आपण मागील भागात बघितलं, मनोजने लग्न केल्याची बातमी आई बाबांना सांगितली त्यावेळी आई बाबांना खूपच धक्का बसला होता.
रात्रभर घरातील कोणाचाच डोळ्याला डोळा न लागल्याने सगळेच जण सकाळी लवकर उठले. मेघना उठून आल्यावर तिने बघितले की आई गॅस जवळ उभी आहे, दूध उतू चालले आहे तरी आईचे गॅसकडे लक्ष नाही. मेघना पळत येऊन गॅस बंद करते. बाबा हॉल मध्ये कुठेतरी शून्यात बघत बसलेले असतात. मनोज गॅलरीत उभा असतो.
मेघना--- आई दूध उतू चालले होते, तुझे लक्ष कुठे आहे?
आई--- अग काही नाही, मी चहा ठेवण्यासाठी गॅस जवळ आले होते.
मेघना--- आई तु बाबांच्या शेजारी जाऊन बस, मी चहा करून आणते.
आई हॉल मध्ये बाबांच्या शेजारी जाऊन बसते थोड्याच वेळात मेघना सगळ्यांसाठी हॉलमध्ये चहा घेऊन येते.मेघना मनोजलाही चहा घेण्यासाठी बोलावते. सर्वजण एकत्र बसून चहा पितात पण कोणीच कोणाशी बोलत नाही. मनोज चहा पिऊन झाल्यावर बोलायला सुरुवात करतो.
मनोज--- आई बाबा मला माहित आहे की माझ्या हातून खूप मोठी चुक घडली आहे, मी तुम्हाला खूप दुखावले आहे.माझ्या अश्या वागण्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला आहे. माझ्या चुकीच्या बदल्यात मला काहीतरी शिक्षा द्या, मला मारा, बोला, रागवा पण असा अबोला धरू नका. आपल्या घरातील शांतता मला खायला उठते आहे. आई बाबा मला माफ करा.
मनोजच्या डोळ्यात पाणी आलेले असते.
बाबा--- (मोठ्या आवाजात) मनोज माफ करायचं म्हणजे काय तुझी चुक स्विकारायची असच ना. तुला शिक्षा करणारे आम्ही कोण? आमचा तुझ्याशी काय संबंध?
मनोज--- बाबा अस का बोलत आहात?
बाबा--- मग काय बोलू? तुझी आरती ओवाळू का? अरे आजूबाजूच्या लोकांना खरे काय आहे हे कळल्यावर ते आमच्या तोंडात शेण घालतील.
मनोज--- बाबा तुम्ही थोड्यावेळ तरी लोकांचा, समाजाचा विचार सोडून फक्त माझा, माझ्या मनाचा विचार करणार आहात का?
बाबा--- तु समाजाचा विचार करणारच नाहीस पण मला त्यांचा विचार करावाच लागेल कारण मला ह्या समाजात रहायचे आहे.
मनोज--- बाबा एकदा मला समजून घ्याना, बाबा जुलिया ही खूप चांगली मुलगी आहे, तिला एकदा भेटून बघा, तुम्हाला ती नक्की आवडेल.
बाबा--- हे बघ मनोज मला तुझ्या बायकोला भेटण्यात काहीच रस नाहीये, आता मी जे काही सांगतो ते शांतपणे सगळ्यांनी ऐकायचे आहे, माझे मत बदलण्याचा किंवा मला समजावण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. मनोज तुझ्या जे बुद्दीला, मनाला पटले तसा तु वागलास. तुला जे करायचे होते ते तु केलेस. आता माझा अंतिम निर्णय ऐक, हा जो तु चहा पिलास हा माझ्या घरातील तुझा शेवटचा चहा होता, आजपासून मी अस समजेल की मी फक्त एका मुलीला जन्म दिलेला आहे, मला मनोज नावाचा मुलगा कधीच नव्हता, माझ्या घरात परत पाऊल ठेवायचे नाही, आजपासून आमचा आणि तुझा संबंध संपला, तु तुझ्या आयुष्यात सुखी रहा, आम्ही आमच्या आयुष्यात सुखी राहतो. ( मेघना व तिच्या आईकडे बघून) आणि ह्या घरातील कोणाला जर तुझ्याशी काही संबंध ठेवायचा असेल तर त्यांना ह्या घरात जागा नाही. पुढच्या दहा मिनिटात तु माझ्या घरातून गेला पाहिजे.
एवढे बोलून बाबा रुममध्ये निघून गेले, मेघनाच्या व आईच्या डोळ्यात पाणी येते, मनोज आईकडे व मेघनाकडे बघतो.
मनोज--- आई मी निघतो, तुझी काळजी घे, मेघना आयुष्यात पुढे जाऊन जर माझी मदत लागली तर मला हक्काने फोन कर हा दादा तुझ्या मदतीसाठी हजर असेल.
एवढे बोलून मनोज रूममध्ये जाऊन त्याचे सामान घेऊन येतो आणि आईला नमस्कार करून घराबाहेर पडतो.
