आपण मागील भागात बघितलं, मेघनाच्या आई बाबांनी मनोजकडे लग्नाचा विषय काढल्यावर मनोजने त्याचे लग्न झाले आहे असे सांगितले. आता बघूया पुढे काय होईल
आई--- मनोज हे काय बोलत आहेस? तु आमची गम्मत करत आहेस ना? तुझे लग्न झाले आणि आम्हाला कसे माहीत नाही?
बाबा--- मनोज हा काय पोरकटपणा आहे. तु काय बोलतो आहेस ते तुला तरी कळतंय का?
मनोज--- आई बाबा मला मान्य आहे की तुम्हाला हे ऐकून खूप मोठा धक्का बसणार आहे पण माझे लग्न झाले आहे हे वास्तविक सत्य आहे. मी गम्मत करत नाहीये.
थोडयावेळ घरात स्मशान शांतता पसरते, कोणीच कोणाशी काहीच बोलत नाही, बाबांचा चेहरा रागाने लालबुंद झालेला असतो, ते जागेवरून उठून फेऱ्या मारू लागतात, आईच्या डोळ्यात पाणी येते, मनोज खाली मान घालून बसलेला असतो.
मेघना--- बाबा तुम्ही फेऱ्या मारू नका, एका जागी शांत बसा, आई डोळ्यातील पाणी पूस. दादा आई बाबांना अर्ध सत्य सांगू नकोस त्यांना पूर्ण सत्य परिस्थिती सांग. तसाही त्यांना जो धक्का बसायचा आहे, तो बसणारच आहे.
आई--- म्हणजे मेघना तुला हे सर्व माहीत होतं.
मेघना--- हो आई, मला हे कालच कळालं आणि ते पण दादाकडून नाही तर दादाच्या बायको कडून कळाले.
आई--- तु याच्या बायकोला भेटली सुद्धा आणि मला किंवा तुझ्या बाबांना काहीच कल्पना दिली नाही.
मेघना--- आई मी हे सर्व तुम्हाला कालच सांगितलं असतं तर लग्नात सर्वांना कळालं असतं, तु सर्वांपासून तुझी रिऍकॅशन लपवू शकली असती का? मला सर्वांपासून लपवता लपवता किती नाके नऊ आले हे मलाच माहीत.
बाबा--- ( रागात) मनोज लग्नासारखा एवढा मोठा निर्णय घेताना तुला एकदाही आम्हाला विचारावे वाटले नाही किंवा लग्न केल्यावर सुद्धा स्वतःहून आम्हाला सांगावे वाटले नाही. असा आम्ही तुला वाढवताना काय चुक केली होती.
मनोज--- बाबा मी लहानपणापासून बघत आलोय, लव्ह मॅरेज बद्दल तुमचे मत काही चांगले नाही. मी लग्न करताना तुम्हाला विचारले असते तर तुम्ही कधीच स्वखुशीने लग्नाला परवानगी दिली नसती आणि आईने तर इमोशनल ब्लॅकमेल केले असते. आई बाबा माझे जुलियावर खूप प्रेम आहे आणि मी तिच्या शिवाय राहू शकत नाही.
आई--- आमचे तुझ्यावर प्रेम आहे त्याचे आम्ही काय करायचे? आणि एक मिनिटं जुलिया म्हणजे ती तर नाही ना जिच्यासोबत तु डान्स केला होतास?
मनोज--- हो तीच आहे.
बाबा--- पण ती तर शिवानी सोबत आली होती ना.
मेघना--- बाबा दादाने मला सांगितलं होतं की जुलिया त्याची मैत्रीण आहे आणि तिला भारतातील लग्न बघायचे होते म्हणून ती त्याच्यासोबत भारतात आली. जर दादाची मैत्रीण म्हणून ती लग्नात आली असती तर तुम्हाला चालले नसते आणि नातेवाईकांना चघळायला एक विषय मिळाला असता म्हणून मीच शिवानीला सांगितलं होतं की जुलियाला तुझ्यासोबत लग्नात घेऊन ये. दादाने मलाही खोटेच सांगितले होते. काल सकाळी जुलियाला हॉटेलमध्ये चक्कर आली होती म्हणून शिवानीने मला व दादाला बोलावून घेतले होते, आम्ही डॉक्टरांना बोलावले होते त्यावेळी आम्हाला डॉक्टरांकडून जुलिया प्रेग्नन्ट असल्याचे समजले आणि मग जुलियाने सांगितले की ती मनोज दादाची बायको आहे. सहा महिन्यांपूर्वी मनोज दादाने जुलियासोबत लग्न केले आहे.
