आपण मागील भागात बघितलं, विद्याची हळद मजा मस्ती करत पार पडली. आदित्यने मेघनाला हळद लावली.
हळद लागल्यानंतर मेघनाच्या बाबांनी आदित्यसोबत थोडेफार बोलण्याचा प्रयत्न केला. आदित्य सोबत बोलल्यावर मेघनाच्या बाबांच्या अस लक्षात आले की आदित्यचा स्वभाव खूप चांगला आहे तसेच तो एक व्यक्ती म्हणून खूप छान आहे. मेघनाच्या बाबांचे व आदित्यचे सूत जुळले हे बघून मेघनाला आनंद झाला होता पण त्यापेक्षा मनोज आणि जुलिया बद्दल बाबांना जेव्हा कळेल तेव्हा बाबांना किती मोठा धक्का बसेल याचे टेन्शन तिला जास्त आले होते. आदित्यच्या नजरेतून मेघनाचा चिंताग्रस्त चेहरा काही सुटला नाही पण त्या दिवशी आदित्यला मेघनासोबत बोलायला वेळच भेटला नाही.
दुसऱ्या दिवशी मेघनाशी बोलणे होईल या आशेने आदित्य लग्नासाठी जरा लवकरच आला. आदित्यने मेघनाला फोन करून मंगल कार्यालयाच्या बाहेर बोलावून घेतले.
मेघना--- काय झालं आदित्य? मला इथे या वेळी का बोलावलं आहेस?
आदित्य--- तुला बघावेसे वाटले म्हणून बोलावलं, माझा एवढाही हक्क नाहीये का?
मेघना--- आदित्य ही वेळ रोमांस करण्याची नाहीये, मला खूप काम आहेत, विद्या दीदी मला शोधत असेल.
आदित्य--- मेघना तुला काय झालंय?
मेघना--- कुठे काय? मी तर ठीक आहे.
आदित्य--- तु ठीक नाहीयेस. तुझ्या चेहऱ्यावर आलेले हसू खोटे आहे. दुसऱ्या कोणाला तुझा चेहरा वाचता येत नसेल पण मला तुझा चेहरा वाचता येतो. तु कसल्या टेन्शन मध्ये आहेस? तुला काही सांगायचे नसेल तर नको सांगू पण तु मला सांगितलंस तर कदाचित मी तुझी काही मदत करू शकेल.
मेघना--- आदित्य अस नाहीये की मला तुला सांगायचे नाही पण परिस्थितीच अशी विचित्र आहे ना की मला काय करु आणि काय नको करू हेच कळत नाहीये. सगळा गोंधळ होऊन बसला आहे.
आदित्य--- मेघना मला कळेल अश्या भाषेत बोलशील का?
मेघना--- आदित्य प्लिज हे कोणालाच सांगू नकोस. मनोज दादाने आम्हाला न सांगता सहा महिन्यांपूर्वी जुलिया सोबत लग्न केले असून जुलिया प्रेग्नन्ट आहे.
आदित्य--- जुलिया म्हणजे तिच ना जी दादासोबत डान्स करत होती.
मेघना--- हो तीच, आई बाबांना सत्य परिस्थिती कळाल्यावर घरी काय होईल याची कल्पना मला करवत नाहीये. मी आई बाबांना कस सावरू? बाबांना लव्ह मॅरेज आवडत नाही, ते कसे रिऍक्ट होतील हेही सांगता येणार नाही.
आदित्य--- मेघना तु रिलॅक्स हो. जे सत्य आहे ते आपण बदलू शकत नाही. तु स्वतःला सावर आणि आई बाबांनाही तुलाच सावरायला लागेल. दादावर आई बाबा चिडतील, रागावतील पण तु समजदारीने घे.
मेघना--- आदित्य मी निघते, विद्या दिदीसोबत पार्लर मध्ये जायचे आहे.
मेघना आदित्यला भेटून निघते, आदित्यसोबत बोलल्या मुळे मेघनाच डोकं थोडं शांत झाले होते. विद्या आणि वैभवचे लग्न थाटामाटात पार पडले. लग्न आटोपल्यावर सर्वच नातेवाईक मंडळी आपापल्या घरी जायला निघाली तसेच मेघना, मनोज व त्यांचे आई बाबा आपल्या घरी गेले. घरी गेल्यावर सर्वच थकले असल्याने मेघनाच्या आईने रात्रीच्या जेवणासाठी फक्त तांदळाची खिचडी केली. लग्नाच्या गप्पा मारत मारत सर्वांनी खिचडीवर ताव मारला. जेवण चालू असतानाच मनोजला जुलियाचा फोन आला. बाबांना जेवतांना फोनवर बोललेलं चालत नाही हे माहीत असूनही मनोज फोनवर बोलण्यासाठी ताटावरून उठून बाजूला गेला. मनोज फोनवरचे बोलणे संपवून परत आल्यावर बाबांनी मनोजकडे रागाने पाहिले. आईने बाबांना नजरेनेच खुणावून सांगितले की आत्ताच काही बोलू नका.
जेवण झाल्यावर बाबा हॉलमध्ये बसले होते, त्यांनी मनोज, मेघना व मेघनाच्या आईला तिथे बोलावून घेतले.
बाबा--- मला तुमच्या सर्वांशी काही बोलायचे आहे. विद्याचे लग्न जसे थाटामाटात पार पडले तसेच मला तुमच्या दोघांचीही लग्ने थाटात पार पडावी अशी माझी इच्छा आहे. मनोज तु इतकी वर्षे तुझ्या मनाचे धकवलेस, तुला अमेरिकेत नोकरी करायची होती ती केलीस पण मला अस वाटत की तु आता भारतात नोकरी शोधावीस. असा किती दिवस तु आमच्यापासून दूर रहाणार आहेस?
मनोज--- बाबा भारतात मला तेवढ्या पगाराची नोकरी मिळणार नाही. मला भारतात सेटल व्हायचे नाहीये. मी अमेरिकेतच रहाणार आहे.
बाबा--- मनोज आपल्याकडे काय कमी आहे, देवाच्या कृपेने सर्व आहे. तुला नोकरी करायची नसेल तर आपण एखादा बिजीनेस सुरू करू, तुला भांडवल मी पुरवतो. आमची दोघांची वय होत चालली आहे, तु इथे नसशील तर आमच्याकडे कोण बघेल?
मनोज--- तुम्ही माझ्या बरोबर तिथे चला, तिथे तुम्ही नक्कीच आरामात रहाल. तुम्हाला सर्व सुख सोयी मी पुरवेल. इथे राहून बाबा काहीच होणार नाही.
आई--- मनोज बाबा बोलता ते खरे आहे. आपले सर्व नातेवाईक इथे आहेत, तिकडे त्या अनोळखी देशात आपण कस रहायचं? आमचं एवढं आयुष्य इथे गेलंय, आम्हाला तिथे करमणार नाही.
मनोज--- आई नातेवाईकांचे काय घेऊन बसलीस? मला तर कधीच त्यांची आठवण येत नाही. तुम्हाला माझ्यासोबत यायचे असेल तर चला पण मला इथे कायमस्वरूपी रहायला जमणार नाही
आई--- बरं तुला नसेल इथे रहायचं नको राहूस, आता सुट्टी आहेच तर तुझ्यासाठी मुली बघू का?
बाबा--- एखादी मुलगी आवडली तर साखरपुडा करून ठेऊ आणि पुढच्या सुट्टीत लग्न करता येईल. मेघना तुला काय वाटतं?
मेघना सर्वांची चर्चा शांत बसून ऐकत होती. आई बाबांनी मनोजच्या लग्नाचा विषय काढल्यावर ती मनातल्या मनात बोलली "आई बाबा दादाचे लग्न आधीच झालेय, तुम्ही त्याच्या लग्नाचा विचार करू नका आणि आपला दादा परत भारतात कायमस्वरूपी कधीच रहायला येणार नाही ही सत्य परिस्थिती तुम्हाला स्विकारावी लागेल."
मेघना--- बाबा लग्न दादाला करायचे आहे, त्याला जे योग्य वाटेल ते करा. मी त्याच्या बाबतीत निर्णय घेणारी कोण आहे? दादा तुच सांग तुला लग्न करायचे की नाही?
मनोज--- (दीर्घ श्वास घेऊन) आई बाबा मला लग्न करायचे नाहीये.
बाबा--- का? अरे ठराविक वेळेत लग्न झालेले बरे. लग्नाला उशीर करून कस चालेल?
आई--- मनोज तुला हवी तशी मुलगी आपण शोधू. तुझ्या मनाविरुद्ध आम्ही काहीच करणार नाही.
मनोज--- आई बाबा माझं लग्न झालंय.
आई--- काय!
आई बाबांची काय प्रतिक्रिया असेल हे बघूया पुढील भागात...
©®Dr Supriya Dighe