पुढचे काही दिवस घरातील वातावरण तंग असते. घरात कोणीच कोणाशी फारसे काही बोलत नसायचे. मेघना कंपनीत जायला लागली होती पण तिच्यात पहिल्या सारखा कामाचा उत्साह राहिला नव्हता. मेघना आदित्य सोबत अंतर ठेवून वागू लागली होती. आदित्य सोबत बोलणे टाळू लागली होती. आदित्यला समजत नव्हते की नक्की मेघनाला काय झाले असेल? म्हणून आदित्यने मेघनाला कंपनी सुटल्यावर थांबायला लावले होते.
ठरल्याप्रमाणे कंपनी सुटल्यावर मेघना आदित्यची वाट पाहत थांबलेली असते. आदित्य तिला गाडीत बसवतो आणि एक शब्दही न बोलता गाडी जोरात चालवत असतो.
मेघना--- आदित्य गाडी हळू चालव, आपण कुठे चाललो आहोत हे तर सांग.
आदित्य--- तु हल्ली काही सांगतेस का तर मी तुला का सांगू?
मेघना--- आदित्य निदान तु तरी माझी मनस्तिथी समजून घे.
आदित्य--- तु काही सांगितले तर मला समजणार आहे ना. मी काही देव नाही तुझ्या मनातलं सर्व ओळखायला. एक तर काही झालेले नसताना तु मला टाळत आहेस , माझ्याशी नीट बोलत नाहीये.( आदित्यने बोलता बोलता गाडी रस्त्याच्या कडेला घेतली) मेघना मी तुझ्यावर प्रेम केले हा माझा गुन्हा आहे का?
मेघना--- आदित्य अस नको बोलूस, गेल्या काही दिवसांपासून घरात जे वातावरण आहे ना त्यामुळे मला कोणाशीच बोलायची इच्छा राहिली नाहीये.
आदित्य--- मेघना काय झालंय?
मेघना--- आदित्य आई बाबांना मनोज दादाने लग्न केल्याबद्दल सांगितल्यावर बाबांनी मनोज दादाला घरातून हाकलून दिले, त्याच्याशी सर्व संबंध तोडले. आईला बाबांचा हा निर्णय पटलेला नाहीये पण ती बाबांचा विरोध करू शकली नाही. माझी आई मनाने खूप हळवी आहे, ती दादाच्या खूप क्लोज होती. जे घडलंय ते आई बाबा दोघांनाही पचवायला खूप जड जात आहे. आमच्या घरात एकमेकांमध्ये कमीत कमी संवाद होत आहे. आई बाबा दोघेही खचले आहेत.
आदित्य--- आपल्या लग्नाबद्दल बाबा पुढे बोलणार होते त्याचे काय झाले?
मेघना--- आदित्य आत्ताची परिस्थिती खूप वेगळी आहे, जोपर्यंत बाबा स्वतःहून काही बोलत नाही तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही.
आदित्य--- तुझ्या आईला बाबांशी बोलायला लाव, माझ्या आईला आपल्या लग्नाची घाई झाली आहे, तिने बाबांना तुझ्याबद्दल सांगितले आहे, माझ्या घरी सर्व तयार आहेत, तुझ्या घरचे तयार झाले पाहिजेत. तु काही पुढाकार घेऊ शकत नाही का?
मेघना--- आदित्य मी आईसोबत बोलून तुला सांगते. आदित्य आपलं लव्ह मॅरेज आहे हे कळाले नाही पाहिजे नाहीतर बाबा आपल्या लग्नाला कधीच होकार देणार नाही.
आदित्य--- हो ग बाई मला समजत आहे पण काय करू तुझ्यापासून दूर राहणे शक्य नाही होतं. किती दिवस अस बाहेर गुपचूप भेटायचे आणि एकतर तु घरी थोडं काही झालं की माझ्याशी बोलणे सोडून देते.
मेघना--- आदित्य माझीही परिस्थिती तुझ्यापेक्षा वेगळी नाहीये. तुझ्याशी बोलायला काही नाही रे पण मलाच वाटतं राहत की सतत काय आपलं रडगाणे गात रहायचे म्हणून मी तुझ्याशी जास्त बोलत नाही.
आदित्य--- मेघना तु माझ्याशी बोलली नाहीतर माझी खूप चिडचिड होत राहते आणि मग मी काहीपण बोलून जातो.
मेघना--- आदित्य फक्त थोडे दिवस मग आपल्याला सोबतच रहायचे आहे. आपण आता निघुयात का? आई वाट बघत असेल.
आदित्य मेघनाला तिच्या घरी सोडायला जातो, वाटेत त्यांना मेघनाची आई भेटते, आदित्य गाडी थांबवतो, मेघनाची आई गाडीत बसते.
आदित्य--- काकू कशा आहात?
मेघनाची आई--- मी ठीक आहे, तु बऱ्याच दिवसात घरी आला नाहीस?
आदित्य--- काकू सध्या कंपनीत काम खूप वाढले आहे वेळच भेटत नाही. काकू तुम्ही एकदा काकांसोबत आमच्या लग्नाबद्दल बोलून घ्याल का?
मेघनाची आई--- तुला मेघनाकडून कळलंच असेल की आमच्या घरात सध्या वेगळेच वादळ उठलेले आहे. येत्या एक दोन दिवसांत मी मेघनाच्या बाबांशी बोलून घेते आणि मग तुझ्या आईला फोन करून कळवेल.
आदित्य मेघना व तिच्या आईला त्यांच्या घराजवळ सोडतो आणि तो निघून जातो.
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा