Login

चहा आणि बरंच काही भाग ३८

Story of love and friendship

आपण मागील भागात बघितलं, मेघनाने आदित्यशी लग्न न करण्याचा निर्णय शिवानीला व आईला सांगितला तर आदित्यने मेघनाचा निर्णय आई बाबांना सांगितला. मेघनाने तिच्या बाबांना सांगितले की तुम्हाला आवडलेल्या मुलाशी मी लग्न करायला तयार आहे तर आदित्यनेही त्याच्या आईला लग्नासाठी मुली शोधायला सांगितल्या.

आता बघूया पुढे काय घडते...

दुसऱ्या दिवसापासून आदित्य व मेघनाची भेट कंपनीत व्हायची पण ते एकमेकांशी फक्त कलीग म्हणूनच वागत होते, ते दोघे एकमेकांसमोर येणे शक्य तितके टाळायचे. त्या दिवसापासून आदित्यने मेघनाकडे एकदाही डोळे भरून बघितले नसेल. शिवानीने काही दिवसांतच कंपनी सोडली, तिचे संकेत सोबत US मध्ये लग्न होणार असल्याने ती आई वडिलांसोबत US ला निघून गेली. विद्या व वैभवने अनेकदा मेघना व आदित्यला त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती केली पण ते दोघेही आपल्या निर्णयावर ठाम होते.

मेघनासाठी तिच्या बाबांनी बरीच मुले बघितली पण त्यांना स्वतःलाच एकही मुलगा पसंत पडत नसे. आदित्यच्या आईनेही त्याच्यासाठी खूप मुली बघितल्या पण एकही मुलगी त्यांना त्यांच्या मनासारखी भेटत नव्हती.

काही दिवसांनी आदित्यने त्याची बदली दुसऱ्या डिपार्टमेंटला करून घेतली जेणेकरून त्याला मेघना नजरेस पडणार नाही. अलीकडे मेघना अबोल झाली होती, ती कंपनीत किंवा घरीही फारशी कोणाशी काही बोलत नसायची. आपले काम भले आणि आपण असा पवित्रा मेघनाने घेतला होता.मेघनाच्या आईला तिच्यात झालेला बदल कळत होता, मेघनाच्या मनाला किती यातना होत असतील हे कळत होते पण परिस्थिती पुढे आई हतबल झाली होती.

काही महिन्यांनी कंपनीकडून आदित्यला US ला सहा महिन्यांसाठी जाण्याची ऑफर आली, याआधीही ही ऑफर आदित्यला अनेकदा आली होती पण प्रत्येक वेळी घरापासून दूर रहायचे नाही म्हणून त्याने ती ऑफर स्विकारली नाही मात्र यावेळी मेघनाला विसरणे सोपे जाईल म्हणून US ला जाण्याची ऑफर आदित्यने लगेच स्विकारली. आदित्यने US ला गेल्यावर स्वतःला कामात गुंतवून घेतले. एके दिवशी आदित्यची शिवानी व संकेत सोबत भेट झाली. शिवानीने संकेत व आदित्यची ओळख करून दिली. संकेतने आदित्यला घरी जेवणासाठी आमंत्रित केले. तसेही आदित्यला घरच्या जेवणाची आठवण येतच होती म्हणून आदित्यने संकेतचे आमंत्रण स्विकारले. आदित्य व संकेत मध्ये हळूहळू चांगली मैत्री झाली होती. आदित्यचे संकेतच्या घरी येणे जाणे वाढले होते. शिवानीने आदित्य समोर बरेचदा मेघनाचा विषय काढण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी आदित्य तो विषय टाळायचा. आदित्यच्या बोलण्यावरून वागण्यावरून शिवानीला हे कळून चुकले होते की अजूनही आदित्य मेघनाला विसरू शकला नाहीये.