बाबा--- देवा हे सगळं ऐकण्याआधी माझे डोळे का मिटले नाहीस?
मेघना--- बाबा तुम्ही अस नका बोलू, मला आईला तुमची गरज आहे. मला माहीत आहे की हा धक्का आपल्यासाठी खूप मोठा आहे, याची तीव्रता मला समजते पण बाबा अस खचून जाऊन कसे चालेल, आपल्यासमोर जी परिस्थिती आली आहे तिला आपल्याला खंबीरपणे सामोरे जावे लागेल.
आई--- मनोज हे काय करून ठेवलं आहेस? मेघना आपल्या नातेवाईकांना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना हे सर्व कळाल्यावर आपली किती नाचक्की होईल याची कल्पनाही मी करू शकत नाही. ताठ मानेने आपण रस्त्यावर फिरू शकणार नाही.
मेघना--- आई शरमेने मान खाली घालायला आपण काही कोणाचा खून केलेला नाहीये आणि लोकांच काय घेऊन बसली आहेस, थोड्या दिवस बोलतील आणि नंतर विसरून जातील. आपण या सगळ्याचा जास्त त्रास करून घ्यायचा नाही.
बाबा--- मेघना बाळा तुला आमच्या वेदना नाही कळणार, आयुष्यभर कमावलेली इज्जत एका झटक्यात या नालायकाने घालवली आहे. मी सर्वांना किती अभिमानाने सांगायचो, माझा मनोज अमेरिकेत राहतो पण माझ्या शब्दाबाहेर नाही, कधीच काही चुकीचे पाऊल उचलणार नाही. ( बाबांना बोलता बोलता कंठ दाटून आला)
मेघना--- बाबा स्वतःला सावरा, असे हतबल होऊ नका.
बाबा--- आज रात्री झोप तर मला लागणारच नाही पण मला थोड्यावेळ एकटे राहू द्या
एवढे बोलून बाबा रुममध्ये निघून जातात, बाबांच्या पाठोपाठ आई मनोज कडे रागाने बघत रुममध्ये जाते.
मेघना--- झालं तुझं समाधान, हेच हवं होतं ना तुला. आई बाबांना ठेच पोहचवून तुला खूप भारी वाटले असेल ना.
मनोज--- मेघना मला आई बाबांना दुखवायचे नव्हते. प्रत्येकवेळी बाबांच ऐकायला मी लहान राहिलो नाहीये. बाबांनी माझी बाजूही समजून घ्यायला हवी. मेघना प्रेम काही सांगून होत नाही.
मेघना--- दादा प्रेम सांगून होत नाही हे मला मान्य आहे पण प्रेमात पडलेला माणूस सारासार विचार करण्याची बुद्धी हरवून बसतो का? तु लग्न करताना एकदा तरी हा विचार केलास का की आपल्या लग्नात आपले आई बाबा, आपली बहीण असावी. तुला बाबांनी समजून घेतले असते पण तु त्यांना समजावण्याचा प्रयत्न केलास का?
मनोज--- मेघना मी कितीही काहीही सांगितलं तरी माझी बाजू कुणालाच पटणार नाही. सर्वजण मलाच चुकीचे ठरवतील.
एवढे बोलून मनोज त्याच्या रुममध्ये निघून जातो. सर्वजण आपापल्या रुममध्ये निघून गेल्यावर मेघना देवाच्या फोटोकडे बघत बडबडते, देवा हे काय वाढून ठेवले आहेस? ही अशी विचित्र परिस्थिती का उभी केलीस? दादाने चुक करूनही त्याला त्याची चुक मान्य नाहीये आणि आई बाबा जुलियाला सून म्हणून कधीच स्विकारणार नाही परिणामी आमचे कुटुंब तुटणार अशी भीती वाटत आहे. देवा ह्या परिस्थितीशी लढण्याची मला शक्ती दे.
©®Dr Supriya Dighe