या लग्नाला कधीच परवानगी दिली नसती पण त्यांना एकदातरी विचारायला हवे होते. दादा बाबांनी आपल्यासाठी खूप काही केले आहे. तु आज जो कोणी आहे त्यांच्यामुळेच आहे हे विसरू नको.

मनोज--- मेघना तु तरी मला समजून घे ना. विद्याचं लग्न झालं की आई बाबांना सर्व खरं खर सांगेन तोपर्यंत प्लिज कोणाला काहीच सांगू नकोस.

मेघना--- दादा कोणाला काही सांगण्याची माझ्यात हिम्मतही नाहीये. तु जे काही करून ठेवलं आहे ते तुच निस्तर कारण ज्यावेळी आई बाबांना खर काय आहे ते कळेल त्यावेळी आई बाबा कोलमडतील आणि त्यावेळी मलाच त्यांना सांभाळावे लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट जुलिया तु लग्नात कुठल्याच कार्यक्रमाला येऊ नकोस म्हणजे अजून घोळ होणार नाही आणि या सगळ्यात शिवानी फसणार नाही.

मनोज--- मेघना मला माफ करशील. 

मेघना--- दादा आई बाबांनी तुला माफ केलं तरच मी तुला माफ करेल. आता हे सगळं आई बाबांना कळल्यावर काय होईल याची कल्पनाही मला करवत नाहीये. मी निघते आता, तुमच्या दोघांमध्ये माझं काही काम नाहीये. तुला यायच असेल तर लवकर ये आणि हो तुझ्या बायकोची व तुमच्या होणाऱ्या बाळाकडे नीट लक्ष दे. घरी न येण्याचे काय कारण सांगायचे असेल ते तुच आईला फोन करून सांग, इथून पुढे मी तुला कुठल्याही प्रकारची मदत करू शकणार नाही किंवा माझ्याने ते होणारच नाही.

   एवढं बोलून मेघना तिथून निघून जाते. मेघनाला खूप मोठा धक्का बसलेला असतो.मेघना डोळे पुसून, स्वतःला सावरून लग्नघरी जायला निघते.

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all