सहा महिने भुर्रकन उडून गेले. शिवानीला US ला येऊन जवळ जवळ एक वर्ष होत आले होते,तिला घरच्यांची खूप आठवण येत होती. आदित्यचे तेथील कामाचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यालाही भारतात परतावे लागणार होते. संकेतने शिवानीला सांगितले की "आदित्यही भारतात चाललाच आहे तर तुही त्याच्यासोबत जा आणि काही दिवस तिथे राहून, सगळ्यांना भेटून परत ये"

घरी अचानक जाऊन सर्वांना सरप्राईज देता येईल म्हणून तिने ती भारतात येणार असल्याचे कोणालाच सांगितले नाही. शिवानी आदित्य सोबत भारतात परतली. तिने घरी जाऊन तिच्या घरच्या लोकांना अनपेक्षित सरप्राईज दिले. शिवानीला मेघनाला भेटण्याची आणि तिला सरप्राईज देण्याची तयारी चालू केली. शिवानीने मेघनाला मॅसेज केला," मेघना जिथे असशील तिथून ताबडतोब माझ्या घरी जा, आई चक्कर येऊन पडली आहे, बाबाही घरी नाहीयेत. मला शेजारच्या काकूंनी फोनवर सांगितले की आई बरी आहे पण मला खूप काळजी वाटत आहे प्लिज तु घरी जा आणि मला फोन करून तिथली सत्य परिस्थिती सांग"

शिवानीचा असा मॅसेज पाहून मेघनाच्या पोटात भीतीने गोळा उठला. मेघना त्यावेळी कंपनीत होती, सुट्टी व्हायला अजून दोन तास अवधी होता, तोपर्यंत मेघनाला धीर निघाला नसता म्हणून तिने सरांना घरी इमर्जन्सी आहे असं सांगून कंपनीतून निघाली, बसची वाट बघण्यात वेळ न दवडता तिने स्पेशल रिक्षा केली, वाटेत मेघना देवाचा धावा करत होती, ती देवाला सांगत होती की हे देवा काकूंना काही होऊ देऊ नको. रिक्षा शिवानीच्या घरासमोर येऊन उभी राहिली. मेघना घाईघाईने रिक्षातून खाली उतरली, रिक्षावाल्याला पटकन पैसे दिले आणि तिने शिवानीच्या दरवाजावरची बेल वाजवली. पहिल्या बेल मध्ये उघडणारा दरवाजा आज तीन बेल वाजल्यावरही उघडत नाही म्हणून मेघनाला खूप जास्त भीती वाटत होती, तिला दरदरून घाम फुटला होता. मेघना चौथ्यांदा बेल वाजवणार इतक्यात दरवाजा उघडला गेला तर समोर मेघनाला शिवानी नजरेस पडली. मेघना शिवानीकडे आ वासून बघत होती आणि शिवानीने मात्र मेघनाला लगेच मिठी मारली. मेघनाला दोन मिनिटं काय चालू आहे हेच कळाले नाही.

मेघना--- ( जोरात ओरडली) शिवानी तु! इथे कशी?

शिवानी---( ओठावर आलेले हसू दाबत) मेघना हळू बोल, आजूबाजूचे लोकं जमा होतील. 

मेघना--- काकू कश्या आहेत? आणि तु इथे कशी?

शिवानीची आई किचनमधून बाहेर आली

शिवानीची आई--- मी ठणठणीत बरी आहे. मला काही झाले नाही, शिवानीला तुला सरप्राईज द्यायचे होते म्हणून तो मॅसेज केला होता.

मेघनाने शिवानीकडे रागाने पाहिले आणि तिने शिवानीला मारायला सुरुवात केली.

मेघना--- शिवानी मी किती घाबरले होते, अस कोणी सरप्राईज देतं का? तु अचानक कशी काय आलीस?

शिवानी--- अग खूप दिवसांपासून तुमच्या सर्वांची आठवण येत होती. आदित्य सर परत यायला सोबत होते मग संकेतच म्हणाला की तु आदित्य सोबत जाऊन थोडे दिवस भारतात राहून ये.

मेघना--- आदित्यचा आणि तुमचा काय संबंध?

शिवानी--- ते मी तुला सर्व सांगते, आपण माझ्या रुममध्ये जाऊन गप्पा मारत बसू. आई आमच्यासाठी मस्त कॉफी बनव.

मेघना--- काकू मी कॉफी नाही घेत, माझ्यासाठी चहा करा.

शिवानी मेघनाकडे आश्चर्यचकीत होऊन बघत होती. मेघना व शिवानी रुममध्ये जातात.

शिवानी--- तुला आदित्यचा विषय काढलेला आवडणार नाही म्हणून मी याआधी तुला सांगितले नाही. आदित्यची व आमची भेट एके दिवशी मॉल मध्ये झाली. संकेत व आदित्यमध्ये खूप छान मैत्री झाली त्यामुळे त्याचे आमच्या घरी येणे जाणे वाढले होते.

मेघना--- ओके,बरं झालं आधी सांगितले नाही. बाकी काय म्हणतेस? वैवाहिक आयुष्य कसे चालू आहे? 

शिवानी--- मजेत. सर्व अस स्वप्नवत घडत आहे. संकेत खूप भारी आहे ग, तो माझ्यावर खूप प्रेम करतो. माझे सर्व हट्ट पुरवतो.

मेघना--- चला तुला तरी पाहिजे ते सर्व मिळाले. शिवानी तु संकेतसोबत किती खुश आहेस हे तुझ्या चेहऱ्यावरून समजतच आहे.

शिवानी--- मेघना तुला राग नसेल येणार तर एक प्रश्न विचारू?

मेघना--- तुला कधीपासून माझ्या परमिशनची गरज लागायला लागली? विचार ना

शिवानी--- मेघना तु आदित्यला विसरली आहेस? तुझे आदित्यवर प्रेम नाही?

मेघना--- शिवानी आदित्य हा विषय संपून एक वर्ष पूर्ण झाले आहे, त्याच्या बद्दल आत्ता बोलून काय उपयोग?

शिवानी--- मेघना तु सर्वांशी खोटं बोलशील पण माझ्याशी तुला खोटं बोलता येत नाही. तुम्ही दोघेही कबूल करत नसाल तरी अजूनही तुमचे एकमेकांवर प्रेम आहे हीच सत्य परिस्थिती आहे.

मेघना--- शिवानी मला आदित्यच्या मनात काय आहे हे माहीत नाही किंवा मला त्याच्याशी काही देणे घेणेही नाही. पण माझ्या साईडने मी क्लीअर आहे, माझे आदित्यवर प्रेम नाहीये.

शिवानी--- मेघना आदित्य तुझा विषय टाळतो, तुझ्याबद्दल तो चांगलंच काय वाईट पण बोलत नाही. आता मला एका प्रश्नाचे खरेखरे उत्तर दे. अगदी कालपर्यंत तुला कॉफी प्यायला आवडत होती आणि मग आज का तुला चहा प्यायला आवडत आहे? कॉफी वरून चहा हा बदल कसा झाला? आदित्यला चहा आवडायचा म्हणूनच तु चहा पितेस ना? हे प्रेम नाहीतर काय आहे?

मेघना--- शिवानी माणसाची आवड कालांतराने बदलत चालते. अश्या अनेक गोष्टी आहेत की ज्या मला लहानपणी आवडत नव्हत्या त्या मला आत्ता आवडायला लागल्या आहे. त्याचा आणि प्रेमाचा काय संबंध?

शिवानी--- मेघना तु वास्तविकता स्विकारतच नाहीये. तु त्याच्या आठवणीत चहा पित आहेस आणि तो तुझ्या आठवणीत कॉफी पित आहे. पण तुम्ही दोघेही मान्य करू नका की तुमचे अजूनही एकमेकांवर प्रेम आहे.

मेघना--- शिवानी मी आत्ता निघते, अजून मी थोड्या वेळ जरी इथे थांबले तरी आपल्यात भांडण होईल आणि ते मला नको आहे.

शिवानी--- मेघना मी तुला अडवणार नाही. मी तुझी एक चांगली मैत्रीण आहे म्हणून तुला आरसा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. अजूनही आपल्या हातातून वेळ गेलेली नाहीये. एकदा पुन्हा माझ्यासाठी प्लिज आदित्यचा विचार कर.

मेघना शिवानीला काहीच उत्तर न देता निघून जाते.

©®Dr Supriya Dighe